आनंदी. बर्याच दिवसांपासून माझ्या मनावर गारूड करून आहे. किंबहुना, तीच नाही, तर त्या काळात ज्या स्त्रिया शिकल्या, चाकोरीबाहेर जाऊन वेगळे काही करू शकल्या, त्या सर्वांबद्दलच माझ्या मनात एक मोठे कुतुहल आहे. आजच्या काळात शिकणे वा परदेशात जाणं काहीच अवघड नाही. परंतु घराबाहेर पडण्याची बंदी असलेल्या काळात या स्त्रिया त्यांच्या काळातील लोकांपेक्षा चार पिढ्या पुढेच होत्या. मला प्रश्न आहेत ते: यांना शिकावे असे मुळातून का वाटलं? त्यासाठी विरोध पत्करायची आणि सहन करण्याची आंतरिक शक्ती यांना कशी मिळाली? त्या एकट्या होत्या की सुदैवाने काही मदतही मिळाली? त्रास झाला हे खरे, पण तो नक्की कसा आणि कुणाकुणाकडून? त्यावेळेस समाजात काय स्थित्यंतरे घडत होती? असा प्रयत्न करणार्या याच पहिल्या स्त्रिया होत्या, की अजून काही अपेशी जीव होते?..... प्रश्नावली तर काही थांबतच नाही.. मी शोधून शोधून आनंदी-गोपाळ मिळवलं आणि वाचलं. एकदा वाचले, आणि वाटले की आपल्याला आनंदी कळाली. पण नंतर काहीतरी निसटून जातंय, काहीतरी राहून जातं आहे असे वाटत होते. ती फक्त जीवनकहाणी होती. एक गोष्ट सांगितल्यासारखी. पण त्यात आनंदीचे स्वत:चे असे काहीच दिसत नव्हतं. तिचं अंतरंग, विचार, ज्ञान यांची प्रगल्भता दिसत नव्हती. ती फिलाल्डेफियाला जाऊन नक्की काय शिकली? तिला क्षय होऊन ती अवघ्या बावीसाव्या वर्षी वारली. स्वत: एक डॉक्टर असताना, एका मेडिकल कॉलेजात शिकत असताना तिच्या रोगाचे निदान कुणालाच कसे झाले नाही? आनंदी मला भेटूनही पुन्हा परकी झाली होती.
अशातच गेल्या आठवड्यात माझी सततचीआनंदी-आनंदीची भुणभुण ऐकून माझ्या मैत्रिणीने वाचनालयात ’डॉ. आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व’ हे पुस्तक दिसल्या दिसल्या उचलले. आणि प्रस्तावनेतच कळाले की मला हवे असलेले पुस्तक ते हेच होते!! आणि भारल्यासारखी एकामागून एक प्रकरणं कशी संपली हे कळालेच नाही. लेखिका अंजली किर्तने यांनी आनंदीवर जवळजवळ सहा –सात वर्षे संशोधन केले. मला पडलेले, किंबहुना त्याहून जास्त प्रश्न त्यांना पडले होते, आणि एक प्रश्न सोडता सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी मिळवली असे म्हणायला हरकत नाही. आनंदीबाई निवर्तल्यानंतरच्या एकाच वर्षात त्यांच्या जीवनावर दोन चरित्रे लिहिली गेली. एक होते काशीबाई कानिटकरांचे आणि दुसरे कॅरोलीन डॉल यांनी लिहिलेले. काशीबाई आनंदीच्या समकालीन, त्यांना नवर्याने लिहावाचायला शिकवले. हरिभाऊ आपटे त्यांचे स्नेही. त्या आनंदीला कधी भेटल्या नाहीत, मात्र गोपाळरावांना त्या भेटल्या. किंबहुना त्यांना बरीचशी माहिती गोपाळरावांकडूनच मिळाली. कॅरोलीन ही आनंदीहून बरीच मोठी होती. ती आनंदीला अमेरिकेत भेटली. प्रथम दर्शनी तिला आनंदीमध्ये काही विशेष जाणवले नाही पण नंतर तिच्या बुद्धीमत्तेची चमक पाहून तीही थक्क झाली होती. आनंदी जात्याच सोशीक असल्याने आणि मुलीच्या जातीने काय काय करू नये याची शिकवण लहानपणापासून असल्याने ती नवरा हा विषय सोडून कॅरोलीनकडे पुष्कळ बोललेली दिसते. त्यामुळे काहीप्रमाणात का होईना, पण आनंदीच्या मनातली स्पंदने तिच्याप्रमाणात पोचली होती, असे म्हणायला हरकत नाही. पण हेही आहे की, तिला काही गोष्टी गवसल्या नाहीत आणि काशीबाईंनी लिहिलेले चरित्र गोपाळरावांच्या सांगण्यावरून लिहिलेले म्हणूनही आणि त्यानी चरित्राच्या दुसर्या आवृत्तीत काटछाट करताना त्यात काही महत्वाच्या संदर्भही उडवून लावल्याने परिपूर्ण नव्हते. त्यामुळे आणखी खोलवर जाऊन सत्यासत्यतेची पाळंमुळं शोधण्याचे काम कुणीतरी करायला हवेच होते, आणि ते या कीर्तनेबाईंनी केलंय.
