Tuesday, April 22, 2014

ट्रंक, संदूक, इत्यादी..

एकंदरीतच, स्मृती म्हणजे बत्तीस मोगरी*. कुठे कसे काय गुपित कुठे दडले असेल याचा नेम नाही. परवा पिझ्झा एक्सप्रेसच्या रेस्तरां मध्ये सजावटीसाठी वापरलेल्या ट्रंका पाहून मेंदूतल्या सुरकुत्यांची बरीचशी उलथापालथ झाली. स्मरणरंजनाचा दोष मान्य आहे.  पण आठवणींवरती खरंच ताबा नसतो, त्या कधीही-कुठेही येऊ शकतात.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 

आजोळी आमचं आणि माझ्या सहा चुलताअजोबांची सहा  अशी सगळी घरं पाठीला पाठ लावून आजही तश्शीच आहेत. गोठा, त्यानंतर अंगणवजा रस्ता, कमरभर उंचीचे जोते, ऐसपैस सोपा, स्वयंपाकाची खोली आणि मग आत आणखी एक अंधारी खोली. तिला माजघर म्हणतात हे शाळेत गेल्यानंतर पुढे कधीतरी कळालं. मागे परसात जास्वंदीखाली थंडगार पाण्याचा रांजण आणि मग शेवगा, रामफळ, सीताफळ, पेरू या झाडांसोबत सुखात नांदत असलेली विलायती चिंचांची कैक झाडं.

इतकं असलं तरी त्या काळात आम्हा सगळ्यांनाच माजघरातल्या एका कोपर्‍याचं गूढ आकर्षण होतं. तिथे एक भली मोठी संदूक होती. लहान मुलीच्याने एकटीला उचलणार नाही इतक्या जडशीळ झाकणाची. हळूहळू सवयीनं आणि मोठ्या भावंडांनी शिकवलेल्या क्लृप्त्यांमुळे ते झाकण उघडण्याची कला लीलया जमू लागली. निगुतीनं ठेवायच्या सगळ्या गोष्टी इथंच ठेवलेल्या असत. आजीचं मंगळसूत्र वेगळंच होतं. खूप सार्‍या काळ्या मण्यांमध्ये पेटी, चंद्र-तारे आणि फुले गुंफलेलं. ती त्याला डोरलं म्हणे. आंघोळीला जाताना हे डोरलं या संदुकीतच ठेवलेलं असे. हातावरच्या भाकरीइतकी जाड साय असलेलं दूध, ताकाची घट्ट झाकण लावलेली बरणी, गाडग्यातलं दही. तिथेच बाजूला सोललेल्या चिंचांमध्ये खडे मीठ घालून ठेवलेलं.  आम्ही कधीही आलो तरी पटकन खायला काहीतरी असावं म्हणून आजीने मोठ्या आकड्याने काढलेल्या विलायती चिंचा, झाडं पुष्कळ असली तरी बाळगोपाळांच्यामुळे क्वचितच हाती येणारी परसातली फळं, एक ना दोन. झालंच तर अत्यंत नाजूक नक्षीकाम असलेले काचेचे वाडगे आणि भली मोठी काचेचीच फुले ल्यायलेली तसराळी. यापूर्वी अशी भांडी फक्त एके ठिकाणी ईदला गेल्यावरच पाहिलेली. त्यामुळे असल्या भांड्यांचा आमच्या घरात काय उपयोग हे तेव्हाचं मोठं कोडं होतं. संदुकीचं झाकण उघडलं की या सगळ्यांचा छान संमिश्र वास यायचा. कधीकधी हळूच काही घेताना सांडलवंड होणं आणि मग आजीचं लटकं रागावणं  हे तर अगदी ठरलेलं. आजोळ म्हणजे ती संदूक आणि संदूक म्हणजेच आजोळ वाटावं इतकी ती पेटी जवळची वाटे. पुढे सुरतेची लूट वाचताना मिठाईंचे पेटारे म्हणून आपल्या घरातल्या संदूकेसारख्याच पेट्या मावळ्यांनी वापरल्या असल्या पाहिजेत अशी माझी पक्की खात्री होती. माझ्या आई-मामाच्या तरूणपणी फोटो काढायाची तितकीशी पद्धत आणि ऐपत नसावी. घरी संदुकीच्यावरच्या बाजूला खिळ्याला मामाचा एक फोटो होता. साखरकारखान्याच्या कुठल्याशा समारंभाला यशवंतराव चव्हाण आले होते तेव्हाच्या गर्दीत मामा एका कोपर्‍यात उभा असलेला. माझा मामा मला कळत्या वयात फक्त तिथेच भेटला. नाही म्हणायला थोडं थोडं अंधुकसं आठवतं. धोतर, काळी गोल टोपी आणि कोट घातलेला, हातात छत्री असलेला मामा. मला खांद्यावर फिरवून आणणारा मामा आणि नंतर त्या फोटो मान तिरकी करून ऐटीत उभा असलेला मामा. मामा गेला आणि  आजीने  तो फोटोही नंतर त्या संदुकीत पार आत ठेवून दिला.

लहानपणी घरातल्या ट्रंका नेहमी मला अलीबाबांच्या गुहा वाटत. त्यांच्या पोटात लपलेली कुतूहलं पाहायला मी सतत मध्येमध्ये लूडबूड करी. वरचे गल्लीला (आजोळ आणि घर त्याच गावात असल्याने वरचे गल्ली म्हणजे आजोळ आणि पागा गल्ली म्हणजे आमचे घर) संदुकीनंतर नंबर यायचा तो एका ट्रंकेचा. ती ट्रंक म्हणजे माझ्या आईच्या शाळेच्या आठवणींचं भांडार होतं. जुनाट पिवळ्या पडलेल्या पानांच्या वह्या, आईच्या मोत्यासारख्या अक्षरांत लिहिलेली शालागीतं आणि प्रार्थना. या वह्यांसाठी कसे पैसे जमवले आणि बारा आण्यांना तेव्हा कसं बरंच काही मिळायचं हे सगळं सांगत ती हरवून जायची. तिला शाळेत असताना शिवण आणि विणकाम होतं. अत्यंत तलम आणि नाजूक क्रोशांचे तीन रूमाल आणि एक मफलर त्या ट्रंकेत होता. त्या धाग्यांच्या लडी विकत आणणं ही तिच्यासाठी भलेमोठी चैन होती. तिची असोशी पाहून मी ते सगळं विणकाम आणि तिची एकेकाळची होमगार्डची टोपी आपण आपल्या घरी नेऊयात म्हणून हट्ट करायचे. आपल्या कष्टाचं चीज नसलेल्या सासरी नेऊन त्यांचा काहीच उपयोग नाही हे तिला आताशा पुरतं माहित झालं होतं. मग ती खिन्नपणे हसून उदासवाणा नकार देई. एक ना एक दिवस ती हो म्हणेल म्हणून मी प्रत्येक वेळेस ते रूमाल मागत राहिले पण आजीने आणि आईने, दोघींनीही कधीच त्याला होकार दिला नाही.

सकाळी सहा ते संध्याकाळी सहा असं दिवसभरात दीड-दिवसाच्या (दीडीच्या) कामाला दुसर्‍यांच्या शेतात आईला राबवणार्‍या आणि आम्हालाही कुठे भुईमूगाच्या शेंगा तोडायला ने, बेदाणे निवडायला ने असं करणार्‍या आजीला आत्याने लग्नानंतर दुसर्‍यांच्या शेतात असं काम करणं आवडलं नाही. ती आत्या-मामा दोघांनाही आमच्या गावी घेऊन आली. मामांना कारखान्यावर ओळखीने शेतकी मदतनीसाची नोकरी मिळाली. आमचं घर तेव्हा पटवर्धनांकडून पागेची जागा भुईभाड्याने घेऊन आजीने स्वत: वरती बांधकाम केलेलं असं होतं. आत्याचा संसार तसा मोठा. ती दोघं आणि तीन मुलं. कूळकायद्याचा बडगा कडक झाला आणि लोकांना भाड्याने घरे मिळायला अडचण पडू लागली. दर अकरा महिन्यांनी विंचवाचं बिर्‍हाड घेऊन फिरण्याला आत्या कंटाळली. अशातच एकदा ओढ्याकाठाचं घर भाड्याने मिळालं होतं. काही कामानिमित्त मामा परगावी गेलेले. आणि बाहेरून चोरांनी कडीशेजारची जागा पोखरली. सावध झोपेमुळे आत्याला जाग आली आणि तिने आतून कुलूप लावलं आणि मदतीसाठी हाका मारायला सुरूवात केली. माझी आतेभावंडं खूप लहान असावीत, ती भेदरली. आजूबाजूला वस्ती नसल्यानं कुणीच आलं नाही. चोर घाबरून पळून गेले. पण ते दबा धरून बसले असतील म्हणून आत्या रात्रभर हाका मारत राहिली. दुसरे दिवशी तिचा घसा पार कामातून गेला होता. खूप झालं, जसं असेल तसं एका घरात राहू म्हणून आजी आत्याला घरी राहायला घेऊन आली. एका छोट्या दहा बाय दहाच्या खोलीत तिने संसार मांडला. ती खोली फक्त त्यांचं सामान ठेवायला होती, नाहीतर सगळं घर त्यांचंच होतं. आधी एकाच चुलीवर स्वयंपाक चाले. आत्याच्या लहरीवर आईने आधी किंवा नंतर स्वयंपाक करायचा. आत्या घरातच असे, आई तेव्हा डी एड. शिकत होती पण तरीही आईच्या वेळेची कुणाला किंमत नव्हती. नंतर मग काही वर्षांनी आत्याच्या खोलीत स्टोव्ह आला आणि आईची सुटका झाली. आत्याच्या घरी सकाळी पोह्यांचा दरवळ घमघमे. आजी आणि आणि तिचा मुलगा खोलीत जाऊन खाऊन येत. आई गप्प बसे, तिची मुलं तडफड्त.  घरात आईच एकटी कमावती असली तरी तिच्या मुलांना काही खाऊ घालण्याचं स्वातंत्र्य तिला नव्हतं. मोठ्या बहिणीला नोकरी लागेपर्यंत पुढे कितीतरी वर्षं कांदेपोहे ही आम्हा मुलांसाठी अप्राप्य गोष्ट होती. आम्हाला त्या खोलीत जायची परवानगी नव्हती. आता आमच्यात खूप प्रेम आहे पण तेव्हा तीच आतेभावंडं आम्ही त्यांच्या घरी पाऊल टाकलं तरी मारहाण करत, चहाड्या करून आणखी मार-ओरडा मिळेल याची व्यवस्था करत. दुपारी आम्ही साधे हरभरे जरी खारवून खाल्ले तरी रात्री तितकाच मग चोप मार मिळे.

आत्याकडे दोन बॅगा होत्या. आकाशी रंगाच्या. आतून गुलबक्षी रंगाचं साटीनीचं अस्तर, अस्तराचे छानशे कप्पे आणि त्या कप्प्यांत काय दडलं असेल याचं आम्हा भावंडांना नेहमी कुतूहल. त्यांनी बॅग उघडली, की आम्ही हळूच जाऊन मागे उभे राहात असू. आत्याकडे एक सोनीचा टेपरेकॉर्डर होता. त्याच्या कॅसेट्स एका बॅगेत छान लावून ठेवलेल्या असत. नेहमीच्या ऐकायच्या वेगळ्या आणि बाकिच्या घरी कुणी खास आलं, त्यांनी फर्माईश केली की लावायच्या होत्या. सुगमसंगीत, ओल्ड इज गोल्ड, HMV च्या बर्‍याचशा, राज कपूर, एक तोहफा पिक्चरची पण होती. या बॅगेला साधारण कधीच कुलूप नसे आणि क्वचित आत्याच्या मुलांचे मित्र मागायला आले तर त्यातून कॅसेटस काढून देणे हे माझे काम असे. मी बरेचदा ती गुळगुळीत कव्हर्स पाहात असे. कधी ती कव्हर्स काढून प्लास्टिकचं आवरण आतूनबाहेरून छान पुसून पुन्हा ती कॅसेट्स लावून ठेवणं हा माझा छंद होता. दुसरी आकाशी बॅग आत्याच्या खोलीत असे. त्यात सगळ्यात वरती पारदर्शक पिशवीत निगुतीने ठेवेलेले गौरींचे हार हा अजूनही त्यांच्या घरातला अभिमानाचा विषय आहे. चार पदरी टपोर्‍या मोत्यांचे सर, उभ्या गौरींच्या कमरेच्याही खाली येतील इतक्या लांबीचे, छान कलाबतू लावलेले, मोहक पदकांचे ते हार अजूनही अगदी तस्सेस आहेत. त्यासोबत मामांचे सिल्कचे गुरूशर्ट, आत्याच्या एकदोन ठेवणीतल्या साड्या, आतेबहिणीला नहाण आलं तेव्हा बाबांनी घेतलेली आजोळची लालचुटूक साडी, तेव्हाही बाबा आदमच्या जमान्यातला वाटेल असा कॅमेरा, असंच काहीबाही ठेवलेलं असायचं. मूड ठीक असेल तर  सगळं बरं असायचं, पण नसेल तर तिथे ऊभं राहिल्याबद्दल जाम ओरडा मिळायचा. आत्याने नवीन घर घेतलं तेव्हा दोन्ही बॅगा स्वयंपाकघरातल्या जईवर गेल्या.  खूप खोल्यांच्या घरात बरीच कपाटं झाली आणि त्या बॅगांचं महत्व गेलं.

