Friday, November 19, 2010

पुरो आणि मुक्ता!!

परवा अपघातानेच ’पिंजर’ हाती लागली. अमृता प्रितम म्हटले की मला “वारिस शाह नूं” आणि “पिंजर” हेच आठवते. पंजाबी वळणाची हिंदी ही त्यांची शैली. सहसा माहित नसलेलेही बरेच हिंदी शब्द पानांच्या वाटेवर भेटत राहतात आणि हळूहळू ओळखीचे होऊन जातात. पिंजरच्या अर्पणपत्रिकेतच त्या म्हणतात, “स्त्री, वह हिंदू हो या मुसलमान, जो उसकी ठिकाने तक पहुंच पाई.” यावरून खरेतर आत काय असावे याची कल्पना यावी. भारत-पाकिस्तानाची फाळणी हा तसा बराचसा संवेदनशील विषय. आणि ज्यांनी ते प्रत्यक्षात अनुभवले, त्यांच्यासाठी तर जन्मभराची भळभळती जखम. लेखिकेने हे सगळे जवळून पाहिल्यानेच की काय पण वारिस शाह नूं आणि पिंजरमध्ये फक्त “फाळणी” यापलिकडे जाऊन त्याचा जनसामान्यांवर झालेला परिणाम अधिक उत्कटतेने दिसून येतो.

    पिंजर. ही कुंकवाची पिंजर नाही. तो आहे अस्थिपंजर. स्त्रीमनाचा आणि शरीराचाही. तो पिंजर आहे पुरोचा आणि मुक्ताचा. दोघीही स्त्रियाच, पण वेगवेगळ्या काळातल्या, वेगवेगळ्या भूभागातल्या!! दोघींचे जिव्हाळ्याचे विषयही वेगळे, तरीही दोघींमध्ये एक समान धागा आहे. पुरो, ही गुजरातच्या पण आता पाकिस्तानात असलेल्या भागात राहणाया धनकोची मोठी मुलगी. पुरोची सगाई झालीय, रत्तोवालच्या रामचंदशी आणि पुरोच्या पाठच्या भावाचे लग्न पण तेव्हाच रामचंदच्या बहिणीबरोबर ठरवून टाकलंय. गावातलाच शेखांचा रशिद तिला सतत मागावर असल्याचे जाणवतं, तिचं स्त्रीत्व तिला अनामिक धोक्याची जाणीव करून देतं. आणि एक दिवस लग्न आठवड्यावर आले असताना रशिद तिला पळवून घेऊन जातो. गावातल्या या शेखांसोबत पुरोच्या घराचे पिढीजात वैर आहे. तिच्या ताऊंनी रशीदच्या आत्याला पळवून आणले होते, तीन दिवस घरात डांबून ठेवले आणि नंतर सोडून दिले. तिला ना कुणी घरात घेतले, ना तिचे लग्न झाले. रशीदच्या काका-भावांनी त्याला याचा बदला म्हणून पुरोला पळवायला भाग पाडलेय, आणि काही केलंत तर बरे होणार नाही असे तिच्या बाबांना धमकावलंय देखील. पण रशीद पुरोच्या ताऊंसारखे वागत नाही, तिला सोडून देत नाही. तो तिच्याशी निकाह करतो आणि तिला त्रास होऊ नये म्हणून तिला दुसर्‍याच गांवी घेऊन येतो.

    इथेही पुरोचे मन रमत नाही. ती त्यांच्या भाऊबंदांत रमत नाही, बोलत नाही. निसर्ग आपले काम चोख बजावतो. पण तिला तो गर्भ म्हणजे शरीरात असलेल्या नकोशा किड्यासारखा वाटत असतो. मूल झाल्यावर तिला त्याच्याबद्दल थोडेफार प्रेम वाटते, पण तेही तितकेच. ती स्वत: मात्र तूप न लावलेलय रोट्या, फक्त देह जगवायला अतिशय साधे अन्न तेही दिवसातून एकदाच खात राहते आणि अस्थिपंजर बनून जाते. इतक्या दिवसांच्या सहवासानेही तिला रशिदबद्दल प्रेम वाटत नसते, पण तो एकदा आजारी पडल्यावर तिला त्याची काळजी वाटते आणि तिला पळवून आणल्याबद्दलचा तिरस्कार, ताटातूट सगळी गळून पडते.