पुस्तकाची सुरूवातच मुळात १९व्या शतकातला हिंदुस्तान आणि शिक्षण याच्या तपशीलाने होते. आपले तेव्हाचे ज्ञान हे जातीव्यवस्थेवर आधारलेल्या शिक्षणपद्धतीवर मिळायचे. तेव्हा एतद्देशीयांनी आणि काही ख्रिस्ती मिशनर्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ते लोकाभिमुख कसे झाले याचा इतिहास वाचण्यासारखा आहे. पुरूष शिक्षण, त्यानंतर स्त्रिशिक्षण आणि त्याकाळातले वैद्यकिय शिक्षण हे देखील बरेचसे झगडून मिळवावे लागले. तो झगडा नुसताच रूढीपरंपरांशी नव्हता तर इथल्या राजवटीशीही होता. स्त्रिशिक्षणात काय अडचणी आल्या असाव्यात हे मी नव्याने सांगायला नको. पण जेव्हा आपल्या फायद्यासाठी हा होईना, पण जेव्हा वैद्यकिय महाविद्यालये इथे निघाली, तेव्हा इंग्रज, अमेरिकन मिशनरी आणि नेटिव्ह हा भेदाभेद केला गेलाच. उदा. त्यांना शस्त्रक्रिया व शवविच्छेदनाचा थेट अनुभव न देता शेळीवरती प्रयोग करणे, अथवा एम. बी. बी. एस. ची पदवी न देता लिटरेचर इन मेडिसीन ही हलक्या प्रतीची डीग्री देणं. हे झाले बाहेरचे. स्त्रियांसाठी तर घराबाहेर पडणंच अवघड होतं. त्यांच्यासाठी होती अंधारी माजघरे, बालविवाह, नहाण आलं की गर्भाधान आणि नंतर चालू होणारी बाळंतपणाची मालिका. काही मुले जगत, काही मरत. त्या बाळ-बाळंतिणीला घरगुती औषधोपचार सोडले तर काहीच मिळायचे नाही. पुरूष डॉक्टरकडे जाण्यातल्या संकोचाने स्त्री डॉक्टरांची गरज निर्माण झाली. तेव्हा मिशनरी स्त्रिया आपली भाषा शिकून माजघरापर्यंत पोचल्या. पण त्यांनाही त्यांच्यातल्या उणीवा जाणवल्या असाव्यात. कारण त्या काळी भारतातच नव्हे तर इतरत्रही स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण मिळणे खूप हलाखीचे होते. जे आपल्याकडे सर्वसामान्य शिक्षणासाठी झाले ते त्यांच्याकडे या शिक्षणासाठी त्यांनीही भोगले. नाही म्हणायला फिलाल्डेफियाला एकच असे ’वीमेन्स मेडिकल कॉलेज’ होते, की जिथे मुलींना प्रवेशासाठी झगडावे लागले नाही अथवा विश्वस्त मंडळ आणि विद्यार्थ्यांच्या कृपेची वाट पाहात थांबावे लागले नाही. तशी आनंदी ही हिंदुस्तानातली डॉक्टर होऊ इच्छिणारी पहिली मुलगी नाही. तिच्याही आधी कृपाबाई ख्रिस्ती या बाईंचीही तीच इच्छा होती. पण शरीरप्रकृतीने साथ न दिल्याने त्या हे शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. या कृपाबाईंचाही आनंदीआधीची आनंदी म्हणून एका प्रकरणात परिचय आला आहे. इथेपर्यंत पुस्तकाची पहिली तीन प्रकरणे संपतात आणि आनंदीपर्व चालू होतं.
