Thursday, November 22, 2012

गौळणी!!!

सगळीकडे दिवाळी चालू होते धनत्रयोदशीला. पण काही घरांसारखी माझ्याही घरी ही चाहूल आधीपासूनच लागते. आधी घरी चार-पाच म्हशी होत्या तेव्हा काही काळजी नसायची. एकादशीला आई, आत्या, आणि घरोघरच्या लक्ष्म्या भल्या पहाटे उठत. (आता असे फक्त म्हणावं लागतंय. एकादशीला घरी असल्याला लै सालं उलटली). आम्ही त्यानंतर अर्ध्या तासाने डोळे चोळत बाहेर जाऊ तोवर तिचा अंगणात शेणसडा घालून झालेला असायचा. मला आईच्या कामात लुडबुड करायची असायचीच, पण ती मोठ्या ठामपणे माझा बेत हाणून पाडायची. तिथून उठून रांगोळ्या काढणार्‍या बहिणींच्यात गेले, तरी तिथेही तीच गत. मग मी येऊन पायरीवर बसून दोन्ही हातांच्या ओंजळीत हनुवटी घेऊन आई काय करते हे एकटक पाहात राही. आणि बघता बघता माझ्या अंगणात इवलंसं एक नगरच अवतरे!!

आईचं एक तंत्र होतं. शेणाचा छोटासा गोळा दोन्ही हातात घेऊन ती त्याला आकार देई, अशी आधी नुसती धडे बनवून बाजूला ठेवे, मग त्यांना योग्य जागी ठेवे, आणि मग डोकी आणि नंतर त्यांना हात चिकटवे. मी आईला बर्‍याचदा गूळ लावून मला एक-दोन तरी गौळणी बनवायला दे असे म्हणत असे. तिने एकदा खरेच दिलं खरं, पण माझ्या गौळणी फारच नम्र झाल्या होत्या. उभ्या राहिल्या खर्‍या, पण कमरेत भलत्याच वाकल्या होत्या.

वसुबारसेला चालू झालेला हा सोहळा संपतो तो बलिप्रतिपदेला. बळीराजाची सर्वांना माहित असलेली तीच ती छोटीशी गोष्ट. बळी राजाचे पुण्य खूप झाले, इतकेकी त्याला देवांचा राजा करतील की काय अशी इंद्राला पुन्हा एकदा भीती पडली. त्यानं श्रीविष्णूला साकडं घातलं आणि पुण्यवान बळीला स्थान मिळालं ते पाताळात. त्या बळीचे पूजन जरी बलीप्रतिपदेला होत असलं तरी, त्याचं स्मरण करण्याची ही आगळीवेगळी प्रथा विलक्षणच. लहानपणी खूप कुतुहल असे, आईला प्रश्न विचारूम मी भंडावत असे. आता हे काम भाचरं करतातच.

हे नक्की असतं काय? तर, बळी राजाच्या राज्यातले एक छोटंसं नगर. जिथे सगळेजण गुण्यागोविंदाने राहतात. तिथे समृद्धी आहे, संस्कृती आहे, कामसू वृत्ती आहे. थोडक्यातच सांगायचं तर या पुण्यशील राजाच्या राज्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रजानन त्याची सेवा करतात. हे इतकं सगळं दाखवताना तिथे अवतरतात, गौळणी!! मुख्य असतो तो बळीराजा. नगरीत दिसणारा एकमेव पुरूष. बाकीचे कुठे गेलेयत तडमडायला या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळाले नाहीय. तर हा निवांत पहुडलेला असतो. त्याच्या हातापायाशी, डोक्याशी गौळणी त्याची सेवा करत असतात. हा बळी पडला राजा. त्यामुळे त्या बळीला सजवण्याचीही अहमहिका लागलेली असते. त्याचा हार, मुकुट, भलादांडगा करदोडा, वाळे हे तर नेहमीचेच. त्यासोबत छोटेमोठे हार आणि इतर दागिन्यांचे तर काही विचारायलाच नको. आणि त्यात बारकावे इतके, की त्याच्या मानेखाली एक छोटीशी उशीही दिली जाते. हा आमचा साधासुधा बळीराजा:

