Sunday, May 31, 2009

माझी मद्रास ची सफर- भाग अंतिम

तसं बरंचसं लिहून झालंय चेन्नई/मद्रास बद्दल... देवांनी तर सविस्तर लिहिलं आहेच.. नि बरीचशी जनता ही तिकडे राहून आल्यामुळेही अनुभव जवळ्जवळ सारखेच असतील... पण माझ्यामते... आणखी एक-दोन गोष्टींच्या उल्लेखाविना ही सफर नक्कीच अपूर्ण राहिल...

पहिली गोष्ट म्हणजे.. दाक्षिणात्यांचं वागणं!!!
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं.. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.. माझ्या पाहण्यातले बरीचशी गुजराती,उत्तर प्रदेशातील कुटुंबे आहेत की ज्यातल्या अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्याना चांगली मराठी नि हिंदी बोलता येते.. जर मराठी बोलता येत नसेल.. तर त्यांना कळते तरी नक्कीच.. माझ्या उत्तरभारतीय मैत्रिणीची मुलगी मराठी पाळणाघरात जाते.. तिच्याशी हिंदी बोलले तरी ती उत्तर मात्र शुद्ध मराठीत देते.. काका-मामा-मावश्या-आत्या-आई-बाबा याना मराठी येतंच... दोन्ही आजी-आजोबाच काय.. पणजोबाही मोडकं तोड़कं का होईना.. तिच्याशी मराठीत बोलतात.. मग हे दाक्षिणात्यच असे का वागतात..?? ज्या ठिकाणी १०-२० वर्षं राहतात.. तिथली भाषा कळत नाही असे का म्हणतात..??
त्यावरचं उत्तर खरंच चपखल आहे.. ते दिलं एका तमिळनाडूमध्ये लहानाचे मोठे झालेल्या एका गुज्जुभाईने.. तर त्यांच्या मते.. "तमिळ माणूस हा स्वतःच्या कोशात राहणारा प्राणी आहे.. त्याच्या मनात काय चालू असेल... कुणीच सांगू नाही शकत.. घरातल्या घरात भावा-भावा मध्ये कोश असतात.. पण जेव्हा प्रसंग दुसर्‍या कुटुंबासोबत येतो.. तेव्हा तो कोश थोडाफार स्वतःच्या कुटंबापुरता विस्तृत होतो.. त्याप्रमाणे जेव्हा आपला प्रदेश सोडून ते बाहेर जातात.. तेव्हा तो कोश आपल्या भाषेपुरताच ठेवतात.. असं म्हणतात की एका ठिकाणी एका मद्राशाला नोकरी द्या.. तो लगेच आपल्या मागे इतरांची रांग लावेल.. तेही या कोश जीवनपद्धतीमुळेच... दुसरी भाषा समजते असं म्हटलं तर त्या कोशात बाहेरचे लोकही येतील असं त्याना वाटतं नि त्यांना ते कोणत्याही परिस्थितीत नको असतं... आता थोडं परिवर्तन येतं आहे.. पण जुनी खोडं बदलणं खरंच अवघड आहे...."
आश्चर्य म्हणजे सगळ्याना हे उत्तर पटलंही.. नि बर्‍याच जणांनी असंही म्हटलं की हे खरं आहे.. पण असं नेमकं शब्दबद्द करणं त्यांना स्वतःलाही जमले नसतं... खरंय!!! आपल्या इथेही दोन पिढितला हा फरक मी खुपदा अनुभवलाय..

असो.. त्या लोकांबद्द्ल खूप झालं.. तुम्हाला माहित आहे.. आपले लोक तिकडे गेले की कसे वागतात???
मी आधीच सांगितलं ना पहिल्या भागात की मला तिथे एक नातेवाईकांकडे जायचं होतं..तर त्यांचा मुलगा बी. एस्सी. च्या प्रथम वर्षात होता.. त्याची माझी ऑर्कुट्वर ओळख झाली.. निरोप्यावर गप्पाही बर्‍यापैकी झाल्या होत्या.. नि त्यामुळेच त्या लोकांना मी तिकडे येणार अशी खबर मिळाली होती.. मी पोचल्यावर त्याला फोन केला.. म्हटलं एवढं मोठं चेन्नई... त्यात मला तमिळ येत नाही.. रिक्षावाल्यंबद्दल पण काही चांगलं ऐकलं नाहिये.. नि २० मिनिटांचंच तर अंतर आहे मोटरसायकल वरून... पण तो बेटा काही यायला तयार नव्हता.. अस्सा राग आला.. कालपर्यंत तर नीट होता.. त्याच्या गावात आले तर याला भाव चढला.. थोड्या घुश्श्यातच कसं यायचं ते विचारलं नि तत्क्षणी आईला फोन करून सांगितलं.. की फक्त तू म्हणतेयस म्हणून जातेय.. पुन्हा जा म्हणून सांगू नकोस..हो म्हणाली बिच्चारी..
बाहेर आल्या-आल्या गेस्टरूमच्या रखवालदाराने सांगितलं की विजेरी वरच्या बसेस दर १५ मिनिटाला येतात.. तिने तुम्हाला मुख्यप्रवेशद्वारापर्यंत जाता येईल..म्हटलं बरं झालं.. नाहीतरी सकाळी ११:३० च्या दरम्यान मी आले होते.. नि त्यावेळी आय आय टी चे आवार म्हणजे एक जंगलच वाटलं होतं.. रस्त्यावर एखदं माणूस कुठेतरी.. नाहीतर.. किर्र झाडी.. मुंबई आय आय टी सारखे सायकलवरून जाणारे विद्यार्थी नाहीत.. एखादी इमारत कुठेतरी.. जाम टरकले होते.. अशा परिस्थितित दुपारी ३-४ वाजता काही वाहन मिळणे कठीण होते.. नशीब या बसेस तरी होत्या..
तर मला जायचं होतं गिंडी स्थानकापासून तिरूमलायै स्थानकापर्यंत.. (हो तेच ते.. तिरूमलायै.. खत्रूड पाटीवालं)!!! आय आय टी च्या मुख्य प्रवेश्द्वारापासून गिंडी पर्यंत रिक्षावाल्याने सांगितल की ४० रू भाडं होईल.. मीटर प्रकरण कुणाच्या गावीही नव्ह्तं.. मी मुंबईकर.. थोडं बारगेन करण्याचा प्रयत्न केला.. कुठलं काय... त्याने भाडं कमी करणं सोडा.. सरळ निघून गेला..!!! त्यानंतर ५०-- ६० अशी चढती भाजणी चालू झाली तेव्हा निमूटपणे ६० रू ठरवले.. नि मंडळी कसचं काय... इथं मुंबईत तेवढ्या अंतराला अवघ्या नऊ रूपड्या मोजतो हो आपण.. (नंतर प्रत्येकवेळी आम्ही तेवढं अंतर चालूनच गेलो!!!) मनात म्हटलं.. अक्कलखाती पडले..!!! रेल्वे दुसर्‍या मजल्यावर येते.. इंडिकेटर मुंबईसारख्या मागास्लेल्या भागात हो.. तिथे सगळे बहुधा विजयकांथ किंवा रजनीकांथ ची दिव्य पॉवर घेऊन येत असावेत.. ट्रेन आली..