नाही म्हणायला आमच्या घरात दोन ट्रंका होत्या. एक पारच मोडलेली, झाकण न लागणारी अशी दरिद्री ट्रंक होती. तिच्यात कुणाकडून आलेले आणि असेच फिरवायचे आहेराचे खण इत्यादी असं बिनमहत्वाचंच ठेवलेलं असे. दुसरी ट्रंक अजूनही मजबूत आहे. तिला कधीच कुलूप असलेलं आम्ही पाहिलं नव्हतं. त्यामुळं तिच्यात कुणाला रसही नसे. त्यात सांगली हा दक्षिण सातारा जिल्हा की प्रांत असा कायसासा असल्यापासूनच्या घराच्या भुईभाड्याच्या पावत्या होत्या, अजूनही असाव्यात. अगदी आण्यांपासून एक-दोन बंद्या रूपयांपर्यंतचे व्यवहार त्या पावत्यांवर वाचलेले लख्ख आठवतात. कधीतरी अशीच उचकापाचक करताना तीमध्ये नोटांची चित्रं असलेले तीनचार कागद असलेलं लक्षात आलं. आता त्या नोटा एकाच रंगाच्या असल्या आणि अस्सल नोटेसारख्या दिसत नसल्या तरी फुकट ते पौष्टिक म्हणून आम्ही ते गोड मानून घेतलं. मोठ्या कागदांमुळे होणारी अडचण एकदा साग्रसंगीत कार्यक्रमात मी आणि लहान भावाने अतिरिक्त कागद कापून फक्त नोटांचे तुकडे कापून घेऊन सोडवली. दोनचार दिवसांत आमचे उद्योग कळाल्यावर पाठी बर्‍याच शेकल्या होत्या. ते राहत्या घराचं खरेदीखत होतं. सध्या ती ट्रंक आजीच्या खोलीत असते. आमची वडिलोपार्जित जमीन विकून आलेली रक्कम तिने बर्‍याचशा बॅंकांत गुंतवलीय, तिचे कागदपत्र आणि हिशोब तिथे असतात. पहिली अनामत दामदुप्पट होण्याच्या वेळेस तिने माझ्याकडून सगळं व्यवस्थित लिहून घेतलं होतं. आता तिच्या खात्यांमध्ये किती पैसे आहेत ते खुद्द तिलाही माहित नसेल. त्या ट्रंकेत दोन दागिने सुद्धा आहेत. एक आईचं स्त्रीधन-बोरमाळ. आईच्या आईनं तिला लग्नात घातलेली ती बोरमाळ आईचं लग्न झाल्यानंतर वर्षभरातच काहीतरी खुसपट काढून आजीने ती काढून घेतली ती आजतागायत आईच्या अंगास लागलेली नाही. आता आईकडे खूप दागिने आहेत, पण एकेकाळी ती लंकेची पार्वती असताना आजी समारंभात दोन दोन बोरमाळा घालून हिंडे तेव्हा तिला अतीव दु:ख होई. आजीकडे एक जोंधळपोत आहे. पूर्वी चारपदरी होती. आत्याच्या मुलाने दुकानासाठी म्हणून दोनवेळा गहाण टाकायला घेतली होती. दुसर्‍या खेपेस एका बाजूचे चारपदर काढून परत दिली. माझ्या आईचा लेकीवारसाने आलेला हिस्सा काढून घेतला म्हणून. आमच्यावर गुरगुरणारी आजी तेव्हा मूग गिळून गप्प बसली. त्या जोंधळपोतीला एक नाजूकशा मोत्यांचा घोस आहे. गांधीवधाच्या काळात हुपरीकरांचा वाडा पंधरा दिवस जळत होता म्हणे. त्यानंतर तिथे खेळायला गेलेल्या बाबांना तो सापडला. कधी कुठल्या सोनाराच्या नजरेस जोंधळपोत पडली की तो मागून घेऊन मोती पाहिल्याशिवाय राहात नाही. मला नोकरी लागेपर्यंत आमच्या घरी कसला दागिना म्हणून नव्हता. अगदी बहिणींना पाहायला आल्यावरही आजीने कधी ती जोंधळपोत आम्हाला दिली नाही. अजूनदेखील ’मी मेल्यावरच तुम्हाला काय ते मिळेल’ म्हणून करवादते. आता कुणाला त्या जोंधळपोतीची असोशी वाटण्याऐवजी तिच्यासोबत कटू आठवणीच जोडल्या आहेत.

औरंगाबादला एक पेटी आहे. गौरींच्या कपड्या-दागिन्यांची. इकडे सगळ्या पद्धतीच वेगळ्या. गौरींची महालक्ष्मी झाली, सोबत पोरेबाळेही आली. आमच्याकडे आधी डब्यावर डबे ठेवून वरच्या डब्यात मोठ्या तांब्यामध्ये गौरीचा मुखवटा ठेवत, आताशा थेट सांगाडेच बनवून घेतलेयत. खांदा म्हणून दोन हॅंगर्स आडवे बांधले आणि मानेसाठी आधार देऊन मध्ये कापड गुंडाळले की गौरी तीन दिवस हलत नाहीत. औरंगाबादला मोठ्या मापट्याच्या आकाराचे लोखंडी धड आणि कमरेपासून वरती कापडी सांगाडे आहेत. त्या मापट्याला कोठ्या म्हणतात. या पेटीत एक काळसर सुती कपडा आहे. कपडा कसला, अगदी चिंधीच. सोन्याचं कारण नसतानाही जतन झालेली. तो खरातर कोठीत आधाराला घालायचा कपडा आहे, निखिलच्या आजीपासूनच्या वेळचा. हे सांगतानाही आईंच्या चेहर्‍यावर कौतुक असतं. त्यांच्या चेहर्‍यावर मला कितीतरी महलक्ष्म्यांच्या आठवणी सहज वाचता येतात. मग गौरींचे एक एक करून जमवलेले दागिने, अगदी साड्यांना लावायच्या पिनांसह सगळं निगुतीनं ठेवलेलं. बाळगोपाळांसाठी कधीकाळी शिवलेल्या कपड्यांचा एक जोड. मुलीसाठी अनुष्काचं बाळलेणं. चारदोन वर्षांपूर्वी नवीन शिवलेले काही कपडे. ते  बाहेर काढताना तिच्या लहानपणी ती कशी द्वाड होती याच्या कौतुकमिश्रित आठवणी. सामान बाहेर काढायचं सोडून गप्पांना रंग चढतो.

परवा त्या ट्रंका पाहिल्या आणि या सार्‍या ट्रंका नजरेसमोरून झरझरत गेल्या. सध्या ट्रंका राहिल्या नाहीत, त्या ठिकाणी ट्रॉली बॅग्ज आहेत. त्यात कधीतरी बारीक झाले तर घालेन म्हणून ठेवलेले माझे आवडते काही कपडे, शाली-स्वेटर्स ठेवली आहेत. अधिक काळाच्या प्रवासाठी बॅगा काढताना मला नेहमीच वेळ लागतो. व्यवस्थित असलेल्या वस्तू सरळ ठेवण्याच्या निमित्ताने मी पुन्हा एकदा माझाच खजिना नजरेखालून घालते.

*- श्रेयअव्हेर- वि. स. खांडेकर

Monday, March 31, 2014

डॉ. रखमाबाई - एक दीपशिखा

१८८४ साली एक अघटित घटना घडली. एका विवाहित मुलीनं तिचा नवरा अशिक्षित आहे, व्यसनी आहे, रोगट आहे आणि कफल्लक आहे ह्या कारणासाठी सासरी जाण्यास नकार दिला. हे एक पुरे की काय म्हणून तिच्या नवर्‍यानं - बायको माझ्यासोबत नांदायला येत नाही - म्हणून कोर्टात सरळ दावाच ठोकला! आणि अपेक्षेप्रमाणे, "आजकालच्या मुलींनी अगदीच ताल सोडला आहे" छापाच्या धर्ममार्तंड आणि तथाकथित संस्कृतीरक्षक-पत्रकार यांच्या वक्तव्यांना अगदी पूर आला. पण हे जर असं घडलं नसतं तर कदाचित भारताला वैद्यकीय सेवा देऊ शकणार्‍या पहिल्या स्त्रीडॉक्टरसाठी आणखी काही वर्षं वाट पाहावी लागली असती. ह्याचं श्रेय त्या मुलीच्या खंबीरपणाला जातं, तसंच ते तिला असलेल्या घरच्या पाठिंब्याला आणि अर्थातच कौटुंबिक पार्श्वभूमीलाही जातं.

रखमाबाई जनार्दन सावे, जन्म २२ नोव्हेंबर १८६४. हरिश्चंद्र यादवजी ह्या त्याकाळच्या 'रायबहादूर' आणि 'जस्टिस ऑफ पीस' अशी नेमणूक असलेल्या गृहस्थांची नात. ते स्वत: उत्तम इंग्रजी शिकलेले आधुनिक विचारांचे गृहस्थ होते. रखमाबाईंची आई, जयंतीबाई ही वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी विधवा झाल्यानंतर त्यांनी तिचा दुसरा विवाह करून दिला. रखमाबाई ही जयंतीबाई ह्यांची पहिल्या विवाहापासूनची मुलगी. जयंतीबाईंचे दुसरे पती डॉ. सखाराम अर्जुन (राऊत) हे नावाजलेले वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक होते. तसेच ते शल्यचिकित्साही शिकवत. त्याकाळी त्यांच्या ज्ञातीमध्ये विधवाविवाहाला विरोध नसला तरी बालविधवाविवाह की प्रौढ विधवाविवाह, हा प्रश्न चांगलाच जोर धरून होता. हा विरोध पत्करून केलेलं सापत्यविधवेसोबतचं लग्न हे हरिश्चंद्रजी आणि डॉ. सखाराम दोघांचंही धाडसाचं पाऊल होतं.

रखमाबाईंचे प्रथम पती - दादाजी भिकाजी ह्यांच्या आईनं हरिश्चंद्रजींकडून 'जयंतीबाईंच्या मुलीचं लग्न माझ्या मुलाशी करून दे', असं वचन घेतलं होतं. त्याप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षीच रखमाबाईंचा विवाह झाला. सासरी पाठवायची वेळ येईतो मात्र ह्या दोन घरांमधल्या आधीच असणार्‍या सांस्कृतिक, वैचारिक, आर्थिक सगळ्याच दर्‍या अधिकच रूंदावल्या. दरम्यान, दादाजींना व्यसनं जडली. स्वतःचं घर नव्हतं; ते त्यांच्या मामांच्या घरी राहत. इतकंच नव्हे, तर ते मामांवर आर्थिकरीत्या पूर्णपणे अवलंबून होते. दम्याचा विकार जडला होता. मामांच्या घरचंही वातावरण म्हणजे - घरच्या लक्ष्मीवर अत्याचार, तर घरात आणून ठेवलेल्या बाईच्या हाती सारी सत्ता. हे सगळं लक्षात घेऊन रखमाबाईंनी सासरी जाण्यास नकार दिला. खरंतर दादाजी अगदी सहज 'गेलीस उडत' म्हणून दुसर्‍या स्त्रीशी विवाह करू शकले असते. परंतु एका स्त्रीकडून आलेला नकार, तसेच जयंतीबाईंनी पुनर्विवाह केल्याने पूर्वपतीची रखमाबाईंच्या नांवे असलेली (दादाजींच्या मते २५,०० रूपये मूल्य असलेली) इस्टेट, ह्या कारणांकरता त्यांनी - बायकोला सासरी पाठवावे - असा कोर्टात दावाच ठोकला.