गौळणी घालताना पहिला मान बळीराजाचा. तो एकदा तयार झाला की, कल्पनेच्या भरार्‍या चालू होतात. जणू या गृहिणी आपल्याच रूप या कामाकाजात गुंतलेल्या गौळणींमध्ये पाहतात. कुणी भल्यापहाटे जात्यावर जावेला नाहीतर नणंदेला सोबत देत धान्य दळते, कुणी स्वयंपाक रांधते, कुणी तुळशीवृंदावनासमोर घरच्यांसाठी-तिच्या धन्यासाठी आरोग्य, समृद्धी मागते, कुणी गायींना पाणवठ्यावर नेते, कुणी बाजारहाट करते, एक ना दोन. पण त्या गौळणींना मात्र आभूषणांचं लेणं नाही. त्यांचं लेणं म्हणजे, बोटाशी पोर आणि डोईवर घमेलं नाहीतर हातातलं काम. घमेल्यावाल्या गौळणीच्या म्हणजे बाजारात जाणार्‍या. माझी मामी मग त्या प्रत्येक गौळणीच्या डोईवरच्या घमेल्यात काही ना काही ठेवतेच. मग एकजण कांदा-मिरच्या घेऊन येते, दुसरी नुसतीच भुईमुगाच्या शेंगा तर तिसरी दुसरंच काही. कधी कधी भाकरीच्या करणारीच्या तव्यावर, टोपलीत, हातात इवलुशा भाकरीही ठेवते. तिच्या कडच्या गौळणी सगळेजण आवर्जून पाहायला येतात. तसं प्रत्येक घरापुढचे नगर वेगळं. पण यात वेशीत आपल्या सखीला भेटणारी आणि लेकुरवाळी अशा गौळणी आणि दरदिवशी मोठा होत जाणारा डोंगर या गोष्टी मात्र सगळीकडे अगदी मस्ट!!! सगळ्यांच्या गौळणी पाहाव्यात आणि नुसतं घरधनीणीचं कौतुक करत रहावं.

कामात गर्क गौळणी:

रोज रोज मात्र तेच ते केलं जात नाही. वैविध्य हवंच, नाही का? मला या डोंगराचे महत्व किंवा त्याचे अस्तित्व का असावे हे अजून कळालं नाही. वसुबारसेला डोंगराचा एकच थर असतो. हा असा:

त्यामुळे काही गौळणी नगरात तर काही या डोंगरावर असतात. काहींची बाळंही त्यांच्यासोबत असतात. दुसर्‍या दिवशी आणखी एक थर पडतो, तिसर्‍या-चौथ्या दिवशी मग डोंगर खर्‍या अर्थाने डोंगर म्हणण्यासारखा उंच होतो.

हा फोटो तिसर्‍या दिवशीचा असावा. बारकाईने पाहिले तर तीन थर स्पष्ट दिसताहेत. आत्याचे काम अजून चालू असतानाच मी हा फोटो काढलाय. इथे वेशीतल्या गौळणीच्या कडेवर बाळ आहे. या नगरात अगदी खर्‍याखुर्‍या नगरासारखी जिवंतपणाची सळसळ असते. काहीजणी डोंगर चढत असतात, काहीजणी मुक्कामाला पोचलेल्या असतात, एक भाकरी तव्यावर, दुसरी हातात, काही भाकरी तयार होऊन टोपल्यात विसावलेल्या असतात, काही गायी पाणवठ्यावर पोचलेल्या असतात, एखादे चुकार वासरू आपला पाय मागे ओढत असते, वर्णन करू तितके कमीच!! प्रथा कुणी चालू असावी माहित नाही, पण हे असे जिवंत चित्रण एखाद्या कलाकाराच्या कलाकृतीइतकंच मला भावतं!!