आँ!!!! मी चढायला पुढे सरसावलेले मागे झाले.. कार शेड मध्ये जातेय बहुधा.. शंका नको म्हणून आत डोकावून पाहिलं...



पण तोवर एक दोन मुली चढल्या.. त्यांना विचारलं तर.. एकदा पुण्यात ABC म्हणजे काय हे विचारण्याचा मूर्खपणा केला होता.. तेव्हा उत्तर देताना त्या मुला-मुलींनी "अंगावर झुरळ पडल्याचा"+"शी बाई.. कसली कसली पात्रं येताहेत आजकाल पुण्यात" असा अविर्भाव चेहर्‍यावर आणून "आपा बळवंत चौक" जस्सं सांगितलं होतं ना.. त्याची आठवण आली... Sad
असो.. तिथं मात्र स्थानकावर तो न्यायला आला होता.. त्या भागातले सगळे लोक तमिळेतरच वाटत होते.. अतिशय साधा एखाद्या खेड्यात शोभेल असा परिसर.. आत घरे मात्र चांगली आहेत.. मला आमचं नातं नक्की काय आहे तेही ठाऊक नव्हतं.. तिथे गेल्यावर कळालं की ते माझ्या मामीच्या वहिनीचं माहेर आहे.. नि माझ्या मामीनं खूप कौतुक आधीच करून ठेवलेलं.. वर माझी आई किती कडक शिस्तीची.. याचं पण गुणगाण केलं होतं... त्यामुळं गप्पा बर्‍यापैकी औपचारिकच चालू झाल्या.. मी म्हटलं पण त्याना... काही मला तुमच्या मुलीच्या सासरची समजू नका.. आपण पहिल्यांदीच भेटतोय.. मस्त गप्पा मारू ना..!!! पण काका-काकू सतत हातचं राखून बोलत असल्या सारखं मला शेवटपर्यंत वाटत होतं.. नशीब तो मुलगा तरी नीट बोलत होता पण इथे आल्यापासून तोही नेहेमीसारखं बोलत नव्हता..

थोड्या वेळानं निघायची वेळ झाली.. तशी त्या काकांनी मुलाला खोपच्यात नेऊन काहीतरी समजावलेलं दिसलं...मुलगा आता मला बाईकवरून सोडायला तयार झाला होता.. झाल्या प्रकारानं माझ्या मनात मात्र आल्या मार्गानं जायचं होतं.. त्या लोकांच्या आग्रहापुढे काही चालेना तेव्हा शेवटी झाले तयार बाईकवरून जायला.. त्याने मुख्य रस्त्यावरून गाडी घेण्याऐवजी चोळा-बोळांच्या रस्त्याने घेतली... नि शोधक नजरेने सतत तो इकडे तिकडे पाहत होता.. आता मात्र सटकलं होतं जाम... माझ्या मनात नाही नाही ते विचार.. ते सिनेमात दाखवतात तसं.. सगळेजण गूढ बोलतात.. मग त्या हिरॉइनला संमोहीत करतात.. सगळ्या पाहिल्या न पाहिलेल्या रामसेंच्या चित्रपटाची विचित्र काँबिनेशन्स सुचायला लागली... Sad(
आता मात्र राहावेना... त्याला विचारलं.. काय चाललंय.. मला एकंदरीत खूप विचित्र वाटतंय..
तर एकंदरीत लफडं असं होतं.. की आतापावेतो आम्ही निरोप्यावर गप्पा मारल्या होत्या.. त्या इंग्रजीत.. घरी सगळेजण मराठी बोलत होते.. त्याची मराठी काय हो.. घरी ऐकलेली ग्राम्य मराठी... गावी गेल्यावर बहुतेक नातेवाईक खेड्यातले.. त्यामुळे तेही तसेच बोलणारे.. माझं मराठी ऐकून तो बोलायचा गप्प झाला होता.. (चला पहिली शंका फिटली)
तिथे राहणार्‍या मराठी लोकांचा मोठ्ठा गट आहे.. सगळे सण - समारंभ ते मिळून मिसळून साजरे करतात.. त्या गटात कुणी जात-पात मानत नाही..(ते सगळं इकडे.. देशावर आल्यावर) आपण मराठी ही एकच भावना.. आता म्हणाल.. यात लफडं ते काय? चांगलंच आहे न... हो पण तरूणांचं काय? ते शिकतात ती शाळा-महविद्यालये तर मराठी नाहीयेत ना... नि प्रेम कुणी कुणावर करावं हे कुणी नियमात बसतंय की नाही ते पाहून ठरवत नाही ना... मग ती मुलं-मुली तिथल्या तमिळ मुली-मुलांशी लग्न करतात.. मग तो गट अशा घराला बहिष्कृत करतो.. आणि जसे सगळीकडे असतात तसे लोक इथेही असतात.. "आम्हाला माहीत होतं आधीच.. पण उगाच वाईट्पणा नको म्हणून सांगितलं नाही... तुम्हाला नाही का कळालं.. आपला मुलगा/मुलगी काय गुण उधळतायत ते??" असे म्हणणारे..
आता आधीच तमिळ माणूस जवळ येऊ देत नाही म्हणूनही.. अन भाषेमुळेही आधी त्यांच्याशी दुरावा असतो.. त्यात जे कुणी इथले सगे-सोयरे असतात की जे संकटकाळी मदत करू शकतात... त्यांनीही संबंध तोडले की त्या कुटुंबाची अवस्था खूप वाईट होते.. मग आता त्या लोकांनी त्यावर तोडगा शोधून काढलाय.. हे जे वरती शहाणपणा सांगतात ना.. घटना घडून गेल्यावर बोलणारे.. त्यांनाच प्रतिप्रश्न केला.. "माहित होतं ना तुम्हाला??? मग काय मुलं पळून जाण्याची वाट बघत होतात का मला येऊन सांगायला???" बरेच जण यातून गेल्यामुळे प्रत्येक्जण मराठी मुला-मुलींवर नजर ठेऊन असतो.. बाईकवर नवी मुलगी दिसली.. किंवा मुलगी कुणाच्या बाईकवर दिसली, नि हे एकाने जरी पाहिले, तरी बोभाटा होतो... या मुलाच्या वर्गातल्या एका मुलीचा पाय मुरगळला होता.. त्याच्या घरापासून जवळच रहते ती.. त्याने घरी फोन करून दहादा परवनगी घेतली तिला घरी सोडायला... बाबांनी सांगितलं.. "आजचा एकच दिवस सोडायचं.. नंतर तिचा पाय तुटला तरी तिला लिफ्ट द्यायची नाही.." त्याने ऑर्कुट्वर माझा फोटो पाहिला होता.. आईबाबांना दाखवला होता.. त्यामुळे सगळ्यानी आधी ठरवलं होतं के त्याने मला न्यायला यायचं नाही.. घरी गेल्यावर कसं ते माहित नाही त्यांचं मतपरिवर्तन झालं होतं. मात्र त्याला गाडी कमी रहदारीच्या रस्त्यावरून शक्यतो कुणाच्या नजरेस पडणार नाही याची काळजी घेऊन जायला सांगितलं होतं... घरी माहित होतं हो.. तो कुणाला फिरवतोय.. पण ती गोष्ट घरा पर्यंत पोचून बाबांनी स्पष्टीकरण देईपावेतो कुणाकुणापर्यंत बातमी पोचली असती.. नि याचं नाव काळ्या यादीत गेलं असतं..
तिथं मराठी मुलांची-तमिळ मुलीशी मैत्री वा थोडं उलट.. मराठी मुलीची-तमिळ मुलाशी मैत्रीच काय, मुला-मुलांची किंवा मुली-मुलींच्या मैत्रिवर पण आक्षेप आहे.. आयांची सक्त ताकिद असते.. घरात तुमचे मित्र-मैत्रीणी आल्यावर यंडुगंडु करायचं नाही.. बहुतेक जणी पूर्णवेळ गृहमंत्री.. त्यामुळे इंग्रजी/तमिळचा गंध त्याना नाही.. नि तमिळ माणूस हिंदी बोलत नाही..आहे की नाही पंचाईत!!!! मग ही मुलं मित्र-मैत्रीणीना घरी बोलावतच नाहीत... नि वाण नाही पण गुण लागतोय.. या लोकांनी पण यांच्या मराठीसमाजापुरता कोश विणून घेतलाय.. त्यामुळे इतरांशी बोलताना मोजूनमापून बोलतात.. यात मुला-मुलींचे हाल होतात हे मात्र खरं.. [ हूश्श!!! आता सगळ्या शंका फिटल्या...]
आजूबाजूला काय घडतंय.. बर्‍याचदा आपल्याला ठाऊक नसतं ते असं...

असो.. चेन्नईला जायचं.. नि रेशमी साड्याबद्दल बोलायचं नाही... असं कधी झालंय का राव? मी "The vantage point" च्या शनिवारीच माझी खरेदी उरकून घेतली होती... कांजिवरम साड्या जिथे बनतात.. ते कांचीपुरम दोन-तीन तासांच्याच अंतरावर होतं.. तिथले काही सहाध्यायीही होते की ज्यानी आम्हाला खरेदीला मदत करू असं आश्वासन दिलं होतं... फसवणूकीचे प्रकार तिथेही चालतात.. पण तिकडे जाऊ की नाही नक्की नव्ह्तं.... एक चार-पाच जणांचा गट तरी हवा होता.. नि नल्ली तसं विश्वासार्ह.. त्यामुळे मी एक आईला, एक बहिणीला नि मला एक कांजिवरम अशी खरेदी करून टाकली होती.. आपण इकडे पाहतो तो एकच पॅटर्न.. तिकडे खूप वैविध्य होतं... ही खरेदी पाहून त्या संध्याकाळी आराम केलेल्या पुरूष सहकार्‍यानी त्याना खरेदीला मदत करण्याची विनंती केली.. मला काय... आणखी एकदा विन्डो शॉपींग... एकदा जाऊन आल्याने शहाणपणा दाखवण्याची संधी कुणी सोडेल काय??? बस क्रमांक माहीत होते.. थेट बस नाही मिळाली तर कुठून पुढची बस मिळेल.. सगळं माहीत होतं... नल्लीपासून बस स्थानकापर्यंत चालत आल्यानं चेन्नई सिल्क कुठं आहे तेही माहित होतं... आधी तिथं गेलो...

तिथला विक्रेता एक एक साडी काढून पुढ्यात टाकत होता.. नि माझी नजर मात्र समोरच्या साड्या सोडून कपाटात रचलेल्या साड्यांकडे.. शोकेस मधल्या साड्यांकडे...स्त्री स्वभाव हो... विवाहीत लोकांना लगेच पटेल... जशी देखणी बायको दुसर्‍याची.. तशीच देखणी साडी दुसरीकडची Smile (अवांतरः तसा मला एक साडी पसंत करायला दहा मिनिटांपेक्षा अधिक वेळ लागत नाही.. विक्रेत्याला मला नक्की काय हवंय हे कळत नाहिये हे लक्षात आलं की मी काढता पाय घेते.. उगाच खोळंबा नको.. त्याचाहे नि माझाही.. त्यामुळे मिपावरच वाचलेला साडी प्रसंग माझ्याबाबतीत तरी घडायचा नाही..) पाहिलं तर शोकेसमध्ये ती साडी होती... आतापर्यंत बर्‍याचदा ढकलपत्रातून आलेली..



खाली प्रशस्तिपत्रक आहे.. साडीच्या किंमतीचं 3,931,627 रू. फक्त... गिनिज बुकात नोंद झाल्याचं.. साडीवर राजा रवी वर्म्यानं काढलेले चित्र आहे... तो दागिने बरहुकुम रेखाटण्यासाठी प्रसिद्ध होता... या लोकांनी अस्सल मोती, हिरे, माणकं जडवलीयेत.. जर पण सोन्याची आहे..

हे ते मूळ चित्र...




व्यवस्थापक महोदयाना खूपच अभिमान आहे या साडीचा.. आमचा मोर्चा तिकडे वळताच ते स्वतःहून तिची माहिती द्यायला आले.. आश्चर्य म्हणजे साडी पूर्ण हातमागावर विणलीय... या प्रकारच्या...



मी विचारलं.. असंच काहीतरी वेगळं करायचं म्हणून ही साडी बनवली गेली.. की कुणी गिर्‍हाईक पण मिळालं.. त्यांनी सांगितलं.. की अशी त्यांनी पहिली साडी बनवली.. ती एका बंगळुरूच्या व्यक्तीला आवडली.. त्यांनी लगेच ती खरेदी केली व आणखी एका तशाच साडीची ऑर्डर दिली.. म्हणजे अशा एकूण तीन साड्या आजवर बनवल्या.... आता जी दुकानात दिसतेय.. ती तिसरी अन दोन विकल्या गेल्या..
आता.. ज्यानी खरेदी केली.. एकाच घरात दोन साड्या.. जवळ्जवळ ४० लाख प्रत्येकी.. त्यानी घरच्या शोकेसमध्ये ठेवायला तर नक्कीच घेतल्या नसाव्यात... नि यच्चयावत स्त्री जमातीला.. आपण स्वतः कोणत्या समारंभात काय कपडे-दागिणे घातले होते हे तर सोडाच.. पण जमलेल्या मुख्य पाहुण्यांनी.. नि "प्रेक्षणीय स्थळांनी" काय काय कपडे-दागिणे घातले होते हे झोपेत देखील स्वच्छ लक्षात असतं.. त्यामुळे एकच पोषाख्/साडी दुसर्‍यांदा वापरायची असेल.. तर आधिच्या ठिकाणचे कमीत कमी लोक (म्हण्जे जवळ जवळ शून्य) उपस्थित असतील.. तरच नेसली जाते.. जर सामान्यांची ही कथा... तर अशा वेळेला.. जर या कुटुंबातल्या बाईनं ही चाळीस लाखांची साडी घालायची म्हटलं.. तर एवढी किंमती साडी म्हणून थोडं वावरताना अवघडलेपण तर होच.. पण कौतुकापेक्षा.." काय मेलं ते ४० लाखाच्या साडीचं कौतुक.... पहावं तेव्हा एकच साडी नेसते" असे टोमणे जास्त मिळायचे.. जाऊ द्या.. शेवटी ज्याची त्याची आवड!!!!
बाकी या १५ दिवसांच्या सफरीनं बरंच काही दिलं.. नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या.. एक आयुष्यभराचा अनुभव.... टिफ्फ्नी या उपहारगृहात हिंदी गाण्याच्या ओळी कानावर पडताच कोलंबसाला अमेरिका मिळाल्यावर झालेला तसा आनंद.... मिपाला.. चार लेख.. Smile अन बरंच काही!!!