    एवढे सगळे होऊनही तिचे मन माहेराकडे, ज्याची लग्नापूर्वी रात्रंदिन स्वप्ने पाहिली, त्याच्याकडे धावत असते. अचानक तिला एक संधी मिळते, रत्तोवालला जाण्याची. ती जाते, गावांत फिरता येत नाही, म्हणून शेतांतून फिरते, उगाच काहीबाही करणे काढून हे शेत कुणाचे ते शेत कुणाचे असे विचारत राहते. तिने एकवार त्याला ओझरते पाहिलेले असते, आणखी भेट व्हावी असे वाटतं पण प्रत्यक्षात तो भेटल्यावर ती काहीच बोलत नाही. त्यालाही कळत नाही, ही मुस्लीम स्त्री कोण ते, पण ती ओढ कुठेतरी असावी. तो दुसर्‍या दिवशी विचारतो, “तू पुरो आहेस का?” ती अर्थातच उत्तर टाळून निघून जाते. अशातच फाळणी होते, हिंदूना तो भूभाग सोडून जावे लागते. सगळे मुस्लिम त्यांचे वैरी बनतात. घरे लुटतात, मुलींना पळवून नेतात, अव्वाच्या सव्वा भावाने त्याना धान्यधुन्य विकतात. सरकारी छावण्यांतला बंदोबस्तही अशा लोकांना रोखायला कमी पडतो. आणि अशावेळी रामचंद तिला पुन्हा भेटतो ते हेच सांगायला की, त्याची बहिण व पुरोची वहिनी मुस्लिमांनी पळवून नेलीय आणि बाकीचे कुटुंब जीव वाचवून भारतात जात आहे. ही जीवावर उदार होते, नवराही साथ देतो आणि ती रत्तोवालमध्ये जाऊन वहिनीला पळवून आणते. पत्ता देऊनही रामचंद, भाऊ कुणीच संपर्क साधत नाही. इथे दोघीही आता समदु:खी. एकीला १५ दिवस पळवून नेली म्हणून घरात घेतले नाही, तर तेच लोक आता दुसरीला कसे घेतील? वहिनीने तर आशाच सोडलीय. पण पुरो वहिनीला आपल्यासारखी पिंजर होऊ देत नाही. महिन्यावर महिने उलटतात, पण तिच्यातला दुर्दम्य आशावाद तिला धीर देत राहतो. एके दिवशी खरेच निरोप येतो की अमक्या अमक्या दिवशी इथे जे लोक राहिले आहेत, त्यांना भारतात नेण्यात येणार आहे. आपल्याही घरचे कुणी येईल म्हणून तिघेही तिकडे जातात. भाऊ-बहिण जवळ जवळ दहा वर्षांनी एकमेकांना भेटतात. आणि तेव्हाच उद्घोषणा होते, “भारतात ज्यांना जायचेय त्यांनी या बाजूला यावे”.

आता हे एकदम अवघड वळण. अजूनही भावाचा हात तिच्या हातात आहे. तो स्पर्श तिला सोबत नेऊ पाहतोय, तिच्या स्वत:च्या माणसांत. तिच्याही मनात स्वार्थ डोकावतो, पण तो क्षणभरच! ती निकराने फक्त वहिनीला परत पाठवते. कारण एकच, तिच्यावाचून तिच्या रशीदचं, पोटच्या मुलाचं आणि एका सांभाळलेल्या मुलाचं पिंजरच शिल्लक राहिले असते...

पुरोची कथा इथेच संपते. एका मुलीच्या आयुष्यात आलेली स्थित्यंतरे दिसतात, दिसतात म्हणण्यापेक्षा लेखणीमधून, निवडलेल्या शब्दांतून ती जाणवत राहतात. लग्नाआधी मैत्रिणींसोबत असतानाचे प्रसंग वाचताना आपल्यालाही प्रसन्न वाटते, तेच रशीद तिला दिसला रे दिसला की अशुभाची काळी छाया पान व्यापून राहिल्यासारखे वाटते. रशीद तिला सक्कडअलीला नेऊन ठेवतो. तिने परिस्थितीसमोर हार मानलीय, तिला कशाचा उत्साह नाही, हे “मटमैला दिन था” सारख्या छोट्या छोट्या वाक्यरचनांमधून तिचे नैराश्य अधिक गडद होत जाते. तिचा स्वत:चा स्वत:शी संघर्ष दिसतो, नंतर परिस्थितीशी जुळवून घेतल्यावरची बदलेली पुरो ही अधिक ठाम अन अधिक खंबीर वाटते.
  