अशा परिस्थितीत त्यांना दोष न देता उलट पाठीशी उभ्या राहणार्‍या आजोबांचं आणि आईबाबांचं विशेष कौतुक करायला हवं. ह्या लोकांना समाजात किती त्रास झाला असेल ह्याची गणतीच नाही. घरच्या मुलींना सासरहून माहेरी पाठवणं बंद होणं, समाजात टिंगलटवाळी, वर्तमानपत्रातून बदनामी, एक ना दोन. अगदी आजच्या काळात दिल्ली बलात्कार आणि तत्सम घटनांनतर लोकांची ताळतंत्रं सुटलेली वक्तव्यं वाचल्यावर तेव्हाच्या काळी काय झालं असेल, ह्याची तर कल्पनाच नको. सनातन्यांच्या मुक्ताफळांना रखमाबाईंनी 'द हिंदू लेडी' ह्या नावानं 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये पत्रं लिहून आपली बाजू मांडली. भावनाविवश न होता, सौम्य परंतु मर्मग्राही शब्दांत त्यांनी मनातले विचार उतरवले. 'बालविवाह', 'सक्तीचे वैधव्य' 'पडदापद्धत' अश्या काही विषयांवरही त्यांनी लिहिलं. कदाचित असं लेखन करून लोकशाहीच्या मार्गानं स्वतःवरच्या आणि इतर स्त्रियांवरच्या अन्यायाला वाचा फोडण्याचा हा त्यांच्यापुरता मार्ग असावा. अर्थातच 'हिंदू लेडी'च्या ह्या पत्रांनी खळबळ माजली. खटला तर आणखी गाजलाच परंतु वाईटातून चांगलं निष्पन्न होतं, ह्या न्यायानं, लेडी डफरिन, लेडी रे आणि मिसेस ग्रँट डफ, ह्यांनी हिंदू लेडीला साहाय्य केलं.

रखमाबाईंच्या जडणघडणीत त्यांच्या कौटुंबिक पार्श्वभूमीचा मोठा वाटा तर आहेच, परंतु त्याचा योग्य वापर करून आपलं व्यक्तिमत्व घडवणं, हेही तितकंच महत्वाचं आहे. त्या काळच्या रितीरिवाजाप्रमाणे वयाच्या नवव्या वर्षी लग्न झालं, तरी विसावं लागेपर्यंत त्यांच्या सासरी जाण्याचा प्रश्न उद्भवला नव्हता. ही तेव्हा सामान्य बाब खचित नसावी. कदाचित वयात आल्याआल्या त्यांना सासरी पाठवलं गेलं असतं तर असा - सासरी जाणं हितावह की नाही - हा विचार कितपत टोकदारपणे त्या करू शकल्या असत्या, हा एक प्रश्नच आहे. त्यांच्या आईनं मुलीसोबत सुनेलादेखील इंग्रजी शिक्षण दिलं होतं. खटल्याच्या पूर्वकाळात (१८८२-८५) शिक्षणासोबतच त्या आर्य समाजाच्या चिटणीसपदाचा कार्यभार सांभाळत. हरिश्चंद्र यादवजी आणि डॉ. सखाराम अर्जुन ह्या दोघांची समाजातील प्रतिष्ठितांत तसेच इंग्रज लोकांत उठबस होती. आपली मतं स्पष्टपणे मांडल्यामुळे आणि कणखरपणामुळे रखमाबाईंनाही ह्या दोन्ही वर्तुळांत विशेष वागणूक मिळत असे. स्वतः लेडी गव्हर्नर, लेडी जस्टिस त्यांना चहापार्टींसाठी आमंत्रणं धाडीत. त्यामुळे त्यांचे विचार आणि कहाणी इंग्रज समाजात थेट परिचयाची होती. नव्या हिंदुस्थानाच्या तरूण पिढीची प्रतिनिधी म्हणून हा युरोपियन समाज त्यांच्याकडे कौतुकानं आणि आदरानं पाहत असे. इतकेच नव्हे तर इंग्लंडमध्ये शिक्षणासाठी गेल्यानंतर तिथेही रखमाबाईंना विचारवंत व अभ्यासू लोक भेटले. ऍलिस (बर्ट्रांड रसेलची प्रथम पत्नी), हेन्रिएट्टा मुल्लर, पंडिता रमाबाई, इव्हा मॅक्लेरन अशी बरीच मंडळी त्यांच्या व्यक्तीसंग्रहात होती. इंग्लंडमध्येसुद्धा त्या वेगवेगळ्या सभांमधून भाग घेत राहिल्या. ह्यावरून त्यांचा सतत कार्यरत राहण्याचा पिंड दिसून येतो.

अंजली कीर्तने लिखित ’आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व’मधल्या संदर्भानुसार परदेशातसुद्धा स्त्रियांचं वैद्यकीय शिक्षण तितकं सोपं नव्हतं. असं असताना रखमाबाईंनी भूलतंत्र, सुईणपण, दंतशास्त्र ह्यांचा व स्त्रीरोगचिकित्सेचा विशेष अभ्यास केला. त्यासाठी वेगवेगळ्या कॉलेजमध्ये जाऊन खास शिक्षण घेतलं. बाळंतपणाचं शास्त्र व बाळंतपणातल्या शस्त्रक्रिया ह्या विषयांत 'लंडन स्कूल ऑफ मेडिसिन' इथल्या परिक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलं. त्याचसोबत शरीराला मालिश करण्याचं तंत्र आणि त्याचा अनुभवही त्यांनी घेतला. वैद्यकीय शिक्षणात स्त्री-पुरुष आपपरभाव न करणार्‍या ह्या कॉलेजात 'मुलींना पदवीदान करणे', हे मात्र विद्यापीठाच्या कायद्यात बसत नसे. तेव्हाच्या पद्धतीप्रमाणे रखमाबाईंनी ही शेवटची परीक्षा 'Onjoint board of the colleges of physicians and surgeons of Edinburgh and Glasgow' ह्या स्कॉटलंडच्या संस्थेत दिली आणि त्या उत्तम तर्‍हेनं उत्तीर्ण झाल्या. 'Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons' ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या 'मेडिकल रजिस्टर'मध्ये सनदशीर दाखल झालं.

रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणार्‍या 'डफरिन फंडा'तर्फे एकूण सात रुग्णालयं उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत 'कामा हॉस्पिटल', नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक 'हाऊस सर्जन' म्हणून झाली. इथे त्यांनी केवळ सहाच महिने काम केलं. कामा हॉस्पिटलमधल्या तात्पुरत्या नेमणुकीनंतर रखमाबाईंना सुरतच्या तेव्हाच्या 'शेठ मोरारभाई व्रजभूषणदास माळवी हॉस्पिटल'मध्ये 'मेडिकल ऑफिसर' ह्या पदावर नियुक्त करण्यात आलं. परदेशगमन, लग्नासंबंधीचा खटला अश्या सगळ्या वादग्रस्त परिस्थितीत सुरतेची ही नोकरी त्यांच्या पथ्यावरच पडली.

त्यांचा वैद्यकीय कार्यकाल हा मुख्यत्वे वयाच्या साठाव्या वर्षापर्यंत सुरत तर त्यानंतर राजकोट इथे गेला. दोन्ही ठिकाणी त्यांनी फक्त व्यवसाय हेच ध्येय न ठेवता सोबत समाजोपयोगी कामंही केली. सुरतेत तर पायाभरणीपासून सुरुवात होती. आधी तर बर्‍याचश्या स्त्रिया कुठल्याच दवाखान्यात प्रसूतीसाठी जायला तयार नसायच्या. त्यात ह्यांच्या इस्पितळासाठी इमारत तयार होती परंतु ती झपाटलेली असल्याच्या वदंता पसरल्या होत्या. तेव्हा इमारतीत शेळीचं सुखरूप बाळंतपण करून खात्री देण्यापासून ते दवाखान्यात प्रसूतीसाठी न येणार्‍या स्त्रियांचं समुपदेशन तर केलंच आणि त्यासाठी शेवटपर्यंत अथक प्रयत्न करत राहिल्या. उपचारांसाठी आलेल्या स्त्रियांसोबतच्या मुलांसाठी बालक मंदिर स्थापन केलं. समाजाकडून अव्हेरलेल्या विधवा व त्यांच्या मुलांचं त्या आश्रयस्थान बनल्या. इतकंच नव्हे तर आसपासच्या स्त्रियांना लिहितावाचता यावं म्हणून त्या त्यांचे खास वर्गही घेत. स्त्रियांनी घराबाहेर पडून काही करावं म्हटलं तर सर्वसाधारणपणे घरांतल्यांकडून विरोध होतो, पण तोच विरोध त्या धार्मिक कार्यासाठी बाहेर पडत असतील तर तितकासा तीव्र राहत नाही. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन रखमाबाईंनी प्रथमतः स्त्रियांना धार्मिक पुस्तक वाचनासाठी एकत्र केलं व नंतर त्यातून 'वनिता आश्रम'ची स्थापना केली. इतर उपक्रमांसोबत विधवाआश्रम आणि अनाथाश्रम हे वनिताआश्रमचं मुख्य कार्य होतं. एकीकडे दिवसाचे अठरा तास काम, दर शनिवारी 'आयरिश मिशन'च्या दवाखान्यात मोफत सेवा तर दुसरीकडे समाजिक कार्य, हे शिवधनुष्य त्यांनी सहज पेललं होतं. (रोजच्या कामांच्या भाऊगर्दीत अगदी साडी नेसण्यात वेळ जाऊ नये म्हणून त्या पेटिकोटला साडीच्या निर्‍या शिवून ठेवत.)

एक डॉक्टर म्हणून त्यांचं काम महत्त्वाचं खरंच, पण त्यांनी केलेली इतर कामंपण तितकीच महत्त्वाची आहेत. सुरतेला असताना रमाबाई रानडेंनी अध्यक्षपद भूषवलेल्या १९०७च्या सुरतेच्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या स्वागत समितीच्या चिटणीसपदी त्यांनी काम केलं, तर पुढे राजकोटला गेल्यावर 'रेडक्रॉस सोसायटी'ची शाखा उघडली. पहिल्या महायुद्धादरम्यानचं त्यांचं कार्य लक्षात घेऊन १९१८ साली त्यांना रेडक्रॉसतर्फे सन्मानपदक देण्यात आलं.

जश्या त्या कामामध्ये कणखर, स्वतःवरती अन्याय होऊ न देणार्‍या होत्या, तसंच इतरांवरही अन्याय होऊ नये, अशी त्यांची शिकवण होती. त्यांच्या एका शिष्येनं, रखमाबाईंनी भावाच्या सुनेला दिलेला सल्ला लिहून ठेवला आहे - 'बायकोचे पोट हे नवर्‍याच्या पोटात' हे तत्वत: मान्य कर परंतु पाच-पंचवीस माणसांच्या घरात सर्वात शेवटी जेवायला बसणार्‍या बायकांचे जेवण आधी वेगळे काढून ठेवत जा. वरवर साध्या वाटणार्‍या ह्या वाक्याचं काय मोल आहे, ते अशा परिस्थितीतून गेलेल्या स्त्रीलाच कळेल.

रखमाबाईंचा मूर्तीपूजेवर विश्वास तसाही नव्हताच. निवृत्तीनंतर उत्तरायुष्यात त्यांनी दासबोध-तुकारामाच्या अभंगांचं मनन, संस्कृत श्लोकांचा अभ्यास चालू केला. अस्पृश्यतेविरोधात काही शाळांमधून व्याख्यानं देण्याची व्यवस्था केली. स्त्रियांसाठी खास विज्ञान-स्त्रीशिक्षकांच्या व्याख्यानमाला चालवल्या आणि अगदी किती स्त्रिया तिथे हजर होत्या, इथपासूनची नोंद ठेवली. इतकंच नव्हे, तर कामाठीपुरामधल्या स्त्रियांसाठी अारोग्यविषयक व्याख्यानं घडवून आणली. स्वतःच्या आजोबांच्या मालकीचं गावदेवीचं मंदिर सर्वांसाठी खुलं केलं. अस्पृश्यांना, त्यांच्या स्त्रियांना हक्क आहेत ही त्यांची धारणा होती. 'असमर्थांना आपण समर्थ बनवण्याचा प्रयत्न केला, परंतु जे दुर्लक्षित आहेत त्यांच्या प्रश्नांचं काय', ही भावना त्यांना छळत असे. त्यातूनच त्यांनी प्रत्येक ज्ञातिचे काय हक्क आहेत त्यांच्या याद्या लिहून काढल्या. उदा. महाराला बावन्न हक्क आहेत, तर त्यांना त्या हक्कांची जाणीव करून दिली. अगदी ऐंशीच्या घरात वय असतानादेखील कुणा एकाकी मुलीला आसरा देणं, तिला लिहायला वाचायला शिकवणं, 'मिडवाईफरी'ची परीक्षा द्यायला लावणं अशी कामं त्या करत राहिल्या. स्त्रियांना बँकांमध्ये खातं काढायला लावून बचतीचं महत्त्व कृतीतून तेव्हाही शिकवत राहिल्या. डोळ्यांनी दिसणं अगदीच कमी झालं तेव्हा आजूबाजूच्या मुलांची 'बालसभा' घेत व त्यांच्या अंगी सभाधीटपणा यावा म्हणून गाणी-गोष्टी म्हणायला लावत. दुर्दैवानं रखमाबाईंनी त्यांचा पत्रव्यवहार जपून ठेवला नाही; उलटपक्षी तो वेळोवेळी जाळून टाकला. त्यांच्या टिपणातल्या काही वह्या आहेत त्यावरूनच काय ती त्यांच्या कार्याची थोडीफार माहिती कळते.