या सहलीतली काही छायाचित्रे... महाबलीपुरम (त्यांच्या लेखी-- मामल्लापुरम) ला सहलीला गेलो होतो.. मेन्यूकार्डावर उत्तर भारतीय थाळी दिसली.. अरे व्वा.. खूप दिवसांनी भात-रसम सोडून काही मिळेल या आशेवर मागवली.. पण त्यासाठी एक तास लागेल असं सांगितलं.. नि इतका वेळ सर्वांना थांबवणं तर इष्ट नव्हतंच.. म्हणून सर्वांसोबत पुन्हा एकदा दक्षिणी थाळी... केळीच्या पानावरची...



माझ्या खोलीबाहेरचं आय आय टी तारामणी अतिथीगृहाचं आवार..

आय आय टी मध्ये बिन्धास्त फिरणारे.. नि कुठेही दिसणारे प्राणी..

महाबलीपुरमच्या दीपस्तंभापासून दिसत असलेला समुद्र...

तिथलं प्रसिध्द गजेंद्र सर्कल....

तिथलं घनदाट जंगल..... आय आय टी जंगलात आहे.. की जंगल आय आय टी मध्ये आहे असा प्रश्न पडावा...

या सगळ्यात दोन गोष्टी मात्र राहून गेल्या.. एक म्हणजे.. कांचिपुरम पहाणं.. तिथे म्हणे १०१ की १२१ निरनिराळ्या शिल्पकला असलेली मंदिरं आहेत.. नि दुसरं म्हणजे पाँडिचेरी.. चेरी म्हणजे आपल्याकडे असते तशी वाडी.. वेलीचेरी.. पाँडिचेरी अशा खूपशा वाड्या आहेत.. दोन्ही ठिकाणं काही अधिक दूर नव्हती.. पण सगळ्यांना परतीचे वेध लागले होते.. नि अजून खूप आयुष्य बाकी आहे.. आता नाही तर पुन्हा कधीतरी नक्कीच जाता येईल या विचाराने निघाले.. मुंबईत विमानतळावर रिक्षावाल्याला कुठे जायचे हे सांगितल्यावर त्याने मीटर फिरवले.. तो आवाज खूप कर्णमधुर असतो.. हा शोध मला तेव्हा लागला...

Friday, May 15, 2009

माझी मद्रास ची सफर- भाग ३

मद्रासची सफर तिथल्या रिक्षावाल्यांबद्दल बोलल्याशिवाय पूर्ण कशी होईल?? मुंबईत जिथे किमान रिक्षाभाडे ९ रू. मध्ये जाता येते, अशा ठिकाणीही हे लोक ४०रू आकारतात.. मी ४०रू पेक्षा खाली येणारा रिक्षावाला एकदाही नाही पाहिला.. आय आय टीच्या मुख्य प्रवेश्द्वारापासून गिंडी स्थानक १० मिनिटांच्या अंतरावर आहे.. पण त्यासाठीही ५०रू. मोजलेयत.. आमचे सहाध्यायी एक तमिळ हिंदी वाद सोडला तर खूपच चांगले होते.. कुठेही जायचे असेल, तर रिक्षावाले त्यांना तर फसवतातच, पण आम्ही बाहेरचे म्हणून आम्हांला आणखी जास्त फसवतील म्हणून ते घासाघीस करून भाडे ठरवून द्यायचे.. मीटर प्रकार तिथे कुणाच्या खिजगणतीतही नाही..
असेच एकदा आम्हास शहरात जायचे होते.. रेशमी साड्या.. झालंच तर आणखी काही इथल्या खास गोष्टी घरी नेल्या असत्या.. गटाल्या इतर बायकांना रस्त्यांवर खरेदी करायची होती.. मुंबईत फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोड वरती फिरून झाल्यावर मला तिथल्या फॅशन स्ट्रीट वा तत्सम प्रकाराचं अप्रूप नव्हतं.. पण सगळ्यांसोबत रिकामपणाचे उद्योग म्हणून सगळेच निघालो.. बहुधा तो शनिवार होता..आणि तिथे आय आय टी मध्ये एक खुले थिएटर आहे.. दर शनिवारी तिथे माफक दरात चित्रपट दाखवले जातात.. पुरूष मंडळीना आमच्या खरेदीत काही रस नव्हता.. त्यांना संध्या़काळी आराम करून रात्री चित्रपट पाहायचा होता.. शिबिरातून अतिथीगृहात न जाता थेट शक्य तितक्या लवकर मुख्य प्रवेश द्वारापाशी आलो... नेहेमीप्रमाणे रिक्षा ठरवण्याचे काम स्थानिक सहकार्‍यांने पार पाडले.. ४०रू.. पोंडी बाजार पर्यंत.. तिथे फॅशन स्ट्रीट.. अणि पुढे T नगरमध्ये नल्ली, चेन्नई सिल्क अशी इतर दुकाने आहेत... मला पोंडी बाजारातली आवडलेली एकमेव गोष्टः

नल्ली'ज मस्त प्रशस्त आहे.. साड्यांची पुष्कळ व्हरायटी आहे.. तिथे आणखी एक स्टोअर आहे.. "सरवाना'ज"..ते चेन्नईतले सगळ्यात मोठे स्टोअर आहे... नल्ली'ज पेक्षा स्वस्त आहे.. अर्थात वस्तूंचा दर्जाही त्याच लायकीचा असतो. पण तरीही गर्दी इतकी असते की पाय ठेवायला जागा मिळत नाही.. नल्ली'ज मध्ये मनसोक्त खरेदी केल्यावर समोरच आणखी एक कपड्यांचेच दुकान होते.."पोथी'ज"!!! वेळही भरपूर होता हाताशी.. चला म्हटले.. विन्डो शॉपिंग करू... माझ्या एक सहकारी.. त्याना माझं जीन्स कुर्ता प्रकरण भलतंच आवडलं होतं... त्या म्हणाल्या चार मजली दुकान आहे.. भरपूर कपडे असतील तिथे.. मला जीन्स कुर्ता निवडायला मदत कर... दुकान छानच होतं.. पण माहीत आहे..??? त्या दुकानात चार स्वागतिका ठेवल्या होत्या... भरतनाट्यमला घालतात तसा पारंपारिक पोषाख न दागिने घालून त्या दिवसभर उभ्या असतात.. नंतरही त्या दुकानात दोनदा जाण्याचा योग आला.. तेव्हाही त्या तशाच.. चेहेर्‍यावर हसू आणून उभ्या होत्या.. मला त्यांच्याबद्द्ल खरंच खूप वाईट वाटलं..