पिंजरची दुसरी नायिका मुक्ता. ही स्वतंत्र भारतातली मुलगी. अत्यंत सुंदर पण दुर्दैवाने गरीब घरात जन्माला आलेली. घरातल्या वस्तू अगदी मोजक्या. इतक्या मोजक्या की लग्नासारख्या समारंभात देखील काय येणार, किती येणार आणि काय काय जाणार हेही अगदी ठरून गेलेलं!!! ती कॊलेजात शिकते, पण याला घरच्यांचा म्हणावा तसा पाठिंबा दिसत नाही. तसाच तो तिने “मिस दिल्ली” स्पर्धेत भाग घ्यायलाही मिळत नाही. याची रूखरूखही तिच्या मनात कुठेतरी आहेच. तिला एका श्रीमंत बिजवराचे स्थळ सांगून येते. तो बराच श्रीमंत.  अगदी त्याच्या पदरी त्या काळात पगारी वकिल ठेवले होते. आणि त्यातल्या कुठल्यातरी एका वकिलाच्या मुन्शीची ही लेक. त्यात पाठीवर बहिणी आहेतच. घरच्यांना स्थळात काही वावगे दिसत नाही, पण हीच काही बोलत नाही.
 “त्याची बायको आत्ताच वारलीय, ओटीत लहान मूल टाकून गेलीय, मग लग्न नक्की कुणाची गरज म्हणून? बाळाची, की नवर्‍याची??? जर बाळाची गरज म्हणून मी, तर मग माझे त्याच्या आयुष्यातले अस्तित्व काय??” तिच्या मनात नुसते विचारांचे काहूर. अर्थातच उघड बोलण्याची सोय नाहीच.

तीनेक महिन्यांनी पुन्हा तेच स्थळ, यावेळी एक निरोपही आहे सोबत. “मुलाला हवे तर आजीकडे अमृतसरला ठेवतो” यावेळी हिला खिजगिणतीत न धरता लग्न ठरवले जाते. लग्न तरी काय, अत्यंत आवश्यक विधी चार भिंतींआड जास्त गाजावाजा न करता पार पाडले जातात इतकंच. ती सासरी येते, कळतं, ते मूल-राहूल-नुकतेच गेलंय. पाहुण्यांत दबकी चर्चा.  हिच्या कानावर पडेलशी..., “अपशकुनी दिसते मुलगी, इकडे स्थळ सांगून गेलं, तिकडे मूल गेलं!!”
नवरा अद्याप प्रथम पत्नीला विसरू शकलेला नाही. सगळ्यांनी अगदी त्याच्या आईने सांगूनही त्याने पहिल्या पत्नीचा, मुलाचा व त्याचा फोटो नवपरिणीत जोडप्याच्या शयनकक्षात तसाच ठेवलाय. घरातले बाकीचे फोटो काढू दिलेत, हे त्यातल्या त्यात नशीब. त्याचा भूतकाळ तिला पावलोपावली भेटत राहतो. कपड्यांच्या अलमारीत.. पहिलीच्या कपड्यांच्या ट्रंकांत... गडीमाणसांच्या बोलण्यात.... अगदी त्या दोघ्यांच्या शय्येवर सतत तिला ते न पाहिलेल्या मुलाचं प्रेत दिसत राहातं. मनातल्या मनात ती पिंजर बनत जाते. नवर्‍याला खुश ठेवते, पण त्याच्यापर्यंतही तिचे अंतर्मन पोचत नाही. ती गरोदर राहते, पण नवर्‍याला त्याने त्याच्या आईला कळवू नये अशी अट घालते. तोही ती म्हणेल तेव्हा आईला सांगू असे म्हणून गप्प राहतो. तिचा गर्भपात होतो, आणि याचे मन चरकते, “असे काही होणार हे मुक्ताला आधीच कसे कळले?” ती सांगते, “मला माहित होते, तो जाणार होता. तो राहुल होता” नवर्‍याचे डोळे उघडतात. आपला भूतकाळ वर्तमानाला जगू देत नाहीए. यावेळी तो तिला खोदून खोदून विचारतो आणि इतके दिवस साचलेले तिचे दु:ख बाहेर पडते, “मला तो नको होता. म्हणजे आपल्यामध्ये नको होता. पण मी त्याच्या मृत्यूची आशा कधीच केली नव्हती. तो इथेच असतो, रोज असतो. इथे, आपल्या पलंगावर, आपल्या दोघांच्या मध्ये” आणि असेच बरेच काही. मुलाच्या मत्यूची टोचणी तिचे मन खात असते. जणू काही ते तिच्याच इच्छेचे फलित असावे. नवर्‍यालाही कळते, हे सगळे काय आणि का घडतं आहे. तो बेडरूममधला तिघांचा फोटो काढून टाकतो.
सगळे बोलून टाकल्याने तिच्या मनावरचे ओझेही हलके होते, ती तो फोटो तिथेच परत लावते. “आपका अतीत अब मेरा भी अतीत है” म्हणत!!


दोन वेगवेगळ्या कथा, पण दोघींची आतल्या आत धुसमट हे समान सूत्र. ना पुरो रशीदला कधी तिला काय वाटते ते सांगते, ना मुक्ता. तरीही त्यांना काय वाटते, ते पक्के आहे, त्यांच्यापुरते ठाम आहे. दोघीही वेगवेगळ्या लादलेल्या प्रतिकूल परिस्थितींचा शेवटी स्वीकार करतात आणि लक्षात राहतात.

No comments: