नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट.
चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो. त्यातच त्याच्या घरी एक कार्यक्रमही आहे, त्यासाठी तसेही त्याला घरी यायचंच असते. नीरजाला अंगावर, विशेषत: चेहर्यावर कोड आहे. ते जन्मजात नाही, पण नंतर उद्भवलेलं असं. तिला आताशा लोकांच्या विचित्र नजरांची सवय झालीय. आधीचा तिचा कोड असण्याबद्दलचा न्यूनगंड तिच्या पेशातल्या कौशल्याने, बुद्धीने आता झाकोळून गेलाय. तरीही कुठेतरी कधीतरी तिला ते कोड खुपतं असं जाणवतं.
अनन्यचे घर मोठे. कुटुंब मोठं उच्चविद्याविभूषित, तसेच समाजात चांगलेच स्थान असलेलं. आजोबा-आजी, आई-बाबा, काका-काकू व त्यांची दोन मुले, एक विधवा काकू-तिची मुलगी आणि एक अविवाहित आत्या असा याचा हा परिवार. घरातला मोस्ट इलिजिबल बॅचलर घरी मैत्रिण घेऊन आलाय म्हटल्यावर घरी थट्टामस्करीला ऊत येतो, पण जेव्हा नीरजा समोर येते तेव्हा सगळ्यांचे चेहरे पाहण्यासारखे होतात. आतापर्यंत सुशि़क्षित आणि पुरोगामी विचार असलेल्यांचे खरे रूप समोर येते.
जरे प्रेम असले तरी अजून दोघांनी ते एकमेकांना बोलून दाखवलेले नाही. त्यामुळे ती त्याच्याबद्दल आणि आता घरच्यांच्या प्रतिक्रिया पाहून आता तो स्वत:ही साशंक होतो. हळूहळू घरातले सगळेजण दोघांसमोर आडून आडून आपापली मते मांडतात. आई अपेक्षेप्रमाणे ठाम विरोधात. ती अगदी नीरजाने चिरलेल्या फळांनाही केराची टोपली दाखवते. बाबांचा तितकासा विरोध नाही, पण बायकोचे मत डावलून घरात वादळ नकोय त्यांना. दोघांचीही लग्नाआधी मने इतरत्र गुंतलेली असताना एकमेकांशी लग्न करण्याचा व्यवहारिकपणा त्यांनी केलाय. पण त्यांची मने आयुष्यभर खरेच जुळली का हा प्रश्न त्यांच्या वागण्याबोलण्यातून जाणवतो. काकाने काकूला कुठेतरी पाहिले आणि तिच्या सौंदर्यावर भाळून तिच्यासोबत लग्न केले. हे अभिमानाने सांगणारी काकू लगेच तिच्या मताला घरी किंमत नाही हे आठवून व्याकुळते. आत्या ही टीव्ही मालिकांत काम करते. तिच्या दृष्टीने सौंदर्य आणखी महत्वाचे. पण तिलाही एकटेपणाचे दु:ख माहित. त्यामुळे ती प्लॅस्टिक सर्जरी किंवा मेक-अपने डाग झाकण्याचा सल्ला देते. विधवा काकू तर इतर जातीतली. (जगात दोनच तर जाती ना, एक कोकणस्थ आणि दुसरी इतर!!! ) त्यामुळे ती गोरी-घारी नसण्याचा मानसिक छळ तिने सोसलाय. तिचं पूर्ण मत या दोघांना अनुकूल, पण नंतर घरचे तिला कसे वागवतील याची तिला धास्ती आहे. आजीने तर अजून तिला पाहिलेही नाही. अनुभवलाय तो तिचा स्पर्श.. आणि तो स्पर्शच तिला नीरजा किती सुंदर आहे हे सांगतो. तिच्या ऑपरेशननंतर जेव्हा ती नीरजाला प्रथम पाहाते, तेव्हाचा प्रसंग खरंच पाहण्याजोगा आहे. आजोबाही मधल्या पिढीपेक्षा समंजस आहेत. नव्या पिढीला मात्र तिच्या दिसण्याशी काही घेणंदेणं नाही. त्यांची तिच्याशी छान गट्टी जमते. आता शेवट काय होतो हे मी आता इथे सांगत नाही.