परत येताना.. रिक्षा शोधू लागलो.. पहिला म्हणाला.. ८०रू... कैच्या कै??? त्याला सांगितले.. ए बाबा.. येताना ४०रू. मध्ये आलो.. थोडे तरी कमी कर.. तो ऐकेचना.. सरळ निघून गेला...दुष्ट मेला!!! त्यानंतर भेटलेले रिक्षावाले... चढत्या क्रमाने.. १५०/-, २००/- शेवटी २५०/- पर्यंत पोचले हो ते रास्कल आण्णा लोक!!! पैसे देण्याबद्द्ल ना नव्हती... पण ते सरळ्सऱळ अडवणूक करत होते हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं.. तेवढ्यात समोर बस स्थानक दिसलं.. नि त्यात ५ब क्रमांकाची बसही... थेट आय आय टी त जाणारी... मग आणखी काय हवं होतं?? "तुम्हा रिक्षावाल्यांच्या नानाची टांग" असं मनात नाही.. Cool मोठ्यांदा म्हणून (नाहीतरी कुणाच्या बापाला मराठी कळत होतं तिथे?? Tongue ) बसमध्ये शिरलो.

बाकी बाईमाणसं संध्याकाळच्या चित्रपटासाठी उत्सुक नव्हती.. मी माझं तिकीट आधीच इतरांना काढायला सांगितले होतं.. मला त्या आय आय टी मध्ये सगळ्यांत जास्त काही आवडलं असेल तर ओपन एअर थिएटर... खूप मोठं आहे... खुलं असूनही आवाज अगदी स्पष्ट.... रात्रीची मस्त थंड हवा... नि चित्रपट होता.. "द वॅन्टेज पॉइन्ट"!!!! वाह!!!! Applause उन्हाळ्याच्या सुटयांमुळे गर्दी जास्त नव्हती... पुढे खुर्च्या होत्या पण आम्ही पाठीमागे पायर्‍यांवर बसून चित्रपट मस्त अनुभवला.....

तसे रोज संध्याकाळी फिरायला तर जात असूच.. एकदा सागरकिनारी (मेरिना बीच नव्हे.. या किनार्‍याचं नाव नाही आठवत्)गेलो होतो.. आपल्या चाट्च्या गाड्यांसारख्या मासे तळून देणार्‍या गाड्या भरपूर होत्या.. नि बाँबे भेळ नि चौपाटी आईस्क्रीमच्या पण!!!! समोर मुरूगन नावाचे हॉटेल आहे... तिथल्या इड्ल्या मात्र.. मस्त.. लाजवाबच होत्या.. वसतीगृहातील अर्धकच्च्या इडल्या खाऊन आयुष्यात पुन्हा कधीही इडली न खाण्याची प्रतिज्ञा या इडल्या खाऊन मोडली...

मस्त कोवळं लुसलुशीत केळीचं पान.. त्यावर गरमागरम इडली... नि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या... नि काटा-चमच्यांना पूर्ण फाटा... अहाहा.... स्वर्गसुख म्हणजे आणखी दुसरं काय असतं?? (उत्तर आहे माझ्याकडे: मस्त वाफाळता भात.. त्यावर वरण... वरून तुपाची धार... लिंबाची फोड.. नि मेतकूट... याला भूतलावर कुठेही पर्याय नाही)....!!!

(क्रमशः)

Thursday, May 14, 2009

माझी मद्रास ची सफर- भाग २

एक-दोन दिवसांत आमची एकमेकांशी चांगलीच ओळख झाली... नि आधी सांगितल्याप्रमाणे, मी आणि एक गुज्जुभाई सोडला तर सारेच दक्षिणी होते.
आता आधी या प्रशिक्षणाबद्दल थोडंसं... ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ते आयोजित केले जाते, त्यांनी जर एक वर्षभर आधी त्यबद्दलचा अर्ज केला.. तर AICTE आणि ISTE या दोन संस्थांकडून अर्थसहाय्य मिळतं.. म्हणजे उमेदवारांना येण्या-जाण्याचा रेल्वेचा द्वितीय वर्गाचा खर्च आणि त्यांचा राहण्या-जेवण्याचा खर्चाचा भार ते उचलतात.. अशा काही प्रशिक्षण शिबिरांना उपस्थिती लावल्याशिवाय महाविद्यालयीन शिक्षकांना पदोन्नतीही मिळत नाही.. त्यामुळे अशी प्रशिक्षणे म्हणजे दुसर्याच्या खर्चाने १५ दिवसांची सहल आणि वर बढती अशीच सर्वसाधारण मनोवृत्ती असते.. अर्थात त्यालाही अपवाद आहेत...पण ते अपवादात्मकच!!!... नि जर समजा, जर एक वर्ष आधी अर्ज नाही केला, तर त्या संस्थेस कार्यक्रमाची फक्त मंजूरी मिळते.. पण खर्च त्यांचा त्यांनाच करावा लागतो.. विशेषतः स्त्रिया, ज्यांना १५ दिवसांसाठी घर सोडून जाणे शक्य नसते.. त्या अशा प्रशिक्षण शिबिरांत स्वखर्चाने (जास्त नाही.. रूपये २५००/- मात्र) जातात.. पहिल्या प्रकारच्या कार्यक्रमांकडे गंभीरतेने पाहिले जात नाही... नुसता टाईमपास... मी एकदा जाऊन पस्तावले होते.. विद्यार्थ्यांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल रागावणारे शिक्षकच तसे वागत होते.. तो अनुभव पुन्हा कधीतरी नक्कीच.. मला मात्र मुंबईपासून दूर कुठेतरी जायचे होते आणि असं नावापुरतं प्रशिक्षण पण नको होतं... हैद्राबादचे अध्यापक विद्यालय आणि आय आय टी मद्रास इथेच अशी शिबिरं होतात ही पक्की माहिती मिळाली.. ईतर आय आय टी मध्ये अशी शिबिरं होत नाहीत.. फक्त दूरस्थ शिक्षण मिळते...

आय आय टी चे शिबिर AICTE व ISTE पुरस्कृत होतं. मी यापूर्वी लांबचा प्रवास केलाय; दुसरा वर्ग, दोन टियर, तीन टियर अशा सगळ्या वर्गांतून. पण एकटं जाण्याचा प्रसंग कधीच नाही आला... त्यातच मेरी त्वचा से मेरी उमर का पता ही नहीं चलता Smile , त्यामुळे स्त्रिदाक्षिण्य म्हणून येणारे पुढचे प्रिय-अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी म्हणून आणि पूर्वानुभवावरून यावर्गात भोचकपणा आणि काळजी यामध्ये जरा तारतम्य असते म्हणून पण, दोन टियर वातानुकुलीत डबा हा माझा पर्याय होता.. नि माझ्या तमाम हितचिंतक वर्गाचा विमान.. मी तरीही आगगाडीचे आरक्षण केले.. जे मी जाईपर्यंत कन्फर्म झाले नाही... पण जर मी द्वितीय वर्गाचे केले असते, तर जाईपावेतो नक्की झाले असते... आता हे नमनाला घडाभर तेल कशाला खर्च केले ते सांगते...
तिथे गेल्याच्या दिवशीच प्रवासखर्च मिळवण्यासाठीचे अर्ज भरावयाचे होते... मी विमानाने आले म्हट्ल्यावर लोकांनी डोक्याला हात लावणे फक्त बाकी होते.. त्यांच्या मते.. हा दोष माझ्या मुंबईकर असण्याचा होता.. मुंबईचे लोक कशावरही वायफळ खर्च करतात..(आणखी एक मुंबईकरांबद्दल गैरसमज!) नि बाँबे गर्ल त्याला कशी काय अपवाद असणार? जर का मी त्यांच्यासारखे भारताच्या इतर कोणत्याही कानाकोपर्‍यातून आले असते, तर मला रेल्वेचे ति़कीट मिळले असते.. नि नसते मिळाले, तर विमानाने न येता दुसर्‍या प्रकारातल्या शिबिरास जाऊ शकले असते.. त्या लोकांचा येण्या-जाण्याचा जास्तीत जास्त खर्च ६००/- हून अधिक नव्हता.. नि माझे येण्याजाण्याचे मिळून ६०००/- अधिक गेले होते.