बळीपाडव्याच्या दिवशी मात्र चित्र एकदम पालटतं. बळीराजा उठून उभा राहतो, सगळ्या गौळणींची पूजा होते आणि त्यांची घरच्या पांढर्‍याशुभ्र शेवयांनी सजलेली छोट्या छोट्या पानांची पंगत बसते. ज्वारीची कणसासहित पाच धाटे आणि एक ऊस यांचा झोपडीसदृश आकार त्याच्या डोईवर विसावतो. इतर दिवशी या नगरात नसणारी दिपमाळ यादिवशी मात्र या चित्रात किमान एकतरी हवीच. बहुधा ही पंगत गावातल्या चौकात किंवा ग्राममंदिरात बसत असावी. आता मला नांव आठवत नाही, पण या सगळ्या गौळणींना पांढरे पण टोकाशी गुलाबी होत जाणारे गवताचे तुरे खोचले जातात. ते नाही मिळाले तर मग झेंडू आणि मखमलीची फुले असतातच.

वरती चित्रात ही आडवी काठी दिसते ती वेस आहे. वेशीतच नेहमी गाठभेट होते याचा प्रतिकात्मक अर्थ घरी पाहुणा येणार हे माहित असेल तर त्याला सामोरे जाऊन तिथेच गळाभेट घेऊन घरी मानाने आणणं असावं. वेशीच्या वरच्या बाजूला दोन-तीन फुले ल्यालेली आकृती दिसतेय, ही आहे दीपमाळ. मोठ्या मंदिरांत ही सहसा असतेच. तिच्यावर आता समारंभाला पण पूर्वीच्या काळी अंधारून आलं की दिवे, पणत्या ठेवल्या जात.<br>

आदल्या दिवशीच्या गौळणी दुसर्‍या दिवशी उत्तरपूजा करून मोडल्या जातात आणि त्यात नवीन शेण मिसळून पुन्हा नव्या गौळणी बनतात. पाडव्यानंतर मात्र या सगळ्या गौळणी चांगल्या वाळवून शेण्यांच्या *हुडव्यात ठेवतात आणि मग कधीतरी बंबात जातात.

आता घरी म्हशी नाहीत, आणि आईलाही मधल्या काळात झालेल्या छोट्या अपघतानंतर जास्त वेळ चवड्यावर बसवत नाही. गेल्या वर्षी आत्याने घातलेल्या गौळणींचा फोटो काढला आणि तिला म्हटले, “मी यावर इंटरनेटवर लिहीन.” जाम खूष झाली ती. आता घरी गेले की तिला हा लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया दाखवेन, म्हणजेच ती आणखी्च खूष होऊन जाईल!! *हुडवा: उन्हाळयात शेण्या चांगल्या वाळवून त्या व्यवस्थित गोलाकार रचून त्यावर पुन्हा शेणाचा जाडसा थर देतात. पावसाळ्यात भिजूनही याचे फारसे नुकसान होत नाही. गरज पडेल तशी एका बाजूने या हुडव्याला छोटे भगदाड पाडून आतल्या शेण्या बाहेर काढल्या जातात.

रिकामपणाचे उद्योग..


कॉलेजमध्ये कुणीतरी एक लेटरपॅड विसरून गेलं होतं. गुलबट-बदामी पानं आणि खालच्या कोपर्‍यात दोन-तीन चित्रे थोड्या थोड्या अंतराने आली होती. त्यातलं एक चित्र जाम आवडलं होतं म्हणून त्याचं एक पान मी फाडून घरी आणलं. तीन-चार वर्षे तशीच गेली. मध्येच मी माझा पहिला वहिला बाऊल रंगवला, त्यानंतरही ग्लास पेंटिंग केलं आणि मग या बाईला पेंट करावं अशी मनानं उचल खाल्ली. माझ्या घरातल्या स्वयंपाक घरात उघडणारा हॉलचा दरवाजा भिंतीच्या मधोमध आहे. तेव्हा दोन्ही बाजूला काहीतरी पेंट करून लावल्यास छान दिसेलसं वाटलं. साधारण प्रमाण पाहता ए३ हा आकार चांगला दिसेलसं माझं मीच ठरवलं. बरेच सव्यापसव्य करून ते दीड इंच बाय तीन इंचाचं चित्र आधी ए४ आणि नंतर ए३ मध्ये एका कागदावर छापून आणलं. पण तेही नंतर लहान वाटलं म्हणून कसंबसं ए२ आकारातलं रेखाचित्र जमवलं. तरीही कितपत जमेल असा आत्मविश्वास नसल्यानं आधी एका ट्रान्सपरन्सीवर रंगीत तालिम घेतली आणि किमान 'हे जमू शकेल' असं म्हणून स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.

