Thursday, March 25, 2010

अर्थ अवर २०१०!!!

दरवर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी पाळला जाणारा अर्थ अवर यावर्षी या शनिवारी २७ तारखेला भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री ८:३० ते ९:३० पाळला जाणार आहे...

यातून काय नि कितपत साध्य होणार असा विचार न करता आपण यात आपला खारीचा वाटा उचलूयात!!
चला गाऊयात पुन्हा एकदा.... बिजली है शक्ती इसे व्यर्थ ना जलाओ..!!!

अर्थ अवर - अनावश्यक दिवे नि उपकरणे वर्षातून निदान तासभर बंद ठेवून वीजबचत करणे..

Sunday, March 7, 2010

राष्ट्रगीत..

सिनेमागृहात सिनेमा चालू होण्या आधी राष्ट्रगीत दाखवण्याची आपल्याकडे प्रथा आहे.... आपल्याकडे राष्ट्रगीताच्या वेगवेगळ्या विडिओजची कमी नाहीय.. त्यांतल्या काही विडिओज बद्दलची ही माझी काही मते.. अर्थात ही व्यक्तीगत मते आहेत.. मतांतरे असू शकतात.. किंबहुना असणारच!!!

हा विडिओ, यांत बरेचसे सिने कलाकार, गायक आहेत.. यात प्रत्येकाने एक-एक ओळ म्हटलीय, ते प्रकरण फारसे आवडले नाही.. एकतर ५२ सेकंदाचे गीत, त्यात पण ओळी अर्ध्यामुर्ध्या करून सगळ्यांत खिरापतींसारख्या वाटल्या आहेत.. हा एक भाग सोडला, तर चित्रीकरण उत्तम आहे.. निदान त्या परवाच्या फिर मिले सुर मेरा तुम्हारा मधल्या सारखे कुणीही आम्ही सेलेब्रिटी आहोत असे सतत दाखवत आहे असे वाटत नाही.

आणखी एक विडिओ आहे. ज्यात लतादिदी-आशा भोसले राष्ट्रगीत एक एक ओळ गातात. बर्‍याच लोकांची खिचडी नाहीय पण बहुधा रेकॉर्डिंग मध्ये काही तरी घोळ असावा.. कारण त्यात बहुतांश ठिकाणी मला त्यात लिप-सिंक आढळला नाही.. या सगळ्यांत अगदी काल-परवा पर्यंत मला सिनेमॅक्स मध्ये दाखवली जाणारी मराठी कलाकारांची चित्रफीत अधिक आवडायची (भूतकाळ का केला याचे कारण पुढे देतेय) सगळेजण छान स्वच्छ पांढर्‍या पोषाखात, उल्हासित चेहर्‍यांनी, सात्विक भाव चेहर्‍यावर घेऊन गातात.. तेव्हा खरेच आम्हांला आमच्या देशाचे गीत गाताना अभिमान वाटतोय अशा आवेशात त्यांना गाताना पाहून खरेच छान वाटायचे!!!


पण काल-परवा, एक नवीन (निदान माझ्यासाठीतरी) विडिओ पाह्यला... कुठेतरी लडाख किंवा तत्सम अतिथंड प्रदेशात जवानांनी झेंडा फडकवल्याच्या पार्श्वभूमीवर जन गन मनची धून वाजवली जात होती... रोंरावणारा वारा, त्यासोबत उडणारे बर्फाचे कण, थंड पडलेल्या बंदुका, त्यातही झेंडा फडकवत ठेवण्याची त्यांची जिद्द!!! एकही शब्द कुणी न बोलता.. मेक-अप, अभिनय काहीच नाही.. पण त्यांच्या चेहर्‍यावरचे बाणेदार भाव... कणखरपणा... इतक्या गारठलेल्या थंडीतही एका ओळीत उभे राहिलेले... त्या बर्फाच्या वादळाची तमा न बाळगता बाणवलेली कडक शिस्त..!!!!
त्या वेळी काय वाटले हे शब्दांत व्यक्त करणं केवळ अशक्य आहे!!!!



सर्व वीर जवानांना माझा सलाम!!!!!