Monday, December 27, 2010

साम्राज्य बुरख्यामागचे - The Veiled Kingdom

    सर्वात आधी नॉट विदाऊट माय डॉटर, त्यानंतर द ब्रेडविनर, आणि गेल्यावर्षीच वाचलेलं स्प्लेंडिड थाऊजंड सन्स. वाचताना आणि त्यानंतरही आपण भारतात जन्माला आलो हे किती हे भाग्य असंच वाटत राहातं. त्यातूनही आजकालच्या बातम्या वाचल्या-पाहिल्या की बरं झालं, आपण दिल्लीबिल्लीत राहात नाही, आणि महाराष्ट्रात राहून रात्री उशीरापर्यंत बिन्धास्तपणे फिरू शकतो असं वाटतं. अर्थात हे चांगलं चित्रही आजकाल बिघडायला लागलंय. 

        हे सगळं पुन्हा एकदा आठवायचं कारण म्हणजे कारमेन बिन लादेनचं ’द व्हेल्ड किंगडम’. अदितीनं हिरव्या देशात जाताना बॅग जड होतेय म्हणून बाहेर काढलं आणि स्प्लेंडीड थाऊजंड सन्स वाचताना आता पुन्हा सौदी अरेबिया, अफगाण, इराण देशातली स्त्रियांवरच्या अत्याचारांची पुस्तकं वाचून मनाचा उद्वेग करून घेण्यापेक्षा ती वाचणंच बंद करायची हा निश्चय माझा मीच मोडला. कारण हे पुस्तक कुठल्या आम स्त्रीचं नाही. ती तर प्रत्यक्ष ओसामा बिन लादेनची वहिनी. आणि हे पुस्तक तिने ९/११ नंतर ती ज्या मानसिक त्रासांमधून गेली त्यानंतर लिहिलेलं.

     खूप मानसिक तयारी करून पुस्तक वाचायला घेतलं खरं, पण वाचताना मन खूप घट्ट करावं नाही लागलं. नॉत विदाऊट माय डॉटर वाचताना, किंवा अगदी अलीकडचं थाऊजंड सन्स वाचताना देखील मी जाम रडले होते. पहिल्या भागात मरियमला हक्काचा बाबा मिळत नाही म्हणून जितकी रडले त्याहून जास्त तिचा नवरा आणि नंतर भरीस भर पोटचा मुलगाही छळतो म्हणून डोळ्यांत पाणी आलं होतं. कारमेनचे अनुभव वाचताना तितकंसं वाईटही वाटलं नाही. कदाचित ती स्वत:ला तितकं त्रयस्थ ठेऊ शकलीय म्हणूनही असेल, किंवा खरंच तिला बेट्टीइतका त्रास झाला नाही म्हणूनही असेल. पण ती स्वत: ती अगदी बिचारी होती, सतत दडपणाखाली तिचा कोंडमारा झाला असं दळण दळत नाही. तिला त्रास झालाच नाही असं नाहीच. तिला घरच्या स्त्रियांशी काय बोलावं असा प्रश्न पडतो, प्रयत्न करूनही त्यांच्याशी गट्टी जमू शकत नाही, कोणत्याही खरेदीसाठी तिला प्रत्यक्ष जाता येत नाही तर तीनचारदा कामगारांच्याच नमुने घेऊन फेर्‍या होतात, अगदी तिला हवं ते तिच्या मुलीसाठीचं दूध तिथं मिळत नाही, बाहेर गेल्यावर सतत अंग झाकून राहावं लागतं असे असं सगळं तिच्याबाबतीतही झालंच. पण त्यातल्या त्यात बरी गोष्ट हीच की तिच्या मनासारखं काम झालं नाही तेव्हा तिचा नवरा स्वत:च तिला काम करवून घेण्याची परवानगी देतो, तिला हव्या त्या किरकोळ खरेदीसाठीही जिनिव्हाला जाऊ देतो, किमान त्याच्याकडून तरी तिला मानसिक त्रास होत नाही आणि वेगळं घर असल्याने इतरांचाही तितकासा प्रश्न येत नाही. कदाचित या सगळ्या कारणांमुळेच पुस्तकाचा रोख ’मी किती त्रास भोगला’ यावरून ओसामाचं घर, तिथली विचारसरणी, वातावरण यांवर राहतो.

       ओसामाच्या वडिलांबद्दल तिला जाम आदर आहे. इतका की, तिच्या सध्याच्या घरातही त्यांचा फोटो टांगलेला आहे म्हणे. त्यांचं कर्तृत्व, त्यांचा मोठा कुटुंबकबिला, स्वत: ओसामा यांच्याबद्दल मग सगळं तब्बेतीनं येत राहातं. त्यांचे कौटुंबिक सोहळे, तिथेही काहींचं(उदा. येस्लाम:कारमेनचा नवरा) नव्या विचारांना आपलंसं करणं, त्या विरूद्ध ओसामाचं आणि म्हणून त्याला मानणार्‍या त्याच्या भावाबहिणींचं अतिसनातन राहाणं (मूल बेंबीच्या देठापासून रडत असेल तरी त्याला धर्माविरूद्ध म्हणून बाटलीनं दूध न पाजणं) हे सगळंच येत राहातं. ती तिथं लग्नापासून ते तिसर्‍या खेपेस गरोदर असेपर्यंत राहिली. हा साधारण दहा-एक वर्षाचा कालावधी तरी असावा. त्यामुळे कुटुंबातल्या व्यक्ती, प्रत्येकाच्या खाचाखोचा यांच्याबद्दलची माहिती ती अगदी व्यवस्थितरित्या देते. श्रीमंत असूनही नवर्‍याकडून मिळालेल्या पैशातली शिल्लक दडवून ठेवणं आणि ती खोट्यानाट्या किंवा किरकोळ आजारापणासाठी परदेशात गेलं की त्याचे कपडे दागिने घेणं हे वाचून तर जगाच्या पाठीवरच्या सगळ्या स्त्रिया सारख्याच हे पुन्हा एकदा पटलं. ओसामाची बहिण त्याची मर्जी राहावी म्हणून त्याला हवं तसं वागण्याचा प्रयत्न करते तर त्याच्या एका भावाची पत्नी कुटुंबातल्या लोकांच्या नकला करते. मोठ्या कुटुंबातून स्त्रियांची आणि मुलींची घुसमट होणं यात नवीन काही नाही. ते इथंही आहेच. आणि स्त्रियांचं अस्तित्व इतकं दुर्लक्षित की एकदा का मुलगा झाला की तिला स्वत:चं नांव टाकून देऊन त्याजागी ’उम-मुलाचं नांव’ मरेपर्यंत घ्यायचं. कारमेनच्या सासूचं नांव ’उम-येस्लाम’ होतं!!!!!

            काही गोष्टींची मात्र राहून राहून गंमत वाटत राहाते. हे घर अतिसनातनी असलं तरी सगळे भाईबंद अमेरिकेत मात्र अगदी पाश्चांत्यासारखे राहतात. म्हणजे यांच्या सगळ्या रूढीपरंपरा फक्त आपल्या देशात. यांच्या घरच्या बायका घरातून उठून सुपरमार्केटात गेल्यासारख्या उठसूठ युरोपात साध्या साध्या खरेदीला जातात. मला आतापर्यंत तिथल्या स्त्रियांचा ड्रेस हा पंजाबीसारखा किंवा गेलाबाजार आय ड्रीम ऑफ जिनीमधल्या जिनीसारखा असेल असं वाटलं होतं. पण या तर लग्नात पाश्चात्यांसारखा वेडिंग गाऊन घालतात. खुद्द कारमेन व तिच्या मुली तिथल्या त्यांच्या वास्तव्यात गुडघ्यापर्यंतचे फ्रॉक्स आणि मिडीस्कर्टस घालतात. कडक धर्मबंधनं असतानाही हे बरं चालतं तिथे!! हे सगळं वाचून त्यांच्या आचारांवर बंधनं असतील असं वाटत नाही. विचारांवर मात्र बंधनं नक्कीच आहेत!!!

         एक मात्र खरं, की ही कारमेन बाई मोठी धोरणी होती. तिला तिच्या नवर्‍याच्या बदलत्या विचारांची चाहूल वेळेत लागली आणि कर्मधर्मसंयोगाने ती तिसर्‍या बाळंपणासाठी माहेरी गेली. त्यानंतर येस्लामच्या कोणत्याही विनंती-धमकीला भीक न घालता ती तिथेच राहिली. नाहीतर परत जाणं आणि मुलींना अशा जाचक वातावरणापासून दूर ठेवणं तिला जमतं ना!!! ती उजेडात आली ती ९/११ नंतर लोकांनी टेलिफोन डिरेक्टरीत बिन लादेन कुटुंबाचा शोध घेतला तेव्हा. तिच्यावर आणि मुलींवर ओसामाला सामिल असल्याचा आरोप झाला. अमेरिकेन जनतेनं त्यांनाही अतिरेकी ठरवलं आणि कारमेननं या बुरख्याआडच्या साम्राज्याची कथा जगासमोर आणली.

      अर्थात बर्‍याचशा अनुवादांचे जे होतं तेच या पुस्तकाचंही झालंय. अविनाश दर्प यांनी हा अनुवाद केलाय. काही ठिकाणी अडखळायला होतं. वाचताना पुस्तक मूळ इंग्रजीत वाचलं असतं तर जरा बरं वाटलं असतं असं वाटल्यावाचून राहावत नाही. थोडक्यात, स्वत: विकत घेऊन संग्रही ठेवण्यापेक्षा लायब्ररी किंवा उसनवार मिळालं तर वाचावं हे उत्तम!!!

Sunday, December 26, 2010

साहित्य संमेलन आणि साहित्य!!!!

साहित्य संमेलनात बरीचशी पुस्तकं मिळाली नाहीत. अगदी त्या त्या प्रकाशन संस्थेच्या स्टॉल्सवरही नाही. बरं तेव्हा उपलब्ध नव्हती आणि नंतर येणार असतील म्हटलं, तर ते ही नाही. पहिल्या दिवशीच दोन पुस्तकांच्या शेवटच्या प्रती मिळाल्या. जराशा खराब असतील, तरी घेण्यासारख्या होत्या. ’मुंबई दिनांक’ तर त्याही पलिकडे गेलं होतं. वर मॅजेस्टिकचा एक विक्रेता मी ’मुंबई दिनांक’ आहे का विचारताच मला मी ’माजी मुंबई’घ्यावी म्हणून मागे लागला. पुस्तक कशाबद्दल आहे हे ही त्याला माहित नव्हतं!!!!
राजहंसने ’बाराला दहा कमी’ चं मुद्रण करून खूप वर्षं झाली, हे तेच सांगतात. पॉप्युलरकडे ’बिढार’ नाही, मौजेकडे ’बखर एका राजाची’ नाही. बरं, पुन्हा कधी मिळेल याचेही त्यांच्याकडे उत्तर नाही. बरं, शेवटच्या दिवशी गेल्याने संमेलनातला साठा संपला असावा असंही नाही. :-( सवलत मूल्याबद्दल तर बोलायलाच नको. मौजेकडे १०% डिस्काऊंट उपकार केल्यासारखा मिळाला. कॉंटिनेंटलकडेही तीच गत. तेच पुस्तक मॅजेस्टिककडे घेतले तर त्याच पुस्तकांवर १५% डिस्काऊंट. चांगली पुस्तकं घ्यायची तर किंमतीकडे लक्ष देऊन भागत नाही हे जरी खरं असलं तरी एकदम पंधरावीस पुस्तकं घ्यायची तर नक्कीच त्यामुळे फरक पडू शकतो. त्यामुळे ग्रंथालीचा ४०% डिस्काऊंट जाम आवडला!!!

             एका स्टॉलवर दुसर्‍या प्रकाशकाचा स्टॉल कुठे आहे म्हणून विचारले तर तेही कुणी सांगत नाही. मराठीला वाचक नाहीत म्हणून एकीकडे ओरड करायची आणि दुसरीकडे वाचकाला काय हवंय याची पत्रास ठेवायची नाही. आणि म्हणे साहित्य संमेलन!!!

एक उनाड दिवस!!

एक रिकामटेकडा दिवस, पाकीट नोटांनी भरलेलं, सोबत आपल्यासारखेच वेडे मित्र-मैत्रिणी आणि समोर पुस्तकांचा समुद्र!!! आणि काय हवं मग??? [मध्ये हवी तेव्हा पोटपूजा करायला मिळावी इतकंच] 

 काल घरच्या खजिन्यात पडलेली भर:

१) रथचक्र - श्री. ना. पेंडसे
२) डांगोरा एका नगरीचा: त्र्यं.वि.सरदेशमुख
३) वनवास - प्रकाश संत
४) शारदासंग्रह - प्रकाश संत
५) पंखा - प्रकाश संत
६) झुंबर - प्रकाश संत
७)एम.टी. आयवा मारू- अनंत सामंत.
८-११)बिढार, हूल, जरीला, झूल - चांगदेव चतुष्टय - भालचंद्र नेमाडे
१२) चिरदाह
१३-१४)दोन एस.एल भैरप्पा- वंशवेल आणि आवरण
१५)नांगरल्याविण भुई
१६)सात सक्कं त्रेचाळीस - किरण नगरकर
१७)पर्व - एस.एल.भैरप्पा - अनु: उमा कुलकर्णी
१८)माचीवरला बुधा - गो. नि. दांडेकर
१९)एका रानवेड्याची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे
२०) असा घडला सचिन- अजित तेंडुलकर

खिशाला खार किती पडली हे मात्र विचारू नये..

Friday, November 19, 2010

कणेकरी!!!

एके रात्री निद्रादेवी आमच्यावर अंमळ रूसली.. नि एका बेसावध क्षणी मी पुस्तकांचे कपाट उघडले.. नाहीतरी शनिवारची जंगी खरेदी खुणावत होतीच.. मोठं पुस्तक आख्खी रात्र खाईल म्हणून छोट्सं नि हलकंफुलकं पुस्तक निवडलं-- कणेकरांचं गोतावळा.. पुढे दोन-अडीच तासांत  ते संपलं नि मी बाजूला ठेवलेलं झाडाझडती पुन्हा उचललं हे काय आता वेगळं सांगायला हवं?

कणेकर कोणे एके काळी सामनाच्या रविवारच्या पुरवणीतून शब्दचित्रं रेखाटायचे त्याचं हे संकलन. गोतावळा म्हणजे शिवाजी पार्काच्या कट्ट्यावर जमणारे इरसाल लोक.. नि अर्थातच त्यांचं शब्द चित्रण. प्रस्तावनेतच कणेकर म्हणतात की ,"यावेळच्या लेखात हवी तशी हजामत नाही झाली" असे अभिप्राय त्यांना मिळाले.. आपण हजामत केल्यासारखी लोकांची खेचतो हे त्यांना स्वत:लाच आवडले नाही.. मग त्यांनी त्या लोकांना यावर खास छेडताच असे काही नाही, उलट आमची लोकप्रियताच वाढली  असे सर्वांनी त्याना सांगितले, असे कणेकर म्हणतात!!!! त्यांच्या या गोतावळ्यात अविनाश खर्शीकर, नंदू जूकर, संजय मोने, बाळ ठाकरे, ओ. पी. सारखी सुमारे बावीसशे व्यक्तीचित्रे आहेत..

पुस्तक वाचायला जसं हवं होतं तसं  हलकेफुलके आहे.. नि काही अपवाद वगळता , उदा. त्यांचा मावसभाऊ सुभाष, कर्णिक वकील, ते लेखातून हजामत करतात हे वाक्य अगदी पटले.. चारपानी लेखाची पहिली ३ पाने त्या व्यक्तीचित्राची वाट लावण्यात खर्ची पडतात.. नि राहिलेल्या जागेत कधी आणखी एखादा राहिलेला अनुभव आणि  "मेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये" च्या चालीवर त्या माणसाबद्दल शेवटी कुठेतरी चांगलं लिहिलं आहे...

सांगायचंच झाले तर अविनाश खर्शीकर बद्दल, "काहीही फुकट मिळेल ते घेऊन ठेवणारा माणूस.. मग ते मित्राच्या गाडीतले प्लास्टीकचे फनेल का असेना", "अवीच्या घरात अन्न शिजत नाही","अविनाशची दोन्-तीन वर्षांनी एकदा होणारी पार्टी म्हणजे एका वड्याच्या बदल्यात आपल्याला त्याला किमान चाळीस चिकनची जेवणं खायला घालणं", "त्याला नाटकाला सेटस लागत नाहीत, लाइटिंग लागत नाही, प्रेक्षकही लागत नसावेत" इ. इ. ओ पी नय्यरच्या तिरसटपणाबद्दलही तेच.. एकूण काय, थोडक्यात 'हजामतच!!'

या हजामतीत एक प्रकरण त्यांनी स्वतःवरही खर्ची घातलंय. स्वतःलाही थोडेफार चिमटे काढले आहेत, पण इतरांच्या चिमट्यांच्या तुलनेत हे काहीच नाहीत. त्यांच्याच गोतावळ्यातल्यातले एक संपादक कणेकरांनी चित्रपट समीक्षकांवर(यांत कणेकरही होते) कणेकरी शैलीतल्या लेखावर काट मारताना, "आपणच आपल्याला मारलेली थोबाडीत आपल्याला लागत नाही" असे म्हणतात ते इथे अगदी पटले..

थोडक्यात काय?
अगदीच न वाचले तरी काही हुकल्याची खंत नाही.. वाचलं तरी वेळ अगदीच वाया गेला असेही नाही छापाचे पुस्तक!!!

टीपः सदर परिचय छोटा डॉन यांना समर्पित!!!!

आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ जोशी. मनात खोल दडून राहिलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक.. आता आठवत देखील नाही त्यांच्याबद्दल प्रथम केव्हा ऐकले. कन्या शाळेत शिकत असताना दर शारदोत्सवात आठवडाभर व्याख्यानं असायची, कधी तांब्यांची मनू, कधी आनंदीबाई, कधी चाँदबीबी तर कधी राणी चन्नम्मा.. तेव्हाच तिची कथा मनात खोल दडून राहिली.. तासाभराच्या व्याख्यानात नुसती तोंडओळख झाली.. पण तेवढ्याने मन भरत नव्हते. आणखी काहीतरी हवे होते. त्याकाळी स्त्री शिक्षणालाच इतका विरोध होता, मग ही कशी शिकली? ते पण सासरघरी? नवरा साधा पोष्टात कारकून, मग त्याचा ’अभिमान’ नाही का झाला? ती परदेशात शिकायला गेली, एकटीने एवढा प्रवास करण्याइतका आत्मविश्वास, सामर्थ्य तिच्यात आले कुठून? काय अडचणी आल्या असतील, कशी मात केली असेल त्यावर? अवघ्या एकविसाव्या वर्षी वारली... कितीतरी प्रश्न.. सगळेच तेव्हा अनुत्तरीत!!!! कधीकाळी म्हणे दूरदर्शनवर मालिका लागायची. पण तेव्हा घरी टिव्ही नव्हता. आणि तीही पाहायची राहून गेली.. मग आनंदी-गोपाळ पुस्तक आहे असे कळाले, पण तेही कुठे मिळेना.. असा पाठशिवणीचा खेळ चालूच होता..

नंतर कधीतरी कॉलेजच्या विश्वस्तमंडळाने एका शिबिराला पाठवले होते. त्यात सगळ्याच कॉलेजातली विविध शाखांमधली विविध विषय शिकवणारी मंडळी होती. ट्रेनमध्ये चाललेली माझी चौफेर टकळी थांबवण्यासाठी एका उपप्राचार्यांनी विचारले, “काय गं, नुसतीच बडबडतेस की काही वाचतेस सुद्धा??” आणि मग मी काय काय वाचलंय यापेक्षा काय काय वाचायचंय याचीच लांबड लावली. त्यात पुन्हा एकदा आनंदी गोपाळ होतंच. परत आलो, आणि एक दोन दिवसांतच त्यांचा फोन आला, “आनंदी गोपाळ तर नाही मिळाले, पण एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्या दोघांचा पत्रव्यवहार आहे, हवा असेल तर घेऊन जा.” त्यांचे कॉलेज कँपसमध्येच. पण आर्टस, कॉमर्स आणि सायन्स या तिन्हींची वेगवेगळी काँबिनेशनची एकूण पाच कॉलेजं अधिक बीएड, एम एड चा खिचडी असलेली एक मोठीच्या बिल्डींग आहे. त्यात चार प्रवेशद्वारे, आणि आत गेले की जाम भुलभुलैय्या!!! विचारत विचारत त्यांच्या केबिनपाशी जाऊन पोचले आणि चार चार वेळा धन्यवाद देत ते पुस्तक घेऊन आले.

अधाशासारखं आल्या आल्या लगेच वाचूनही काढलं.. आधी गोपाळराव कसे असतील, त्यांचे जीवनमान आनंदी अमेरिकेला जाण्याआधी आणि नंतर कसे असेल, अशी उत्सुकता होती.. बायकोला शिकवले, अगदी परदेशात पाठवले याचा समाजाने त्यांना त्रास दिला असेल, हेटाळणी केली असेल.. त्यात हे पडले पुरूष. स्त्री एक वेळ पुरूषाचा उत्कर्ष सहन करू शकेल, पण याच्या उलटे न होण्याचाच तो काळ. एक ना अनेक प्रश्न. वाचू लागले, मात्र आता प्रत्येक पानागणिक त्यांचा राग येऊ लागला होता.. आनंदीबाईंची पत्रे तिकडून प्रेमाची , काळजीने ओथंबलेली आणि इकडून यांची रागे भरणारी.

एकदा त्यांनी नवर्‍याला त्यांचा फोटो पाठवला, तर त्यांचे लक्ष बायकोऐवजी त्यांचे त्यांच्या उडणार्‍या पदराकडेच.
“तुमची तस्बीर बघितली, तुमच्या आणि आमच्या पितरांना स्वर्गामध्ये आनंदाच्या उकळया फुटल्या असतील ना? कुणाकडे बघून हसताय? पदर सरळ्सरळ ढळलेला दिसतोय” आणि अशीच नाउमेद करणारी वाक्ये. काय वाटले त्यांना तेव्हा? एकतर परका देश, वेगळे राहणीमान, त्यातच आपल्या नऊवारी नेसण्याच्या पद्धतीमुळे पोटर्‍या उघड्या पडायच्या, थंड हवा बोचत असे, आणि त्यात असे हे आपल्यात माणसाकडून मनावर ओरखडे!!!!

आणखी एक पत्र आठवतेय, गोपाळराव विलायतेत असतानाचे पत्र. ते अमेरिकेत होते, पण आनंदीबाई ज्या शहरात होत्या, त्या गावात नव्हते. तेव्हाचे त्यांचे ते पत्र तर अतिविषारी होते. “अमेरिकेत राहून आता तुमचे श्रीमंती चोचले चालू झाले. हे मानवत नाही, ते मानवत नाही, अमक्याने डोके दुखते, तमक्याने कळा येतात.. या चोचल्यांत माझ्यासारखा गरीब मनुष्य कुठे बसणार देव जाणे. आता माझीही तुम्हाला अडचण वाटायला लागली असेल!!!”
आणि हे कमी की काय म्हणून तुम्हाला भेटायला आल्यावर मी कसे वागावे याला उत्तर देताना त्याच पत्रात ते पुढे लिहितात, “मी स्टेशनवर उतरल्यावर इतर अमेरिकन स्त्रियांप्रमाणे तुम्ही मला आलिंगन देऊन ओष्टचुंबन देत आहात आणि इतर अमेरिकन स्त्रीपुरूष टाळ्या वाजवत आहेत, हे दृश्य माझ्यासमोर उभे राहिले. हा हिंदु संस्कृतीचा घात घालणारे चित्र आहे. मला असे थिल्लर वागणे जमणार नाही. निरनिराळे लोक आपल्याबद्दल निरनिराळे बोलतात.. तुम्हांला हे उत्तम जमेल!! कसे वागायचे हे आपण ठरवलेले असेलच!!!” अशा पत्राने नवर्‍याबद्दल प्रेम उत्पन्न होण्याऐवजी धास्तीच यायची त्याच्या विक्षिप्तपणाची. कदाचित त्यामुळेच एकदा आनंदीबाईंनी, त्या चोळीऐवजी शर्ट वापरत तेव्हा साडी शर्टाला पिन-अप करण्यासाठी पिन पाठवण्याविषयी लांबलचक स्पष्टीकरण लिहिले होते. विखार आणि डंखांनी भरलेली ती गोपाळरावांची आधीची लांबलचक आणि नंतरची त्रोटक होत गेलेली ती पत्रे. सतत त्यात कुत्सित विचार भरलेले.. त्यांची घायाळ करणारी संभाषणे वाचून तर माझ्या मनाची तडफड झाली होती.. थोडेसे चरफडतच मी ते पुस्तक संपवले.

मिपावर हळूहळू लिहायला लागले, ओळखी झाल्या. आणिक एक दिवस असाच एक वाचनवेडा मित्र भेटला. त्यालाही आनंदी गोपाळ कसे हवेय वगैरे पुन्हा एकदा रामायण सांगून झाले. माझ्या नाही, परंतु त्याच्या शोधाला यश आले, आणि एक दिवस पुस्तक माझ्या पदरात नाही, पण हातात तरी पडलेच. दुसर्‍या दिवशी काही कारणांनी कॉलेज बुडवायचे होतेच, त्यामुळे सकाळी वेळेत उठण्याची चिंता नव्हती. पहाट होता होता पुस्तक वाचून संपलंही होतं.

आतापर्यंत फक्त पुण्याच्या राजा केळकर वस्तुसंग्रहालयात तिने मैत्रिणींसोबत मिळून शिवलेली गोधडी फक्त पाहिली होती, आता तिचा सगळा जीवनपट समोर उलगडला होता. सावळ्या वर्णाची, तोंडावर देवीचे व्रण असलेली यमू, नऊ वर्षांची झाली तरी बिनालग्नाची आणि मग नंतर आलेच स्थळ म्हणून पंचविशीच्या बिजवराच्या गळ्यात बांधलेली. तो बिजवर तरी कसा? चिडखोर, हेकट आणि वि़क्षिप्त. त्याला पत्नी हवी होती लिहिता वाचता येणारी, मग घराणं अगदी रांडेचं असले तरी चालेल असे चारचौघांत बोलून दाखवण्याचा भयंकर फटकळ म्हणा किंवा तोंडाळपणा असलेला!!! त्यांना खरेतर वयाने इतक्या लहान मुलीशी करण्याऐवजी एखाद्या विधवेशी लग्न करायचे होते, पण त्यांचे लग्न झाले ते लहानग्या यमूशी. असा माणूसच सासुरवाडीच्या लोकांना धर्मांतर करेन म्हणून धमक्या देऊन बायकोस शिकवायची हिंमत करू जाणे. आणि त्यावेळेस बायकोला पायात मोजड्या घालून समुद्रकिनारी फिरायला नेण्याचा देखील!!!! पण तरीही या दोन गोष्टी माझ्या मनातल्या पूर्वग्रहाला बदलू शकल्या नाहीत. कदाचित यामागे त्यांनी लहानग्या आनंदीकडून ओरबाडून घेतलेले शरीरसुख किंवा बायको गरोदर असताना अथवा अगदी नुकतेच जन्माला आलेले मूल मेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून नुसता बुकांचा धोशा लावणे हेही कारण असू शकेल.

मी इंजिनिअरिंगला असताना माझ्या आसपासच्या बायका आईला म्हणायच्या, "कशाला शिकवतेस तिला??? आपण शिकवायचे आणि परक्यांचं घर भरायचं". आई अर्थातच लक्ष द्यायची नाही. आनंदीचा काळ तर खूपच जुना. अगदी १८६५चा. ती कशी शिकली असेल, असे वाटायचे. पुस्तक वाचताना कळले, तिला नशीबाने कुठल्याच प्रकारचा सासुरवास झाला नाही. पण आनंदीचे शिक्षण जरी नवर्‍याने तिच्यावर लादले असले, तरी सुखासुखी झाले नाही हे निश्चित. आई, बाबा , आजी सगळ्यांनी करता येईल इतका विरोध केला. लग्न बायकोला पुढे शिकवेन याच अटीवर झाले असले तरी, हे क्षणिक असेल आणि नंतर ते वेड जाईल अशीच सगळ्यांची अटकळ होती. ते बधत नव्हते याची शिक्षा मात्र आनंदीला जळक्या लाकडाचे चटके घेऊन भोगावी लागली. नवर्‍याचा आडमुठेपणा आणि घरच्यांचा सनातनीपणा यात तिचं बालपण मात्र भरडलं गेलं.

नवरा असा तर्‍हेवाईक, पण कुठे कुठे गोपाळरावांचे चांगले रूपही दिसत होते. एकदा ते आनंदीबाईंना म्हणतात, “आता अमुक कशाला आणि तमुक कशाला हा प्रश्न विचारायचा नाही. मी सांगेन ते वाचायचं.. जन्मभर सारखा अभ्यास करायचा. माझ्यापेक्षाही जास्त शहाणं व्हायचे.. मला येत नाहीत-कोणत्याही पुरूषाला येत नाहीत, असे विषयही शिकायचे”. त्यांनी आनंदीबाईंना वेगवेगळे विषय शिकवले, ज्ञान मिळवण्यासाठी उद्युक्त केलं, पण दुर्दैवाने स्वत:हून पंधरासोळा वर्षांनी लहान पत्नीचे मन समजून घ्यायला मात्र ते कमी पडले हेदेखिल जाणवत राहिले. त्यांनी परदेशात डॉक्टरी शिकायला जावे असे म्हणणार्‍या त्यांच्यात नंतर मात्र कली शिरला..

पुस्तकाला सुरूवात करण्याआधी बरेचसे प्रश्न होते. माझ्या त्या प्रश्नांची उत्तरे मला आनंदी-गोपाळमधून मिळत गेली. ख्रिश्चन लोक किती झाले तरी भारतीयांना समान वागणूक देणं शक्यच नाही. आता जरी कुणी परदेशात शिकायला निघाले तरी आधी सगळी चौकशी करतो, कुणी तिथे ओळखीचे भेटेल का हे पाहातो.. आनंदीसाठी सारेच नवीन. बोटीचा इतका मोठा प्रवास... आणि पत्रातून सूर जुळलेल्या मावशी. आणि नजरेसमोर एक मोठे स्वप्न-डॊक्टर बनण्याचे!!!! राहणीमानाच्या, खाणपानाच्या सवयींनी झालेला त्रास.. आणि पुन्हा चालू झालेला गोपाळरावांचा पत्रातला दुष्टपणा. एक मात्र खरं, की आनंदीबाईंमध्ये जन्मत: काही असे वेगळे करण्याची, शिकण्याची इच्छा दिसत नाही, तिला रूजवले, खतपाणी घातलं ते गोपाळरावांनी. मात्र त्यांच्या मनाचे सूर कधी जुळलेच नाहीत. आनंदीबाई हुशार असाव्यातच. नाहीतर इतके सगळे विषय घरच्याघरी तयार करणं, नंतर इंग्रजी व्यवस्थित शिकणं, परक्या भाषेतून भाषणं देणं हे आजच्या घडीला देखील सगळ्यांना जमतंच असे नाही. त्यांच्यामध्ये, विचारांमध्ये प्रगल्भता आली, जिथे गोपाळराव कधीच पोचू शकले नाहीत.

पुस्तक एकदा वाचून मन नाहीच भरलं. अजूनही कधी मनात आले की काढून वाचत बसते. कितीही नैसर्गिक, कौटुंबिक , मानसिक अडचणींतून आनंदीबाई गेल्या, स्थित्यंतरे अनुभवली, परंतु त्या स्वत:ला त्यातून समृद्ध करत राहिल्या. त्यामुळे जरी शोकांत शेवट असेल तरी मला आनंदीबाईंची प्रतिकूल परिस्थितीतही लढा देण्याची वृत्ती दुर्दम्य आशावाद देऊन जाते. आधी त्या माझ्यालेखी एक व्यक्तिरेखा, आदर्श होत्या, आता माझ्या त्यांच्याविषयी काय वाटतं ते शब्दांत नाही सांगता यायचं.. पुस्तक मिळवण्यासाठी बरीच धडपड केली होती आणि ती धडपड खरोखर यथार्थ ठरली!!!

पुरो आणि मुक्ता!!

परवा अपघातानेच ’पिंजर’ हाती लागली. अमृता प्रितम म्हटले की मला “वारिस शाह नूं” आणि “पिंजर” हेच आठवते. पंजाबी वळणाची हिंदी ही त्यांची शैली. सहसा माहित नसलेलेही बरेच हिंदी शब्द पानांच्या वाटेवर भेटत राहतात आणि हळूहळू ओळखीचे होऊन जातात. पिंजरच्या अर्पणपत्रिकेतच त्या म्हणतात, “स्त्री, वह हिंदू हो या मुसलमान, जो उसकी ठिकाने तक पहुंच पाई.” यावरून खरेतर आत काय असावे याची कल्पना यावी. भारत-पाकिस्तानाची फाळणी हा तसा बराचसा संवेदनशील विषय. आणि ज्यांनी ते प्रत्यक्षात अनुभवले, त्यांच्यासाठी तर जन्मभराची भळभळती जखम. लेखिकेने हे सगळे जवळून पाहिल्यानेच की काय पण वारिस शाह नूं आणि पिंजरमध्ये फक्त “फाळणी” यापलिकडे जाऊन त्याचा जनसामान्यांवर झालेला परिणाम अधिक उत्कटतेने दिसून येतो.

    पिंजर. ही कुंकवाची पिंजर नाही. तो आहे अस्थिपंजर. स्त्रीमनाचा आणि शरीराचाही. तो पिंजर आहे पुरोचा आणि मुक्ताचा. दोघीही स्त्रियाच, पण वेगवेगळ्या काळातल्या, वेगवेगळ्या भूभागातल्या!! दोघींचे जिव्हाळ्याचे विषयही वेगळे, तरीही दोघींमध्ये एक समान धागा आहे. पुरो, ही गुजरातच्या पण आता पाकिस्तानात असलेल्या भागात राहणाया धनकोची मोठी मुलगी. पुरोची सगाई झालीय, रत्तोवालच्या रामचंदशी आणि पुरोच्या पाठच्या भावाचे लग्न पण तेव्हाच रामचंदच्या बहिणीबरोबर ठरवून टाकलंय. गावातलाच शेखांचा रशिद तिला सतत मागावर असल्याचे जाणवतं, तिचं स्त्रीत्व तिला अनामिक धोक्याची जाणीव करून देतं. आणि एक दिवस लग्न आठवड्यावर आले असताना रशिद तिला पळवून घेऊन जातो. गावातल्या या शेखांसोबत पुरोच्या घराचे पिढीजात वैर आहे. तिच्या ताऊंनी रशीदच्या आत्याला पळवून आणले होते, तीन दिवस घरात डांबून ठेवले आणि नंतर सोडून दिले. तिला ना कुणी घरात घेतले, ना तिचे लग्न झाले. रशीदच्या काका-भावांनी त्याला याचा बदला म्हणून पुरोला पळवायला भाग पाडलेय, आणि काही केलंत तर बरे होणार नाही असे तिच्या बाबांना धमकावलंय देखील. पण रशीद पुरोच्या ताऊंसारखे वागत नाही, तिला सोडून देत नाही. तो तिच्याशी निकाह करतो आणि तिला त्रास होऊ नये म्हणून तिला दुसर्‍याच गांवी घेऊन येतो.

    इथेही पुरोचे मन रमत नाही. ती त्यांच्या भाऊबंदांत रमत नाही, बोलत नाही. निसर्ग आपले काम चोख बजावतो. पण तिला तो गर्भ म्हणजे शरीरात असलेल्या नकोशा किड्यासारखा वाटत असतो. मूल झाल्यावर तिला त्याच्याबद्दल थोडेफार प्रेम वाटते, पण तेही तितकेच. ती स्वत: मात्र तूप न लावलेलय रोट्या, फक्त देह जगवायला अतिशय साधे अन्न तेही दिवसातून एकदाच खात राहते आणि अस्थिपंजर बनून जाते. इतक्या दिवसांच्या सहवासानेही तिला रशिदबद्दल प्रेम वाटत नसते, पण तो एकदा आजारी पडल्यावर तिला त्याची काळजी वाटते आणि तिला पळवून आणल्याबद्दलचा तिरस्कार, ताटातूट सगळी गळून पडते.

    एवढे सगळे होऊनही तिचे मन माहेराकडे, ज्याची लग्नापूर्वी रात्रंदिन स्वप्ने पाहिली, त्याच्याकडे धावत असते. अचानक तिला एक संधी मिळते, रत्तोवालला जाण्याची. ती जाते, गावांत फिरता येत नाही, म्हणून शेतांतून फिरते, उगाच काहीबाही करणे काढून हे शेत कुणाचे ते शेत कुणाचे असे विचारत राहते. तिने एकवार त्याला ओझरते पाहिलेले असते, आणखी भेट व्हावी असे वाटतं पण प्रत्यक्षात तो भेटल्यावर ती काहीच बोलत नाही. त्यालाही कळत नाही, ही मुस्लीम स्त्री कोण ते, पण ती ओढ कुठेतरी असावी. तो दुसर्‍या दिवशी विचारतो, “तू पुरो आहेस का?” ती अर्थातच उत्तर टाळून निघून जाते. अशातच फाळणी होते, हिंदूना तो भूभाग सोडून जावे लागते. सगळे मुस्लिम त्यांचे वैरी बनतात. घरे लुटतात, मुलींना पळवून नेतात, अव्वाच्या सव्वा भावाने त्याना धान्यधुन्य विकतात. सरकारी छावण्यांतला बंदोबस्तही अशा लोकांना रोखायला कमी पडतो. आणि अशावेळी रामचंद तिला पुन्हा भेटतो ते हेच सांगायला की, त्याची बहिण व पुरोची वहिनी मुस्लिमांनी पळवून नेलीय आणि बाकीचे कुटुंब जीव वाचवून भारतात जात आहे. ही जीवावर उदार होते, नवराही साथ देतो आणि ती रत्तोवालमध्ये जाऊन वहिनीला पळवून आणते. पत्ता देऊनही रामचंद, भाऊ कुणीच संपर्क साधत नाही. इथे दोघीही आता समदु:खी. एकीला १५ दिवस पळवून नेली म्हणून घरात घेतले नाही, तर तेच लोक आता दुसरीला कसे घेतील? वहिनीने तर आशाच सोडलीय. पण पुरो वहिनीला आपल्यासारखी पिंजर होऊ देत नाही. महिन्यावर महिने उलटतात, पण तिच्यातला दुर्दम्य आशावाद तिला धीर देत राहतो. एके दिवशी खरेच निरोप येतो की अमक्या अमक्या दिवशी इथे जे लोक राहिले आहेत, त्यांना भारतात नेण्यात येणार आहे. आपल्याही घरचे कुणी येईल म्हणून तिघेही तिकडे जातात. भाऊ-बहिण जवळ जवळ दहा वर्षांनी एकमेकांना भेटतात. आणि तेव्हाच उद्घोषणा होते, “भारतात ज्यांना जायचेय त्यांनी या बाजूला यावे”.

आता हे एकदम अवघड वळण. अजूनही भावाचा हात तिच्या हातात आहे. तो स्पर्श तिला सोबत नेऊ पाहतोय, तिच्या स्वत:च्या माणसांत. तिच्याही मनात स्वार्थ डोकावतो, पण तो क्षणभरच! ती निकराने फक्त वहिनीला परत पाठवते. कारण एकच, तिच्यावाचून तिच्या रशीदचं, पोटच्या मुलाचं आणि एका सांभाळलेल्या मुलाचं पिंजरच शिल्लक राहिले असते...

पुरोची कथा इथेच संपते. एका मुलीच्या आयुष्यात आलेली स्थित्यंतरे दिसतात, दिसतात म्हणण्यापेक्षा लेखणीमधून, निवडलेल्या शब्दांतून ती जाणवत राहतात. लग्नाआधी मैत्रिणींसोबत असतानाचे प्रसंग वाचताना आपल्यालाही प्रसन्न वाटते, तेच रशीद तिला दिसला रे दिसला की अशुभाची काळी छाया पान व्यापून राहिल्यासारखे वाटते. रशीद तिला सक्कडअलीला नेऊन ठेवतो. तिने परिस्थितीसमोर हार मानलीय, तिला कशाचा उत्साह नाही, हे “मटमैला दिन था” सारख्या छोट्या छोट्या वाक्यरचनांमधून तिचे नैराश्य अधिक गडद होत जाते. तिचा स्वत:चा स्वत:शी संघर्ष दिसतो, नंतर परिस्थितीशी जुळवून घेतल्यावरची बदलेली पुरो ही अधिक ठाम अन अधिक खंबीर वाटते.
  
पिंजरची दुसरी नायिका मुक्ता. ही स्वतंत्र भारतातली मुलगी. अत्यंत सुंदर पण दुर्दैवाने गरीब घरात जन्माला आलेली. घरातल्या वस्तू अगदी मोजक्या. इतक्या मोजक्या की लग्नासारख्या समारंभात देखील काय येणार, किती येणार आणि काय काय जाणार हेही अगदी ठरून गेलेलं!!! ती कॊलेजात शिकते, पण याला घरच्यांचा म्हणावा तसा पाठिंबा दिसत नाही. तसाच तो तिने “मिस दिल्ली” स्पर्धेत भाग घ्यायलाही मिळत नाही. याची रूखरूखही तिच्या मनात कुठेतरी आहेच. तिला एका श्रीमंत बिजवराचे स्थळ सांगून येते. तो बराच श्रीमंत.  अगदी त्याच्या पदरी त्या काळात पगारी वकिल ठेवले होते. आणि त्यातल्या कुठल्यातरी एका वकिलाच्या मुन्शीची ही लेक. त्यात पाठीवर बहिणी आहेतच. घरच्यांना स्थळात काही वावगे दिसत नाही, पण हीच काही बोलत नाही.
 “त्याची बायको आत्ताच वारलीय, ओटीत लहान मूल टाकून गेलीय, मग लग्न नक्की कुणाची गरज म्हणून? बाळाची, की नवर्‍याची??? जर बाळाची गरज म्हणून मी, तर मग माझे त्याच्या आयुष्यातले अस्तित्व काय??” तिच्या मनात नुसते विचारांचे काहूर. अर्थातच उघड बोलण्याची सोय नाहीच.

तीनेक महिन्यांनी पुन्हा तेच स्थळ, यावेळी एक निरोपही आहे सोबत. “मुलाला हवे तर आजीकडे अमृतसरला ठेवतो” यावेळी हिला खिजगिणतीत न धरता लग्न ठरवले जाते. लग्न तरी काय, अत्यंत आवश्यक विधी चार भिंतींआड जास्त गाजावाजा न करता पार पाडले जातात इतकंच. ती सासरी येते, कळतं, ते मूल-राहूल-नुकतेच गेलंय. पाहुण्यांत दबकी चर्चा.  हिच्या कानावर पडेलशी..., “अपशकुनी दिसते मुलगी, इकडे स्थळ सांगून गेलं, तिकडे मूल गेलं!!”
नवरा अद्याप प्रथम पत्नीला विसरू शकलेला नाही. सगळ्यांनी अगदी त्याच्या आईने सांगूनही त्याने पहिल्या पत्नीचा, मुलाचा व त्याचा फोटो नवपरिणीत जोडप्याच्या शयनकक्षात तसाच ठेवलाय. घरातले बाकीचे फोटो काढू दिलेत, हे त्यातल्या त्यात नशीब. त्याचा भूतकाळ तिला पावलोपावली भेटत राहतो. कपड्यांच्या अलमारीत.. पहिलीच्या कपड्यांच्या ट्रंकांत... गडीमाणसांच्या बोलण्यात.... अगदी त्या दोघ्यांच्या शय्येवर सतत तिला ते न पाहिलेल्या मुलाचं प्रेत दिसत राहातं. मनातल्या मनात ती पिंजर बनत जाते. नवर्‍याला खुश ठेवते, पण त्याच्यापर्यंतही तिचे अंतर्मन पोचत नाही. ती गरोदर राहते, पण नवर्‍याला त्याने त्याच्या आईला कळवू नये अशी अट घालते. तोही ती म्हणेल तेव्हा आईला सांगू असे म्हणून गप्प राहतो. तिचा गर्भपात होतो, आणि याचे मन चरकते, “असे काही होणार हे मुक्ताला आधीच कसे कळले?” ती सांगते, “मला माहित होते, तो जाणार होता. तो राहुल होता” नवर्‍याचे डोळे उघडतात. आपला भूतकाळ वर्तमानाला जगू देत नाहीए. यावेळी तो तिला खोदून खोदून विचारतो आणि इतके दिवस साचलेले तिचे दु:ख बाहेर पडते, “मला तो नको होता. म्हणजे आपल्यामध्ये नको होता. पण मी त्याच्या मृत्यूची आशा कधीच केली नव्हती. तो इथेच असतो, रोज असतो. इथे, आपल्या पलंगावर, आपल्या दोघांच्या मध्ये” आणि असेच बरेच काही. मुलाच्या मत्यूची टोचणी तिचे मन खात असते. जणू काही ते तिच्याच इच्छेचे फलित असावे. नवर्‍यालाही कळते, हे सगळे काय आणि का घडतं आहे. तो बेडरूममधला तिघांचा फोटो काढून टाकतो.
सगळे बोलून टाकल्याने तिच्या मनावरचे ओझेही हलके होते, ती तो फोटो तिथेच परत लावते. “आपका अतीत अब मेरा भी अतीत है” म्हणत!!


दोन वेगवेगळ्या कथा, पण दोघींची आतल्या आत धुसमट हे समान सूत्र. ना पुरो रशीदला कधी तिला काय वाटते ते सांगते, ना मुक्ता. तरीही त्यांना काय वाटते, ते पक्के आहे, त्यांच्यापुरते ठाम आहे. दोघीही वेगवेगळ्या लादलेल्या प्रतिकूल परिस्थितींचा शेवटी स्वीकार करतात आणि लक्षात राहतात.

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी....

          २६/११ चे रणकंदन आणि तेव्हाचा थरार भारतीयांच्या मनातून कधीच पुसला जाणं शक्य नाही. बरेच जण मृत्यूमुखी पडले, कैक जायबंदी झाले. त्यात पोलिस आणि सामान्य नागरिक दोन्हीही आलेच. या हल्ल्यात आपले बरेच नुकसान तर झाले, वर पोलिसदलाने अनेक पोलिस इन्स्पेक्टर्स, शिपाई, कॉन्स्टेबल्स यांसह अशोक कामटे, हेमंत करकरे आणि साळसकर यांच्यासारखे मोहरे गमावले. तेव्हाच्या बातम्यांत झळकणारं “करकरे, कामटे आणि साळसकर यांना परिस्थितीचे गांभीर्य ल़क्षात आले नाही” हे वाक्य कामटेंच्या पत्नी- विनीता कामटे-यांच्या मनाला लागलं आणि त्यांनी सत्य शोधून या पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर मांडले.

           अशोक कामटे हे खरेतर मुंबई पूर्वविभागाचे-चेंबूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त. पण त्यांना वेळोवेळी शहराच्या इतर भागातही कारवाईसाठी जावं लागत असे. तसेच त्यांना २६ नोव्हेंबरलाही जावे लागले आणि काही तासांतच दूरचित्रवाणीवर त्यांच्या मृत्यूची बातमी झळकली. आपली यंत्रणा अशा प्रकारच्या हल्ल्यासाठी तयार नव्हती, आपल्या पोलिसांकडची शस्त्रास्त्रे आधुनिक  पद्धतीची नाहीत हे सगळे जरी खरे असले तरी ’असे काय झाले की ते तिन्ही अधिकारी एकाच गाडीत बसून कामा हॉस्पिटलकडे गेले’ हा प्रश्न अनुत्तरित होता. विनीताबाईंना नेमके हेच शोधून काढायचे होते. त्याची पहिली पायरी म्हणून त्यांनी पोलिसांकडे असलेल्या वायरलेस मोटोरोला आणि एरिक्सन या दोन कंपन्यांच्या फोन्सवर कामटे आणि कंट्रोलरूम यांमध्ये  झालेले संभाषण मिळवले. पुस्तकात अगदी क्रमवार पद्धतीने त्यांनी या संभाषणाचे तपशील दिले आहेत. त्यातून कंट्रोलरूम कडून व्यवस्थित प्रतिसाद न मिळाल्याचे, आलेल्या संदेशांवर- विशेषत: करकरेंच्या पोलिस फोर्स मागवण्याच्या संदेशांवर कारवाई न झाल्याने या तिघांचा मृत्यू ओढवला यापेक्षा वेगळं काही  निष्पन्न होत नाही.  म्हणून त्यांना लोकांनी १०० या नंबरावर फोन करून काय माहिती दिली, याचे तपशील हवे होते. की जेणेकरून या तिघा अधिकार्‍यांचा मृत्यू त्यांनी स्वत:वर निष्काळजीपणे ओढवून घेतलेला नसून तो यंत्रणेतील त्रुटीमुळे आहे हे अधोरेखित होईल. एका वरिष्ठ अधिकार्‍याची पत्नी म्हणून त्या हे सगळे सहज करू शकतील अशी त्यांची अटकळ मात्र धुळीला मिळाली. एका सर्वसामान्य नागरिकासारखाच त्यांना महिती अधिकाराचा उपयोग करून घेऊन ही माहिती मिळवावी लागली. त्यांनी जानेवारीत मागवलेली माहिती झगडून झगडून नोव्हेंबरात पदरी पाडून घेतली. त्यांची त्यापायी केलेली धडपड एकंदर मूळातूनच वाचण्यासारखी आहे. विनीताबाईंना हे तपशील या प्रकरणाची चौकशी करणार्‍या ’राम प्रधान’ आयोगासमोर मांडायचे होते, पण तुटपुंजे अधिकार असलेल्या या समितीस कोणालाही साक्ष देण्यास बोलावण्याचे अधिकार नव्हते, व हा सगळा शोध सरकार दफ्तरी नोंदला गेला नाही.

          पुस्तकाचा मुख्य मुद्दा मांडल्यानंतर पुस्तकाचा नंतरचा भाग म्हणजे अशोक कामटे यांची थोडक्यात जीवनकहाणी आहे. *त्यात त्यांचे ठिकठिकाणचे पोस्टिंग्ज, त्यांची कार्यपद्धती, निर्णयक्षमता, त्यांचे भंडारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यातले काम असा आहे. कामटेंच्या सोबत काम केलेले त्यांचे सहकारी, पत्रकार व काही मित्र, त्यांच्या राजकोट व कोडाईकॅनॉलच्या शाळेतले मित्र आणि शिक्षकांनीही त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या आहेत. पुस्तकाच्या उत्तरार्धात कामटेंचं एकंदर कुटुंब येते. यांचे घराणेच मुळात पोलिस आणि लष्करसेवेत असलेलं आहे. अशोक कामटे यांचे पणजोबा मारूती कामटे हे १८९५ ते १९२३ याकाळात पोलिसांत होते आणि त्यांना त्यावेळच्या मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरनी तलवार देऊन सन्मानित केलं होते. आजोबा एन. एम. कामटे हे मुंबईचे पहिले आय.जी. होते, त्यांनी त्यांच्या नोकरीतल्या व ब्रिटिशांसोबतच्या आठवणी “फ्रॉम देम टू अस” या पुस्तकात मांडल्या आहेत. पणजोबा-आजोबा नंतर बाबा मात्र पोलिसांत न जाता लष्करात गेले, आणि त्यांनी तिथे कर्नलपद भूषवले. कामटेंची आईही अशाच मोठ्या घराण्यातून आलेली व १९५६ सालची स्क्वॅशची नॅशनल चँपियन होती. कामटेंना मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीने आणि घरच्या-कामगिरीवरच्या फोटो आल्बमसोबत पुस्तक संपतं. पहिला भाग वाचताना हे असे का व कसे घडले असेल असा प्रश्न पडतो. विनिताबाईंना माहिती देतानाची संबंधितांनी केलेली टाळाटाळ मन उद्विग्न करते. या दु:खद घटनेतून सावरणार्‍या, सत्याचा छडा लावणार्‍या विनिताबाईंची तळमळ खरेच कौतुकास्पद आहे. पुस्तकाचा मूळ हेतू पहिल्या एकतृतियांश भागातच संपत असला तरी, नंतरचे पुस्तकही कंटाळवाणं होत नाही. एक पोलिस अधिकारी म्हणून, पिता, पती, भाऊ, एक उत्कृष्ट खेळाडू, अशी विविध रूपांतून त्यांची प्रेरणादायी गाथा उलगडत जाते.

     एकदा घरी येताना पायरेटेड पुस्तकांच्या स्टॉलवर हे पुस्तक दिसले. मोह आवरला नाही, आणि अवघ्या साठ रूपयांत ते पुस्तक मिळाले. पायरेटेड कॉपी असली, तरी एकदोन फिकुटलेली किंवा अतिठळक झालेली पाने सोडता वाचायला काहीच वाईट नव्हती. एकंदर पुस्तकाची मांडणी अगदीच उत्कृष्ट सदरात मोडत नसली तरी चांगली आहे. तशा फ्रुफरिडिंगच्या चुकाही आहेत. दोनतीन ठिकाणी पूर्ण परिच्छेदांची पुनरावृत्ती झाली आहे.  पण एकंदरीत पुस्तक वाचनीय व एका घडलेल्या महत्वपूर्ण घटनेची  ती कशी घडत गेली याची मीमांसा म्हणून छानच आहे. कदाचित आता नंतर असे काही घडले, तर किमान आपली यंत्रणा या चुकांपासून काही शिकेल अशी आशा बाळगूयात

         * हा भाग वाचताना पती म्हणून कामटे विनीताबाईंना  खूप महान वाटत असतील आणि म्हणून त्यांनी अतिशयोक्ती केली असावी असे वाटण्याचा संभव आहे. कामटे २००२च्या सुमारास सांगली जिल्ह्यात होते. मूळ सांगली शहरात गुंडगिरी, दिवसाढवळ्या खून पडणे, मारामारी असले प्रकार सर्रास घडायचे. फासेपारधी सतत चोर्‍या करत असत. त्यांच्या काळात कामटेंनी याप्रकाराला खूप आळा घातला. त्यांच्यानंतर सांगलीला आलेले आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तिथे इतका दरारा निर्माण केला की त्यांच्या नावाने लोक अक्षरश: घाबरत. बेकायदा प्रवासी वाहतूक, बेकायदा वाळू उपसा,  गुंडगिरी आणि असे बरेच उद्योग पूर्ण बंद झाले होते. एकदा गणेशोत्सवात झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: तासगांवच्या रथोत्सवाच्या बंदोबस्तात सामील झाले होते. तेव्हा फक्त मानकर्‍यांसाठी असलेल्या रथात लोकांनी त्यांना आमंत्रित केले. आणि तद्दन गल्लाभरू चित्रपटात साजेसा प्रसंग तिथे घडला. लोक त्यांना कॅमेर्‍यात साठवत होते, अभिवादन करत होते, अचानक सगळीकडून उत्साहाची लाट आसमंतात सळसळत पसरली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी रस्त्यावर उतरला की लोकांना त्यांचा किती आधार वाटतो आणि असा अधिकारी कसा लोकप्रिय होतो, हे स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवल्यामुळे मला अशीच कार्यपद्धती असलेल्या कामटेंना या पुस्तकात मुद्दाम ग्लोरिफाय केले आहे असे मुळीच वाटले नाही.

आनंदी आनंदी आणि आनंदी!!!

           आनंदी. बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनावर गारूड करून आहे. किंबहुना, तीच नाही, तर त्या काळात ज्या स्त्रिया शिकल्या, चाकोरीबाहेर जाऊन वेगळे काही करू शकल्या, त्या सर्वांबद्दलच माझ्या मनात एक मोठे कुतुहल आहे. आजच्या काळात शिकणे वा परदेशात जाणं काहीच अवघड नाही. परंतु घराबाहेर पडण्याची बंदी असलेल्या काळात या स्त्रिया त्यांच्या काळातील लोकांपेक्षा चार पिढ्या पुढेच होत्या. मला प्रश्न आहेत ते: यांना शिकावे असे मुळातून का वाटलं? त्यासाठी विरोध पत्करायची आणि सहन करण्याची आंतरिक शक्ती यांना कशी मिळाली? त्या एकट्या होत्या की सुदैवाने काही मदतही मिळाली? त्रास झाला हे खरे, पण तो नक्की कसा आणि कुणाकुणाकडून? त्यावेळेस समाजात काय स्थित्यंतरे घडत होती? असा प्रयत्न करणार्‍या याच पहिल्या स्त्रिया होत्या, की अजून काही अपेशी जीव होते?.....  प्रश्नावली तर काही थांबतच नाही..  मी शोधून शोधून आनंदी-गोपाळ मिळवलं आणि वाचलं. एकदा वाचले, आणि वाटले की आपल्याला आनंदी कळाली. पण नंतर काहीतरी निसटून जातंय, काहीतरी राहून जातं आहे असे वाटत होते. ती फक्त जीवनकहाणी होती. एक गोष्ट सांगितल्यासारखी. पण त्यात आनंदीचे स्वत:चे असे काहीच दिसत नव्हतं. तिचं अंतरंग, विचार, ज्ञान यांची प्रगल्भता दिसत नव्हती. ती फिलाल्डेफियाला जाऊन नक्की काय शिकली? तिला क्षय होऊन ती अवघ्या बावीसाव्या वर्षी वारली. स्वत: एक डॉक्टर असताना, एका मेडिकल कॉलेजात शिकत असताना तिच्या रोगाचे निदान कुणालाच कसे झाले नाही? आनंदी मला भेटूनही पुन्हा परकी झाली होती.

             अशातच गेल्या आठवड्यात माझी सततचीआनंदी-आनंदीची भुणभुण ऐकून माझ्या मैत्रिणीने वाचनालयात ’डॉ. आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व’ हे पुस्तक दिसल्या दिसल्या उचलले. आणि प्रस्तावनेतच  कळाले की मला हवे असलेले पुस्तक ते हेच होते!! आणि भारल्यासारखी एकामागून एक प्रकरणं कशी संपली हे कळालेच नाही. लेखिका अंजली किर्तने यांनी आनंदीवर जवळजवळ सहा –सात वर्षे संशोधन केले. मला पडलेले, किंबहुना त्याहून जास्त प्रश्न त्यांना पडले होते, आणि एक प्रश्न सोडता सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी मिळवली असे म्हणायला हरकत नाही. आनंदीबाई निवर्तल्यानंतरच्या एकाच वर्षात त्यांच्या जीवनावर दोन चरित्रे लिहिली गेली. एक होते काशीबाई कानिटकरांचे आणि दुसरे कॅरोलीन डॉल यांनी लिहिलेले. काशीबाई आनंदीच्या समकालीन, त्यांना नवर्‍याने लिहावाचायला शिकवले. हरिभाऊ आपटे त्यांचे स्नेही. त्या आनंदीला कधी भेटल्या नाहीत, मात्र गोपाळरावांना त्या भेटल्या. किंबहुना त्यांना बरीचशी माहिती गोपाळरावांकडूनच मिळाली. कॅरोलीन ही आनंदीहून बरीच मोठी होती. ती आनंदीला अमेरिकेत भेटली. प्रथम दर्शनी तिला आनंदीमध्ये काही विशेष जाणवले नाही पण नंतर तिच्या बुद्धीमत्तेची चमक पाहून तीही थक्क झाली होती. आनंदी जात्याच सोशीक असल्याने आणि मुलीच्या जातीने काय काय करू नये याची शिकवण लहानपणापासून असल्याने ती नवरा हा विषय सोडून कॅरोलीनकडे पुष्कळ बोललेली दिसते. त्यामुळे काहीप्रमाणात का होईना, पण आनंदीच्या मनातली स्पंदने तिच्याप्रमाणात पोचली होती, असे म्हणायला हरकत नाही. पण हेही आहे की, तिला काही गोष्टी गवसल्या नाहीत आणि काशीबाईंनी लिहिलेले चरित्र गोपाळरावांच्या सांगण्यावरून लिहिलेले म्हणूनही आणि त्यानी चरित्राच्या दुसर्‍या आवृत्तीत काटछाट करताना त्यात काही महत्वाच्या संदर्भही उडवून लावल्याने परिपूर्ण नव्हते. त्यामुळे आणखी खोलवर जाऊन सत्यासत्यतेची पाळंमुळं शोधण्याचे काम कुणीतरी करायला हवेच होते, आणि ते या कीर्तनेबाईंनी केलंय.

          पुस्तकाची सुरूवातच मुळात १९व्या शतकातला हिंदुस्तान आणि शिक्षण याच्या तपशीलाने होते. आपले तेव्हाचे ज्ञान हे जातीव्यवस्थेवर आधारलेल्या शिक्षणपद्धतीवर मिळायचे. तेव्हा एतद्देशीयांनी आणि काही ख्रिस्ती मिशनर्‍यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ते लोकाभिमुख कसे झाले याचा इतिहास वाचण्यासारखा आहे. पुरूष शिक्षण, त्यानंतर स्त्रिशिक्षण आणि त्याकाळातले वैद्यकिय शिक्षण हे देखील बरेचसे झगडून मिळवावे लागले. तो झगडा नुसताच रूढीपरंपरांशी नव्हता तर इथल्या राजवटीशीही होता. स्त्रिशिक्षणात काय अडचणी आल्या असाव्यात हे मी नव्याने सांगायला नको. पण जेव्हा आपल्या फायद्यासाठी  हा होईना, पण जेव्हा वैद्यकिय महाविद्यालये इथे निघाली, तेव्हा इंग्रज, अमेरिकन मिशनरी आणि नेटिव्ह हा भेदाभेद केला गेलाच. उदा. त्यांना शस्त्रक्रिया व शवविच्छेदनाचा थेट अनुभव न देता शेळीवरती प्रयोग करणे, अथवा एम. बी. बी. एस. ची पदवी न देता लिटरेचर इन मेडिसीन ही हलक्या प्रतीची डीग्री देणं. हे झाले बाहेरचे. स्त्रियांसाठी तर घराबाहेर पडणंच अवघड होतं. त्यांच्यासाठी होती अंधारी माजघरे, बालविवाह, नहाण आलं की गर्भाधान आणि नंतर चालू होणारी बाळंतपणाची मालिका. काही मुले जगत, काही मरत. त्या बाळ-बाळंतिणीला घरगुती औषधोपचार सोडले तर काहीच मिळायचे नाही. पुरूष डॉक्टरकडे जाण्यातल्या संकोचाने स्त्री डॉक्टरांची गरज निर्माण झाली. तेव्हा मिशनरी स्त्रिया आपली भाषा शिकून माजघरापर्यंत पोचल्या. पण त्यांनाही त्यांच्यातल्या उणीवा जाणवल्या असाव्यात. कारण त्या काळी भारतातच नव्हे तर इतरत्रही स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण मिळणे खूप हलाखीचे होते. जे आपल्याकडे सर्वसामान्य शिक्षणासाठी झाले ते त्यांच्याकडे या शिक्षणासाठी त्यांनीही भोगले. नाही म्हणायला फिलाल्डेफियाला एकच असे ’वीमेन्स मेडिकल कॉलेज’ होते, की जिथे मुलींना प्रवेशासाठी झगडावे लागले नाही अथवा विश्वस्त मंडळ आणि विद्यार्थ्यांच्या कृपेची वाट पाहात थांबावे लागले नाही. तशी आनंदी ही हिंदुस्तानातली डॉक्टर होऊ इच्छिणारी पहिली मुलगी नाही. तिच्याही आधी कृपाबाई ख्रिस्ती या बाईंचीही तीच इच्छा होती. पण शरीरप्रकृतीने साथ न दिल्याने त्या हे शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. या कृपाबाईंचाही आनंदीआधीची आनंदी म्हणून एका प्रकरणात परिचय आला आहे. इथेपर्यंत पुस्तकाची पहिली तीन प्रकरणे संपतात आणि आनंदीपर्व चालू होतं.

         पुस्तक मुळातूनच वाचावं इतकं छान आहे. कॅनव्हास पुष्कळ मोठा आहे, आणि तो अगदी नेमकेपणाने हाताळला देखील आहे. हे पुस्तक वेगळे यासाठी, की त्यात आनंदीच्या आधीपासून हिंदुस्तानातल्या महत्वाच्या स्थित्यंतरांचा मागोवा घेतला आहे. आणि त्या अनुषंगाने फक्त आनंदीच नव्हे तर इतर स्त्रिया कशा घडत गेल्या, त्यांना काय काय संकटे आली याचे इत्यंभूत वर्णन आहे. त्यातही मग नंतर हिंदुस्तानी आणि परदेशी असा भेदाभेद नाही. आनंदीच्या कॉलेजचे वर्णन करताना त्यांनी एक पूर्ण प्रकरण इंग्लंडातल्या, फ्रान्समधल्या स्त्रियांनी-मुलींनी असे मुद्दामच म्हणत नाही, कारण आनंदीच्या वर्गात वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रिया होत्या-दिलेला संघर्ष, सहकार्‍यांनी, समाजाने केलेली अवहेलना आणि तरी त्यातून जिद्दीने शिकलेल्या या स्त्रिया सगळ्यांबद्दल माहिती मिळते. भारतातल्या त्या काळातल्या शिकलेल्या स्त्रिया म्हणून फक्त आनंदीबाई आणि पंडिता रमाबाई यांचीच नांवे आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण ही फक्त काही उदाहरणे आहेत. पुण्यातल्या रावबहादूर भिडे यांची मुलगी आवडाबाई, कृपाबाई, काशीबाई अशी अनेक सर्वसामान्यांना न माहित असलेली व्यक्तिचित्रेही या अनुषंगाने समोर येतात. या स्त्रिया फक्त शिकल्या नाहीत, तर त्या रोजनिशी लिहीत, त्यांची मते समाजासमोर मांडात नसल्या तरी लेखनातून ती मते कुठेतरी उतरत होतीच. या आनंदीच्या समकालीन असल्याने त्यातूनही आनंदीविषयी अधिकाअधिक समजायला मदत होते.