पहिली पायरी: जीटी मारणे (पक्षी: ग्लास ट्रेसींग). इंजिनिअरिंगला असताना कधी न करावा लागलेला प्रकार आता मी सहज करते!
हे चित्र पूर्णपणे ट्रेस करायला साधारण दोनेक तास लागले.

1

पृष्ठभाग बाऊलसारखा गोलाकार नसल्याने रंग ओघळणं ही अडचण नव्हती. फक्त रंगांच्या बुडबुड्यांनी तोंडाला फेस आणला. हे पहिलं पूर्ण चित्र.

2

नीट जमत आलेलं काम बिघडवण्याची माझी परंपरा यावेळीही खंडित झाली नाही. काही ठिकाणचा रंग तुलनेने पातळ वाटत होता म्हणून मी रात्री झोपायला जाताना आणखी एक रंगाचा थर दिला. सकाळी उठून पाहते, तर खालचा रंग फाटून सगळं चित्र अगदी चित्रविचित्र झालं होतं. आधी चुकचुक, मग नेहमीप्रमाणेच "कशी मला दुर्बुद्धी झाली?", "आता काय करू" वगैरे नेहमीची पालुपदे आळवून झाल्यावर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच झाला पराक्रम निस्तरायला स्वारी सज्ज झाली. एका बोथट चाकूने तो फाटलेला रंगाचा भाग वरच्यावर कापला, काही ठिकाणचं बाजूचं काळ्या रंगाचं रेखाटनही 'तेरा मेरा साथ रहे' म्हणत सोबत निघून आलं. लगोलग 'जालिम जमाना' बनत त्यांचा साथ मी तिथंच कापून टाकला. मग, आधी रेखाटनाची दुरूस्ती केली. फाटलेला नारिंगी रंग संपला होता म्हणून तिथे आता चॉकलेटी रंग देऊन टाकला. आणि "लहान मुलं असतील नसतील तेवढे सगळे रंग वापरतात तसं माझं चित्र वाटत नाहीय. ना?" असं म्हणून नकारार्थी उत्तराला जराही वाव न ठेवता निखिलकडून "चित्र चांगलंच झालंय" अशी पावती घेतली.

इतके दिवस मला काही फ्रेम करून घेण्याची गरज पडली नव्हती. त्यामुळं आता फ्रेम करणारं माणूस/बाईमाणूस शोधणं आलं. मध्येच एकदा खरडाखरडीत पराग मांडेच्या खव मध्ये मी ट्रान्सपरन्सीचा फोटू डकवून आले होते. तो पाहून लीमाऊजेट्ने "ही हेदर ना गं?" असा प्रश्न विचारून पुढे याच्या पार्श्वभूमीवर इजिप्तमध्ये पपायरस्/पॅपीरस नावाचा गवतापासून बनवलेला हातकागद वापरतात असं सांगितलं. आतापर्यंत ही चित्रातली बाई कोण याचाही गंध नव्हता, पण अज्ञान उघड होऊ नये म्हणून तिला "हो..हो" केलं. अधिक शोभा नको म्हणून आता त्या मेल्या 'पपायरस' सदृश्य काही मिळवायचा प्रयत्न चालू केला. जुन्या काडाच्या चटया सहसा मिळण्यासारख्या नव्हत्या आणि अधिक त्रास घेणं माझ्या आळशीपणाला मानवणारं नव्हतं. म्हणून मग मूळ योजनेबरहुकूम मी हातकागद शोधायला लागले. हेदर जणू माझ्यावर प्रसन्न झाली आणि मला चटईसारखा दिसणारा हातकागद मिळाला. हुश्श. आता सुटले म्हणेतोवर जो मला फ्रेम करणारा भेटला तो फक्त सकाळी ११ ते १२:३० व संध्याकाळी ६:३० ते ७:३० असं हौशीखातर काम करणारा महाभाग. त्याने पुढे त्याच्या व्यवसाय धर्माला जागून मी निवडलेली फ्रेम न लावता दुसरीच कुठलीशी फ्रेम लावली. सुदैवाने तीही जरा बरी होती.