त्यावेळचा त्यांचा प्रश्नः " हाउ डु यू पीपल स्टे इन्न बाँबे?? देअर कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज सो हाय!!! दॅट्स व्हाय यू आर यूज्ड टू स्पेंड टू मच ऑन अननेसेसरी थिंग्ज. एव्हरीडे यू हॅव बाँब ब्लास्ट्स!!!" मला आठवले.. मी जेव्हा जम्मू-काश्मीर मध्ये रहणार्‍या एका मुलीला पहिल्या भेटीत असाच काहीसा प्रश्न विचारला होता!!!! Smile

आमचा साधारण दिनक्रम असा होता.. सकाळी ८:०० ते ८:३० गप्पाटप्पा करत न्याहारी, ९:०० वाजता वर्ग चालू होत असे.. मेसपासून ते ठिकाण चंगलेच दूर होते...प्रशिक्षकांनी उशीर खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी दिली नि नंतर अशा लोकांना समजही दिली.. हे मात्र सहल समजून आलेल्या लोकांना जड गेले... १:३० ते २:१० दुपारचे जेवण.. नंतर ५;०० वाजेपर्यंत पुन्हा शिबिर... आम्ही बर्‍याचदा तेथूनच थेट बाहेर फिरायला जात असू... ८:३० ला मेस बंद होई नि मुख्य प्रवेशद्वारापासूनची विजेरीवरची बस बहुधा ९:१५ ला असे... ९:३० ते रात्री १२:३०-१:०० पर्यंत प्रयोगशाळेत दिलेला अभ्यास किंवा वेगवेगळ्या तांत्रिक विषयावरती चर्चा चालत... आम्ही त्यासाठी अतिथीगॄहात त्यासाठी एक खोली मागितली होती.. पण ती काही मिळाली नाही.. आणि जंटलमन/लेडीज एकमेकांच्या खोलीत जाण्याचा प्रश्नच नव्हता Big Grin त्यामुळे एतक्या दूरवर जावे लागे... आय आय टीत हॉटेल होते.."बसेरा". बंद कधी व्हायचे ठाऊक नाही.. कारण आमचा प्रयोगशाळेनंतरचा पुढचा अड्डा तो असे... सगळे पदार्थ १०-१५-२० च्या रेंजमधले.. त्यामुळे चवही तशीच.. पण दंगामस्तीत वेळ कसा निघून जायचा कळत नसे.. रोज कोणीतरी एक्जण सर्वांचे बिल देई.. असे २:०० वाजेपर्यंत आपापल्या खोल्यांत परतत असू... यात साहजिकच सहलवाले नसायचेच...

अतांत्रिक चर्चा चालु झाल्या... की सगळेजण यंडुगुंडु करायला लागत.. मी त्यांना कॉमन भाषा असे कानीकपाळी ओरडून थकले..करण मी मुलुखाची बडबडी.. अन त्यात जर हे लोक असे बोलायला लागले की नुसतं त्यांच्या तोंडाकडे टुकुटुकु पाहत बसावे लागे... असेच एकदा रात्री बसेरामध्ये बसलो असता.. पुन्हा एकदा तेच चालू झाले.. यावेळी काही प्रतिक्रिया न देता मी गप्प बसले.. आणि अचानक "व्हाय य्यू नार्थ इंडियन्स आर आल्वेज अग्गेन्स्ट साऊथ इंडियन्स"??? असा तोफगोळा आला... मी अगदी तीन तास!!! मी??? नॉर्थ इंडियन??? कधीपासून??? कुणी केलं????? का म्हणून??? गुज्जुभाई काही बोलला नाही.. पण मी परोपरीने प्रयत्न केला.. मी नाही हो उत्तरभारतीय म्हणून.. पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.. मला हिंदी बोलता येते... या फक्त एकाच गोष्टीमुळे माझं झोपडं उत्तरभारतात गेलं होतं... यावेळेपर्यंत मला हिंदी तमिळ वादाबद्दल काही माहीत नव्हते..तसेही आम्ही सारे अभियांत्रिकी महाविद्यायातील व्याख्याते/प्राध्यापक असल्याने आंग्ल भाषेतूनच संवाद चालायचा... एकाने याला तोंड फोडायला प्रयत्न केला.. पण इतरजण गप्प करत होते.. म्हटलं.. बोलू द्या त्यांना... नि इतका वेळ खद्खदणारा प्रश्न विचारला, "हिंदी बद्द्ल इतकी अढी का??" तेव्हा त्यांनी सांगितले.. ही हिंदी राष्ट्र्भाषा होण्याआधी तमिळ राष्ट्र्भाषा व्हावी म्हणून प्रयत्न चालू होते.. त्यासाठी त्यांनी आंदोलनही केले.. तेव्हा हिंदी विरूध्द तमिळ आंदोलनावरच्या गोळीबारात ४१ तमिळ आंदोलक ठार झाले... तेव्हापासून तमाम तमिळजनता हिंदीला शत्रू समजते...
मी म्हटलं, की झालं ते वाईटच झालं.. पण म्हणून तमिळ राष्ट्र्भाषा असावी हा दुराग्रह नाही का?? देशात जास्तीत जास्त ठिकाणी हिंदी बोलली जाते... जर का तुम्हांला हिंदी कळत असेल.. तर गुजराथी, थोडीफार बंगाली, जराशी पंजाबी पण कळतात.. याउलट, तमिळ तर शेजारच्या राज्यातल्या मल्लूला पण कळत नाही... त्यामुळे हिंदीच यासाठी योग्य आहे..

यावर एका संगणक शास्त्रात एम. टेक. केलेल्या, एका महाविद्यालयात संगणक विभागात विभागप्रमुख असलेल्या मनुष्याचा युक्तिवाद: "भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?" Rolling On The Floor
हे ऐकून मी तिथे बाँबे गर्लची नि परिणामी मुंबईची बदनामी नको म्हणूनच फक्त गडबडा लोळले नाही.. अहो.. जर शिकल्यासवरल्या लोकांची ही कथा.. तर इतर लोकांबद्दल बोलायलाच नको... याला सरकारही अपवाद नाहीच... सरकारी पाट्या स्थानिक, हिंदी नि आंग्ल भाषेत असाव्या म्हणून दिल्ली दरबारी नियम आहे... पण म्हणून तो पाळला जातोच असे काही नाही.. बर्‍याचशा पाट्या हिंदी म्हणून वाचायचा प्रयत्न केला.. आपल्याकडे बोलीभाषा दर दह कोसांवर बदलते म्हणतात.. इथे एका दहा कोसांत हिंदीची लिपी बदलते... हिंदी सदृश काहीही हिंदीच्या नावावर खपवले जाते.. हिंदी हवी ना... घ्या मारली तुमच्या डोंबलावर!!!!
वानगीदाखल हे पहा... नि तमिळ हिंदी वाचण्याचा प्रयत्न करा...