नव्या जाणिवा, नवी क्षितिजं, नवी कार्यक्षेत्रं जी त्याकाळच्या अगदी थोडक्या लोकांनी आपलीशी केली, त्यांची यादी डॉ. रखमाबाई ह्यांच्या नावाशिवाय अपूर्ण आहे. फक्त स्वत:साठी न जगता आणि सुधारणेच्या प्रश्नांचा नुसताच खल न करता त्या सुधारणा प्रत्यक्ष जीवनात उतरवून त्या खरोखरी एक ध्येयनिष्ठ जीवन जगल्या.

संदर्भ:

सरलं दळण...

आमचं घर अगदीच टिपिकल शेतकर्‍याचं नसलं तरी लहान गांवात राहिल्याने अगदीच फटकूनही नव्हतं. सतत ऊस लावल्यास जमिनीचा कस कमी होतो म्हणून प्रत्येक खोडव्यानंतर खपली गहू पेरला जायचा, तूरडाळ विकत घेण्याऐवजी थेट आख्खी तूर विकत घेतली जायची, ज्वारी-गहू सोडून इतर धान्य क्वचितच गिरणीत दळायला नेलं जायचं, वर्षभराचं तिखट डंकावर करून आणलं असलं तरी उपवासाचं तांबडं तिखट घरीच बनवलं जायचं. नंतर यंत्रं आली तरी कित्येक दिवस चव चांगली लागत नाही म्हणून दाण्याचं कूट,मिरचीचा ठेचा उखळ-खलबत्त्यातच व्हायचा आणि पुरणयंत्र "मेरा नंबर कब आयेगा" म्हणून अजूनही आ वासून पडलं आहे. थोडक्यात काय, आता कालपरत्वे थोडा फरक पडला असला तरी उखळ, खलबत्ता, पाटा-वरवंटा यांच्या सोबतीने आमच्या घरी दळण-कांडणाची अगदी रेलचेल होती. उखळ आणि जात्याच्या वापराचंही एक तंत्र असतं. खिरीसाठी गहू कांडताना पहार उपयोगाची नाही, त्यासाठी मुसळ लागतं आणि ते सततच्या वापरानं झिजू नये यासाठी त्याच्या एका टोकाला वर्तुळाकार लोखंडी नाल बसवावी लागते. जात्यावर पीठ दळताना छोटे-छोटे घास (जात्याला) भरवून किंचित अधिक जोर लावावा लागतो; तर नुसतं भरडताना मोठे घास आणि हलक्या हातानं दळावं लागतं. एकटीने करताना हे काम कंटाळवाणं खरं, पण जोडीला कुणी असेल तर धमाल येते. कांडप करताना एका हाताने मुसळ खाली आपटायचं, ते जोडीदारीण एका हाताने पटकन उचलून आपटते तोवर पहिलीने हात बदलून पुढचा घाव(!) घालेतोवर दुसरीनेही हात बदलून साथ दिलेली असते. आणि या लयबद्धतेला साथ असते दोघींच्या हुंकारांची. हे पाहायला थोडा वेळ मजा येते परंतु यापेक्षा धमाल असते ती कुणी काकू-मामी-आजी जात्यावर दळायला बसल्यावर. किनऱ्या आवाजात (कदाचित त्यामुळे आवाज नाजूक व पातळ येतो आहे असा सार्वत्रिक समज असावा असं वाटतं) हळूच एकदा का ओव्यांना सुरवात झाली की स्त्रीमनाचे पदर हळूहळू उलगडत जातात. व्यक्त होणं ही सर्वांचीच गरज असते. पण ते व्यक्त व्हावं कुणाजवळ? जुन्या काळच्या, ज्या मुख्यत्वेकरून घरीच असायच्या त्यांना आई, नणंद-भावजया, बरोबरीच्या सख्या किंवा अगदीच कुणी नसेल तर गोठ्यातल्या कपिलेला मनीचे गुज सांगता येई नाहीतर मग जात्यावर दळताना स्वत:शीच गुणगुणणं तर होतंच. अशा तऱ्हेने घरातलं जातं स्त्रियांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असायचं. या जात्यावरच्या ओव्यांत वैविध्य तर शोधावं तितकं कमीच. त्यांमध्ये भोंडल्याच्या गाण्याप्रमाणे माहेरवाशिणीचं सुखदु:ख दडलेलं असे, कधी तिचं रोजचं जीवनमान दिसे तर कधी संसारातली तृप्ती ओव्यांतून-जात्याच्या घरघरीसोबत पिठाप्रमाणे हळूहळू झिरपत राही. सीतेला देवीचा अंश मानलं तरी ती शेवटी मनुष्यच. तिला हरिणकांतीची भुरळ पडावी हे जसं नैसर्गिक, तसंच चार घटका कुणाशी बोलावंसं वाटणं हेही तितकंच साहजिक. तिला दोनदा वनवास घडला. पहिल्यावेळेस ती एकटी नव्हती पण दुसऱ्यांदाच्या वनवासात मात्र ती अवघडलेली, एकाकी होती. तिने तिचा हा काळ कसा कंठला असेल याची चिंता आयाबायांना पडली नसेल तर नवल! या काही जात्यावरच्या ओव्या आहेत, सीतेच्या दोन्ही वनवासातल्या. एकामध्ये रामाचं तिच्यावरचं प्रेम जाणवतं, सीतेपायी विव्हळ झालेला राम दिसतो आणि दुसऱ्या भागात आडरानात एकाकी पडलेली सीता तिथल्या झाडांसोबत आपलं दु:ख वाटून घेताना दिसते. सीता-सीता करत राम, राम पडला धरणीलाऽऽऽऽ। आरं लंकेच्या रावणाऽऽ, कुठं फेडशीऽऽल पापालाऽऽऽऽ।। रावणानं सीतेला पळवून नेले आणि राम अगदी कासावीस झाला. त्याची व्याकुळता पाहून रावणाचा अधिकच राग येतो, त्याची सारी कुकर्मे आठवतात आणि त्याच्यासाठी अगदी शापवाणी ओठी येते. राम अन लक्षीमनऽऽ, दोघं हिंडती लवणानंऽऽऽऽ। ऐका रामाची सीताऽ, सीता नेलीया रावणानंऽऽऽऽ॥ रामच नाही,तर लक्ष्मणाला देखील सीताहरणानं सैरभैर केलं होतं. दोघे तिला ठाई ठाई शोधत होते. अशा वेळी कुणीतरी जाऊन त्यांना सीता नक्की कुठे आहे हे सांगावं असं वाटणं साहजिक आहे. बारा वरसं निरंकारऽऽ, माता अंजनीऽनं केलाऽऽ मारूती ब्रह्मचारी, बाळ पोटी जल्माला आला, त्यानं सीतेचा शोऽऽध केला. मनापासून केलेली प्रार्थना पूर्ण होते म्हणतात. अंजनीमातेस नवस सायासाने झालेल्या मुलाने शेवटी सीता कुठे आहे याचा छडा लावला. त्यानंतर काय, राम-लक्ष्मण पराक्रमी होतेच, आणि मग राम-सीता-लक्ष्मण सुखाने अयोध्येस परत आले. पण अध्याय इथं संपत नाही आणि सीता पुन्हा एकदा वनात येऊन ठाकते, अगदी एकटी. अडग्या रानामंदीऽऽ सीतामाईला नव्हतं कुणीऽऽऽऽ। रानातल्या बोरी-बाभळी झाल्या गं आई-बहिणीऽऽऽऽ।। भयाण वन, आडवाटेचं. आसपास कुणीच नाही, मग मायेचं माणूस तर दूरच. अशा वेळेस अंगभर काटेकुटे असलेल्या, कदाचित ज्यांना कुणी कधी प्रेमाने आंजारलं गोंजारलं नसेल अशा बोरी-बाभळी तिच्या जीवाभावाच्या सख्या बनतात. इथं खरंतर उपमा-उत्प्रेक्षा-रूपक सगळे अलंकार थिटे पडतात. शब्द उच्चारताच डोळ्यासमोर उभी राहतात रानावनात, काटेकुटे ल्यायलेली ही झाडं. रूक्ष, रखरखीत. रणरणत्या उन्हात तळपणारी आणि तरीही अस्तित्व टिकवून ठेवणारी. ऊन-वारा-पावसाचे सगळे आघात सोसूनही ताठ उभी. हे प्रतीक आहे,कसल्याही आपत्तीत हार न जाणाऱ्या स्त्रीत्वाचं, तितक्याच ठामपणे दुसर्‍या एकाकी स्त्रिला तिच्या होरपळणार्‍या आयुष्यात तिला आधार देणारं. बोरी-बाभळीच्या उल्लेखामागे आणखी एक हेतू दिसतो. बरेचदा सहज आसपास असलेले लोक विनाकारण दुर्लक्षित असतात. त्यांची किंमत अशा वेळेसच जाणवत असावी असं काहीसं इथं अधोरेखित असावं. अडग्या रानामंदी कोण रडतं आईईऽऽकाऽऽऽऽ। सीतामाईला समजाविती बोरी-बाभळी बाईईऽऽकाऽऽऽऽ॥ या ओव्या ही मूळची मौखिक परंपरा. तिला कुठल्याही लिखापढीची गरज नाही. ही परंपरा कुठल्या विहित शिक्षणाची गुलाम नाही. ती लेखनाच्या, कोणत्याही प्रकारच्या स्त्रीशिक्षणाच्या आधी जन्म पावलेली आहे. कुठल्याही भाषेत तिचं व्याकरण हे नंतर येतं, पण तीमधला भाव प्रथम येतो. त्यामुळे काव्यातले मीटरचे नियम इथं लावून चालायचं नाही, पण गेयता-भावगर्भता यांच्या निकषांवर या ओव्या उच्च प्रतीच्या ठरतात. मग ती गेयता साधताना कधी एखादा शब्द पुन्हा पुन्हा येणं किंवा एखाद्या शब्दाला सूर लावणं हे नेहमीचंच. इथं भाव जास्त महत्वाचा, त्यामुळे हे कानाला खटकत नाही, उलट गोडच वाटतं. त्यामुळेच या ओवीत 'ऐका'चं 'आईईऽऽकाऽऽऽऽ' काय किंवा 'बायकां'चं 'बाईईऽऽकाऽऽ' हे बिनबोभाट खपून जातं. सीतामाईला वनवासऽऽ, तिला वनवास आला कसाऽऽऽऽ? आली वर्साची संकरातऽऽ, बोरी-बाभळी ववसल्याऽऽऽऽ॥ जंगल असलं म्हणून काय झालं? काळ तर पुढे सरकत राहातो, ऋतू बदलतात आणि सणसमारंभ येत राहतात. कदाचित इतर सणवार साजरे होणार नाहीत, पण ज्या सणांशी तिचं सवाष्णपण जोडलं गेलं असेल ते कसे चुकवणार? सीतेची याबद्दलची मानसिकता काय असेल हा विचार मनात न येता ही ओवी म्हणणाऱ्या स्त्रीची 'नवरा चुकला म्हणून आपण चुकू नये' अशी भावना असावी. संक्रातीला हाती सुगड घेऊन एकमेकींच्या भांगांमध्ये (बहुधा) गुलाल चिमटीत घेऊन दोनतीन वेळा भरणं याला ववसणं म्हणतात. त्यावेळेस जिला ववसलं, तिच्यासोबत हातातल्या सुगडाचीदेखील अदलाबदल केली जाते. पाच या आकड्याचं काय महत्व आहे हे माहित नाही, परंतु किमान पाच सवाष्णींना ववसलं जातं. बोरीबाभळींसोबत दु:खच नाही तर इतरही गोष्टी वाटून घेणं हे असलं तरी दु:खात साजरा केलेला सण अधिक दु:खदायक असावा. अडग्या रानामंदीऽऽ सीता बसली सावलीलाऽऽऽऽ। लंकेच्या रावणानंऽऽ, बट्टा लावला माऊलीलाऽऽऽऽ।। खरंच.. रावणाने सीताहरण केलं नसतंच, तर हा दिवस उगवला नसता. रावण हा दोषी आहे, "root cause" म्हणावा असा. पण त्यामुळे रामाची जबाबदारी कमी होत नाही. प्रत्यक्षरित्या तोच याला जबाबदार असला तरी दोष त्याला नाही, तर तो रावणालाच दिला जातो. असो. हे व्यक्तिपरत्वे होणारं इंटरप्रिटेशन म्हणता येईल. कदाचित त्यावर इतका विचार करण्याची या एकेकाळच्या अवाक्षरही न शिकलेल्या स्त्रियाची उमज नसेल किंवा त्याकाळच्या समाजाच्या बाळकडूप्रमाणे हे बरोबरही असू शकतं. हे रामायण समजून घेऊन ते रोजच्या रामरगाड्यात आळवावं हे मात्र विशेष. या ओव्या कुणी प्रथम लिहिल्या असतील हे माहित नाही पण ज्याप्रकारे त्यांचं जतन-संवर्धन झालं आहे ते कौतुकास्पद आहे. वरच्या ओव्यांमध्ये निरक्षर स्त्रियांचं त्यांच्यापुरतं रामायणाचं विवेचन दिसून येतं. पण ते खरंतर निमित्तमात्र आहे. स्त्रीकाव्य हे बंदिस्तीची वेदना मांडतं आणि त्यातून मुक्तीचं गीत येतं. ती कदाचित खरोखरीची मुक्ती नसेलही, पण किमान ठसठसणारी दु:खं या गीतांमधून मांडली जातात. कधी एकटीनं गुणगुणत, तर कधी सोबत कामाला हातभार लावणार्‍या सखी सोबत. या काव्यात जे असतं, ते केवळ एक स्त्रीच उमजू शकते कारण तेच तिचं जगणं असतं. ही वेदनेची माळ या सगळ्यांना एकत्र सांधत राहाते. रामायणाच्या आख्यानातून गायलेललं दु:ख एकट्या सीतेचं नसतं, कित्येकदा त्या सीतेच्या ठिकाणी ती स्वतः असते तर कधी तिची सखी. घरातल्यांकडून-नवर्‍याकडून अपमानित झालेली, कधी काही दोष नसताना हाकलून दिलेली, भराल्या घरातही एकटी पडलेली... प्रत्येक दु:ख वेगळं, पण त्यामध्ये दुखावली जाणारी ही स्त्रीच. त्याचा निचरा करण्याचा एक मार्ग म्हणजे ते व्यक्त करणं. हे झालं रामायणासारख्या महाकाव्याबद्दल. त्याहीपेक्षा रोजच्या आयुष्याबद्दलच्या ओव्या मला अधिक आवडतात. या ओव्या म्हणणारीला तिच्या गाण्याचं कौतुक आहे, आणि का गावं याची नेमकी कारणं तिच्याकडे आहेत. मुक्यानं दळयानऽऽ तुला कसं गं व्हतं नारीऽऽऽऽ। भाऊ भाच्याचं दलऽऽ तुझ्या उतरलं गं दारीऽऽऽऽ॥ काम करताना गुणगुणलं की कामाचा भार जाणवत नसावा आणि अशा हसत खेळत वातावरणात माहेरचं आख्खं भेटीला येण्यापरतं दुसरं सुख ते काय असावं? या ओवीमध्ये पुन्हा एकदा गेयता साधण्यासाठी 'दळणा"चं "दळयान" होतं की अहिराणी मधलं "दळयान" इथे येतं? उत्तर अवघड आहे. लोकगीतांना प्रांत-भाषांच्या बंधनात असं अडकवता येत नाही. एका ठिकाणचं रोप दुसरीकडे लावलं की तिकडे आपली संस्कृती घेऊन जातं. भाषेचं संक्रमण होतं. लिहितावाचता येत नसलं तरी लोकगीतांद्वारे स्त्रियांनी भाषेचं असं अभिसरण घडवून आणलं. सरीलं दळयानऽऽ सूप सारिते पलिकडेऽऽऽऽ। सासर म्हायेरीऽऽ राज मागीते दोहीकडेऽऽऽऽ॥ या दोन ओळींमध्ये शब्दशः अर्थापलिकडे बरंच काही आहे. धान्याचं सूप खूपशा विधींमध्ये महत्वाचं असतं. काही विशिष्ट विधींमध्ये तर सूप सोडून देण्याची प्रथा आहे, ज्याला बोलीभाषेत 'सूप सोडणं' असंही म्हणतात. असं हे 'दळण सरलं' तरी घरावरची माया कमी होत नाही. स्त्रीच्या कोणत्याही मागणीत असतं त्याप्रमाणे शेवटचं मागणंही दोन्ही घरच्या सौख्याचंच असतं. जात्यावर बसावंऽऽ तंवर जात्याशी बोलावंऽऽऽऽ। सव्वाशेराचं लुगडंऽऽ आपल्या ध्याईवं तोलावंऽऽऽऽ॥ प्रत्येकवेळेसच दळताना सोबत असावी असं काही नसतं. गुजगोष्टी सखीशेजारणीसोबत होतात तशाच त्या जात्यासोबतही ओव्यांमधूनही होऊ शकतात. कदाचित अशा कष्टातून घरादाराला बरकत येऊन सव्वशेराचं लुगडं "ध्याईवर" मिरवायला मिळेल. काही ग्रामीण कवितांमध्ये वाचलेलं , ’हृदयाला 'हुरदं' म्हणणं मला काहीसं ओढून ताणून आणल्यासारखं वाटतं, पण ही देहाची 'ध्याई' म्हणणं कानाला अगदी गोड वाटतं. मला या जात्याचा हेवा वाटतो. किती तरी गृहिणींच्या सुखदु:खांचे साक्षीदार आणि साथीदार असलेल्या या जात्यांकडे लोकगीतांचा ठेवा आहे. तो हळूहळू हरवत चालला आहे. मला यात स्मरणरंजनाहून त्या स्त्रियांची अभिव्यक्ती अधिक महत्वाची वाटते. छोट्या प्रतिकांतून किती मोठा अर्थ त्या सांगून जातात. जातं कालबाह्य झालं आहे आणि ते कधीतरी होणारच होतं. परंतु त्यामुळे हे अमूल्य साहित्य हरवतं आहे त्याचं दु:ख अधिक आहे. या ओव्यांना आजची आपली तथाकथित मीटरची सूत्रं लागू पडत नाहीत, परंतु त्यांचीही मात्रांची गणितं आहेत, संगीतांचे विशिष्ट ताल आहेत. ही गणितं मांडली जाण्याआधी ती समाजातील निरक्षर आणि दुर्लक्षिल्या गेलेल्या घटकांनी त्यांचा वापर करावा हे लक्षात घेण्याजोगं आहे. या ओव्यांत गेयता नसती तर लेखनावाचून त्यांचं संक्रमण अशक्य होतं. हे ओळखून तेव्हा ते तसं जोपासलं गेलं. आता तेच आपण कदाचित ब्लॉगवर लिहित असू आणि त्यात इतरजणी प्रतिसादांचा हातभार लावत असतील. आताच्या अभिव्यक्तीत आणि तेव्हाच्या व्यक्त होण्यात काही फरक नाही, फक्त माध्यमं आणि प्रकटनाचं स्वरूप बदललं आहे, इतकंच. उपसंहार: "दळण सरणं" हे मृत्यूचं प्रतीक आहे हे हा लेख लिहीपर्यंत मलाही माहित नव्हतं. लेखाचा पहिला खर्डा मोडकांना पाठवला होता, आणि वस्तुतः साधीशी म्हणून सोडून दिलेल्या ओवीमध्ये किती गहन अर्थ दडला आहे हे कळालं. आणि मग त्या अर्थाच्या अनुषंगाने पुढच्या ओव्या वाचल्या तेव्हा अगदी अंगावर काटा आला. सहज म्हणून म्हटलेल्या त्या ओळी मग अंगावर यायला लागल्या, आणि मग त्या सरळ लेखातून काढून टाकल्या. नाहीतरी, लेख दिवाळीअंकासाठी लिहिला असल्याने निदान अशा मंगलप्रसंगी इतक्या नकारात्मक ओव्या नकोत असं एक मत होतं, आणि पुढेमागे आणखी काही ओव्या जमल्यानंतर या वगळलेल्या ओव्यांसह नवीन काहीतरी लिहिता येईल असाही एक हेतू होता. गेला माहा जीव नका करू संध्याकाळ पोटच्या पोराची थंड्या पान्याची आंगूळ या ओळी अक्षरशः भयंकर आहेत!! अवांतरः ज्या बायकांकडून या ओव्या घेतल्या होत्या त्यांनाही 'दळण सरण्याचा' हा अर्थ माहित नव्हता. त्या फक्त त्यांना या ओव्या माहित आहेत म्हणून गात होत्या. मी अर्थ सांगितल्यावर त्याही विचारात पडल्या.

गोवा रंगीला रे...

या महिन्याच्या सुरवातीस उन्हाळयाचा शेवट आणि पावसाळ्याची सुरूवात असा मुहूर्त साधून चार दिवस जीवाचा गोवा करून आलो. आमचं राहण्याचं ठिकाण दूर आत आणि मुख्य पर्यटन स्थळांपासून दूर असल्याने चांगलंच शांत आणि प्रशस्त होतं. त्यामुळे जातायेता अगदी खरंखुर्रं गोंय भरपूर पाहायला मिळालं. मुंबई-औरंगाबाद-तासगांवातले खड्ड्यातले रस्ते पाह्यल्यानंतर गोव्यातले रस्ते अगदी हिरॉईनच्या गालांसारखे* मऊ मुलायम वाटत होते. आणि त्यातच चार दिवसांतल्या प्रवासात एकही टोलनाका दिसला नाही त्यामुळे अगदी चुकल्यासारखं झालं.

तिथे प्रवास करताना माड-पोफळीच्या बागा आणि समुद्रकिनार्‍यांपेक्षाही जर काही नजरेत भरली असतील, ती होती तिथली घरे. वेगवेगळ्या वास्तुकलांचे नमुने तर खरेच, पण त्यांना दिलेले रंग या सगळ्यांवर सॉल्लीड मात करत होते.नेहमीच्या त्याच त्याच रंगांच्या इमारती बघून मेलेल्या नजरेला ही रंगाबेरंगी घरे पाहून जणू नवसंजीवनीच मिळाली. माझं हे अशा घरांच्या फोटो काढण्याचे वेड पाहून पैसा ताईला 'हे वेगळेपण इतके दिवस मला कसं जाणवलं नाही' असं वाटू लागलं!

विशेष सूचना: धावत्या कारमधून आणि दही खाल्लं तर पाच मिनिटांत त्याचं हमखास ताक होईल अशा अतिवळणावळणांच्या रस्त्यावरून जाताना हे फोटो काढले असल्याने फोटोंच्या कोलितीबद्दल अवाक्षर काढू नये, अपमान करण्यात येईल.
तर मंडळी सादर आहेत, रंगरंगील्या गोव्याचे फोटो:

सुरवात करतेय एकदम गुलाबी गुलाबी रंगाच्या घराने. अगदीच नाही म्हटलं तर पनवेलमध्ये शिरताना या रंगाची एक इमारत दिसते.

हा रंग आजवर एखाद्या फिक्या रंगाला पूरक म्हणूनच पाह्यलेला आठवतोय.

आणि हा पण. इथे जरासा वेगळा दिसतोय हा, पण हादेखिल रक्तवर्णीच आहे.

या रंगाच्या सगळ्या छटा इथे पाह्यला मिळाल्या.

हा रंगसुद्धा फिका वाटत असला तरी प्रत्यक्षात तो जांभळाच्या आतला (पक्षी:पर्पल) रंग आहे.

निळ्या रंगासोबतच इथल्या लोकांना पिवळ्या रंगाच्या सगळ्या छटा आवडतात असं वाटतं.

हे जरा नेत्रसुखद तरी आहे.

हे मंदिरासारखे दिसत असले तरी, फोंड्याजवळच्या गावातले घरच आहे.

ही फोंड्यातल्या कोर्टाची इमारत आणि तटबंदी:

हे असेच आणखी एक घर..

आणि हा सर्वांवर कळस आहे. तिथे एक घराला गडद turquoise blue रंग देणे चालूय, अजून पूर्ण व्हायचंय ते)

फोटो बरेच काढले. त्यातले काही खूपच धावत होते. आणि सगळेच काढणंही झालं नाही. एक फोटो घेता घेता शेजारचं घर वाकुल्या दाखवून पळायचं तर कधी नक्की कोणत्या बाजूच्या घराचा फोटो घेऊ असं होऊन कधी एक तर कधी दोन्ही फोटो हातचे गेले. एक तर घर 'शी'च्या रंगासारखं होतं, एक दत्ताचं देऊळ अगदी अविश्वसनीय बेबी पिंक रंगात होतं. खरंतर हे इथे दिलेले रंग काहीच नव्हेत असं वाटायला लावणारे अतरंगी रंगही टिपता नाही आलेयत. आणि असं बरंच काही...
अधिक फोटो इथे.

फोटो घेता घेता कॅमेर्‍याची बॅटरी संपली, पण तरीही अशी वेगवेगळी घरे खुणावत होती. राहिलेले फोटो देण्याचं पैसातैने कबूल केलेय.. तेव्हा अजून खजिन्याच्या प्रतिक्षेत आहे.

*श्रेयअव्हेरः बहुतेक भाईकाका. चू भू दे घे.
स्थळः साष्टी तालुक्यातल्या वर्का बीचपासून मडगांव-शांतादुर्गा-मंगेशी-फोंडा या गावातले रस्त्यांच्या आजूबाजूस.

पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!!


नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्‍या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट.
चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो. त्यातच त्याच्या घरी एक कार्यक्रमही आहे, त्यासाठी तसेही त्याला घरी यायचंच असते. नीरजाला अंगावर, विशेषत: चेहर्‍यावर कोड आहे. ते जन्मजात नाही, पण नंतर उद्भवलेलं असं. तिला आताशा लोकांच्या विचित्र नजरांची सवय झालीय. आधीचा तिचा कोड असण्याबद्दलचा न्यूनगंड तिच्या पेशातल्या कौशल्याने, बुद्धीने आता झाकोळून गेलाय. तरीही कुठेतरी कधीतरी तिला ते कोड खुपतं असं जाणवतं.

अनन्यचे घर मोठे. कुटुंब मोठं उच्चविद्याविभूषित, तसेच समाजात चांगलेच स्थान असलेलं. आजोबा-आजी, आई-बाबा, काका-काकू व त्यांची दोन मुले, एक विधवा काकू-तिची मुलगी आणि एक अविवाहित आत्या असा याचा हा परिवार. घरातला मोस्ट इलिजिबल बॅचलर घरी मैत्रिण घेऊन आलाय म्हटल्यावर घरी थट्टामस्करीला ऊत येतो, पण जेव्हा नीरजा समोर येते तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. आतापर्यंत सुशि़क्षित आणि पुरोगामी विचार असलेल्यांचे खरे रूप समोर येते.

जरे प्रेम असले तरी अजून दोघांनी ते एकमेकांना बोलून दाखवलेले नाही. त्यामुळे ती त्याच्याबद्दल आणि आता घरच्यांच्या प्रतिक्रिया पाहून आता तो स्वत:ही साशंक होतो. हळूहळू घरातले सगळेजण दोघांसमोर आडून आडून आपापली मते मांडतात. आई अपेक्षेप्रमाणे ठाम विरोधात. ती अगदी नीरजाने चिरलेल्या फळांनाही केराची टोपली दाखवते. बाबांचा तितकासा विरोध नाही, पण बायकोचे मत डावलून घरात वादळ नकोय त्यांना. दोघांचीही लग्नाआधी मने इतरत्र गुंतलेली असताना एकमेकांशी लग्न करण्याचा व्यवहारिकपणा त्यांनी केलाय. पण त्यांची मने आयुष्यभर खरेच जुळली का हा प्रश्न त्यांच्या वागण्याबोलण्यातून जाणवतो. काकाने काकूला कुठेतरी पाहिले आणि तिच्या सौंदर्यावर भाळून तिच्यासोबत लग्न केले. हे अभिमानाने सांगणारी काकू लगेच तिच्या मताला घरी किंमत नाही हे आठवून व्याकुळते. आत्या ही टीव्ही मालिकांत काम करते. तिच्या दृष्टीने सौंदर्य आणखी महत्वाचे. पण तिलाही एकटेपणाचे दु:ख माहित. त्यामुळे ती प्लॅस्टिक सर्जरी किंवा मेक-अपने डाग झाकण्याचा सल्ला देते. विधवा काकू तर इतर जातीतली. (जगात दोनच तर जाती ना, एक कोकणस्थ आणि दुसरी इतर!!! Wink ) त्यामुळे ती गोरी-घारी नसण्याचा मानसिक छळ तिने सोसलाय. तिचं पूर्ण मत या दोघांना अनुकूल, पण नंतर घरचे तिला कसे वागवतील याची तिला धास्ती आहे. आजीने तर अजून तिला पाहिलेही नाही. अनुभवलाय तो तिचा स्पर्श.. आणि तो स्पर्शच तिला नीरजा किती सुंदर आहे हे सांगतो. तिच्या ऑपरेशननंतर जेव्हा ती नीरजाला प्रथम पाहाते, तेव्हाचा प्रसंग खरंच पाहण्याजोगा आहे. आजोबाही मधल्या पिढीपेक्षा समंजस आहेत. नव्या पिढीला मात्र तिच्या दिसण्याशी काही घेणंदेणं नाही. त्यांची तिच्याशी छान गट्टी जमते. आता शेवट काय होतो हे मी आता इथे सांगत नाही.

महाश्वेता कादंबरी काय आणि शासनाच्या जाहिराती काय, कुणीही कितीही सांगितले तरी प्रत्येक कोड हा लेप्रसीचा नसतो हे कितपत आपल्या गळी उतरलेय हा मोठाच प्रश्न आहे. हा चित्रपट आपण खूप काही मोठा सामाजिक संदेश देतोय असा आव आणत नाही. आणि त्यामुळेच मला तो जास्त आवडला. चित्रपटाची स्टारकास्ट मोठी तगडी आहे. माझ्यासाठी डॉ. नीरजाची भूमिका करणारी देविका दफ्तरदार व अनन्यची भूमिका करणारा शेखर कुलकर्णी हेच काय ते नवीन होते. आजोबा- विजय तेंडुलकर, आजी-दीपा श्रीराम, आई-उत्तरा बावकर, बाबा- विक्रम गोखले, काका- रविंद्र मंकणी, काकू-नीना कुळकर्णी, आत्या-रिमा लागू, विधवा काकू- ज्योती सुभाष, तर भावंडांतले उल्लेखनीय नांव म्हणजे अमृता सुभाष.. कलाकारांची ही मांदियाळीच चित्रपटाच्या अभिनयसंपन्नतेबद्दल सर्व काही सांगून जाते. संयतपणे आणि परिणामकारकतेने हाताळलेला एक वेगळा सामाजिक विषय आणि त्याला या सर्वाच्या अभिनयाची जोड असे असताना साहजिकच चित्रपटास बरीचशी पारितोषिके मिळाली नसती तरच नवल होते. http://www.nitalthefilm.com/ या दुव्यावर चित्रपटाबद्दलची माहिती तसेच पुरस्कारांची भली थोरली यादी दिसते. अवांतर: मी हा चित्रपट गाभ्रीचा पाऊस पाहिल्यानंतर लगेच पाहिला. ज्योती सुभाषना नऊवारीतून एकदम स्कर्ट्मध्ये पाहून अंमळ गंमतच वाटली होती. Smile

हा चित्रपट पाहताना मला सतत महाश्वेतामधले प्रसंग आठवत होते. विशेषत: मोठ्या उमेदीने बरे होऊन घरी परतणारे जीव पुन्हा एकदा हिरमुसल्या चेहर्‍यांनी त्यांच्या कुष्ठरोगी निवासात परततात ते चटका लावून जाणारे क्षण पुन्हा पुन्हा आठवत गेले. माझ्या मते आजकालच्या जमान्यात भलेही या गोष्टी सून म्हणून एखादी मुलगी घरी आणताना काकदृष्टीने पाहिल्या जात असतील, परंतु सहकारी अथवा तत्सम कारणांनी संपर्कात येणार्‍या व्यक्तीस नक्कीच दुजाभावाने वागवले जात नसावे. माझ्या पाहण्यातल्या दोन स्त्रिया आहेत. त्यातल्या एकीला छान टापटिपीने राहण्याची सवय आहे. त्यामुळे त्या सतत लांब हातभर कपडे घालून कोड लपवतात. तर दुसर्‍या सध्या सत्तरीच्या घरातल्या बाई आयआयटीयन आहेत आणि बर्‍याच उच्चपदावर आहेत. त्या असले कोड लपवायचा प्रयत्न बिल्कुल करत नाहीत, पण त्यांचाही त्यांच्या काळचा प्रेमविवाह होता. पहिल्या बाई सतत हसतमुख असतात आणि कुणी त्यांना कोड आहे म्हणून त्यांच्याशी दुष्ट्पणे वागल्याचे पाहिल्याचे माझ्या माहितीत नाही. दुसर्‍या बाईंशी कुणी पंगा घेण्याचा प्रश्नच नाही, त्यांनी भल्याभल्यांना अधिकाराने आणि त्यांच्या ज्ञानाने गारद केलेय. हा माझा स्वत:चा आणि मुंबईतला एका छोट्या समूहातला अनुभव आहे. पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष न करण्याइतका सुधारला आहे का? जर तसे असेल तर खूपच छान.

मला इथे हा चित्रपट पाहिला असल्यास तुम्हाला तो कसा भावला, तसेच कोडाच्या समस्यांबद्दल आणि त्याबद्दलच्या समाजाच्या एकंदर दृष्टीकोनाबद्दल इथे वाचायला आवडेल.

स्टॅनली का डब्बा

खूप दिवस पाहायचा पाहायचा म्हणून हा पिक्चर पाहायचा राहूनच गेला होता. अलग वेळ देणं होत नसेल तर मी सिनेमे दहा-पंधरा मिनिटांच्या तुकड्यांत बघते. माझ्या या तंत्राला चांगले सिनेमे मात्र दाद देत नाहीत. ते एकाच बैठकीत कधी पाहायला भाग पाडतात हे कळतही नाही. बर्‍याच दिवसांनी असा पिक्चर पाहण्याचा योग आला.
डिस्क्लेमर: लेखावरून बरीचशी कथा कळतेय. ज्यांना असा रसभंग व्हायला नकोय त्यांनी इथंच थांबावं. नाहीतरी वरच्या चार वाक्यांतून पिक्चर चांगला आहे असं या लेखाचं तात्पर्य कळतं आहेच.

नेहमीसारखीच एक सकाळ. शाळेत सोडायला आलेली कुणाची आई प्रेमाने मुलाला झापतेय. आणि चौथीच्या वर्गात ढॅण्टॅढॅण म्हणत पोरासोरांनी सॉल्लीड धिंगाणा घातलाय. एकदम जिवंत, निरागस आणि तितकंच लोभसवाणं चित्र. सुखवस्तू घरातला अमन. हा खेळायला थांबला तर त्याच्या घरून त्याच्यासह सर्व मित्रांसाठी खाणं येतं. अभिषेक, आणि त्याच मुलांतला एक मुलगा स्टॅनली.

स्टॅनली वर्गातल्या मुलांहून थोडासा वेगळा आहे. नाचताना वर्गाचा हिरो आहे. आवडत्या टीचरसाठी तो कविता स्वत:हून पाठ करून म्हणतो, वर्गातल्या प्रोजेक्टसाठी दीपस्तंभाची छोटीशी प्रतिकृतीच उभारतो. तसा गोंडस आहे पण कधीमधी चेहरा मारामारी केल्यासारखा काळानिळा करून घेऊन, कधी सुजवून घेऊन येतो. म्हणे बाजारात कुण्या मुलीला वाचवताना त्याला हे इतकं लागलेलं असतं. तशी त्याला पुस्तकांची पानं फाडणारी लहान बहीण आहे, पटकन उडी मारून बस पकडणारी, धावत ट्रेन पकडणारी सुपरवुमन आई आहे, आणि बाबा आहेत. हे सगळं कधी दिसत नाही, पण त्याच्या निबंधांत, मित्रांबरोबरच्या गप्पांतून जाणवत राहातं. तसंही वर्गातल्या कुणाचंच घर किंवा घरचे सिनेमात नाहीत, त्यामुळे याच्या आईबाबांचं न दिसणं खटकत नाही.