हेदरः
3

आता मला दुसर्‍या बाजूची फ्रेम करायची होती. आता हेदरबाईंमुळे दुसर्‍या बाजूलाही कुणीतरी इजिप्शियन सोबत आणावी असं वाटत होतं. होता होता तुतनखामेनचा बळी द्यायचं ठरवलं. दरवाजाच्या दोन्ही बाजूंचं सारखेपण जपायचं असल्यामुळं जर लवकर चित्र दिलं नाही तर तशीच फ्रेम पुन्हा मिळणार नाही असं त्या फ्रेमवाल्यानं सांगितलं. हे त्याचं पुढचं काम मिळवण्याचं गिमिक असू शकेल असं वाटूनही मी धोका पत्करायला तयार नव्हते. आणि नुसत्या काचेच्या आकाराने तो मापं घ्यायला आढेवेढे घ्यायला तयार नव्हता. अशा वेळेस जे होतं तेच झालं. तयार होता होता पुन्हा एकदा ९८% तयार झालेलं चित्र बिघडलं. त्यानंतर आठवडाभर आम्ही गावी चाललो होतो. आता " जे व्हायचे ते होऊ दे" असं म्हणून फ्रेम-सारखेपणा-आणि जे जे काही असेल ते गेलं खड्ड्यात म्हणून सरळ त्या बिघडलेल्या तुतनखामेनकडे तुच्छ कटाक्ष टाकून आम्ही घराबाहेर पडलो. तसंही या चित्रापायी "हा बाई का बुवा जे काही आहे ते जरा इथून हलव" असले शब्द ऐकून मला या चित्राचाच कंटाळा आला होता.
परत आल्यावर नव्याने तयारीला लागले. आधी चाकूने रंग-रेखाटने कापून आणि त्यातल्या दाद न देणार्‍याला भागाला मस्तपैकी भांडी घासण्याच्या उपकरणांनी घासून काच पुन्हा पहिल्यासारखी केली. सुदैवाने किंवा जे काही असेल त्याप्रमाणे तश्शीच बाजूची फ्रेम मिळाली आणि एकदाचे तुतनखामेनोबा घरी आले.

4

या दोघांची स्थापना करून वर्ष उलटून गेलं आहे. दिवाळीनिमित्त काही वेगळ्या प्रकारातले कंदिल पाहून आणि माझी रंगांची आवड पाहून एका मित्राने मला असले पाच कंदिल आणून दिले. त्यातला एक अजून रंगवला नाहीय, दुसर्‍यावरचं चुकलेलं रंगकाम मी अजून दुरूस्त करतेय. हे बाकीचे तीनः