माझी मद्रास ची सफर

एका.. प्रशिक्षणासाठी भारतीय औद्यौगिकि प्रशिक्षण संस्था (आय आय टी) मध्ये गेल्या मे-जून मध्ये जाण्याचा योग आला... आता पर्यंत या मद्रदेशा बद्द्ल फक्त ऐकले होते.. आता प्रत्यक्ष जाण्याची संधी अन वेळ दोन्ही आल्या होत्या... उन्हाळ्याचे दिवस... सग्ळ्याना सुट्या.. त्यामुळे गर्दी असणार ही अट्कळ होतीच..पण ट्रेनिंगही चुकवायचे नव्हते.. म्हनून आगगाडी आणि विमान.. दोहोंचे तिकिट घेतले.. आगगाडी चे काही शेवट्पर्र्यंत नककी झाले नहीच मग शेवटी विमानशिवय पर्यायच नव्हता... त्यात मी एकटीच जाणार होते.. माझा मानलेला भाउ म्हणाला.. विमानानेच जा.. म्हणजे दोन दिवस तु पोचलीस की नाही याची काळजी तर लाग्णार नाही...!!! झाले.. एकदाचे बाईसाहेबांचे विमान उडाले... पोचल्यानंतर पहिला अनुभव म्हनजे तिथले रिक्शवाले.. त्यांच्याबद्दलचे अनुभव सविस्तर येतीलच..

तर.. तिथे आय आय टी च्या तारामणी अतिथीगॄहात राह्ण्याची व्यवस्था होती.. चौकशी केल्यानंतर कळाले कि एक हैद्राबाद ची मुलगी रुममेट आहे म्हणून.. बरेचसे प्रसंग तिच्यासोबत असतानाच आले...

प्रसंग १) मला पोचल्याच्या दिवशीच एका नातेवाईकांकडे जायचे होते... त्यांना मी काळे की गोरे हेही पाहिले नव्हते पण आईची भु्णभुण नको म्हणुन गप्प जायला तयार झाले होते... मि निघेनिघेस्तोवर ही मुलगी आली.. २२-२३ वय असावं साधारण... बहुधा पहिल्यांदाच घरबाहेर नि तेही इतके दूर आली असावी... बाबा अन भाउ पोचवायला इथवर आले होते...पण ते रुम मध्ये काही आत नाही आले.. मी अपली निघण्याच्या गड्बडीत तरीहि म्हट्लं.. त्या दोघांना आत बोलाव.. थोडे हातपाय धुवुन ताजेतवाने वाटेल... सग्ळ्यांनी मझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले.. मि पुन्हा एक्दा तरीही पुनरुच्चार केला... नि निघाले.. (यायचे तर या.. नाहीत्र तुमची मर्जी...) सन्ध्याकाळी तिला विचारले.. तर मुलींच्या रुम मध्ये पुरुष कसे जाणार?? हे उत्तर मिळाले.. (आयला.. हे आणखी काय असते??) जाउ दे.. नवीन जागा... नवीन लोक..कुणाची मते कशी.. माहीत नाही..... नि कुणाच्या अध्यात्मध्यात पडायचे नाही म्हणुन काही न बोलता झोपले..

प्रसंग २) दुसर्या दिवशी यथावकाश इतर लोकांशीही ओळख झाली.. मी आणी एक गुज्जुभाइ सोडला तर झाडुन सारे केरळी न तामिळी होते... मी मुंबईची म्हटल्यावर.. मल्लिका तिचे रोजचे कपडे माझ्याकडुनच उसनवारीवर नेते.... मी कपडेबदलल्यासारखे बॉयफ्रेंड्स बदलते... रोजची अर्धी रात्र पब मध्येच होते....हे नी असंच बरंच काही बोलणार्या नजरा मी स्पष्ट वाचल्या.... नी वरती इतरांना ओळख करून देताना.. बॉम्बे गर्ल... अशीच खासकरून दिली जायची... (नंतर २ आठवड्यांच्या काळात हे इत्क्यांदा झाले... कि याचे काही वाटेनासे झाले.. यथावकाश ते प्रसंगही येतीलच)

प्रसंग ३) सन्ध्याकाली आयआयटी च्या बाहेर फिरायला जायचा बूट निघाला... त्यांच्या विजेरी वर चालणार्या मिनिबसेस मधुन गेलो.. जाताना तर काही गर्दी नव्हती.. पन येताना मात्र चांगलीच भरली होती.. अचानक मी पाहिले.. की मागे बल्कनी ला एक जागा रिकामी होणार होती.. तसं माझ्या मुंबईच्या मित्रमंडळीत मी सर्वात लहान असल्याने सगळयांनी डोक्यावर चढवलेय.. पन त्याच वेळी आपल्याहून कुणी लहान असेल तर त्याची काळजी आधी घ्यायची हेही शिकवलेय.. नि त्यात हिचे बाबा-भाउ तिला इत्क्या दुरून सोडायलाही आले होते.. साह्जिकच.. त्यामुळे आम्ही तिला हाक मारून त्या सीट शेजारी बोलावू लागलो.. पण ती काही तिच्या जागेपासुन ढिम्म हलायला तयार नव्हती... नि इत्क्या गर्दीत ती राखुन ठेवणेही शक्य नव्ह्ते.. परिणामी लहान नाहीतर सग्ळ्यांत जे मोठे होते.. त्याना ती जागा कशीबशी मिळवून दिलि... तिला रूम मध्ये गेल्यानंतर का गं आली नाहीस म्हणून विचारले... तर म्हणाली.. " हाउ केन आय सीट नेकस्ट टू स्ट्रेंज जंटलमेन"??? मी परत सपाट.. (तिचंच काय, बर्याच जणांचं इंग्रजी कच्चं होते.. त्यामुळे तिच्या लेखी सगळे पुरुष पुस्तकि भाषेप्रमाणे जेंटलमेन होते... सगळे दक्षिणी बंधुभगिनी जेवण झाले का असे विचारायचे असेल तर, "completed??" असे विचारत!!!!) पण आतापावेतो मी धीट झाले होते.. मुलगी खुपच निरागस होति.. त्यामुळे तिने मी काही विचारले तर मनावर नसते घेतले.. म्हणून म्हट्ले.. बये.. हे प्रकरण काहीतरी नवीन आहे.. जरा सांगशील का समजावून?
तर होते असे: घरची शिकवण अशी होती कि.. परपुरुषाच्या शेजारी बसायचे नाही.. बसले तर लोक वाइट चालीची ठरवतात... समाजात मुलीला नि घरच्यांना प्रतिष्ठा मिळत नाही.. (बरोबर आहे कि.. चुकलं कुठे मग?? पण ते आपल्या घरी फक्त ना?? तिथे भरपूर जागा असते.. नि कुठे बसायचे यासाठी हजारो पर्याय असतात.. इथे बस आणी ट्रेन च्या गर्दीत हा विचार करायला तरी सवड मिळते का हो मुंबईकर??)

