आता आधी या प्रशिक्षणाबद्दल थोडंसं... ज्या शैक्षणिक संस्थेमध्ये ते आयोजित केले जाते, त्यांनी जर एक वर्षभर आधी त्यबद्दलचा अर्ज केला.. तर AICTE आणि ISTE या दोन संस्थांकडून अर्थसहाय्य मिळतं.. म्हणजे उमेदवारांना येण्या-जाण्याचा रेल्वेचा द्वितीय वर्गाचा खर्च आणि त्यांचा राहण्या-जेवण्याचा खर्चाचा भार ते उचलतात.. अशा काही प्रशिक्षण शिबिरांना उपस्थिती लावल्याशिवाय महाविद्यालयीन शिक्षकांना पदोन्नतीही मिळत नाही.. त्यामुळे अशी प्रशिक्षणे म्हणजे दुसर्याच्या खर्चाने १५ दिवसांची सहल आणि वर बढती अशीच सर्वसाधारण मनोवृत्ती असते.. अर्थात त्यालाही अपवाद आहेत...पण ते अपवादात्मकच!!!... नि जर समजा, जर एक वर्ष आधी अर्ज नाही केला, तर त्या संस्थेस कार्यक्रमाची फक्त मंजूरी मिळते.. पण खर्च त्यांचा त्यांनाच करावा लागतो.. विशेषतः स्त्रिया, ज्यांना १५ दिवसांसाठी घर सोडून जाणे शक्य नसते.. त्या अशा प्रशिक्षण शिबिरांत स्वखर्चाने (जास्त नाही.. रूपये २५००/- मात्र) जातात.. पहिल्या प्रकारच्या कार्यक्रमांकडे गंभीरतेने पाहिले जात नाही... नुसता टाईमपास... मी एकदा जाऊन पस्तावले होते.. विद्यार्थ्यांना त्यांच्या गैरवर्तनाबद्दल रागावणारे शिक्षकच तसे वागत होते.. तो अनुभव पुन्हा कधीतरी नक्कीच.. मला मात्र मुंबईपासून दूर कुठेतरी जायचे होते आणि असं नावापुरतं प्रशिक्षण पण नको होतं... हैद्राबादचे अध्यापक विद्यालय आणि आय आय टी मद्रास इथेच अशी शिबिरं होतात ही पक्की माहिती मिळाली.. ईतर आय आय टी मध्ये अशी शिबिरं होत नाहीत.. फक्त दूरस्थ शिक्षण मिळते...
आय आय टी चे शिबिर AICTE व ISTE पुरस्कृत होतं. मी यापूर्वी लांबचा प्रवास केलाय; दुसरा वर्ग, दोन टियर, तीन टियर अशा सगळ्या वर्गांतून. पण एकटं जाण्याचा प्रसंग कधीच नाही आला... त्यातच मेरी त्वचा से मेरी उमर का पता ही नहीं चलता , त्यामुळे स्त्रिदाक्षिण्य म्हणून येणारे पुढचे प्रिय-अप्रिय प्रसंग टाळण्यासाठी म्हणून आणि पूर्वानुभवावरून यावर्गात भोचकपणा आणि काळजी यामध्ये जरा तारतम्य असते म्हणून पण, दोन टियर वातानुकुलीत डबा हा माझा पर्याय होता.. नि माझ्या तमाम हितचिंतक वर्गाचा विमान.. मी तरीही आगगाडीचे आरक्षण केले.. जे मी जाईपर्यंत कन्फर्म झाले नाही... पण जर मी द्वितीय वर्गाचे केले असते, तर जाईपावेतो नक्की झाले असते... आता हे नमनाला घडाभर तेल कशाला खर्च केले ते सांगते...