शाळा बहुतेक सकाळची असावी. त्यामुळं छोट्या सुटीतला नाष्टाच सगळे डब्यातून आणतात. अमनचा डबा विशेष असावा. त्याची आई त्याला छान छान पदार्थ करून देते. तसे सगळेच डबे आणतात पण दोन लोक मात्र कधीच आणत नाहीत. सिनेमाच्या नावावरूनच कळतं, की यातला एक आहे स्टॅनली आणि दुसरे आहेत हिंदीचे टीचर बाबुभाई वर्मा. स्टॅनली डबा का आणत नाही कळत नाही. त्याला इतरांचा डबा खाणंही मनाला डाचतं. म्हणून तो कधी कधी नसलेल्या दोन रूपयांचा वडापाव खातो असं खोटंच सांगून थंडा फराळ करून येतो. पण त्याचे मित्र चांगले आहेत. विशेषत: अमन. त्याच्या घरचे पराठे तेही आईने बनवले म्हटल्यावर स्टॅनली एकदम असोशीने ते खायला जातो, पण....

बाबुभाई म्हणजे एक पात्र आहे.त्याला सगळेजण खडूस म्हणतात. वर्ग अर्ध्यावर सोडून तो सहकार्‍यांनी आणलेले डबे चोरून खातो, पुन्हा सगळे जेवताना मधी मागून तर कधी कधी मला नको आहे, पण आता तुम्ही देतच आहात तर खातो बापडा म्हणून सतत खात असतो. त्यातही हे नको ते नको असे त्याचे नखरे आहेत. आताशा सगळ्यांना त्याच्या या वागण्याची सवय झालीय आणि मनात ’घे मेल्या गिळ’ असंच म्हणत त्याला खाणं ऑफर करतात. तो स्वत: फुकटचं खातो पण स्टॅनली डबा आणत नाही म्हणून त्याचा सतत पाणउतारा करतो.

स्वाईन फ्ल्यूमुळं शाळांना दिलेली सुटी महागात पडते आणि शाळेला रोजचे तास वाढवणं भाग पडतं. आपसूक छोट्या सुटीसोबत आता एक मोठी सुटीही येते आणि स्टॅनलीचा डब्याचा प्रश्न आणखीच आ वासतो. अमनला तर आता चार कप्प्यांचा मोठा डबा येतो. साहजिकच वर्गातला सगळ्यात मोठा डबा आहे तो. खडूसचा त्या डब्यावर डोळा आहे. स्टॅनली एकदोनवेळा घरून जेऊन येतो म्हणून गेला पण त्याला फाटकापाशीच घुटमळताना अभिषेकनं पाह्यलंय. म्हणून स्टॅनलीची आई गावाहून येईपर्यंत अमनला स्टॅनली्सोबतच डबा शेअर करायचाय. यावरचा एकच उपाय आहे की वर्गात डबा खायचाच नाही. या उंदीर-मांजराच्या खेळात मुलं डबा खाण्याचं रोज एक वेगळं ठिकाण सांगतात आणि खडूस त्यांना वेड्यासारखा शोधत राहतो. मुलं जाऊन जाऊन जाणार कुठं? एक दिवस ही मंडळी त्याच्या तावडीत सापडतात आणि डबा घेऊन आल्याशिवाय शाळेत यायचं नाही अशी स्टॅनलीला तंबी मिळते.

स्टॅनली शाळेत यायचा बंद होतो. त्याच्यावर प्रेम करणार्‍यांना, त्याला रागवणार्‍यांना, इतकंच काय पण खडूसलाही त्याची अनुपस्थिती खटकते. मध्यंतरी एका आंतरशालेय समारंभासाठी मुलांची निवड होण्याची वेळ येते पण नेमका स्टॅनली तेव्हा या डबा प्रकरणात शाळेत येत नसतो. स्टॅनलीच्या आवडत्या रोझीटीचरला हा प्रकार कळतो आणि आधीच पश्चात्ताप होत असलेल्या खडूसला ती खडे बोल सुनावते आणि अभिषेककडून त्या समारंभाची माहिती मिळून स्टॅनली थेट मुख्य ठिकाणीच जातो आणि तिथे त्याची निवड होते हे सांगायला नकोच. त्यानंतर एक दिवस स्टॅनली खडूससाठी मोठ्ठा डबा घेऊन जातो आणि त्याच्याकडे वर्गात बसण्याची परवानगी मागतो. यावेळी मात्र खडूस सरळ राजीनामा देऊन शाळाच सोडून जातो.

त्या आंतरशालेय समारंभाच्या कार्यक्रमानंतरही आंतरशालेय समारंभाच्या आईबाबांना त्याला आणायला उशीर होतो आणि शाळेचे फादर त्याला घराजवळ सोडून जातात. तो घरी पोचल्यावर कळतं, आई, बाबा, बहीण हे सगळं खोटं आहे आणि तो अनाथ आहे. तो एका दूरच्या काकाच्या हॉटेलमध्ये काम करतो आणि हा काका त्याचा अतिशय छळ करतो. घरी पोचल्यापोचल्या तो हसतमुखाने कामाला लागतो आणि स्टॅनलीच्या नवीन डब्याचं गुपित कळतं. रात्रीचे राहिलेले पदार्थ दोघे मिळून डब्यात भरतात आणि दुसर्‍या दिवशी काकाच्या नकळत हा डबा स्टॅनलीसोबत शाळेत जातो. त्यानंतरही रोज तो डबा घेऊन तर जातोच आणि फक्त मित्रांनांच नाही, तर टीचर्स, शाळेतला शिपाई या सगळ्यांना आईने किती लवकर उठून आणि मेहनतीने बनवलाय याचे किस्से सांगत खिलवत राहतो.

स्टॅनली लहान आहे, त्या वयाची निरागसता त्याच्या चेहर्‍यावरून ओसांडून जाताना दिसते. तो खोटं बोलतो पण त्यात बनेलपणा नाही. जेव्हा त्याच्या खोटं बोलण्याचं कारण कळतं तेव्हाही त्याच्या चेहर्‍यावरचं हसू लोपत नाही. परिस्थितीची नीट जाणीव असलेला तरी तिच्यासमोर त्यानं आपलं बाल्य हरवलं नाहीय. स्टॅनलीची भूमिका केलीय अमोल गुप्तेच्या मुलाने-पार्थो गुप्तेने. त्याचे मित्र अमन आणि अभिषेक- हे ही दोघे नवीनच चेहरे आहेत. अभिनयाच्या बाबतीत लहानांनी मोठ्यांवर बाजी मारलेय. खडूसमुळे आपला मित्र शाळेत यायचा बंद झालाय पण मास्तरवर राग कसा दाखवायचा अशा स्थितीत घुश्शात असलेला वर्ग एकदम गोडुला दिसतो. साधारणपणे लहान मुलांच्या सिनेमात मुलं मोठ्यांसारखे लेक्चर झोडत असतात. असाही इथं आव नाही ही एक जमेची बाजू. गाणी बरी आहेत पण अगदी आठवणीत राहावीत अशीही नाहीत.

पिक्चरभर स्टॅनली डबा का आणत नसावा हा प्रश्न सतावत राहातो. मनाशी अंदाजही बांधले जातात. तसं ओळखणं अगदी अवघडही नाही. चित्रपट बालकामगारांच्या आकडेवारीच्या स्लाईड्सनी संपतो. चित्रपट एका बालकामगारावर असला तरी ही अनिष्ट प्रथा थांबवण्यासाठी काही संदेश देत नाही.

सिनेमाचा समस्त कलाकारवृंदः

आवर्जून सांगावंसं असं काही;-
१. तसं पाहायला गेलं तर सिनेमात काम करणं ही पण एक मजूरीच. बरेच बालकलाकार त्यासाठी शाळा बुडवतात आणि स्वत:चे खास टीचर्स ठेवतात. इथं अमोल गुप्तेने या चित्रपटाचं शूटिंग मुलांची शाळा बुडू न देता सुटीत आणि तेही मधल्या दोन मध्यतरांसह दररोज पाच तास याप्रमाणे पूर्ण केलंय. इतर चित्रपटनिर्माते आणि विशेषत: मालिकावाल्यांनी अमोलकडून काही शिकावं आणि त्या मुलांचं बालपण हिरावून घेणं थांबवावं.
२. एका फ्रेममधे घराबाहेर पडताना कोलॅप्सिबल दरवाज्याच्या आड स्टॅनली असतो आणि बाहेर रस्त्यावर उभा असतो ’कमवा आणि शिका’ चे प्रवर्तक आणि पुरस्कर्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांचा धीरगंभीर आश्वासक पुतळा!!!!
न बोलता हे दृश्य बरंच काही सांगून जातं. हा ’गुप्ते टच’ मला अगदी मनापासून आवडला. Smile

Wednesday, May 1, 2013

सूरज का सातवाँ घोडा


'सूरज का सातवाँ घोडा' ही धर्मवीर भारती यांची कादंबरी. संकल्पना अशी की, सूर्याच्या रथाला सात घोडे असतात. सहा घोडे चाकोरीबद्ध मार्गाने धावतात. पण सातवा घोडा सर्वात लहान आहे आणि त्यामुळे इतरांच्या गतीने धावू शकत नाही. कदाचित लहान असल्याने अवखळपणे आखलेला मार्ग सोडून धावायची त्याला मुभा आहे. त्यामुळे रथाच्या धावण्याची गती-मार्ग-ध्येय त्याच्यावर अवलंबून आहे. आपापली आयुष्य जगताना कदाचित आपणही असेच सूर्याच्या रथाचे घोडे असू. पण तो सातवा घोडा बनण्याची इच्छा आणि धमक किती जणांत असते?

'सूरज का सातवाँ घोडा' सात कथांभोवती गुंफला आहे. पहिल्या व दुसर्‍या कथेला नांव आहे. ’नमक की अदायगी’ व ’घोडे की नाल’. नंतरच्या कथा बिनानावाच्याच आहेत. या सार्‍या मात्र स्वतंत्र कथा नसून एकमेकांत गुंतल्या आहेत. या कथा गावातल्या लोकांच्या, त्यांच्या जीवनाच्या आणि एकमेकांची आयुष्ये घडवणार्‍या आणि बिघडवणार्‍या. खरंतर या कथांचा केंद्रबिंदू आहे माणिक मुल्ला (रजत कपूर) याच्या आयुष्यात आलेल्या तीन स्त्रिया. एक सुशिक्षित, एक मध्यमवर्गीय तर तिसरी कनिष्ठवर्गीय. या तिघींच्या कथा लघुकथेच्या रूपात येतात. आणि कळतं, खरंतर या सगळ्या लघुकथांचा संच म्हणजे एकच सलग दीर्घकथा आहे. माणिक मुल्ला आपल्या वडिलोपार्जित घरी एकटा राहात मित्रमंडळींचं टोळकं जमवून या कथा सांगतो आणि ते सगळे तींवर चर्चा करत राहतात. या कथांमध्ये देवदास आहे, कार्ल मार्क्स आहे आणि चेकॉव्ह सुद्धा आहे. कथा सांगण्याचं तंत्र, तंत्राशिवायची गोष्ट असं सगळंच काही आहे.

साधारण एकाच छोट्या गावात राहणारी माणसे. जमुना आणि तिचे आई-बाबा हे एक कुटुंब, शेजारीच राहणारा जमुनाचा प्रियकर तन्ना आणि त्याच्या दोन बहिणी-बाबा-बाबांची ठेवलेली बाई हे दुसरं, लिली आणि तिची आई हे तिसरं, माणिक आणि त्याचे दादा-वहिनी हे एक आणि लढाईत हात गमावलेला एक फौजी-चमन ठाकूर आणि त्याने सांभाळलेली अनाथ मुलगी-सत्ती हे शेवटचं कुटुंब. साधारण हीच पात्रे सगळ्या कथांमधून येत राहतात. नाही म्हणायला दुसर्‍या गावातला जमीनदार अन त्याचा नोकर रामधन हीच काय ती बाहेरची माणसे. जमुना-मध्यमवर्गीय, लिली-उच्चशिक्षित, सत्ती-कनिष्ठवर्गीय असे समाजाचे सरळसरळ तीन स्तर इथे दिसतात. एक तन्नाचे बाबा सोडले तर मुख्य व्यक्तिरेखांमधलं कुणीच थेट खलप्रवृत्तीचं नाही.

जमुना माणिकला शाळेत असताना भेटते तर लिली आणि सत्ती या इंटरला असतानाच्या काळात. जमुनावरचं त्याचं प्रेम हे पौगंडावस्थेतलं आकर्षण असतं आणि ते तेवढंच टिकतं. सत्तीच्या बाबतीत त्याला ती आवडत असते आणि तिला त्याच्याबद्दल प्रचंड आदर असतो. इथं प्रेमापेक्षाही जिव्हाळा आणि आपुलकीचं नातं जास्त आहे. लिलीवरती मात्र माणिकचं प्रेम असल्याचं दिसतं पण इथेही तो काढता पाय का घेतो हे कळत नाही.