      आनंदीच्या छोट्याशा आयुष्यात तिचा खूप लोकांशी संपर्क आला. या सगळ्यांबद्दल जमेल तितकी माहिती संकलित करून लेखिकेने योग्य तिथे दिली आहे. या व्यक्तींमध्ये महत्वाची व्यक्ती म्हणजे गोपाळराव. हा अतिशय विक्षिप्त मनुष्य, हवे तेव्हा एकदम उलटी उडी मारून टोकाची भूमिका घेऊ शकत असे. आनंदी परदेशात जाईतो गोपाळराव म्हणजे सद्गुणांचा पुतळा म्हणायला हरकत नाही. आनंदी-गोपाळमधून दिसते ते त्यांचे हिमनगाचे पाण्यावरचे टोक. बहुतेकांनी आनंदीबाईंबद्दल लिहिताना काशीबाईंकृत चरित्र प्रमाण मानलेले दिसते. त्याला य.ज. जोशीबुवाही अपवाद नसावेत. त्यामुळे आनंदी-गोपाळ मध्ये आनंदीच्या घरची स्थिती अतिशय हलाखीची, कर्जबाजारी, बाबा-आजी शिक्षणाच्या विरूद्ध आणि कहर म्हणजे घरच्या स्त्रिया गोपाळरावांना कल्याणच्या पोष्टात पाहायला गेल्या आणि पसंत करून आल्या वगैरे गोष्टी दिसतात. सत्य परिस्थिती अगदीच वेगळी आहे हे आता पुन्हा सांगायला नकोच. हो, एक सांगायचे राहिले. लेखिकेने कुठलेही विधान संदर्भाशिवाय केलेले नाही.त्यामुळे आता काय खरे आणि काय खोटे हा प्रश्नच उद्भवत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे पुस्तकाचा बाज संशोधकी आहे पण ते रटाळ होत नाही. आनंदीचे मूळ जोशी घराण्याबद्दलचा दोनशे वर्षांचा जुना इतिहास, आनंदीच्या भावाने ठेवलेल्या नोंदी, इतर तत्कालीन ग्रंथ अशा सगळ्यांची सांगड घालत त्या आपल्यासमोर शक्य तितकी खरी आनंदी उभी करतात. आणि इतर लोकांच्या व्यक्तिरेखाही स्वत:चे मत मध्ये न आणता रंगवतात. त्यामुळे पहिल्यांदा गोपाळरावांचा खलपणा जाणवत नाही. पण जसजशी प्रकरणे पुढे जातात, गोपाळरावांच्या वागण्याचा आनंदीला मानसिक त्रास व्हायला लागतो, तेव्हा एक खास प्रकरण लिहून गोपाळरावांचा दुष्टपणा अगदी साग्रसंगीत सांगतात. कलकत्याच्या सभेत आनंदी स्वत:हून, हातात एक चिटोरेही न घेता भाषण देण्यास उभी राहिली, तेव्हाच त्यांना तिच्या भरारीची कल्पना आली होती. (हे भाषणही पुस्तकात पूर्ण उपलब्ध आहे). जी गोष्ट त्यांची, तीच आनंदीच्या डीनबाईंची. या डीन रिचेल बॉडले, यांनी मोठ्या मनाने आनंदीला त्यांच्या घरी राहायला बोलावले. आनंदीच्या घरमालकिणीबद्दल जेवढं वाईट सांगितले जाते-उदा. अपुरं जेवण देणं, तशा त्या कधीच वागल्या नाहीत.

    या सगळ्या प्रवासातील आनंदीच्या सुखदु:खांची साथीदार होती आंट थिओ कार्पेंटर. एक नवरा सोडला तर खटकणारी, आनंदाची, हळवेपणाची प्रत्येक गोष्ट तिने या दूर देशीच्या मावशीला सांगितली. या पुस्तकात ही आंट तिच्या कुटुंबासह अधिक विस्ताराने येतेच आणि तिच्या कॉलेजमधल्या सहचारिणीही आपापल्या कहाण्या घेऊन येतात. प्रत्येकीचे काही ध्येय होते, काही स्वप्ने होती. इतकेच नाही, तर प्रत्येक प्राध्यापक काय शिकवित होते, त्यांचे आनंदीशी असलेले नाते यांचीही माहिती आनंदीच्या पत्रातून आणि आताच्या मेडिकल कॉलेज ऑफ पेनिसिल्वेनियाच्या दस्ताऐवज विभागातून मिळालेल्या माहितीतून उलगडत जाते. आणि खरोखर आनंदीचा काळ आणि तिचे कर्तृत्व वाचकांसमोर येतं.
लेखिका आनंदीमुळे प्रभावित झालीय पण म्हणून तिच्या चुकांकडे कानाडोळा करत नाही. कलकत्याच्या सभेत तिने उपस्थित जनसमुदायाला दिलेले, “मी माझ्या वेशभूषेत व खाण्यात बदल करणार नाही” हे वचन तिने जीवावर उदार होऊन पाळले. निदान तिने तिथल्या कपड्यांच्या सवयी अंगिकारल्या असत्या, तर थंडी शरीरात राहून राहून ती सतत आजारी पडती ना. तिला भेटणारे सगळेजण “हिंदुस्थानात बालविवाह होतात ना?” असे विचारत असत. तेव्हा तिने आपल्या भाषणात “बालविवाहच कसे चांगले असतात” असे ठासून सांगितले होते. तिच्या सामाजिक भूमिकेत हिंदुस्थानाची प्रतिमा येनकेनप्रकारेण उंचावण्याचाच यत्न जास्त दिसतो. आनंदीचा प्रबंध तिच्या वर्गातल्या इतर प्रबंधांपेक्षा सर्वात मोठा होता, आणि विषय होता: “Obestetrics Among The Aryan Hindoos”. नांव हिंदूंचे, पण ती लिहिते फक्त ब्राह्मण कुटुंबातल्या प्रसूतीशास्त्राविषयी. त्यातही, स्वत:चे असे काही मत न मांडता संस्कृत ग्रंथांचे भाषांतर, मनुस्मृतीतील वचनेच जास्त येतात. एकतर स्वत: डॉक्टर बनावे ही इच्छाच तिला तिच्या मुलाच्या अपमृत्यूमुळे निर्माण झाली होती. असे असताना विज्ञानाभिमुख झालेल्या तिच्या मनाने, पारंपारिक आर्य वैद्यकशास्त्राकडे कोणत्या दृष्टीने पाहिले , पाश्चात्य ज्ञानशाखेच्या अभ्यासानंतर तिला कोणती वेगळी दृष्टी प्राप्त झाली, हे यातून काही लेखिकेला जाणवत नाही. आणि पत्रांतून जाणवणारी चिंतनशील, अत्यंत चिकित्सक, संवेदमाक्षम, सखोल वृत्तीची आनंदी इथे हरवल्यासारखी वाटते. एक प्रश्न फक्त इथे अनुत्तरित राहतो: स्वत: डॉक्टर असूनही, अवतीभोवती इतके निष्णात शिक्षक आणि डॉक्टर  असूनही तिला क्षयाची बाधा झालेली कुठेच कुणी लिहून ठेवले नाही. खुद्द आनंदीला आपण जगू-वाचू याची आशा वाटत नव्हती. गोपाळरावांकडून मानसिक त्रास तर सतत होताच. पण ती औषधे घेत आहे किंवा नाही याचा उल्लेख कुठल्याच पत्रात नाही.

           आनंदी परत येण्यापूर्वीच तिला कोल्हापूर संस्थानात नोकरी मिळाली होती, पण त्यापूर्वीच तिचा आजार बळावल्याने सगळे मार्ग खुंटले. तिच्या मत्यूनंतर रावसाहेब भिडे आणि वैद्य मेहेंदळे यांच्याबद्दलही बरेच वाईट बोलले जात असे, पण ते कसे चुकीचे आहे याचेही ससंदर्भ विवेचन येते. आनंदीची गोष्ट जशी आनंदीच्या आधीच्या आनंदीपासून सुरू होते, तशीच ती आनंदीनंतरच्या आनंदीच्या गोष्टीने संपते. आनंदीच्या मृत्यूनंतर कोल्हापूर संस्थानच्या माहिला डॉक्टरच्या छोट्याशा ओळखीने हे पुस्तक संपते.

     पुस्तकात प्रत्येक गोष्ट अगदी विस्तृतपणे येते. हा परिचय त्यामानाने अगदी त्रोटक म्हणावा लागेल. आनंदी-गोपाळ वाचून आनंदीची फक्त गोष्ट समजते पण तिची खरी ओळख या पुस्तकातून होते. परिशिष्टातला पत्रव्यवहार, आनंदीची भाषणे, आणि तिच्यासाठी इतरांनी केलेली भाषणे, तिचा हिशेबाचा अचूकपणा, या सर्वातून तिची लोकप्रियता व तिचे  सर्वांगीण गुण दिसून येतात. पुस्तक संपता संपता लेखिकेने आंट थिओच्या पणतीकडून मिळालेला आंट- आनंदी पत्रव्यवहारावर पुस्तक लिहायचे ठरवले आहे असे लिहिलेय, आणि आता मी ते पुस्तक शोधायला आतापासूनच सुरूवात करतेय.

Wednesday, August 4, 2010

शांतारामाची कहाणी



पुस्तक : शांताराम



अनुवादक : वेलणकर अपर्णा


भाषा: मराठी


आवृत्ती: प्रथम


किंमत: 990.00


प्रकाशक: मेहता पब्लिशिंग हाऊस


 
 
काल पहाटे सहा वाजून वीस मिनिटांनी शांताराम (अर्थातच मराठी) वाचून संपवली. पुस्तकाची किंमत ९९० रू. म्हणजे कैच्या कैच. म्हणून उधारी-उसनवारीवर आणलेले पुस्तक लवकर परत देण्यासाठी अंमळ भरभरच पाने खाल्ली. हे जरी सत्य असले, तरी कादंबरीने मला खिळवून ठेवले होते हा भागही दुर्लक्षित करता येणार नाही. नेहमी हे प्रकरण झाल्यावर पुस्तक खाली ठेवू असे ठरवायचे आणि पुन्हा नवीन प्रकरण आता हे झाल्यावर नक्की बंद करू म्हणून हातात घ्यायचे. Smile




थोडक्यात कथानक: *शांताराम ही खुद्द ग्रेगरी रॉबर्टस यांच्या आयुष्यावरच आधारीत कादंबरी असल्याची चर्चा आहे. किमान त्यातला काही भाग तरी त्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे हे नक्की. कादंबरीचा नायक लीन ऑस्ट्रेलियात गुन्हेगार आहे नि हेरॉईनचा व्यसनी. ऑस्ट्रेलियात शिक्षा झालेली असताना तुरूंग फोडून तो बाहेर पडतो आणि भारत गाठतो. मुंबईत आल्यानंतर तो इथेच रहातो. इथलाच टॅक्सी ड्रायव्हर प्रभाकर त्याला मुंबईचे खरे स्वरूप दाखवतो. प्रभाकरच त्याला धारावीत राहायला घर मिळवून देतो. त्याला सहा महिने स्वत:च्या गांवी घेऊन जातो. तिथे राहून लीन मराठी शिकतो. झोपडपट्टीत मराठीअरोबरच हिंदीही शिकतो. इथल्या वातावरणाशी लीन समरस होऊन जातो. मधल्या काळात कार्लाशी त्याचे प्रेम जमते. पण अनेक उपकथानकांचा प्रवास करून आणि अनेक वळणे येऊनही लीनची गाडी पुन्हा गुन्हेगारी वर्तुळावरच धावू लागते. अखेरीस तो मुंबई पोलिसांच्या हाती लागतो. त्याला तुरूंगात टाकतात. तिथे त्याचा बराच छळही होतो. तिथून सुटल्यानंतर पुन्हा एकदा गुन्हेगारी वर्तुळ त्याला खुणावतो. त्यातूनच तो अफगाणिस्तानात जातो. तिथून पाकिस्तान पुन्हा मुंबई आणि मग श्रीलंका हा सगळा प्रवास गुन्हेगारी पायवाटेवरच होतो. या काळात तो मुंबईच्या तत्कालीन माफियांच्या संपर्कात असतो. या काळात तो बनावट पारपोर्ट तयार करणे, सोन्याचे स्मगलिंग, परकीय चलनाचा काळाबाजार, चित्रपट सृष्टीत एक्स्ट्रा म्हणून फॊरेनर्स मिळवून देणे या सगळ्या गोष्टी करत असतो.



पुस्तकाची सुरूवात ग्रेगरीच्या मनोगताने होते.त्याला भारतीय भाषांत मराठीत सर्वप्रथम अनुवाद झाल्याबद्दल आनंद आहे. त्याला मराठी येते हे त्याने सर्वत्र नमूद केलंय. तो पोलिसांसोबत मुद्दाम मराठीत बोलतो, प्रभाकरच्या आईशी मराठीत बोलतो. आणि म्हणूनच जेव्हा कादंबरीचे मराठी संस्करण निघत होते, तेव्हा तो अनुवाद मराठीशी इमान राखणारा असावा असेच त्याला वाटत होते. अनुवादकर्तीचे पाणी जोखताना तो एक मित्र दुसया मित्राशी मराठीत कसे बोलेल हा प्रश्न अपर्णाबाईंना विचारतो.. आणि अपेक्षित ’भ, म’ काराची भाषा आल्यावर त्याला खात्री पटली की या बाई नुसते भाषांतर करणार नाहीत, तर त्याला छान मराठी रूपडं बहाल करतील.



पुस्तक वाचण्यापूर्वी त्याबद्दल बरंच वाचलं/ऐकलं होते. काही लोकांच्या मते, स्वत: रॉबिन हूड असल्याच्या थाटात तो मुंबईत केलेल्या कारनाम्यांच्या कथा सांगत राहतो. असे असताना मुद्दाम जाऊन आपण आपल्याच देशाची निंदा का वाचायची हा एक सूर त्यात होता. एका प्रसंगात लीन डिडिअर नावाच्या एका माणसाला तू मुंबईत का राहतोस असे विचारल्यावर,

“मी गुन्हेगार आहे, ज्यू आहे, गे आहे आणि ड्रग अ‍ॅडिक्ट आहे. जगातले दुसरे असे कोणते शहर आहे की जिथे मला या चारही गोष्टींसह स्वीकारले जाईल, आणि मला स्वतंत्रपणे जगता येईल?”

असे तो मित्र उत्तर देतो. क्षणभर वाटलं, हीच का भारताची/मुंबईची आंतरराष्ट्रीय/गुन्हेगारी जगतात ओळख??? कुणीही यावे, कसाही कायदा मोडावा, पैसे चारावेत आणि कामे करून/करवून घ्यावीत!!!! पण जेव्हा जेव्हा अशी तुलना करायची वेळ येते, तेव्हा तो लगेच ऑस्ट्रेलियातले संदर्भ देऊन फक्त भारतातच बेजबाबदारपणा आणि भ्रष्ट्राचार चालतो असे नाही हे सांगतो. मुंबईत हे सगळे चालू शकते कारण इथले लोक मेंदूपेक्षा हृदयाने विचार करतात, जीव लावतात, जीवाला जीव देतात. त्यामुळे तो मुंबईची निंदा करतोय असे वाटत नाही. इथल्या घाणीचे, भ्रष्टाचाराचे वर्णन आहे. पण प्रत्येक ठिकाणी एकदा जीव लावला की लोक कसे मागेपुढे न पाहता मदतीला तयार होतात हेच तो सांगत राहतो.. या भारतीय मर्मानंच त्याला इथे खिळवून ठेवलं.. जिथे जिथे जागा मिळेल तिथे तो भारतीय लोकांच्या या मनोवृत्तीचे कौतुक करत राह्तो. मग ती धारावीतली झोपडपट्टी असो किंवा गोव्यात त्याला भेटलेला खाणावळवाला.