5

6

7

याने खूपच जास्त वेळ घेतला

8

ग्लास पेंटिग करताना मला गवसलेली विचारमोत्ये:
१. सराव म्हणून बाऊल सारखा आकार न घेता सपाट पृष्ठभाग घेतल्यास बरे.
२. चित्रात एखादा आकार खूपच मोठा असल्यास एकीकडचा रंग देऊन दुसरीकडे जाईपर्यंत आधीच रंग वाळतो आणि नंतर मग डाग दिसू लागतात. उदा. तुतनखामेनचा चेहर्‍याचा आणि मानेचा भाग. ते टाळण्यासाठी काही करता येत नाही; हात जरा भराभर चालवावा.
३. चित्र बिघडल्यास जास्त घाबरू नये, सरळ निघेल तितका रंग बोथट चाकूने काढून भांडे/काच घासून घ्यावे. काच चांगल्या प्रतीची असल्यास काही फरक पडत नाही. नसेल, तर काचेचा घासलेला भाग खरबरीत तर न घासलेला गुळगुळीत असं खूपच चिवित्र दिसतं. अशा फालतू संकटांनी डगमगून न जाता आधीचं डिझाईन रद्दबातल करून त्याठिकाणी *चित्रविचित्र दिसणारे मॉडर्न आर्ट काढावे. पाहणार्‍यास आपण चतुरस्त्र आहोत आणि सगळ्या कलाप्रकारात आपणांस रूची आहे असे वाटते. त्यानंतर उगीच खुलासे करून 'झाकली मूठ' उघडण्याचा प्रयत्न करून नये.
*-> इथे ठरवून या प्रकारचे डिझाईन काढले आहे. सध्याचा दुरूस्त करत असलेला कंदिल पूर्ण झाला की नक्की एन्ड प्रॉडक्ट कसे होते ते इथेच सांगेन.
४. हे तसे बरेच वेळखाऊ काम असल्याने विरंगुळा म्हणून "सीआयडी" ही मालिका टीव्हीवर लावावी. टीव्हीकडे न पाहताही आख्खा इपिसोड झक्कास कळतो. आणि छान मनोरंजन होते.
उदा. "दया, ये आदमी यहाँ क्यूं खडा है?"
"हाँ सर, ये आदमी बसस्टॉपपे क्यूं खडा है?"
"अभिजीत, देखो उसके हाथ में ब्राऊन कलरका लिफाफा है."
"हां सर, कितना बडा लिफाफा है, ऑर उसमें कुछ रखा भी है"
" ये यहाँ पिछले दस मिनिटसे खडा है"
"देखो दया , एक नीले रंगकी बस आ रही है"
"हां सर, ये नीली बस तो इसी आदमी की तरफ आ रही है"
"देखो, ये तो बसमें चढ गया" :)
५.  लेख नाहीतर गेलाबाजार किमान फेसबुकावरतरी म्हणून फोटो डकवून लोकांकडून 'चान चान' म्हणून घ्यावे


footer

Sunday, October 21, 2012

A heritage walk

खूप दिवसांपासून ठरत होतं, पण योग यायचा होता. तो या शनिवारी आला. काळ्या घोड्याचंही एक निमित्त होतंच. फोनाफोनी करत, मोडकांना ट्रेनची सफर(ही हिंदी/मराठी बरं का, इंग्रजीमधली नव्हे) घडवत फोर्टात पोचलो. एलआयसीच्या दर वळणानजिक दिसणार्‍या शाखेबरोबरोबर रामदासांची ब्रांच ही तर नव्हे अशा शंका मनी बाळगत एकदाचे त्यांच्या हापिसात पोचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतानाच रामदासांनी टेबलाखालून एक मोठं बाड बाहेर काढलं, '१९४५ ते बहुधा १९५६ पर्यंतचे टाईम मासिकाचे अंक' होते ते. खजिनाच तो, दुसरा शब्दच नाही!!
हापिसातून उतरून खाली आलो, आणि अलीबाबाच्या पोतडीतून एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली. रस्त्याच्या दुतर्फा ताशीव दगडांच्या, मजबूत आणि प्रशस्त इमारती. प्रत्येक इमारतीची स्वतःची एक कहाणी. ती कुणी बांधली, त्या मूळ मालक कंपनीचं पुढं काय झालं, तिची किती, कशी आणि कोणत्या कारणाने हस्तांतरे झाली, हा सगळा इतिहास सांगायला रामदासच हवेत.