पुस्तक मुळातूनच वाचावं इतकं छान आहे. कॅनव्हास पुष्कळ मोठा आहे, आणि तो अगदी नेमकेपणाने हाताळला देखील आहे. हे पुस्तक वेगळे यासाठी, की त्यात आनंदीच्या आधीपासून हिंदुस्तानातल्या महत्वाच्या स्थित्यंतरांचा मागोवा घेतला आहे. आणि त्या अनुषंगाने फक्त आनंदीच नव्हे तर इतर स्त्रिया कशा घडत गेल्या, त्यांना काय काय संकटे आली याचे इत्यंभूत वर्णन आहे. त्यातही मग नंतर हिंदुस्तानी आणि परदेशी असा भेदाभेद नाही. आनंदीच्या कॉलेजचे वर्णन करताना त्यांनी एक पूर्ण प्रकरण इंग्लंडातल्या, फ्रान्समधल्या स्त्रियांनी-मुलींनी असे मुद्दामच म्हणत नाही, कारण आनंदीच्या वर्गात वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रिया होत्या-दिलेला संघर्ष, सहकार्यांनी, समाजाने केलेली अवहेलना आणि तरी त्यातून जिद्दीने शिकलेल्या या स्त्रिया सगळ्यांबद्दल माहिती मिळते. भारतातल्या त्या काळातल्या शिकलेल्या स्त्रिया म्हणून फक्त आनंदीबाई आणि पंडिता रमाबाई यांचीच नांवे आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण ही फक्त काही उदाहरणे आहेत. पुण्यातल्या रावबहादूर भिडे यांची मुलगी आवडाबाई, कृपाबाई, काशीबाई अशी अनेक सर्वसामान्यांना न माहित असलेली व्यक्तिचित्रेही या अनुषंगाने समोर येतात. या स्त्रिया फक्त शिकल्या नाहीत, तर त्या रोजनिशी लिहीत, त्यांची मते समाजासमोर मांडात नसल्या तरी लेखनातून ती मते कुठेतरी उतरत होतीच. या आनंदीच्या समकालीन असल्याने त्यातूनही आनंदीविषयी अधिकाअधिक समजायला मदत होते.