पुस्तक वाचता वाचताच कुणीतरी सांगितले होते की त्याची टीव्हीवर मराठीत मुलाखत दाखवली होती. थोडी उत्सुकता होतीच, की तो कसा बोलत असेल? म्हणून यूट्यूब वर व्हिडिओज शोधले. जस्ट पूजा या कार्यक्रमात पूजा बेदीने घेतलेल्या मुलाखती सापडल्या. त्याच पाहिल्या कारण त्यात तो मराठी/हिंदी बोलण्याची शक्यता अधिक होती. तो म्हणतो की हिंदी/मराठी बोलण्याची गेल्या १४ वर्षात सवय राहिली नाही. पण तरीही तो मधून मधून जे काही बोलला, त्यात सफाई होती. “तुज्ये नांव काय??? तू कोण?” विचारल्यावर त्याने एकाला, “माज्यं नांव? माज्यं नांव शांताराम हाय. मी तुज्या दुष्मन हाय” असे त्याने सांगितल्याची आठवण त्याने सांगितलीय. यावर तो समोरचा त्याला, “च्यांगलं च्यांगलं.. लय लय च्यांगलं” असेही म्हणाला म्हणे. हे बोलताना तो शब्दांशी झगडतोय असेही नाही वाटले. निदान त्या मुलाखत घेणार्‍या पूजा बेदी पेक्षातरी त्याचे उच्चार नक्कीच चांगले होते. मुलाखतीत पुढे जाऊन त्याने कादंबरीत नाट्यमयता आणण्यासाठी बरेच नवीन संदर्भ, कहाण्या घुसडल्या आहेत असेही सांगितले. उदा. कादंबरीत उल्लेखलेला ’सपना’ असा कुणी अस्तित्वात नव्हता, कादंबरीची नायिका ’कार्ला’ अशीही कुणी व्यक्ती अस्तित्वात नव्हती परंतु, त्याला प्रेम वाटेल अशा बर्‍याच मुली त्याला भेटल्या होत्या आणि ही कार्ला म्हणजे त्यांचेच एक रूप. पण इतर गोष्टी, जसे महाराष्ट्रातील एका वीज/पाणी सारखी सुविधा नसणार्‍या खेड्यात तो सहा महिने राहिला होता, तो माफियांसोबत अफगाणिस्तानला गेला, उर्दू नि पश्तूही चिकला, त्याला अरेबिक लिपी येते हे सगळे खरे आहे असेही त्याने सांगितले. मुलाखत मी पुस्तक वाचून झाल्यावर पाहिली, तरी मला कादंबरी अगदीच अतर्क्य, फिल्मी छापाची वाटली नाही.



मूळ पुस्तक चांगले की अनुवाद? खरेतर हे उत्तर प्रत्येक पुस्तकासाठी सापेक्ष असू शकते. मी दा विंची मूळ इंग्रजीतून वाचले, त्यानंतर मला मराठी पुस्तक हातात देखील धरवले नाही. चित्रपट पाहिला, पण त्यात मूळ पुस्तकाचे गारूड जाणवलं नाही. या अनुवादाबद्दल बोलायचे तर, अपर्णा वेलणकरांचे अनुवाद मला आवडतात. हे पुस्तकही नुसता शब्दश: अनुवाद व्यक्त करत नाही, तर त्यातून वेगळा असा आशयही सांगते. अपर्णाबाईंनी ग्रेग्ररीला मराठीतून काय म्हणायचे असेल, हे अगदी शेलके आणि मराठी शब्द वापरून लिहिलेय. पण तरीही मध्येच मराठीत लिहिलेली इंग्रजी वाक्ये खटकतात.. निखिल म्हणतो तसे मूळ पुस्तकात इंग्रजी संवादात मध्येच हिंदी/मराठीत बोललेली वाक्ये मूळ त्याच भाषांत येतात, तो बाज सांभाळण्यासाठी तिने ते केलेले असेलही कदाचित. पण असे इंग्रजी मराठीत वाचणं मला व्यक्तिश: आवडत नाही.

पुस्तकाच्या एकूण प्रभावाबद्दल सांगायचं तर, मी पहिल्यांदाच वाचलं, त्यामुळे मला हे पुस्तक आवडलं. आवडलं यासाठी कारण त्यात एक परदेशी माणूस भारतात येतो. खुशाल इथे राहतो, जिथे पाऊल ठेवण्याची मी स्वप्नातही कल्पना करणार नाही अशा झोपडपट्टीत राहतो, भारतातल्या भारतातच आपण स्वत:भोवती भाषा-प्रदेशाची बंधने घालून घेतो.. तर हा बिन्धास्त त्या आत्मसात करतो. मला स्वत:ला हे कथन म्हणजे काही स्वत:ला रॊबिनहूड समजून केलेले लेखन असे नाही वाटले. एकंदरीत सगळे अनुभव त्याने चांगले मांडले आहेत. मात्र पुढच्या वेळेस वाचायला पुस्तक तितकेच इंटरेस्टिंग नाही राहणार. त्यामुळे वन टाईम रीडींगसाठी ठीक आहे.. आणि स्वत: खरेदी करून तर अगदी नो नो कॆटेगरीमध्ये.



* सदर मजकुर भाग वेबदुनियाच्या एका पानावरून उचलला आहे.
अधिक चर्चा आपण पुस्ताक्विश्ववर पाहू शकता.

Thursday, July 1, 2010

स्मृतीचित्रे: माझ्या नजरेतून!!!

एका वर्षी शाळेत एकदमच रमाबाई रानडे नि लक्ष्मीबाई टिळ्कांच्या शिक्षणावर दोन धडे होते.. त्यात त्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांना शिकवणार्‍यांचे नि मदत करणार्‍यांचे काय 'हाल' झाले होते याचं खुसखुशीत वर्णन दोघींनीही केलं होतं.. रमाबाईंचे शिकणे म्हणजे जुलुमाचा रामराम.. तर लक्ष्मीबाईंचे शिकण्याची सुरूवातच मुळी, "शब्द म्हणजे काय?", या प्रश्नाला "शब्द म्हणजे शब्द" या उत्तराने,  नि आणलेल्या पुस्तकांची होळी करण्यानेच झाली.. तसे आम्ही स्वतःची पुस्तकं सोडून अवांतरात जास्त रमणारी माणसं.. त्यातूनच एकदा बहिणीचे अकरा-बारावीचे पुस्तक वाचत होते.. त्यातही लक्ष्मीबाईंचा लेख होता.. हा मात्र आधी सारखा विनोदी नाही, तर त्यांना होणारा सासुरवास नि नवर्‍याचे धर्मांतर याबद्दल होता. स्मृतीचित्रे वाचायचं तेव्हाच मनात नक्की झालं होतं.. पण योग मात्र आता जुळून आला..



पुस्तक तसे लिहिलंय खूप वर्षांपूर्वी.. हा मुख्यतः १८६० ते १९२० चा कालखंड आहे.. पहिली आवृत्ती १५ डिसें १९३४ ची आहे.. तरी मराठी पुष्कळशी सोपी (पक्षी: बाळबोध) आहे.. तसे आत्मचरित्रच आहे पण जाता जाता त्या त्यांना समजतील तशा सामाजिक घडामोडींचेही वर्णन करायला विसरत नाहीत.सगळे प्रसंग वर्णन तटस्थपणे समोर येतात... तेही काहीशा त्यावेळच्या टिपीकल बायकी पद्धतीने.. म्हणजे... प्रसंगांचे फक्त वर्णन.. त्यावर स्वतःची टिप्पणी तशी कमीच.. नाहीतरी त्या काळी स्त्रियांना स्वतःची मते असावीत असे फार थोड्या जणांनाच वाटायचं ना!!! 'बाईने कसे घर, घरातील माणसं यांना सांभाळून राहावं', हे त्या म्हणत नाहीत.. पण पानोपानी तसे ते जाणवतं मात्र!! पण कशावर शेरा मारत नाहीत याचा अर्थ मनातून काही वाटत नाही असा नसतो हे वाचताना पुढे लक्षात येत राहातं.



लहानपणीचा बाबांचा विक्षिप्त स्वभाव.. लग्न झाल्यावर पळून जाणारा नवरा.. नि मग असावे तितके तर्‍हेवाईक नि कर्मठ सासरे.. यांच्याबद्दल त्या लिहितात, पण यांतले कुणी चुकीचे वागलं असं कुठेच येत नाही.. अगदी टिळकांनी धर्मांतर केलं, तेव्हासुद्धा... त्या रडतात.. आजारी पडतात.. तरीही नाहीच.. उलट स्वतःच्या सततच्या आजारपणाचा उल्लेख त्या लोळणफुगडी म्हणून करून जणू काही तो एक खेळच की काय असे म्हणून उडवून लावतात..



टिळकांचे राहाणं तसे बेभरवशाचं.. कधीही या.. न सांगता कुठेही जा.. पैशाची विवंचना तर कायमची पुजलेली.. अशा वेळी पै-पाहुण्यांच्यात येजा करायची, नवरा एखाद्या कार्याला जात नाही.. पण म्हणून बायकोला जाणं थोडंच चुकतं! अशा वेळी आपण लंकेची पार्वती नि ते कफल्लक शंकर म्हणून त्यांना रडू येतं पण लगेच शंकर-पार्वतीच्या कथा आठवून हसूपण येतं.. जे आहे, जसे आहे, ते त्या अगदी प्रांजळपणे कबूल करतात.. नि परिस्थितीने त्यांची थट्टा करण्याऐवजी त्याच परिस्थितीवर विनोद करतात.. वरचे लोळणफुगडीचे उदाहरण तर आहेच.. आणि भरीस भर म्हणून त्यांना हसू फार येत असे.. त्यामुळे अगदी कडाक्याच्या भांडणं पण त्यामुळं मजेदार होतात.. हेच पाहा ना आता:



"टिळकाबरोबर सोंगटय़ा खेळताना त्यांची सरशी होऊ लागली की मला हसू लोटायचे व मी हसू लागले की, टिळक चिडायचे. एकदा टिळकांच्या रागाचा पारा चढल्या. सोंगटय़ा, पट, फांसे थर थर कापू लागली. काहींनी खालील गटाराचा आश्रय केला. घातलेले बिछाने सैरावैरा धावू लागले. सगळ्या सामानाने बंड पुकारले. जागच्या जागी काही राहिले असेल तर ते फक्त बायको व दिवा! प्रकरण इतके हातघाईवर आले की शेवटी दिव्यानेही राम म्हटले. आगपेटी केव्हाच पासोडीचा आसरा करून बिछान्याच्या ढिगाऱ्यात तोंड लपवून बसली होती. तरी मला वाटत होती गंमत. मी आणखी जोरजोराने हसू लागले. आता त्या युद्धकांडातील शेवटला भाग! जिन्याला नव्हते दार! टिळकांनी मला अंधारात लोटले. मी जिन्यातून ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ करीत खाली तबकडीत येऊन पडले. टिळकांचा राग मावळला व माझे हास्य पळाले. टिळक घाबऱ्या घाबऱ्या आगपेटी शोधू लागले. ती सापडेना. शेवटी अंधारातच चाचपडतते खाली आले व मला उठवून वर घेऊन गेले- विद्यानंदाचे वेळी मला तो सातवा महिना होता."


हे वाचून कुणाला वाटेल की इथे रणकंदन माजले होते??



विद्यानंद.. त्यांचा पहिला मुलगा.. फार काळ तो नाही जगला.. खरंतर त्यांना मुलांची खूप आवड.. त्यांना मुले झाली, नाही असे नाही.. पण त्यातला दत्तू हा मुलगा सोडला तर विशेष कुणाला जास्त आयुष्य लाभले नाही.. पोटच्या मुलांचे मृत्यू तर त्यांनी सहन केलेच, पण टिळकांच्या ख्रिस्ती होण्यामुळे त्यांच्या पारंपरिक, पापभिरू मनावर झालेला आघात मात्र चांगलाच होता. इतका की, जीव देण्याचा विचारही त्यांनी केला होता.. पण शेवटी ख्रिस्ती झाला तर झाला.. पण नवर्‍याची ख्याली खुशाली तर कळाली, म्हणून स्वतःचीच समजूत घालून घेतात..



टिळकांनी धर्म बदलला तरी लक्ष्मीबाईंनी बदलला नव्हता.. पण त्या काळात धर्म बदलणे ही लहान गोष्ट तर खचितच नव्हती.. अशावेळी त्यांचे शुद्धीकरण करून परत धर्मात घेण्याचे प्रयत्न झाले नसतील तर नवलच!!! पण टिळक आपल्या निर्णयावर अटळ होते. परिणाम व्हायचा तोच झाला.. समाजाने त्यांना एका अर्थाने वाळीत टाकले. भाड्याने राहण्यासाठी घर , एवढेच काय पण धुण्याभांड्याला बाई पण मिळेना.. हद्द म्हणजे एका घरमालकाने त्यांना घरातलं शौचालयही वापरू नाही दिले.. यावर त्या "तेही जणू कर्मठ झाले होते" असा मार्मिक शेरा मारतात.. नि नवीन बिर्‍हाड शोधायला सज्ज होतात.. हेच खरं कर्तृत्व!!!



दरवेळी टिळकांनी संसार उधळून टाकायचा, लक्ष्मीबाईंनी काडी काडी करून जमवलेल्या चीजवस्तू त्यांनी लोकांमध्ये वाटून टाकायच्या व लक्ष्मीबाईंनी पुन्हा नव्या जोमाने संसार उभा करायचा.. हे अगदी टिळकांच्या मृत्यूपर्यंत चाललं.. पण तरीही त्या सगळे तितक्याच जोमाने नि मनापासून करत राहिल्या.. एक मात्र आहे, जरी त्यांनी स्वतःचे थेट मत देणं टाळलंय, पण योग्य तिथे ते वागण्यातून ते दाखवूनही दिलंय. "क्रियेवीण वाचाळता...." व्यर्थच याचा योग्य वस्तुपाठ!!! नाहीतर केवळ टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला म्हणून त्यामागोमाग त्याही ख्रिस्ती झाल्या, असे घडले नाही तर नातेवाईकांकडे आश्रित म्हणून जगण्यापेक्षा ख्रिस्ती झालेल्या नवर्‍याची अवहेलना ऐकण्यापेक्षा त्यांनी आपले वेगळे बिर्‍हाड थाटणे पसंत केले. आणि पुढे ख्रिस्ती धर्मातील तत्त्वे पटल्यानंतरच अगदी डोळसपणे त्यांनी त्या धर्माचा स्वीकार केला. स्वयंनिर्णयाचा यापेक्षा दुसरा कोणता पुरावा असू शकेल? टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांचे काम पुढे नेणाऱ्या लक्ष्मीबाईंचे ‘टिळकांच्या अस्थी पेटीत जाताच माझे अस्तित्व जाणवू लागले’ हे उद्गारही त्याच दृष्टीने अर्थपूर्ण होत.



वास्तविकतः त्यांनी रूढार्थाने कसलेही शिक्षण घेतले नव्हते.. नवर्‍याने शिकवले म्हणून त्या मराठी लिहायला वाचायला शिकल्या.. नि जसजशी गरज पडत गेली तशतशा नवीन गोष्टीही शिकत गेल्या.. मग त्यात अगदी उतारवयात मेट्रनची नोकरी करताना शिकलेले इंग्रजी असो वा कराचीला जाऊन तिथली जीवनपद्धती अंगीकारणं असो. आयुष्यातले प्रसंग त्या लिहित तर होत्याच आणि त्या कविताही करत होत्या.. बर्‍याचजणांना या कविता टिळच करत असे वाट्त असे!!!!(हे वाचताना मला सुनीताबाई आणि पुलंचा अवघड वळणात गाडी अडकण्याचा प्रसंग आठवला.. Sealed असो.) आत्मचरित्रातल्या प्रसंगांचे वर्णन वाचताना "मी नाही हो अशी" असा सूरही कुठे जाणवत नाही.. बहुतेक सारे दु:खाचे प्रसंगांचे वर्णन त्या विनोदाने करतात.. मात्र तो कुठे बोचत नाही वा अंगावरही येत नाही.. त्यामुळेच पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेले "प्रसन्न आणि गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल" हे वाक्यही तितकेच सार्थ ठरते.. पुस्तकात इंग्रजी शब्दांचा वापर अनेक ठिकाणी अगदी लीलया झाला आहे.. (माझी आजीही या काळात इतके इंग्रजी शब्द वापरत नाही!!) नि कुठे कुठे त्या शब्दांना छान मराठी रूपडंही बहाल केलंय.. उदा. व्ही.पी चे अनेकवचन.. व्हीप्या!!! Smile



कदाचित त्यांचे हे सगळे लेखनसामर्थ्य पाहूनच आचार्य अत्र्यांनी त्यांना साहित्यलक्ष्मी पदवी बहाल केली असेल..



या वरती आणखी चर्चा इथे...

Monday, June 28, 2010

कभी तनहाईयोंमें यूं!!!!

मघाशी चॅनेल सर्फ करता करता एका ठिकाणी थांबले.. “तुम अपना रंज-ओ-गम” लागले होते.. मला आठवली माझ्या कलेक्शनमधली पहिली कॅसेट... ओल्ड इज गोल्ड.. त्यातली सगळीच गाणी तेव्हा  माझ्यासाठी नवीन होती.

आठवीत असण्याच्या वयात हे गाणे पहिल्यांदा ऐकले.. तेव्हा अर्थ तेवढासा कळला नाही.. तरी गाणं मनाच्या कुठल्याशा कप्प्यात राहून गेलं होतं कुठेतरी... नंतर कधीतरी झी टीव्हीवर दुपारी मूव्ही लागला होता “शगुन”. मला यातली बहुतेक सगळी गाणी माहित होती.. तसेही घरचे सगळेजण अतिशय बोअर मूव्ही त्यातल्या फक्त गाण्यांसाठी पाहण्याच्या माझ्या सवयीला वैतागलेले असायचे.. नशीबाने तो मूव्ही दुपारीच लागला होता. अतिशय संथपणे कथा चालली होती..आणि गाण्याची पार्श्वभूमी कळाली. आधी प्रेमत्रिकोण आणि मग तिला कळतं की ती ज्याच्यावर प्रेम करते, तोच दुसर्‍याच कुणाचा आहे.. आणि तिच्या मनातले भाव हे गाणं सांगू लागतं!!




तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो
तुम्हें उनकी कसम ये दुख ये हैरानी मुज़े दे दो..


नाहीतरी तसेही तुझ्यासाठी मी महत्वाची नाहीच आहे. तुझ्या प्रेमाचे काही क्षणही माझ्या नशीबात नाही आहेत.. मग तुझे दु:ख माझ्या वाट्याला आले तर तसे तुला दु:ख होण्याचे काहीच कारण नाही.

ये माना मैं किसी काबिल नहीं हूं इन निगाहोंमे
बुरा क्या है अगर ये दुख ये हैरानी मुज़े दे दो


प्रेम म्हणे सगळे शिकवते.. पण इथे तर प्रेमातली हार तिला बरेच काही शिकवून गेलीय. तो जिथे असेल तिथे सुखात असावा नि त्यावर कोणतंही संकट येऊ नये यापरती दुसरी कुठलीच भावना तिच्या मनाला स्पर्शत नाही..

मैं देखूं तो सही दुनिया तुम्हें कैसे सताती हैं
कोई इनके लिए अपनी निगेबानी मुझे दे दो


उर्मिला म्हणे लक्ष्मणासाठी चौदा वर्षे त्याची तहानभूक नि झोपही वागवत राहिली. आज भाऊ असावा तर लक्ष्मणासारखा म्हणणारे तो चौदा वर्षे स्वत: न काही खाता व बिल्कुल विश्रांती न घेता भावाच्या कसा रक्षणार्थ उभा राहिला याचे दाखले देताना बिचार्‍या उर्मिलेला मात्र सहज विसरून जातात.. हिची अवस्थाही उर्मिलेपेक्षा काही जास्त वेगळी आहे असे नाहीए. त्याला काही होऊ नये, कुणी त्याला त्रास देऊ नये म्हणून तिला स्वत:चा वेळ, शक्ती खर्च  तर करायचीच आहे, नि बहुधा ते सगळे पुरं पडणार नाही, म्हणून तिला दुसर्‍या कुणाची ’निगेबानी’ ही हवी आहे...

ये दिल जो मैंने मांगा था मगर गैरोंने पाया था
बडी कैफ है अगर उसकी पशेमानी मुझे दे दो.


तिच्या प्रेमावर खरंतर दुसर्‍याच कुणाचा तरी हक्क आहे.. पण म्हणून ती स्वार्थापोटी आंधळी होत नाही. जे आहे ते नियतीने समोर वाढून ठेवलंय. तरीही कुठेतरी आशा आहे, आणि म्हणूनच तिला त्या दुसरीच्या ललाटीचा लेख आपल्या कपाळी हवाय. तसे झाले, तर नक्कीच तिला तिच्या स्वप्नांतला राजकुमार मिळेल..

जेव्हा जेव्हा हे गाणे ऐकते, तेव्हा तेव्हा गहिरं, निस्वार्थ प्रेम त्यातून ओथंबताना मला जाणवतं.. सारं स्वत्व, अभिमान , अहंकार त्या प्रेमापुढे गळून पडला आहे.. आणि एकच भावना उरलीय.. “तुम अपना रंजो गम अपनी परेशानी मुझे दे दो”!!!! त्या प्रेमाला माझा सलाम!!!!


प्रेम त्याग शिकवतं, सारे काही विसरून जायला लावतं. पण त्याच वेळेला जर त्या प्रेमाने विश्वासघात केला तर मात्र तडफड होते.. जीवाची तगमग होते.. आणि जनाची-मनाची पर्वा न करता सारा जीव ज्या प्रेमावर ओवाळून टाकला, त्याच प्रेमाला शाप द्यायलाही मग जीभ कचरत नाही.. माझ्या त्याच त्या कॅसेटमध्ये आणखे एक गाणं होतं, “कभी तनहाईयोंमें यूं”. स्नेहल भाट्करांचे गाणं म्ह्टलं की प्रत्येकाला आठवते तेच ते गाणं. नुसतं प्रेम करणारी व्यक्ती प्रेमभंग झाल्यावर पळभर हाय हाय म्हणेल, आणि पुन्हा जगरहाटीप्रमाणे सारे काही विसरून जाईल. पण हे उत्कट प्रेम जेव्हा होरपळून निघतं.. तेव्हा सर्व भावभावनांचा कडेलोट होतो, अणि तो कल्लोळ समोर येतो तो असा.





ये बिजली राख कर जायेगी तेरे प्यार की दुनिया
न फिर तू जी सकेगा और ना तुझको मौत आयेगी..
कभी तनहाईयोंमें यूं हमारे याद आयेगी
अधेरे छा रहे होंगे, और बिजली कांध जायेगी!!!


“न फिर तू जी सकेगा और ना तुझको मौत आयेगी..” यापरता शाप तो कोणता?? हे गाणं ऐकताना मीच नि:शब्द होते.


दोन गाणी, पण दोन टोकं आहेत.. प्रेमाची.. आणि तळतळाटाची.. पण तरीही अवीट.. नादमाधुर्याने ओथंबलेली.. आणि स्त्रीचं अंतरंग उलगडून दाखवणारी. म्हणणारे म्हणतात, तिरियाचरित्तर कोई ना जाने.. इतरांचे महित नाही.. पण या दोन गीतकारांना तरी नक्कीच कळालं होतं, असंच मी म्हणेन.

Wednesday, June 23, 2010

भ्रमाचा भोपळा!!!!


पुस्तक : बाकी शून्य 

लेखक:  वालावलकर कमलेश 

किंमत:  180.00 

प्रकाशक:  राजहंस प्रकाशन प्रा.लि.



मला न आवडलेलं पुस्तक म्हणजे : बाकी शून्य.
पुस्तकाचा विषय तसा सर्वश्रुत आहेच. एक तरूण, त्याचे लहानपण, पौगंडावस्था, कॉलेजजीवन नि नंतर उमेदवारीचे-नोकरीचे दिवस.. नि यात मालमसाला म्हणून कंटाळा, कंटाळ्याचा कंटाळा, दारू, भकाभका सिगरेट्स, मुली/बायका आणि त्यासंबंधीचे मुलांचे संभाषण, अर्वाच्य भाषा.. सतत येणारे 'झ'कार... आणि हे सगळं कमी की काय म्हणून निरर्थक तत्वज्ञान..
एखादे पुस्तक का आवडत नाही याची बरीच कारणे असू शकतात.. विषय न आवडणं, विषय आवडूनही त्याची मांडणी , सादरीकरण न आवडणं, भाषा न आवडणं!!!आता हे पुस्तक न आवडण्याचे कारण काय म्हणून सांगू??? काहीतरी तरी असायलाच पाहिजे.. तर पहिले आणि मोठे कारण म्हणजे: डोक्याला त्रास देणारे नि पानोपानी छळणारं तत्वज्ञान. पुस्तकभर 'भ', 'ल' ,'चु' आणि 'झ' काराशिवाय काही नाही.. तसे पाहायचं तर आत्मचरित्रपर पुस्तक आहे.. काही ठिकाणी विदारक, अत्यंत हेलाऊन टाकणारं आयुष्यात घडतही असेल, पण प्रत्येक वेळेस ते अशाच शब्दांत मांडायला पाहिजे असेच नाही.. या लेखकाला आपण का जगतोय, नोकरी का करायची वगैरे वगैरे आत्मपरिक्षणात्मक प्रश्न पडतात..ते तो सगळीकडे विचारत राहतो... पण ते विचार मांडून तो काय साधतो? काही नाही. नुसते प्रश्न उपस्थित करतो. बर्‍याचदा त्याला परिस्थितीपासून पळ काढायचाय (उदा. मृणालशी पहिल्यांदा संबंध येतात तो प्रसंग किंवा त्याला नवी नोकरी ऑफर केली जाते तो प्रसंग). बरे, ते विचार एका मार्गाने जातात का? ते ही नाही.. सगळ्या बाजूंनी घडलेल्या घटनेची कंटाळवाणी मीमांसा करत लेखक मध्येच कुठेतरी आपल्याला सोडून देतो. ठीक आहे, एखाद्याच्या मनात एकाच घटनेबाबत किती नि कसे कसे विचार येतात हेच जर दाखवायचेय, तर त्याला कधीतरी काहीतरी मानसिक बैठक तर असायला हवी. ते ही नाहीय. त्याच्या विचारातून त्याला स्वत:ला स्वतःपुरताही काहीही कधीही निष्कर्ष निघत नाही. तो स्वतःकडे काही कमीपणा घेत नाही.. काहीतरी चुकतेय पण तो चुकत नाही असे त्याला एकाच वेळी आणि नेहमीच वाटते. त्यामुळे ते सारे विचार भंपक , दांभिक, एकांगी, वरवरचे , बिनबुडाचे(आणखी कुणाकडे असले काही शब्द असतील तर उसने द्या रे..) वाटतात.
उदा. पुन्हा एकदा वरचाच प्रसंग. मृणालचा. असे घडून गेल्यानंतर एकतर अपराधी वाटेल किंवा जे झाले ते झाले, निभावून नेऊ असे वाटेल. पण यांचे त्यावरचे विचार(लग्न म्हणजे काय? लग्नसंस्था म्हणजे काय? मृणाल तिच्यावर संयम राखू शकली नाही... मग योनीशुचिता ती कसली... आणि परत असेच वाहात जाणारे शब्द) वाचून कुणाला जन्मात लग्न करण्याची इच्छा होईलसे वाटत नाही.. आणि निकिता की आणखी कोणाबरोबरच्या तरी संबंधानंतरचा निष्कर्ष म्हणजे सगळ्यावर कडी आहे.. "प्रत्येकाने लग्न करावे.. होता होईल तितके जोडीदारासोबत प्रामाणिक राहावे. शक्य नसेल तेव्हा प्रत्येकाने वेगळा जोडीदार शोधावा नि व्यभिचार करावा.. एकूणच काय बहु*वित्व ही समाजाची गरज आहे" हे वाचल्यानंतर मी कपाळावर हात मारून घेतला...
वरचा प्रकार म्हणजे मनात येणारे विचार. आता त्याचे इतरांसोबतचे संभाषण पाहू. त्याचे सगळेच मित्र दिसणार्‍या बायकांच्या अवयवांबद्दल बोलतात. काही नुसतेच संबंध ठेवण्याबाबत बोलतात, काहींची संबंध ठेवण्यापर्यंत मजल जाते, आणि ते त्या बायका शेअर करायलाही तयार असतात. बाकी राहिलेले संभाषण म्हणजे, उगीच अश्लाघ्य भाषेत समोरच्याला प्रश्न विचारले की तो पुढे काही बोलत नाही अशा छापाचे आहे.. असे बोलले की ऐकणाराच कानकोंडा होतो.. काही उत्तर देत नाही. मग हा असाच सारखा बोलत राहातो. उदा. त्याला मनःशांतीसाठी कुणीतरी गाईला नमस्कार करायला सांगतो.. मग हा विचारतो," ती गाय नैसर्गिक विधी करत असेल तरी करायचा का?" उत्तर हो येते. मग म्हणतो, "गायच कशाला हवी? आपल्या संस्थानाचा हत्ती फळाफळा मुतत आणि फदाफदा हगत गांवभर उंडारत असतो, त्यालाच नमस्कार करतो.." समोरचा यावर काय बोलणार, कप्पाळ? तो निश्चितच गप्प बसतो. असे झाले की मग लेखकाला कंटाळा येतो.. मग कंटाळ्याचाही कंटाळा येतो.. मग तो भसाभस सिगरेटी फुंकतो नि दारू ढोसतो.. ही जर कंटाळ्याची, दारू सिगरेटची तत्त्वज्ञानाची, भ/झ/ल/चु काराची वाक्ये पुस्तकातून काढली, तर पाचशेवीसातली दहा पानेही शिल्लक राहणार नाहीत..
स्वतःच्या देखणेपणाचं कौतुक तर सगळीकडे ओसांडून वाहतं. माणून पहिले आणि आत्यंतिक प्रेम स्वतःवरच करतो हे जरी मान्य असले तरी, किती म्हणून कौतुक ते करायचे? आणि म्हणून पुस्तकात उल्लेख केलेल्या प्रत्येक मुली/अथवा बाईला याच्याकडून शरीरसंबंधाची इच्छा असते.(यात तो पाचवीत असतानाची एक सातवीतली शेजारीण येते, त्याची चुलत की मावस अशी बहीण येते नि बाकी भेटलेल्या निराळ्याच.) एक दोघी असतील एक वेळ पटलं असतं.. पण प्रत्येकजण???? कठीण आहे. आणि हो, त्या ते बिन्धास्तपणे बोलूनही दाखवतात.. बर्‍याचजणी त्याच्याकडून ती इच्छा पूर्ण करूनही घेतात. अपवाद फक्त एकच, निशा. कारण तिच्यावर हा एकतर्फी लाईन मारत असतो आणि तिच्या खिजगणतीतही नसतो.
भाषेच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार केला. एका तरूणाच्या जीवनात काय काय घडू शकतील असे प्रसंग(काही अतिशयोक्तीपूर्ण सोडले तर) आहेत. पण कोसला पार्ट-टू म्हणण्याइतके यात काही आहे असे मात्र वाटत नाही. आणि कितीही प्रयत्न केला, तरी वरती लिहिले आहे त्या पलीकडे काही सापडत नाही.. लेखकाचा मुख्य प्रॉब्लेम काय आहे हेच कळत नाही.. कंटाळा?? बायका???? ध्येय सापडत नाही??? जग मिथ्या आहे??? जाऊ दे.. त्याचे त्यालाच माहित नाही तर मी का डोके खपऊ???
लेखकच्याच भाषेत सांगायचे झाले तर पुस्तक वाचून डोक्याची झेडझेड झाली..
(खरंतर पुस्तक वाचून माझा शब्दकोष बराच समृद्ध झाला.. या पुस्तकाबद्दल त्याच भाषेत लिहावे असेही एकवेळ वाटले होते.. पण आपण एक आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली, त्यात इथल्या वाचकांचा दोष काय , म्हणून तो विचार बाजूला ठेवला.. Smile )

Monday, June 7, 2010

नाच गं घुमा!!!

आता नक्की आठवत नाही.. पण नागपंचमीच्या आधीची कुठली तरी एक तिथी असायची.. सगळ्यांना पंचमीच्या उंच उंच झोक्याचे वेध लागलेले असायचे.. पण त्याआधीच या तिथीपासून रात्रीचे खेळ चालू व्हायचे!! संध्याकाळपासूनच गल्लीतल्या बायका एकमेकींना आठवण द्यायला लागायच्या.. "आज रात्री जेवण झाल्यावर चौकात जमायचे हं!!!" मी तर पुष्कळ लहान होते .. त्यामुळे इकडे तिकडे निरोप पोचवण्याचं काम मध्ये मध्ये लुडबुड करणार्‍या वानरसेनेकडे आपसूकच यायचं. रात्री :३०-१०:०० चा सुमार झाला की एक-एक करून बायका जमू लागत.. गल्लीत हुंब्यांचे घर अगदी चौकात.. घराला ओटाही होता.. त्यामुळे ते सगळ्यांचं जमण्याचं ठिकाण.. हुंबे आजी तशा खडूस, पण यादिवसांत त्या का कोण जाणे प्रेमळ वागायच्या.. मग जाधवांच्या दोन सुना, चव्हाणांच्या घरातल्या लेकीसुना, पाटीलकाकू, झालंच तर शेजारच्या गल्लीतल्या बायका, आम्ही शाळकरी -१० मुली, असे सगळे जमले की जो उतमात सुरू होई तो अगदी १२ वाजले तरी संपत नसे... लोळणफुगडी... बसफुगडी... कोंबडा... पिंगा.... झिम्मा...आणि बरंच काही!!! परवा शनिवारी मराठी बाणा पाहात होते.. मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झाला नि बरंच काही आठवत गेलं..