त्याच्या कथानायिकांपैकी पहिली आहे जमुना. मध्यमवर्गीय घरातील एकुलती मुलगी. कादंबर्‍या वाचणारी, त्यांच्या स्वप्नील जगात रमणारी एक हट्टी मुलगी. शेजारच्या घरातल्या तन्नावर तिचं प्रेम आहे. तशी ती बेधडक आहे आणि आपल्या प्रेमासाठी आपल्या आणि त्याच्याही घरातल्यांशी टक्कर घेण्यास तयार आहे. तिच्या दुर्दैवानं तन्ना मात्र कचखाऊ आहे. तिचं लग्न मात्र शेवटी तिच्या बाबाच्या वयाच्या दोनदा विधुर झालेल्या जमीनदाराशी होतं. लेखकाच्या मते प्रेमकथांचं तात्पर्य खरंतर आर्थिक आणि वर्णव्यवस्थेवर अवलंबून असतं. इथं जमुना उच्चवर्गीय परंतु आर्थिक परिस्थिती हलाखीची आणि तन्ना खालच्या गोत्राचा. त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी यशस्वी न होता अर्थ आणि वर्ण या दोन्ही पातळींवर वरचढ ठरलेल्या जमीनदाराशी तिचा विवाह होतो.

दुसरी लिली, ललिता. शिकलेली, सुंदर, श्रीमंत, एकुलती आणि त्यामुळे आपसूक असणारा गर्विष्ठ भाव असणारी. तिला मनातून हे लग्न करायचंच नसतं पण पुन्हा एकदा नियतीपुढे तिचं काही चालत नाही. तिचे बाबा वारले आहेत आणि आई ही टिपिकल ’मी बाईमाणूस’ अशा वृत्तीची आहे. तन्नाशी लग्न झाल्यावर ती काही त्याच्याशी जुळवून घेत असताना दिसत नाही. कदाचित तो बापाच्या तालावर नाचतो याचा राग तिला अधिक आहे.

सत्ती ही खरंतर अनाथ मुलगी. तिला चमन ठाकूर या फौजीनं सांभाळलं. ही कामाला वाघ आहे. तशी फटकळ पण मायेचा ओलावाही पुष्कळ आहे. माणिकला शिक्षणासाठी गरज आहे म्हटल्यावर लगेच आयुष्याची पुंजी हवाली करणारी अशी साध्या सरळ मनाची आहे. मात्र ज्याने वडिलकीच्या नात्याने सांभाळलं त्यानेच पैशांपायी विकलं म्हटल्यावर ती जाम चिडते, वैतागते आणि माणिककडे मदतीसाठी येते.

जमुना प्रथमता दिसते ती अवखळ, हट्टी, स्वप्नांत रमणारी व एकदम बेधडक. तन्नाच्या घाबरटपणामुळे चिडून ती माणिकवर प्रेम करू लागते. लग्न झाल्यावर मात्र तिचा आवेश बदलतो. एक शांत, पोक्तपणा हालचालींमधून जाणवतो. इतकंच नव्हे तर आईबाबांपेक्षा तिला आता तिच्या अजून न झालेल्या मुलाच्या भवितव्याची काळ्जी वाटते. आईचा विरोध डावलून तिचा तन्नासोबत विवाह करण्यास परवानगी देणार्‍या बाबांसोबतही ती अत्यंत स्वार्थीपणे वागते. एकूणातच, तिचं पुढचं आयुष्यही सोपं होत नाही. कदाचित इतक्या वृद्ध नवर्‍याकडून संसारसुख मिळत नसल्याने ती पुन्हा तन्नाकडे आकर्षित होते. लेखक पुन्हा एकदा अर्थ-जातिव्यवस्थेला नांवे ठेवतो की ज्यांच्यामुळे अशा अनेक जमुना आपल्या समाजात तयार होतात. .

लिली शारिरीक दृष्ट्या नसली तरी मानसिक रित्या खंबीर आहे. तन्नाशी लग्न ठरल्यानंतर ’नवर्‍यापेक्षा बायको जास्त शिकलेली नको’ किंवा’ बाईच्या जातीला इतकं शिकून काय करायचंय” असं म्हणून तिचं शिक्षण थांबवलं जातं. परिस्थितीपुढे हार पत्करलेली लिली एकंदर प्रकरण लक्षात येताच ’हमें किसी मर्द की जरूरत नहीं’ असं सासर्‍याला ठणकावून सांगून सरळ आईकडेच राहाते. खरंतर तन्ना थोडा खंबीर असतात तर या जमुना आणि लिलीची इतकी परवड झाली नसती. तीच गोष्ट माणिकची. जमुनाच्या वेळी तो शाळेत जाणारा-बहुधा तिच्याहून लहान असावा, परंतु लिलीच्या वेळी त्याने काढता पाय का घेतला हे कळत नाही.

सत्ती ही तिघींमधली फटकळ, सतत चाकू घेऊन फिरणारी, कुणाला न घाबरणारी अशिक्षित मुलगी. इतकी खंबीर असूनही सर्वात जास्त अन्याय मात्र तिच्यावरच होतो. तिच्याशी माणिकची हिशोब लिहिण्याच्या निमित्ताने ओळख होते. दोघे अगदी प्रेमात नसले तरी तिचा त्याच्यावर खूप जीव असतो. साठवलेले सगळे पैसे ती एकदा त्याच्या उच्चशिक्षणासाठी आणून देते. पण जेव्हा खरी मदतीची अपेक्षा असते तेव्हा माणिक डरपोक निघतो आणि आयुष्यभर त्याला याचा सल राहतो.

या सर्वांत तन्ना हा दुष्ट जगातला बिचारा प्राणी वाटतो. तो आयुष्यभर दबलेलाच राहातो. शेवटी मृत्यूपूर्वी त्याचे पाय कापले जाणं त्याच्या असहाय्यतेची परिसीमा आहे. तर त्याचा बाबा हा दुष्टतेचा अर्क आहे. दिसेल त्या बाईवर नजर मारणं आणि नंतर मुलाच्या सासरी भ्याडासारखं लपून बसणं, प्रसंगी विहिणीवरतीही लाईन मारणं म्हणजे कळसच! इथं तन्ना, माणिक, सत्ती, जमुना, लिली सगळ्यांना सूरज का सातवॉं घोडा बनायची संधी असते, ती फक्त लिलीच घेते असं दिसून येतं. किमान तिच्यापुरतं तरी ती सासरी खितपत पडण्यापेक्षा तिचं जगणं बदलते. शेवटाकडे धुक्यात दिसणार्‍या सत्तीकडे धावत जाताना माणिकही प्राप्त परिस्थितीला शरण न जाता जगणं बदलू पाहण्याचा प्रयत्न करताना दिसतो. तो यामध्ये यशस्वी होतो की नाही हे मात्र इथं गुलदस्त्यात आहे.

मूळ कादंबरी सात कथांत विभागली आहे आणि कथा ज्या क्रमाने घडतात त्याच क्रमाने येतात असंही नाही. चित्रपटाचा फॉर्मही तोच आहे. काही प्रसंग दुसर्‍या कथेत दुसर्‍या पात्राच्या दृष्टीमधूनही दिसतात आणि एकाच प्रसंगासाठीचं प्रत्येकाचं वेगवेगळा दृष्टीकोन (परिप्रेक्ष्य) दिसतं.
उदा. तन्ना आणि जमुनाच्या घराची गच्ची जवळजवळ आहे, इतकी की एकीवरून दुसरीवर जाता येतं. एका संध्याकाळी तन्नाला आईची आठवण येत असते आणि तो उदास असतो. तो जमुनाला भेटतो, पण तिला त्याच्या मनःस्थितीची कल्पना येत नाही. ती त्यातून तिला सोयीस्कर वाटलेला अर्थ काढते आणि त्याच्यासाठी खायला आणायला जाते. पुढच्या कथेत कधीतरी सगळं रामायण कळतं. त्याचे बाबा आणि त्यांची बाई शयनगृहात असताना हा तिथे हुक्का ठेवायला जातो. ते दोघे चिडतात. आधीच बाबा रागीट त्यात ती बया आगीत तेल ओतत राहाते. बहिणीही आसुरी आनंद बाळगणार्‍या. त्यामुळे त्यांच्याकडूनही आधारापेक्षा कुत्सित टोमणेच मिळतात. दुखावलेला तन्ना जमुनाला भेटायला जातो तर ती अल्लडपणे त्याच्यासाठी मालपुए आणायला जाते. दुसर्‍या एका प्रसंगात जमुना पहिल्यांदा सासरहून येते तो प्रसंग इतरांच्या किंबहुना आईच्या नजरेतून मुलीच्या सुखश्रीमंतीचं कौतुक करणारा दिसतो तर नंतर तो कधीतरी लग्न होऊन आलेली प्रेयसी आणि आपल्या दारात उभा राहून पाहात असलेला प्रियकर यांच्यातला अवघडलेला पण ते अवघडलेलपण दाखवू न देण्याचा प्रयत्न करणारा असा येतो.

मी मूळ कादंबरी अर्धीअधिक वाचली. कादंबरी असल्यानं प्रसंग खुलवण्यासाठी शब्दमर्यादा नाही, परंतु त्याच सगळ्या गोष्टी अनावश्यक प्रसंग-व्यक्ती टाळून तोच इफेक्ट कसा आणावा यासाठी बेनेगलांना खरंच मानलं. आतापर्यंतची उदाहरणं-दा विंची कोड, शाळा, गोळाबेरीज, पिंजर पाहता पुस्तकाला चित्रपटाने न्याय दिला नाहीय असं माझं मत होतं. इथं मात्र पुस्तकाहून मला चित्रपट अधिक चांगला वाटला.

उत्कृष्ट हिंदी आणि सहजसुंदर अभिनय ही चित्रपटाची बलस्थानं म्हणायला हवीत. रजत कपूरचा(माणिक) हा पहिला चित्रपट असेल असं वाटत सुद्धा नाही. जमुना(राजेश्वरी)चा हा आयत्या घरात घरोबानंतरचा दुसराच चित्रपट. लग्न झाल्यानंतर सतत भरजरी शालूचा पदर सावरणारी आणि नंतर एकदा दरवाजात आत आल्यावर तो उडवून लावणारी जमुना तिच्या देहबोलीतून छान दिसून येते. लिली(पल्लवी जोशी) या एकाच प्रसंगात शिक्षणामुळं आणि श्रीमंतीमुळंही आलेला गर्व, आत्मविश्वास, थोडीशी बेफिकिरी, लग्नामधून आलेली कटुता आणि घेतलेला निर्णयावर ठाम असणं हे कसं दाखवून देते पहा.



मूळ कादंबरी इथं वाचायला मिळेल.
कादंबरीच्या शेवटी दिलेली काही वाक्यं इथं देण्याचा मोह आवरत नाहीयः "हुआ यह है कि हमारे वर्ग-विगलित, अनैतिक, भ्रष्ट और अँधेरे जीवन की गलियों में चलने से सूर्य का रथ काफी टूट-फूट गया है और बेचारे घोड़ों की तो यह हालत है कि किसी की दुम कट गई है तो किसी का पैर उखड़ गया है, तो कोई सूख कर ठठरी हो गया है, तो किसी के खुर घायल हो गए हैं। अब बचा है सिर्फ एक घोड़ा जिसके पंख अब भी साबित हैं, जो सीना ताने, गरदन उठाये आगे चल रहा है। वह घोड़ा है भविष्य का घोड़ा, तन्ना, जमुना और सत्ती के नन्हें निष्पाप बच्चों का घोड़ा; जिनकी जिंदगी हमारी जिंदगी से ज्यादा अमन-चैन की होगी, ज्यादा पवित्रता की होगी, उसमें ज्यादा प्रकाश होगा, ज्यादा अमृत होगा। वही सातवाँ घोड़ा हमारी पलकों में भविष्य के सपने और वर्तमान के नवीन आकलन भेजता है ताकि हम वह रास्ता बना सकें जिन पर हो कर भविष्य का घोड़ा आएगा; इतिहास के वे नए पन्ने लिख सकें जिन पर अश्वमेध का दिग्विजयी घोड़ा दौड़ेगा। माणिक मुल्ला ने यह भी बताया कि यद्यपि बाकी छह घोड़े दुर्बल, रक्तहीन और विकलांग हैं पर सातवाँ घोड़ा तेजस्वी और शौर्यवान है और हमें अपना ध्यान और अपनी आस्था उसी पर रखनी चाहिए।"
--धर्मवीर भारती