आनंदीच्या छोट्याशा आयुष्यात तिचा खूप लोकांशी संपर्क आला. या सगळ्यांबद्दल जमेल तितकी माहिती संकलित करून लेखिकेने योग्य तिथे दिली आहे. या व्यक्तींमध्ये महत्वाची व्यक्ती म्हणजे गोपाळराव. हा अतिशय विक्षिप्त मनुष्य, हवे तेव्हा एकदम उलटी उडी मारून टोकाची भूमिका घेऊ शकत असे. आनंदी परदेशात जाईतो गोपाळराव म्हणजे सद्गुणांचा पुतळा म्हणायला हरकत नाही. आनंदी-गोपाळमधून दिसते ते त्यांचे हिमनगाचे पाण्यावरचे टोक. बहुतेकांनी आनंदीबाईंबद्दल लिहिताना काशीबाईंकृत चरित्र प्रमाण मानलेले दिसते. त्याला य.ज. जोशीबुवाही अपवाद नसावेत. त्यामुळे आनंदी-गोपाळ मध्ये आनंदीच्या घरची स्थिती अतिशय हलाखीची, कर्जबाजारी, बाबा-आजी शिक्षणाच्या विरूद्ध आणि कहर म्हणजे घरच्या स्त्रिया गोपाळरावांना कल्याणच्या पोष्टात पाहायला गेल्या आणि पसंत करून आल्या वगैरे गोष्टी दिसतात. सत्य परिस्थिती अगदीच वेगळी आहे हे आता पुन्हा सांगायला नकोच. हो, एक सांगायचे राहिले. लेखिकेने कुठलेही विधान संदर्भाशिवाय केलेले नाही.त्यामुळे आता काय खरे आणि काय खोटे हा प्रश्नच उद्भवत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे पुस्तकाचा बाज संशोधकी आहे पण ते रटाळ होत नाही. आनंदीचे मूळ जोशी घराण्याबद्दलचा दोनशे वर्षांचा जुना इतिहास, आनंदीच्या भावाने ठेवलेल्या नोंदी, इतर तत्कालीन ग्रंथ अशा सगळ्यांची सांगड घालत त्या आपल्यासमोर शक्य तितकी खरी आनंदी उभी करतात. आणि इतर लोकांच्या व्यक्तिरेखाही स्वत:चे मत मध्ये न आणता रंगवतात. त्यामुळे पहिल्यांदा गोपाळरावांचा खलपणा जाणवत नाही. पण जसजशी प्रकरणे पुढे जातात, गोपाळरावांच्या वागण्याचा आनंदीला मानसिक त्रास व्हायला लागतो, तेव्हा एक खास प्रकरण लिहून गोपाळरावांचा दुष्टपणा अगदी साग्रसंगीत सांगतात. कलकत्याच्या सभेत आनंदी स्वत:हून, हातात एक चिटोरेही न घेता भाषण देण्यास उभी राहिली, तेव्हाच त्यांना तिच्या भरारीची कल्पना आली होती. (हे भाषणही पुस्तकात पूर्ण उपलब्ध आहे). जी गोष्ट त्यांची, तीच आनंदीच्या डीनबाईंची. या डीन रिचेल बॉडले, यांनी मोठ्या मनाने आनंदीला त्यांच्या घरी राहायला बोलावले. आनंदीच्या घरमालकिणीबद्दल जेवढं वाईट सांगितले जाते-उदा. अपुरं जेवण देणं, तशा त्या कधीच वागल्या नाहीत.
या सगळ्या प्रवासातील आनंदीच्या सुखदु:खांची साथीदार होती आंट थिओ कार्पेंटर. एक नवरा सोडला तर खटकणारी, आनंदाची, हळवेपणाची प्रत्येक गोष्ट तिने या दूर देशीच्या मावशीला सांगितली. या पुस्तकात ही आंट तिच्या कुटुंबासह अधिक विस्ताराने येतेच आणि तिच्या कॉलेजमधल्या सहचारिणीही आपापल्या कहाण्या घेऊन येतात. प्रत्येकीचे काही ध्येय होते, काही स्वप्ने होती. इतकेच नाही, तर प्रत्येक प्राध्यापक काय शिकवित होते, त्यांचे आनंदीशी असलेले नाते यांचीही माहिती आनंदीच्या पत्रातून आणि आताच्या मेडिकल कॉलेज ऑफ पेनिसिल्वेनियाच्या दस्ताऐवज विभागातून मिळालेल्या माहितीतून उलगडत जाते. आणि खरोखर आनंदीचा काळ आणि तिचे कर्तृत्व वाचकांसमोर येतं.