एकदा असेच नाचून नाचून थकलो होतो.. पण कुणालाच थांबावंसं वाटत नव्ह्तं. हुंबेआजी एकदम ओट्यावरून खाली उतरल्या. सगळ्याच दिलवाले मधे अमरिशपुरी नाचकामात आल्यावर थांबतात तशा थांबल्या. आजी येताना सुप घेऊनआल्या होत्या. आता या सुपाने कुणाला चोप देणार असं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच चेहर्‍यावर!!! त्या आल्या तशा रिंगणात मध्यभागी उभ्या राहिल्या नि म्हणाल्या, "म्हणा गं पोरींनो, नाच गं घुमा”. आणि काय त्या नाचल्या, यंव रेयंव!!! एका हाताने सुप धरायचं.. निमिषार्धात तो हात सोडायचा.. सूप अधांतरी राहू द्यायचं नि ते खाली यायच्या आधी दुस
र्‍या हाताने पकडायचं.. आणि हे करत करत स्वतःभोवती गोल गोल फिरायचं!!! दुसर्‍या दिवशी येताना घरोघरची सुपं बाहेर आली होती हे काय आता वेगळं सांगायला हवं???

लोळणफुगडी, बसफुगडी, साधी फुगडी नि कोंबड्याच्या स्पर्धा तर अगदी रोजच!!! आम्ही खेळणार म्हणून रस्ता अगदी चांगला झाडून, पाणी मारून तयार असायचाच. आधी जोड्या ठरत. मग एकमेकींसमोर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशी लांबलचक मांडी घालून बसायचं... दोन्ही हातानी दोन्ही अंगठे पकडायचे... डाव्या बाजूने असं कलंडायचं की पूर्ण पाठ जमिनीला लागली पाहिजे... नि मग धरलेले अंगठे सोडता, कुठल्याही आधाराशिवाय उजव्या बाजूने पूर्वस्थितीत यायचं. हे खेळताना "काठवट खणा.. सातारखाना" असले काहीतरी गाणं सुरू असायचं. हे असे हात सुटेपर्यंत चालायचं.. शेवटपर्यंत जी कुणी तग धरेल ती अर्थातच जिंकायची.. (कार्यक्रम संपवून घरी आल्या आल्या मी बेडवर हे करायचा प्रयत्न केला.. कलंडले खरी, पण उठायलाच येईना. :( मग काल हॉलमधलं सगळं फर्निचर एका बाजूला सारलं, थोडी लोळायला ऐसपैस जागा केली.. नि पुन्हा प्रयत्न केला.. हुश्श!!! जमलं एकदाचं!!! एवढी काही खूपच जड नि जाड झाले नाहीय अशी मनाची समजूतपण लगेच घालून घेतली!!!!)

बसफुगडी हे लठ्ठ लोकांचं काम नोहे. ती खेळायची म्हणजे आधी चवड्यावर बसायचं...नि एकदा उजवा पाय पुढे आणिडावा पाठीमागे, आणि दुसर्यांदा डावा पुढे नि उजवा मागे, असे वर्तुळात फिरवत राहायचे.. हात आपसूक जसे पाय हलतील तसे हलतात.. हे प्रकरण मात्र लोळणफुगडीपेक्षा अवघड!!! जास्त वेळ तग नाही धरता येत.. नेहमीची फुगडी घालताना फू बाई फू म्हणतात तसे ही फुगडी घालताना "चुईफुई" अशा सगळ्याजणी म्हणायच्या.. आम्ही मुलीमुळातच वात्रट.. आम्हाला हे चुईफुई गाणं नाही आवडायचं.. आम्ही मुद्दाम मोठ्यांदा "कुईफुई.. कुईफुई" म्हणत बसायचो.. (ही फुगडी काल एकदा घालून पाहिली.. पण कुठचे काय? दोनच मिनिटात पाय दुखायला लागले.. नि हात लढाई येत नसलेल्या शिपायासारखे अंमळ जास्तच आवेशात हलत होते.. छ्या: प्रॅक्टीस नाय राहिली!!!)

फुगडीच्या स्पर्धा म्हणजे अगदी कहर!!! गाणी म्हणून, कसंही ला , ला लावून एकमेकींची पिंग्यातून प्रेमळउणीदुणी काढून नि कमरेचे काटे ढिले करून झाले की फुगड्यांना सुरूवात व्हायची.. सगळ्यात आधी घामेजल्या ओल्या हातांना खडू/भस्म्/माती काहीतरी लावलं जायचं, नाहीतर मग ऐनवेळी हात सुटले तर तोल जाऊन पडण्याचीच शक्यता जास्त... नि वेगात असताना हात सुटले, तर कुठे जाऊन पडेल याचा नेम नाही. फुगड्यांची गाणी आता आठवत नाहीत.. पण आधीच्या हळूहळू गिरक्या लवकरच वेग घ्यायच्या.. मग नुसत्या गिरक्यांचा पण कंटाळा यायचा.. एका जोडीतली कुणीतरी अर्धवट खाली बसून जमिनीला एक पाय नि दुसरा अधांतरी ठेवून जातं घालायला लागली, की त्या संसर्गाची लागण लगेच व्हायची. . अशावेळी मग कुणाचं जातं जास्त वेळ टिकतं याची शर्यत लागायची. जातं घालता घालता फुगडी तशीच संपवणं यात काहीच नाही.. पण जात्यातून पुन्हा फुगडीसाठी उभं राहाणं हे खरं कौशल्याचे काम!!! अजूनही कधी फुगडी घालायचं म्हटलं की मी दोन्ही आणि एका पायावर सारख्याच उत्साहाने तयार असते!!!

खेळून खेळून काकू लोक दमले तरी आमचा उत्साह उतू जात असायचा.. बसलेल्या आयांच्या मागे "चला, उठा"चं टुमणं लावलं की "जा गं, कोंबडा कोंबडा खेळा" म्हणून त्या सुटवणूक करून घ्यायच्या!!! मग काय, आम्ही कानांत वारं शिरलेल्या वासरांसारखे धूम!! एक सुरवातीची नि दुसरी भोज्जाची रेष आखायची.. सुरूवातीच्या रेषेवर पायांवर पायठेऊन बसायचं.. दोन्ही हात गुडघ्यावर एकांवर एक.. नि शर्यत सुरू... मध्येच कुणी अडखळायचं.. ढोपरं फुटायची, खरचटायचं तरीही बिल्कुल रडारड करता पुन्हा कोंबड्याची पोज घेऊन शर्यत सुरूच र्हायची.. अगदीच चिल्लीपिली असतील ती सगळं झाल्यावर भ्वॉ म्हणून भोकाड पसरायची!!!

शाळकरी वयातल्या या गोष्टींची मजाच और होती!!! पंधरा दिवस हां हां म्हणता कसे निघून जायचे तेच कळायचे नाही.. दिवसभर शेतात, घरात काम करून थकलेल्या, नोकरी वरून आलेल्या बायकांना, दिवसभराचं हुंदाडणं जणू कमीच पडलेल्या आम्हा सर्वांसाठी ती पर्वणीच असायची.. कधी घराबाहेर पडणार्‍या पाटील काकू याच दिवसांत नवर्‍याशिवाय बाहेर पडत. मूल नाही म्हणून खंतावलेल्या, कधी कुणाशी बोलणार्‍या चव्हाण काकू याच दिवसांत हसताखेळताना दिसत.. नि नेहमी करवादणा
र्‍या हुंबेआजी नाचून थकलेल्या लेकीसुना आणि पोरीबाळींना मोठ्या प्रेमाने लिंबूसरबताचे ग्लासेस भरभरून देत असत.

आताशा नागपंचमीच्या वेळेस गांवी असणं खूप वर्षांत जमलं नाही. हुंबेआजी गेल्या... बरीच कुटुंबे काही कामाकारणाने गांव बदलून निघून गेली.. आणि हे आमचे छान रंगीबेरंगी दिवस चॅनेलच्या सुळसुळाटात हरवून गेले.

‍ ‍‍ ‍ ‍ ‍ ‍‍ ‍

Friday, June 4, 2010

आई.. आणि आठवणीतील गाणी!!!....३

या चटोर शब्दावरून आणखी आठवलं... शाळेत असताना नाचकामात.. म्हणजे तेच ते हो.. स्नेहसंमेलनात, हिंदी गाणी एवढी बोकाळली नव्हती तेव्हाचं म्हणतेय मी.. तेव्हा कृष्ण-राधेची गाणी चांगलीच पॉप्युलर होती.. मला लहानपणी 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे गाणं पुन्हा एकदा त्यातल्या चटोर शब्दांमुळं आवडायचं.. पण जेव्हा हे गाणं टीव्ही वर पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा कृष्ण म्हणून धुमाळांना बघून बिचार्‍या कृष्णाची कीव आली.. नंतर म्हणून त्या चटोर गाण्याच्या नि चटोर धुमाळांच्याही वाटेस गेले नाही!!!! Sad असो!!!


गणपाची मुलगी 'दिपका मांडिले तुला' ऐकून झोपते.. त्यावरून आठवलं, आमच्या घरातली आख्खी पिलावळ आईचं एक गाणं ऐकत झोपायची. अगदी भावापासून ते सध्या तीन वर्षाचा असलेल्या भाच्यापर्यंत. सगळ्या भाचरांत सर्वात जास्त लाड झाले ते मोठ्या भाचीचे.. घरातलं पहिलं बाळ!! साहजिकच डोक्यावर मिर्‍या वाटायचं.. अजूनही वाटतंच आहे..!!! भावाच्या 'दिपक' प्रकरणात तोंड दुखल्याने त्याला झोपवण्याची जबाबदारी मी कधीच घेतली नाही. पण या भाचीसमोर माझ्या निश्चयाने नांगी टाकली.. आधीच ती मला सोडून राहायची नाही.. नि झोप आल्यावर माझ्या मांडीवर डोकं ठेवून स्वतःच उंउं करत मान हलवायची.. मग कळायचं.. महाराणींना झोप आली ते!!! बाकी, हे गाणं मला माझ्या स्वतंत्र चालीत म्हणता येत नाही असं इतरांचं मत आहे.
Sad

आकाश अंगणी रांगत आला
शीण तान्हुल्या भारीच झाला
पाळण्यामध्ये बाळ झोपला
सृष्टी माऊली लागे गायला... जो बाळा जो जो रे जो!!!

निशामातेच्या अंकी निजाया
केव्हाच गेला दिवस राया
जागून जागून तापली काया
नीज रे बाळ नीज भास्करा.. जो बाळा जो जो रे जो!!!

आनंदकंदा जगतधारा
नीज सुखाने नीज वासरा
पहाट होता जाई माघारा
नीज रे बाळा नीज चंद्रमा.. जो बाळा जो जो रे जो!!!

सृष्टीमाऊली आपल्या दोन मुलांना आलटून पालटून झोपवते, ही कल्पनाच कस्सली येडू आहे. हास्य
एकदा इथे मुंबईतच एका बारशाला जायचा योग आला.. नांव ठेवले.. पाळ्णा म्हणायची वेळ आली. पण 'पहिल्या दिवशी राजदरबारी' तर सोडाच हो पण अंमळ उत्साहाने पुढे आलेल्या मंडळाची गाडी 'हलके हलके जोजवा' च्या दोन ओळींवरच अडकली... मी म्हटलं, नाहीतरी तुम्हांला काहीतरी 'जो बाळा जो जो रे जो' च हवंय ना??? मी म्हणते गाणं!!! मग कुणीतरी, 'म्हण बै. तू पण वाट मिर्‍या' म्हणायचीच खोटी होती!!
मला वाटलं, की हे गाणं कुणाला माहितही नसेल. पण कुठलं काय?? तिथल्या बर्‍याच काकवांनी पण म्हणायला सुरुवात केली.. Party नंतर कळलं, त्यांना शाळेत पाचवी-सहावीच्या पुस्तकात ही कविता होती म्हणून.. नि नंतर सगळा प्रोग्रॅम राहिला बाजूला.. नि समस्त काकूमंडळ शाळेतल्या आठवणीत असं रमलं की यंव रे यंव!!! Big smile



आणखी एक कविता होती.. बहुतेक माझ्याच पहिलीच्या पुस्तकात असावी.. आता जसे मी आणी माझा भाचा जिंगल टून्समधली उंदराच्या टोपीची गोष्ट, 'हे काय आहे? असेल रूमाल!!!! ओहो.. आहा येईल धमाल" असं तालासुरात म्हणतो, तसे तेव्हा मी आणी आई ही कविता म्हणत असू.

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना!!!!!

या गाण्यात कधी मी चिमणी असे, तर कधी आई चिमणीची भूमिका करे. पण मग मला कावळेदादा, कपिलामावशी, पोपट्दादा व्हावं लागे. नि ते मला मुळीच नाही आवडायचं. मग आई मी काही ऐकेना म्हणजे 'आता तुला चिमणी होऊ देणार नाही' अशी धमकी द्यायची!!!


अजूनही पुष्कळशी गाणी आहेत.. मनाच्या कुपीत दडलेली... अशीच कधीतरी इच्छा होईल.. मी परत येईन एकदा आठवणींचा आणि गाण्यांचा खजिना घेऊन !!!

Thursday, June 3, 2010

चाँद तनहा है..

एके काळी मस्त लाईफ होती.. रोज संध्याका़ळी लायब्ररीत जाऊन नवीन पुस्तक आणायचं.. येईल तसा स्वयंपाक पक्षी: माझ्या नि फ्लॅटमेटच्या पोटावर प्रयोग करणारं काहीतरी बनवायचं.. ती आली की जेवायचं.. त्यानंतरच्याआवराआवरीचं आणि सास-बहू सिरियल पाहाण्याचं काम तिचं!! नि मी पळायचे माझ्या बेडरूममध्ये.. हातात पुस्तक.. नि सोबतीला.. विन ९४. वरचं खनक विथ रोशन अब्बास!!!! मस्त गाणी लागायची.. एक वाजेपर्यंत पुस्तक वाचूनसंपायचं आणि मी दुसर्या दिवशी नवीन पुस्तक आणायला सज्ज व्हायचे.. (रोज मला कुठलं पुस्तक द्यायचं म्हणूनतिथले लोक बिचारे वैतागले होते).

खनक आम्हा बर्याच जणांचा आवडता कार्यक्रम!! त्यात गुरूवारी रोशनऐवजी कुणीतरी यायचं.. एकदा अमीन सयानीहोस्ट होते.. नि त्यांनी त्यांच्या त्या टिपिकल आवाजात ओळख करून दिली..मीनाकुमारीने स्वतः लिहिलेल्या निस्वतःच गायलेल्या गझलांची.... नि वानगीदाखल ऐकवली तिची एक गझल.. "चाँद तनहा है.. आसमाँ तनहा!!!"

‍ ‍ माहित नाही ऐकताना नक्की काय वाटलं!!! पण त्या दिवशी पुस्तक पूर्ण नाही झालं.. :( नंतर ते गाणं शोधायचा खूपप्रयत्न केला.. खूप दिवसांनी असेच एकदा यूट्यूबवर Meena kuMaari : I write I recite या नावाने तो पूर्ण अल्बम मिळाला!!! :D





मीनाकुमारी.. शोकांतिकांची नायिका!!! तिच्या खाजगी आयुष्याबद्दल बरंच छापून यायचं.. अजूनही कधी कधी येतं.. मला ती खूप आवडायची असे काही नाही.. पण कधी नावडलीही नाही.. तिचा तो खर्जातला आवाज नि आपके पाँव जमींपर मत रखिए हे मात्र चांगलंच लक्षात आहे!!!! तिची ही गझल ऐकताच मनात एक घर करून गेली.. का? ठाऊक नाही.. कदाचित तिने ज्या परिस्थितीत लिहिलं असावं हे माहित असल्यामुळे जास्त दर्दभरं वाटलं..,तिच्या आवाजात जास्त दर्द आहे....., की शब्दांत जास्त दु: सामावलंय आहेत हे नाही मला सांगता यायचं..!!! पण एक मात्र खरं.. की एकाकीपणाचं दु: काय असू शकतं याचं हे सार्थ वर्णन ठरावं..




हापिसात यूट्यूब बॅन असणार्यांसाठी शब्दरचना येथे देतेयः

चांद तनहा है आसमां तनहा
दिल मिला है कहां कहां तनहा॥

जिंदगी क्या इसी को कहते हैं
जिस् तनहा है और जाँ तनहा॥

‍‍‍(जिथे काया आणि आत्मा देखील परक्यासारखे वागतात.. तिथे इतरांबद्दल काय बोलावं!!!! मी तरी इथं अगदी नि:शब्द!!)

हमसफर कोई गर मिले भी कहीं
दोनों चलते रहे तनहा तनहा॥

जलती बुझती सी रोशनी के परे
सिमटा सिमटा सा इक मकां तनहा॥

राह देखा करेगा सदियों तक
छोड़ जायेंगे ये जहां तनहा!!!


या गझलेच्या शेवटच्या ओळी मला "ये क्या जगह है दोस्तों" ची आठवण करून देतात.. भलामोठ्या आरशात स्वतःला पाहात उभी असलेली एकाकी रेखा.. नि "मेरे लिए भी क्या होई उदास बेकरार है" हा प्रश्न!!!! :(