मग मी तिला समजावून सांगितले... हे बघ.. बदलत्या काळानुसार नियम नि विचार थोडे बदलायला लागतील...
१. हे सगळे नियम आपण घरी असताना अंमलात आणू शकतो.. तिथे जागा भरपूर असते... नी कुठे बसायचे हे आपल्या हातात असते.. नि असे असताना जर तू परपुरूषाशेजारी बसलीस.. तर नक्कीच ते वाईट ठरवले जाईल...
१. पण, तु बस मध्ये परपुरषाशेजरी बसली नाहीस.. नि गर्दीत उभी रहिलीस... कि आजुबाजूच्या ५-६ लोकांचे किमान धक्के लागतात.. Vs जंटलमन च्या शेजारी जास्तीत जास्त दोन(दोहो बाजूंचे जंटलमन) की जे तु टाळूही शकतेस...
२. तरीही एखाद्याने त्रास द्यायचा प्रयत्न केल्यास सोबतचे अथवा सहप्रवासी मदत करू शकतात.. पण जर तु उभी असशील... तर गर्दी आहे.. धक्का लागायचाच अस पवित्र घेतला जाउ शकतो
आता.. जसंच्या तसं सारं आठवत नाही पण बरंचंसं सांगितले होते.. पण (देवकीताईंचा!!) ती अंमलात कित्पत आणेल.. शंकाच होती..
आणी झालं अगदी तस्संच हो... वर्गातली ७० मुलं ऐकतात.. नि नंतर समोर असताना तरी सांगितल्याप्रमाणेच वागतात.. पण ही मास्तरीण मात्र ढिम्म!!! Sad

प्रसंग ४) चेन्नई मध्ये पोंडी बाजारात जाण्यासाठी बसमधून निघालो... वेळ दुपारची होती.... त्यामुळे गर्दी तितकीशी नव्हती... माझ्या रूम मेट्चा जेंटलमनचा अनुभव लक्षात होताच... एकाच बाईशेजारची जागा रिकामी होती नि बाकी टिकाणी एक पुरूष अथवा दोन्ही जागा भरलेल्या होत्या..बस बर्यापैकी स्त्री व पुरूष अशी विभागली गेली होती... तिला म्हटले.. जा तू लेडी कडे.. मल जेंटलमन शेजारी बसयला काही प्रोब्लेम नाही... मी बसले मात्र.....( आणि मुंबईतून तिकडे गेले म्हणजे.. आरामदायक पोषाख म्हणजे जीन्स अन शर्ट (कधीतरी कुर्ता)... केस ही कापलेले...) यच्चयावत लोकांनी... काय छचोर मुलगी आहे.. असे द्रूष्टीक्षेप टाकले.... यंडूगुंडू काहीतरी बोलले.. पण त्यातले बाँबे गर्ल हे शब्द मात्र नीट ऐकू आले...

प्रसंग ५) या सार्या प्रकाराची बिचार्या गुज्जुभाईला काही कल्पना नव्हती... नि तो एक बाई उतरल्यानंतर रिकाम्या झालेल्या सीट वर (आणखी एक बाई त्या बाकावर बसली होती) बसायला गेला.... त्याला तिथे बसूही न देता.... तीने जे काही शब्द उच्चारले... ते वर्णायला माझा कळफलक असमर्थ आहे!!!! Tongue

नंतर कळाले.... परस्त्री शेजारी बसून प्रवास करण्याचा प्रयत्न जरी केला.. तर आधी ती बाई स्वतः , किंवा तिच्याबरोबरचा पुरूष.. जो भाऊ वा पती नसेल, तर दुसर्या बाकावर बसलेला असतो... नि या दोघांनी काही म्हटले नाही ... तर कंडक्टर स्वतः..., येऊन त्या पर(!)पुरूषाला रागे भरतात.. अहो खोटे नाही.... एक्दा असेच एक जेंटलमन.. माझ्याशेजारची जागा रिकामी पहून तिथे बसायला आले.... त्यांना मास्तर रागवले.. मी म्हटलं.. मला काही प्रोब्लेम नाही.... यांना बसायचं तर बसू द्या.. यावर काय धर्मबुडवी अवलक्षणी कार्टी आहे.. असंच कायसंसं मोठ्मोठ्यांदा(!) पुट्पुट्त गेला... (बाँबे गर्ल चं पालुपद होतंच तोंडी लावायला)

आता पूढ्चे याबाबतीतले प्रसंग तपशीलात देत नाही.. मात्र...
१५ दिवसांचे प्रशिक्षण संपत आले.. तरी.....
माझी रूम मेट... माझे एक सहाध्यायी(वय वर्षं ५० नि आम्हा सर्वांचे एकमेकांसोबत दिवसातले १७-१८ तास व्यतीत होतात) त्यांच्या शेजारी ही बसत नाही... आणि अजून्ही धक्के खात उभी रहाणं तिला सोयिस्कर वाटते....

माझा दुसरा एक सहाध्यायी... वय वर्षं २८... ४४ वर्षं वयाच्या आमच्याच गटातल्या बाईंशेजारी सार्वजनिक वाहनात बसत नाही...

मला जाड मिशांच्या दाक्षिणात्य हिरोंबद्द्ल जाम चीड आहे... प्रत्यक्ष आयुष्यात आजोबा झाले तरी.. पडद्यावर... मुख्य नायक.... त्यामुळे मी यावर खुप छान वाद घालू शकते.. नि साह्जिकच ते लोक असे शेरे सहन करू शकत नाहीत... असाच एक्दा एकासोबत वाद रंगात आला असताना.(वेग्वेगळ्या बाकांवर बरं का!!). काय वाह्यात कार्रटी आहेत.. असाच आजूबाजूच्या सगळ्यांचा अविर्भाव होता....त्यात आमच्या ग्रुप मधले लोक नव्हते.. एव्हाना आम्ही एकमेकांना बर्यापैकी ओळखू लागलो होतो... एक तर आम्ही दोघेही असणार्या खर्या वयापेक्षा खुपच लहान दिसतो....आणि, सार्वजनिक ठिकाणी मुलामुलींनी बोलणे... थट्टामस्करीतही वाद घालणे बहुधा तिकडे मान्य नसावे....
तर मला म्हणायचंय असं, की जर चेन्नईत ही कथा... तर खेड्यापाड्यांत काय परिस्थिती असेल???
मला सांगा... असं शेजारी बसून प्रवास केल्याने का कुणी चांगल्या किंवा वाईट चालीचं ठरतं... मुंबई सारख्या ठिकाणीतर असा विचारही करता येणं अशक्य आहे... नि जर यासगळ्या गोष्टी करून जर तुमचे संस्कार सिध्द होत असतील.... तर हेच नियम ते स्वतः सगळीकडे क पळत नाहीत? यांच्या नि तालिबान्यांच्या मध्ये फरक कितिसा तो राहीला??