Wednesday, August 4, 2010

शांतारामाची कहाणी



पुस्तक : शांताराम



अनुवादक : वेलणकर अपर्णा


भाषा: मराठी


आवृत्ती: प्रथम


किंमत: 990.00


प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस


 
 
काल पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी शांताराम (अर्थातच मराठी) वाचून संपवली. पुस्तकाची किंमत ९९० रू. म्हणजे कैच्या कैच. म्हणून उधारी-उसनवारीवर आणलेले पुस्तक लवकर परत देण्यासाठी अंमळ भरभरच पाने खाल्ली. हे जरी सत्य असले, तरी कादंबरीने मला खिळवून ठेवले होते हा भागही दुर्लक्षित करता येणार नाही. नेहमी हे प्रकरण झाल्यावर पुस्तक खाली ठेवू असे ठरवायचे आणि पुन्हा नवीन प्रकरण आता हे झाल्यावर नक्की बंद करू म्हणून हातात घ्यायचे. Smile




थोडक्यात कथानक: *शांताराम ही खुद्द ग्रेगरी रॉबर्टस यांच्या आयुष्यावरच आधारीत कादंबरी असल्याची चर्चा आहे. किमान त्यातला काही भाग तरी त्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे हे नक्की. कादंबरीचा नायक लीन ऑस्ट्रेलियात गुन्हेगार आहे नि हेरॉईनचा व्यसनी. ऑस्ट्रेलियात शिक्षा झालेली असताना तुरूंग फोडून तो बाहेर पडतो आणि भारत गाठतो. मुंबईत आल्यानंतर तो इथेच रहातो. इथलाच टॅक्सी ड्रायव्हर प्रभाकर त्याला मुंबईचे खरे स्वरूप दाखवतो. प्रभाकरच त्याला धारावीत राहायला घर मिळवून देतो. त्याला सहा महिने स्वत:च्या गांवी घेऊन जातो. तिथे राहून लीन मराठी शिकतो. झोपडपट्टीत मराठीअरोबरच हिंदीही शिकतो. इथल्या वातावरणाशी लीन समरस होऊन जातो. मधल्या काळात कार्लाशी त्याचे प्रेम जमते. पण अनेक उपकथानकांचा प्रवास करून आणि अनेक वळणे येऊनही लीनची गाडी पुन्हा गुन्हेगारी वर्तुळावरच धावू लागते. अखेरीस तो मुंबई पोलिसांच्या हाती लागतो. त्याला तुरूंगात टाकतात. तिथे त्याचा बराच छळही होतो. तिथून सुटल्यानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारी वर्तुळ त्याला खुणावतो. त्यातूनच तो अफगाणिस्तानात जातो. तिथून पाकिस्तान पुन्हा मुंबई आणि मग श्रीलंका हा सगळा प्रवास गुन्हेगारी पायवाटेवरच होतो. या काळात तो मुंबईच्या तत्कालीन माफियांच्या संपर्कात असतो. या काळात तो बनावट पारपोर्ट तयार करणे, सोन्याचे स्मगलिंग, परकीय चलनाचा काळाबाजार, चित्रपट सृष्टीत एक्स्ट्रा म्हणून फॊरेनर्स मिळवून देणे या सगळ्या गोष्टी करत असतो.



पुस्तकाची सुरूवात ग्रेगरीच्या मनोगताने होते.त्याला भारतीय भाषांत मराठीत सर्वप्रथम अनुवाद झाल्याबद्दल आनंद आहे. त्याला मराठी येते हे त्याने सर्वत्र नमूद केलंय. तो पोलिसांसोबत मुद्दाम मराठीत बोलतो, प्रभाकरच्या आईशी मराठीत बोलतो. आणि म्हणूनच जेव्हा कादंबरीचे मराठी संस्करण निघत होते, तेव्हा तो अनुवाद मराठीशी इमान राखणारा असावा असेच त्याला वाटत होते. अनुवादकर्तीचे पाणी जोखताना तो एक मित्र दुसया मित्राशी मराठीत कसे बोलेल हा प्रश्न अपर्णाबाईंना विचारतो.. आणि अपेक्षित ’भ, म’ काराची भाषा आल्यावर त्याला खात्री पटली की या बाई नुसते भाषांतर करणार नाहीत, तर त्याला छान मराठी रूपडं बहाल करतील.