लेखिका आनंदीमुळे प्रभावित झालीय पण म्हणून तिच्या चुकांकडे कानाडोळा करत नाही. कलकत्याच्या सभेत तिने उपस्थित जनसमुदायाला दिलेले, “मी माझ्या वेशभूषेत व खाण्यात बदल करणार नाही” हे वचन तिने जीवावर उदार होऊन पाळले. निदान तिने तिथल्या कपड्यांच्या सवयी अंगिकारल्या असत्या, तर थंडी शरीरात राहून राहून ती सतत आजारी पडती ना. तिला भेटणारे सगळेजण “हिंदुस्थानात बालविवाह होतात ना?” असे विचारत असत. तेव्हा तिने आपल्या भाषणात “बालविवाहच कसे चांगले असतात” असे ठासून सांगितले होते. तिच्या सामाजिक भूमिकेत हिंदुस्थानाची प्रतिमा येनकेनप्रकारेण उंचावण्याचाच यत्न जास्त दिसतो. आनंदीचा प्रबंध तिच्या वर्गातल्या इतर प्रबंधांपेक्षा सर्वात मोठा होता, आणि विषय होता: “Obestetrics Among The Aryan Hindoos”. नांव हिंदूंचे, पण ती लिहिते फक्त ब्राह्मण कुटुंबातल्या प्रसूतीशास्त्राविषयी. त्यातही, स्वत:चे असे काही मत न मांडता संस्कृत ग्रंथांचे भाषांतर, मनुस्मृतीतील वचनेच जास्त येतात. एकतर स्वत: डॉक्टर बनावे ही इच्छाच तिला तिच्या मुलाच्या अपमृत्यूमुळे निर्माण झाली होती. असे असताना विज्ञानाभिमुख झालेल्या तिच्या मनाने, पारंपारिक आर्य वैद्यकशास्त्राकडे कोणत्या दृष्टीने पाहिले , पाश्चात्य ज्ञानशाखेच्या अभ्यासानंतर तिला कोणती वेगळी दृष्टी प्राप्त झाली, हे यातून काही लेखिकेला जाणवत नाही. आणि पत्रांतून जाणवणारी चिंतनशील, अत्यंत चिकित्सक, संवेदमाक्षम, सखोल वृत्तीची आनंदी इथे हरवल्यासारखी वाटते. एक प्रश्न फक्त इथे अनुत्तरित राहतो: स्वत: डॉक्टर असूनही, अवतीभोवती इतके निष्णात शिक्षक आणि डॉक्टर असूनही तिला क्षयाची बाधा झालेली कुठेच कुणी लिहून ठेवले नाही. खुद्द आनंदीला आपण जगू-वाचू याची आशा वाटत नव्हती. गोपाळरावांकडून मानसिक त्रास तर सतत होताच. पण ती औषधे घेत आहे किंवा नाही याचा उल्लेख कुठल्याच पत्रात नाही.
आनंदी परत येण्यापूर्वीच तिला कोल्हापूर संस्थानात नोकरी मिळाली होती, पण त्यापूर्वीच तिचा आजार बळावल्याने सगळे मार्ग खुंटले. तिच्या मत्यूनंतर रावसाहेब भिडे आणि वैद्य मेहेंदळे यांच्याबद्दलही बरेच वाईट बोलले जात असे, पण ते कसे चुकीचे आहे याचेही ससंदर्भ विवेचन येते. आनंदीची गोष्ट जशी आनंदीच्या आधीच्या आनंदीपासून सुरू होते, तशीच ती आनंदीनंतरच्या आनंदीच्या गोष्टीने संपते. आनंदीच्या मृत्यूनंतर कोल्हापूर संस्थानच्या माहिला डॉक्टरच्या छोट्याशा ओळखीने हे पुस्तक संपते.
पुस्तकात प्रत्येक गोष्ट अगदी विस्तृतपणे येते. हा परिचय त्यामानाने अगदी त्रोटक म्हणावा लागेल. आनंदी-गोपाळ वाचून आनंदीची फक्त गोष्ट समजते पण तिची खरी ओळख या पुस्तकातून होते. परिशिष्टातला पत्रव्यवहार, आनंदीची भाषणे, आणि तिच्यासाठी इतरांनी केलेली भाषणे, तिचा हिशेबाचा अचूकपणा, या सर्वातून तिची लोकप्रियता व तिचे सर्वांगीण गुण दिसून येतात. पुस्तक संपता संपता लेखिकेने आंट थिओच्या पणतीकडून मिळालेला आंट- आनंदी पत्रव्यवहारावर पुस्तक लिहायचे ठरवले आहे असे लिहिलेय, आणि आता मी ते पुस्तक शोधायला आतापासूनच सुरूवात करतेय.
No comments:
Post a Comment