तिथे गेल्याच्या दिवशीच प्रवासखर्च मिळवण्यासाठीचे अर्ज भरावयाचे होते... मी विमानाने आले म्हट्ल्यावर लोकांनी डोक्याला हात लावणे फक्त बाकी होते.. त्यांच्या मते.. हा दोष माझ्या मुंबईकर असण्याचा होता.. मुंबईचे लोक कशावरही वायफळ खर्च करतात..(आणखी एक मुंबईकरांबद्दल गैरसमज!) नि बाँबे गर्ल त्याला कशी काय अपवाद असणार? जर का मी त्यांच्यासारखे भारताच्या इतर कोणत्याही कानाकोपर्यातून आले असते, तर मला रेल्वेचे ति़कीट मिळले असते.. नि नसते मिळाले, तर विमानाने न येता दुसर्या प्रकारातल्या शिबिरास जाऊ शकले असते.. त्या लोकांचा येण्या-जाण्याचा जास्तीत जास्त खर्च ६००/- हून अधिक नव्हता.. नि माझे येण्याजाण्याचे मिळून ६०००/- अधिक गेले होते.
त्यावेळचा त्यांचा प्रश्नः " हाउ डु यू पीपल स्टे इन्न बाँबे?? देअर कॉस्ट ऑफ लिव्हिंग इज सो हाय!!! दॅट्स व्हाय यू आर यूज्ड टू स्पेंड टू मच ऑन अननेसेसरी थिंग्ज. एव्हरीडे यू हॅव बाँब ब्लास्ट्स!!!" मला आठवले.. मी जेव्हा जम्मू-काश्मीर मध्ये रहणार्या एका मुलीला पहिल्या भेटीत असाच काहीसा प्रश्न विचारला होता!!!!
आमचा साधारण दिनक्रम असा होता.. सकाळी ८:०० ते ८:३० गप्पाटप्पा करत न्याहारी, ९:०० वाजता वर्ग चालू होत असे.. मेसपासून ते ठिकाण चंगलेच दूर होते...प्रशिक्षकांनी उशीर खपवून घेतला जाणार नाही अशी तंबी दिली नि नंतर अशा लोकांना समजही दिली.. हे मात्र सहल समजून आलेल्या लोकांना जड गेले... १:३० ते २:१० दुपारचे जेवण.. नंतर ५;०० वाजेपर्यंत पुन्हा शिबिर... आम्ही बर्याचदा तेथूनच थेट बाहेर फिरायला जात असू... ८:३० ला मेस बंद होई नि मुख्य प्रवेशद्वारापासूनची विजेरीवरची बस बहुधा ९:१५ ला असे... ९:३० ते रात्री १२:३०-१:०० पर्यंत प्रयोगशाळेत दिलेला अभ्यास किंवा वेगवेगळ्या तांत्रिक विषयावरती चर्चा चालत... आम्ही त्यासाठी अतिथीगॄहात त्यासाठी एक खोली मागितली होती.. पण ती काही मिळाली नाही.. आणि जंटलमन/लेडीज एकमेकांच्या खोलीत जाण्याचा प्रश्नच नव्हता त्यामुळे एतक्या दूरवर जावे लागे... आय आय टीत हॉटेल होते.."बसेरा". बंद कधी व्हायचे ठाऊक नाही.. कारण आमचा प्रयोगशाळेनंतरचा पुढचा अड्डा तो असे... सगळे पदार्थ १०-१५-२० च्या रेंजमधले.. त्यामुळे चवही तशीच.. पण दंगामस्तीत वेळ कसा निघून जायचा कळत नसे.. रोज कोणीतरी एक्जण सर्वांचे बिल देई.. असे २:०० वाजेपर्यंत आपापल्या खोल्यांत परतत असू... यात साहजिकच सहलवाले नसायचेच...