पुस्तक वाचण्यापूर्वी त्याबद्दल बरंच वाचलं/ऐकलं होते. काही लोकांच्या मते, स्वत: रॉबिन हूड असल्याच्या थाटात तो मुंबईत केलेल्या कारनाम्यांच्या कथा सांगत राहतो. असे असताना मुद्दाम जाऊन आपण आपल्याच देशाची निंदा का वाचायची हा एक सूर त्यात होता. एका प्रसंगात लीन डिडिअर नावाच्या एका माणसाला तू मुंबईत का राहतोस असे विचारल्यावर,

“मी गुन्हेगार आहे, ज्यू आहे, गे आहे आणि ड्रग अ‍ॅडिक्ट आहे. जगातले दुसरे असे कोणते शहर आहे की जिथे मला या चारही गोष्टींसह स्वीकारले जाईल, आणि मला स्वतंत्रपणे जगता येईल?”

असे तो मित्र उत्तर देतो. क्षणभर वाटलं, हीच का भारताची/मुंबईची आंतरराष्ट्रीय/गुन्हेगारी जगतात ओळख??? कुणीही यावे, कसाही कायदा मोडावा, पैसे चारावेत आणि कामे करून/करवून घ्यावीत!!!! पण जेव्हा जेव्हा अशी तुलना करायची वेळ येते, तेव्हा तो लगेच ऑस्ट्रेलियातले संदर्भ देऊन फक्त भारतातच बेजबाबदारपणा आणि भ्रष्ट्राचार चालतो असे नाही हे सांगतो. मुंबईत हे सगळे चालू शकते कारण इथले लोक मेंदूपेक्षा हृदयाने विचार करतात, जीव लावतात, जीवाला जीव देतात. त्यामुळे तो मुंबईची निंदा करतोय असे वाटत नाही. इथल्या घाणीचे, भ्रष्टाचाराचे वर्णन आहे. पण प्रत्येक ठिकाणी एकदा जीव लावला की लोक कसे मागेपुढे न पाहता मदतीला तयार होतात हेच तो सांगत राहतो.. या भारतीय मर्मानंच त्याला इथे खिळवून ठेवलं.. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तो भारतीय लोकांच्या या मनोवृत्तीचे कौतुक करत राह्तो. मग ती धारावीतली झोपडपट्टी असो किंवा गोव्यात त्याला भेटलेला खाणावळवाला.



पुस्तक वाचता वाचताच कुणीतरी सांगितले होते की त्याची टीव्हीवर मराठीत मुलाखत दाखवली होती. थोडी उत्सुकता होतीच, की तो कसा बोलत असेल? म्हणून यूट्यूब वर व्हिडिओज शोधले. जस्ट पूजा या कार्यक्रमात पूजा बेदीने घेतलेल्या मुलाखती सापडल्या. त्याच पाहिल्या कारण त्यात तो मराठी/हिंदी बोलण्याची शक्यता अधिक होती. तो म्हणतो की हिंदी/मराठी बोलण्याची गेल्या १४ वर्षात सवय राहिली नाही. पण तरीही तो मधून मधून जे काही बोलला, त्यात सफाई होती. “तुज्ये नांव काय??? तू कोण?” विचारल्यावर त्याने एकाला, “माज्यं नांव? माज्यं नांव शांताराम हाय. मी तुज्या दुष्मन हाय” असे त्याने सांगितल्याची आठवण त्याने सांगितलीय. यावर तो समोरचा त्याला, “च्यांगलं च्यांगलं.. लय लय च्यांगलं” असेही म्हणाला म्हणे. हे बोलताना तो शब्दांशी झगडतोय असेही नाही वाटले. निदान त्या मुलाखत घेणार्‍या पूजा बेदी पेक्षातरी त्याचे उच्चार नक्कीच चांगले होते. मुलाखतीत पुढे जाऊन त्याने कादंबरीत नाट्यमयता आणण्यासाठी बरेच नवीन संदर्भ, कहाण्या घुसडल्या आहेत असेही सांगितले. उदा. कादंबरीत उल्लेखलेला ’सपना’ असा कुणी अस्तित्वात नव्हता, कादंबरीची नायिका ’कार्ला’ अशीही कुणी व्यक्ती अस्तित्वात नव्हती परंतु, त्याला प्रेम वाटेल अशा बर्‍याच मुली त्याला भेटल्या होत्या आणि ही कार्ला म्हणजे त्यांचेच एक रूप. पण इतर गोष्टी, जसे महाराष्ट्रातील एका वीज/पाणी सारखी सुविधा नसणार्‍या खेड्यात तो सहा महिने राहिला होता, तो माफियांसोबत अफगाणिस्तानला गेला, उर्दू नि पश्तूही चिकला, त्याला अरेबिक लिपी येते हे सगळे खरे आहे असेही त्याने सांगितले. मुलाखत मी पुस्तक वाचून झाल्यावर पाहिली, तरी मला कादंबरी अगदीच अतर्क्य, फिल्मी छापाची वाटली नाही.