महाश्वेता कादंबरी काय आणि शासनाच्या जाहिराती काय, कुणीही कितीही सांगितले तरी प्रत्येक कोड हा लेप्रसीचा नसतो हे कितपत आपल्या गळी उतरलेय हा मोठाच प्रश्न आहे. हा चित्रपट आपण खूप काही मोठा सामाजिक संदेश देतोय असा आव आणत नाही. आणि त्यामुळेच मला तो जास्त आवडला. चित्रपटाची स्टारकास्ट मोठी तगडी आहे. माझ्यासाठी डॉ. नीरजाची भूमिका करणारी देविका दफ्तरदार व अनन्यची भूमिका करणारा शेखर कुलकर्णी हेच काय ते नवीन होते. आजोबा- विजय तेंडुलकर, आजी-दीपा श्रीराम, आई-उत्तरा बावकर, बाबा- विक्रम गोखले, काका- रविंद्र मंकणी, काकू-नीना कुळकर्णी, आत्या-रिमा लागू, विधवा काकू- ज्योती सुभाष, तर भावंडांतले उल्लेखनीय नांव म्हणजे अमृता सुभाष.. कलाकारांची ही मांदियाळीच चित्रपटाच्या अभिनयसंपन्नतेबद्दल सर्व काही सांगून जाते. संयतपणे आणि परिणामकारकतेने हाताळलेला एक वेगळा सामाजिक विषय आणि त्याला या सर्वाच्या अभिनयाची जोड असे असताना साहजिकच चित्रपटास बरीचशी पारितोषिके मिळाली नसती तरच नवल होते. http://www.nitalthefilm.com/ या दुव्यावर चित्रपटाबद्दलची माहिती तसेच पुरस्कारांची भली थोरली यादी दिसते. अवांतर: मी हा चित्रपट गाभ्रीचा पाऊस पाहिल्यानंतर लगेच पाहिला. ज्योती सुभाषना नऊवारीतून एकदम स्कर्ट्मध्ये पाहून अंमळ गंमतच वाटली होती.
हा चित्रपट पाहताना मला सतत महाश्वेतामधले प्रसंग आठवत होते. विशेषत: मोठ्या उमेदीने बरे होऊन घरी परतणारे जीव पुन्हा एकदा हिरमुसल्या चेहर्यांनी त्यांच्या कुष्ठरोगी निवासात परततात ते चटका लावून जाणारे क्षण पुन्हा पुन्हा आठवत गेले. माझ्या मते आजकालच्या जमान्यात भलेही या गोष्टी सून म्हणून एखादी मुलगी घरी आणताना काकदृष्टीने पाहिल्या जात असतील, परंतु सहकारी अथवा तत्सम कारणांनी संपर्कात येणार्या व्यक्तीस नक्कीच दुजाभावाने वागवले जात नसावे. माझ्या पाहण्यातल्या दोन स्त्रिया आहेत. त्यातल्या एकीला छान टापटिपीने राहण्याची सवय आहे. त्यामुळे त्या सतत लांब हातभर कपडे घालून कोड लपवतात. तर दुसर्या सध्या सत्तरीच्या घरातल्या बाई आयआयटीयन आहेत आणि बर्याच उच्चपदावर आहेत. त्या असले कोड लपवायचा प्रयत्न बिल्कुल करत नाहीत, पण त्यांचाही त्यांच्या काळचा प्रेमविवाह होता. पहिल्या बाई सतत हसतमुख असतात आणि कुणी त्यांना कोड आहे म्हणून त्यांच्याशी दुष्ट्पणे वागल्याचे पाहिल्याचे माझ्या माहितीत नाही. दुसर्या बाईंशी कुणी पंगा घेण्याचा प्रश्नच नाही, त्यांनी भल्याभल्यांना अधिकाराने आणि त्यांच्या ज्ञानाने गारद केलेय. हा माझा स्वत:चा आणि मुंबईतला एका छोट्या समूहातला अनुभव आहे. पण खरेच आपला समाज कोडाकडे दुर्लक्ष न करण्याइतका सुधारला आहे का? जर तसे असेल तर खूपच छान.
मला इथे हा चित्रपट पाहिला असल्यास तुम्हाला तो कसा भावला, तसेच कोडाच्या समस्यांबद्दल आणि त्याबद्दलच्या समाजाच्या एकंदर दृष्टीकोनाबद्दल इथे वाचायला आवडेल.