देशेदेशीच्या  वास्तुशिल्पकलेचे नमुने इथल्या इमारतींमध्ये साकारले आहेत. या पहा रोमन शैलीतले खांब मिरवणार्‍या इमारती:





इतरांच्या हातचं पाणी न चालणार्‍या भटांसाठी राजस्थानी ब्राह्मणांनी चालवलेलं चहाचं दुकान. पाटीचं स्वरूपच दुकान किती जुनं असेल हे सांगायला पुरेसं आहे.




ही आहे पारशी लोकांची विहीर. काळाच्या ओघात तिची देखभाल होत नाहीय, पाणी दूषित होतं आहे आणि आजूबाजूलाही अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. साहजिकच त्यामुळं ती सध्या बंद अवस्थेत आहे.
विहीरीचा दुरून काढलेला फोटो:


विहिरीवरची भित्तीशिल्पे:




विहिरीवरचा फारसी/इराणी मजकूरः



ग्रीक शैलीतली (बहुधा मार्शल & मार्शलची) इमारतः





मोडकांनी उल्लेखलेलं इटालियन मार्बलः


थोडंसं दुरून पाहिलं की दुरवस्था लक्षात येते:


या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर भित्तीशिल्पं आहेत. मी फक्त पहिल्या मजल्यावरच्या शिल्पाचा फोटो घेतला आहे.


लढवय्या पुरूष, त्याची लेकुरवाळी स्त्री आणि ड्रॅगनशी झुंजतानाचा त्याचा अविर्भाव अगदी प्रेमात पडावं असाच!!

प्रसिद्ध स्ट्रँड बुक स्टॉलः


सगळ्या विलायती शैलींमधून आपलं वेगळेपण दाखवणार्‍या इमारतीवरची ही लक्ष्मीची मूर्ती:


काळाच्या ओघासोबत न बदललेली आणि अजूनही लाकडावर चालणार्‍या भट्टीची बेकरी:


माझ्या सोबतच्या चारही लोकांची तोंडं चार दिशांना आहेत!!

बेकरीवरच्या पाट्याही तितक्याच जुन्या आहेत.





इथली खारी, मावा केक  आणि बन मस्का इतका रूचकर होता की फोटो काढण्याचं लक्षातच आलं नाही. खास यांचा आस्वाद घेण्यासाठी इथं कितीही वेळा जाण्याची माझी तयारी आहे. :-)

हे रेमण्डसचं दुकान, पण इतर दुकानांहून जास्त महत्त्व मिळालेलं. शपथविधीपूर्वीचे मंत्र्यासंत्र्यांचे कपडे इथेच शिवले जातात म्हणे. (आर आर आबांनी मात्र ही परंपरा मोडली. शपथेपूर्वी की नंतर हे माहित नाही)


ही देखणी इमारत इथे मुंबईतच आहे असं कुणी सांगितलं असतं तर माझा त्यावर विश्वास बसला नसता.




तिच्या शेजारची ही दुसरी इमारतः


या दोन इमारतींसमोरच हे शांत, धीरगंभीरसं चर्च.


याची बहुधा पुर्नबांधणी झाली असावी. ही त्याच चर्चची मागील बाजू.


पारशांची विहीर बुजवली असली तरी एशियाटिक सोसायटी समोरील ही १८७३ साली बांधलेली विहीर वापरात आहे. तिच्यावरची कोनशिला:


तिथेच असलेला हंडा:


यानंतर एशियाटिकसमोर काळाघोडा संगीत महोत्सवातला कार्यक्रम चालू होता. अद्याप चालू व्हायचा होता, पण ऐकू येणार्‍या तबल्यावरच्या खड्या बोलांनी जागीच थांबवलं. तालबद्ध लयीत सहजगत्या एकेक बोल लीलया निघत होते. माईक टेस्टिंगसाठी असा काही तुकडा वाजवला की यंव रे यंव!! पण मुख्य कार्यक्रम चालू व्हायला बराच अवकाश असल्याने काढता पाय घेतला.

मोडकांनी यांना नांव दिलंय, टिपकागद!