मूळ पुस्तक चांगले की अनुवाद? खरेतर हे उत्तर प्रत्येक पुस्तकासाठी सापेक्ष असू शकते. मी दा विंची मूळ इंग्रजीतून वाचले, त्यानंतर मला मराठी पुस्तक हातात देखील धरवले नाही. चित्रपट पाहिला, पण त्यात मूळ पुस्तकाचे गारूड जाणवलं नाही. या अनुवादाबद्दल बोलायचे तर, अपर्णा वेलणकरांचे अनुवाद मला आवडतात. हे पुस्तकही नुसता शब्दश: अनुवाद व्यक्त करत नाही, तर त्यातून वेगळा असा आशयही सांगते. अपर्णाबाईंनी ग्रेग्ररीला मराठीतून काय म्हणायचे असेल, हे अगदी शेलके आणि मराठी शब्द वापरून लिहिलेय. पण तरीही मध्येच मराठीत लिहिलेली इंग्रजी वाक्ये खटकतात.. निखिल म्हणतो तसे मूळ पुस्तकात इंग्रजी संवादात मध्येच हिंदी/मराठीत बोललेली वाक्ये मूळ त्याच भाषांत येतात, तो बाज सांभाळण्यासाठी तिने ते केलेले असेलही कदाचित. पण असे इंग्रजी मराठीत वाचणं मला व्यक्तिश: आवडत नाही.

पुस्तकाच्या एकूण प्रभावाबद्दल सांगायचं तर, मी पहिल्यांदाच वाचलं, त्यामुळे मला हे पुस्तक आवडलं. आवडलं यासाठी कारण त्यात एक परदेशी माणूस भारतात येतो. खुशाल इथे राहतो, जिथे पाऊल ठेवण्याची मी स्वप्नातही कल्पना करणार नाही अशा झोपडपट्टीत राहतो, भारतातल्या भारतातच आपण स्वत:भोवती भाषा-प्रदेशाची बंधने घालून घेतो.. तर हा बिन्धास्त त्या आत्मसात करतो. मला स्वत:ला हे कथन म्हणजे काही स्वत:ला रॊबिनहूड समजून केलेले लेखन असे नाही वाटले. एकंदरीत सगळे अनुभव त्याने चांगले मांडले आहेत. मात्र पुढच्या वेळेस वाचायला पुस्तक तितकेच इंटरेस्टिंग नाही राहणार. त्यामुळे वन टाईम रीडींगसाठी ठीक आहे.. आणि स्वत: खरेदी करून तर अगदी नो नो कॆटेगरीमध्ये.



* सदर मजकुर भाग वेबदुनियाच्या एका पानावरून उचलला आहे.
अधिक चर्चा आपण पुस्ताक्विश्ववर पाहू शकता.