अतांत्रिक चर्चा चालु झाल्या... की सगळेजण यंडुगुंडु करायला लागत.. मी त्यांना कॉमन भाषा असे कानीकपाळी ओरडून थकले..करण मी मुलुखाची बडबडी.. अन त्यात जर हे लोक असे बोलायला लागले की नुसतं त्यांच्या तोंडाकडे टुकुटुकु पाहत बसावे लागे... असेच एकदा रात्री बसेरामध्ये बसलो असता.. पुन्हा एकदा तेच चालू झाले.. यावेळी काही प्रतिक्रिया न देता मी गप्प बसले.. आणि अचानक "व्हाय य्यू नार्थ इंडियन्स आर आल्वेज अग्गेन्स्ट साऊथ इंडियन्स"??? असा तोफगोळा आला... मी अगदी तीन तास!!! मी??? नॉर्थ इंडियन??? कधीपासून??? कुणी केलं????? का म्हणून??? गुज्जुभाई काही बोलला नाही.. पण मी परोपरीने प्रयत्न केला.. मी नाही हो उत्तरभारतीय म्हणून.. पण कुणी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.. मला हिंदी बोलता येते... या फक्त एकाच गोष्टीमुळे माझं झोपडं उत्तरभारतात गेलं होतं... यावेळेपर्यंत मला हिंदी तमिळ वादाबद्दल काही माहीत नव्हते..तसेही आम्ही सारे अभियांत्रिकी महाविद्यायातील व्याख्याते/प्राध्यापक असल्याने आंग्ल भाषेतूनच संवाद चालायचा... एकाने याला तोंड फोडायला प्रयत्न केला.. पण इतरजण गप्प करत होते.. म्हटलं.. बोलू द्या त्यांना... नि इतका वेळ खद्खदणारा प्रश्न विचारला, "हिंदी बद्द्ल इतकी अढी का??" तेव्हा त्यांनी सांगितले.. ही हिंदी राष्ट्र्भाषा होण्याआधी तमिळ राष्ट्र्भाषा व्हावी म्हणून प्रयत्न चालू होते.. त्यासाठी त्यांनी आंदोलनही केले.. तेव्हा हिंदी विरूध्द तमिळ आंदोलनावरच्या गोळीबारात ४१ तमिळ आंदोलक ठार झाले... तेव्हापासून तमाम तमिळजनता हिंदीला शत्रू समजते...
मी म्हटलं, की झालं ते वाईटच झालं.. पण म्हणून तमिळ राष्ट्र्भाषा असावी हा दुराग्रह नाही का?? देशात जास्तीत जास्त ठिकाणी हिंदी बोलली जाते... जर का तुम्हांला हिंदी कळत असेल.. तर गुजराथी, थोडीफार बंगाली, जराशी पंजाबी पण कळतात.. याउलट, तमिळ तर शेजारच्या राज्यातल्या मल्लूला पण कळत नाही... त्यामुळे हिंदीच यासाठी योग्य आहे..
यावर एका संगणक शास्त्रात एम. टेक. केलेल्या, एका महाविद्यालयात संगणक विभागात विभागप्रमुख असलेल्या मनुष्याचा युक्तिवाद: "भारतात सर्वाधिक ठिकाणी व सर्वाधिक वेळा आढळणारा पक्षी कावळा आहे... पण म्हणून काही तुम्ही कावळ्याला राष्ट्रपक्षी करणार का?"
हे ऐकून मी तिथे बाँबे गर्लची नि परिणामी मुंबईची बदनामी नको म्हणूनच फक्त गडबडा लोळले नाही.. अहो.. जर शिकल्यासवरल्या लोकांची ही कथा.. तर इतर लोकांबद्दल बोलायलाच नको... याला सरकारही अपवाद नाहीच... सरकारी पाट्या स्थानिक, हिंदी नि आंग्ल भाषेत असाव्या म्हणून दिल्ली दरबारी नियम आहे... पण म्हणून तो पाळला जातोच असे काही नाही.. बर्याचशा पाट्या हिंदी म्हणून वाचायचा प्रयत्न केला.. आपल्याकडे बोलीभाषा दर दह कोसांवर बदलते म्हणतात.. इथे एका दहा कोसांत हिंदीची लिपी बदलते... हिंदी सदृश काहीही हिंदीच्या नावावर खपवले जाते.. हिंदी हवी ना... घ्या मारली तुमच्या डोंबलावर!!!!
वानगीदाखल हे पहा... नि तमिळ हिंदी वाचण्याचा प्रयत्न करा...
No comments:
Post a Comment