निघताना मोडकांनी या फोटोंवरती कधी लिहितेयस असं विचारलं, आणि मी आळस केल्याचं सार्थक झालं!! :-)

बॉम्बे टॉकी

ऑफिसमधल्या बर्‍याच धामधुमीनंतर दोनेक दिवसांपासून थोडा रिकामा वेळ मिळाला. रिकामपणाचे उद्योगही खोळंबले आहेत, पण  लॅपटॉपला अत्यंत प्रेमाने वागवल्यामुळे त्याने मुकेपण धारण केलं होतं.  त्यामुळे नवीन लॅपटॉप घेतल्यानंतर बर्‍याच दिवसांचे पाहायचे पाहायचे म्हणून कित्येक दिवसांपासून ठेवलेले सिनेमे आधी पाहायचे ठरवलेयत. सकाळीच काही नवीन शोधावं म्हणून पाहात होते. खरंतर काल रात्री नाना पाटेकरचा कुठल्याशा मराठी मंडळातली जुनीपुरानी मुलाखत पाहून हा माणूस इतका शहाणा आहे, तर त्या फालतू हिंदी सिनेमांतून अतिफालतू भूमिका का करतो हा प्रश्न पडला होता. म्हणून पुन्हा एकदा नव्याने त्याचा 'माफीचा साक्षीदार' शोधत होते. तो मिळाला नाहीच, पण त्यानिमित्ताने दुसरेच सिनेमे डाऊनलोड झाले. 'बॉम्बे टॉकी' बद्दल काही माहिती नव्हतं, पण 'गुलाबी टॉकीज'च्या नावाशी साधर्म्य आणि नावावरून काहीतरी चांगलं असेल असं वाटून तोही डाऊनलोड केला.
     
      पाहायला सुरूवात केली. सर्वात आधी नट-नट्यांची नावं आली. शशी-कपूर जेनीफर म्हणजे चांगलाच असेल पण कदाचित समांतर देखील असू शकेल असं वाटलं. जस-जशा पुढच्या पाट्या येत गेल्या तेव्हा मात्र ज्या कुणी ही संकल्पना मांडली असेल त्याला दाद द्यावीशी वाटली.  सिनेमा तब्येतीत पाहायचाय हे तेव्हाच नक्की झालं. त्यामुळे तो निवांतपणे पाहीन. सध्या फक्त तुम्ही या टायटल्सचा आस्वाद घ्या.

Bombay Talkies

Poster1

Poster1

 

 

 

 

 

 

 

 

 



 


 

 

हे वरच्या फोटोवरचे लाटांचे तुषार अगदी खतरनाक!
 

 


मला ही जागा काही ओळखता आली नाही. कदाचित इतकी रिकामी दिसत असल्याने असावी.
 

गेल्या आठवड्यालत्या लोकसत्तामध्ये टीव्ही कलाकारांना त्यांच्या मालिकेतल्या नावांनीच ओळखले जात असल्याने आणि एक संपली की लगेच दुसरी मालिका चालू करण्याच्या नादात वाहिन्या या अभिनेत्यांची नामावली गाळत असल्याचा लेख होता. मला वाटलं. की यांना निदान कोणत्या ना कोणत्या नावाने ओळखलं तरी जातं. पण पडद्यामागचे कलाकार, तंत्रज्ञ यांसारखे लोक सर्वसामान्यपणे लोकांना माहितही होत नाहीत. अशा परिस्थितीत बॉम्बे टॉकीजची नामावली खरीच अभूतपूर्व (काही कॅरीकेचर्स पाहिलीयेत, पण बहुधा ती त्या-त्या त्ंत्र प्रकारातल्या लोकांची वाटतील अशी होती, त्यावरून हाच तो माणूस असं ओळखणं अवघड असावं.) म्हणायला हवी.


टीपः लेखातील सर्व छायाचित्रे व्हीएलसी प्लेअर मधील स्नॅपशॉट हा पर्याय वापरून काढलेली आहेत, आंतरजालावरून उतरवून घेतलेली नाहीत.)