Friday, November 19, 2010

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी....

          २६/११ चे रणकंदन आणि तेव्हाचा थरार भारतीयांच्या मनातून कधीच पुसला जाणं शक्य नाही. बरेच जण मृत्यूमुखी पडले, कैक जायबंदी झाले. त्यात पोलिस आणि सामान्य नागरिक दोन्हीही आलेच. या हल्ल्यात आपले बरेच नुकसान तर झाले, वर पोलिसदलाने अनेक पोलिस इन्स्पेक्टर्स, शिपाई, कॉन्स्टेबल्स यांसह अशोक कामटे, हेमंत करकरे आणि साळसकर यांच्यासारखे मोहरे गमावले. तेव्हाच्या बातम्यांत झळकणारं “करकरे, कामटे आणि साळसकर यांना परिस्थितीचे गांभीर्य ल़क्षात आले नाही” हे वाक्य कामटेंच्या पत्नी- विनीता कामटे-यांच्या मनाला लागलं आणि त्यांनी सत्य शोधून या पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर मांडले.

           अशोक कामटे हे खरेतर मुंबई पूर्वविभागाचे-चेंबूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त. पण त्यांना वेळोवेळी शहराच्या इतर भागातही कारवाईसाठी जावं लागत असे. तसेच त्यांना २६ नोव्हेंबरलाही जावे लागले आणि काही तासांतच दूरचित्रवाणीवर त्यांच्या मृत्यूची बातमी झळकली. आपली यंत्रणा अशा प्रकारच्या हल्ल्यासाठी तयार नव्हती, आपल्या पोलिसांकडची शस्त्रास्त्रे आधुनिक  पद्धतीची नाहीत हे सगळे जरी खरे असले तरी ’असे काय झाले की ते तिन्ही अधिकारी एकाच गाडीत बसून कामा हॉस्पिटलकडे गेले’ हा प्रश्न अनुत्तरित होता. विनीताबाईंना नेमके हेच शोधून काढायचे होते. त्याची पहिली पायरी म्हणून त्यांनी पोलिसांकडे असलेल्या वायरलेस मोटोरोला आणि एरिक्सन या दोन कंपन्यांच्या फोन्सवर कामटे आणि कंट्रोलरूम यांमध्ये  झालेले संभाषण मिळवले. पुस्तकात अगदी क्रमवार पद्धतीने त्यांनी या संभाषणाचे तपशील दिले आहेत. त्यातून कंट्रोलरूम कडून व्यवस्थित प्रतिसाद न मिळाल्याचे, आलेल्या संदेशांवर- विशेषत: करकरेंच्या पोलिस फोर्स मागवण्याच्या संदेशांवर कारवाई न झाल्याने या तिघांचा मृत्यू ओढवला यापेक्षा वेगळं काही  निष्पन्न होत नाही.  म्हणून त्यांना लोकांनी १०० या नंबरावर फोन करून काय माहिती दिली, याचे तपशील हवे होते. की जेणेकरून या तिघा अधिकार्‍यांचा मृत्यू त्यांनी स्वत:वर निष्काळजीपणे ओढवून घेतलेला नसून तो यंत्रणेतील त्रुटीमुळे आहे हे अधोरेखित होईल. एका वरिष्ठ अधिकार्‍याची पत्नी म्हणून त्या हे सगळे सहज करू शकतील अशी त्यांची अटकळ मात्र धुळीला मिळाली. एका सर्वसामान्य नागरिकासारखाच त्यांना महिती अधिकाराचा उपयोग करून घेऊन ही माहिती मिळवावी लागली. त्यांनी जानेवारीत मागवलेली माहिती झगडून झगडून नोव्हेंबरात पदरी पाडून घेतली. त्यांची त्यापायी केलेली धडपड एकंदर मूळातूनच वाचण्यासारखी आहे. विनीताबाईंना हे तपशील या प्रकरणाची चौकशी करणार्‍या ’राम प्रधान’ आयोगासमोर मांडायचे होते, पण तुटपुंजे अधिकार असलेल्या या समितीस कोणालाही साक्ष देण्यास बोलावण्याचे अधिकार नव्हते, व हा सगळा शोध सरकार दफ्तरी नोंदला गेला नाही.

          पुस्तकाचा मुख्य मुद्दा मांडल्यानंतर पुस्तकाचा नंतरचा भाग म्हणजे अशोक कामटे यांची थोडक्यात जीवनकहाणी आहे. *त्यात त्यांचे ठिकठिकाणचे पोस्टिंग्ज, त्यांची कार्यपद्धती, निर्णयक्षमता, त्यांचे भंडारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यातले काम असा आहे. कामटेंच्या सोबत काम केलेले त्यांचे सहकारी, पत्रकार व काही मित्र, त्यांच्या राजकोट व कोडाईकॅनॉलच्या शाळेतले मित्र आणि शिक्षकांनीही त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या आहेत. पुस्तकाच्या उत्तरार्धात कामटेंचं एकंदर कुटुंब येते. यांचे घराणेच मुळात पोलिस आणि लष्करसेवेत असलेलं आहे. अशोक कामटे यांचे पणजोबा मारूती कामटे हे १८९५ ते १९२३ याकाळात पोलिसांत होते आणि त्यांना त्यावेळच्या मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरनी तलवार देऊन सन्मानित केलं होते. आजोबा एन. एम. कामटे हे मुंबईचे पहिले आय.जी. होते, त्यांनी त्यांच्या नोकरीतल्या व ब्रिटिशांसोबतच्या आठवणी “फ्रॉम देम टू अस” या पुस्तकात मांडल्या आहेत. पणजोबा-आजोबा नंतर बाबा मात्र पोलिसांत न जाता लष्करात गेले, आणि त्यांनी तिथे कर्नलपद भूषवले. कामटेंची आईही अशाच मोठ्या घराण्यातून आलेली व १९५६ सालची स्क्वॅशची नॅशनल चँपियन होती. कामटेंना मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीने आणि घरच्या-कामगिरीवरच्या फोटो आल्बमसोबत पुस्तक संपतं. पहिला भाग वाचताना हे असे का व कसे घडले असेल असा प्रश्न पडतो. विनिताबाईंना माहिती देतानाची संबंधितांनी केलेली टाळाटाळ मन उद्विग्न करते. या दु:खद घटनेतून सावरणार्‍या, सत्याचा छडा लावणार्‍या विनिताबाईंची तळमळ खरेच कौतुकास्पद आहे. पुस्तकाचा मूळ हेतू पहिल्या एकतृतियांश भागातच संपत असला तरी, नंतरचे पुस्तकही कंटाळवाणं होत नाही. एक पोलिस अधिकारी म्हणून, पिता, पती, भाऊ, एक उत्कृष्ट खेळाडू, अशी विविध रूपांतून त्यांची प्रेरणादायी गाथा उलगडत जाते.

     एकदा घरी येताना पायरेटेड पुस्तकांच्या स्टॉलवर हे पुस्तक दिसले. मोह आवरला नाही, आणि अवघ्या साठ रूपयांत ते पुस्तक मिळाले. पायरेटेड कॉपी असली, तरी एकदोन फिकुटलेली किंवा अतिठळक झालेली पाने सोडता वाचायला काहीच वाईट नव्हती. एकंदर पुस्तकाची मांडणी अगदीच उत्कृष्ट सदरात मोडत नसली तरी चांगली आहे. तशा फ्रुफरिडिंगच्या चुकाही आहेत. दोनतीन ठिकाणी पूर्ण परिच्छेदांची पुनरावृत्ती झाली आहे.  पण एकंदरीत पुस्तक वाचनीय व एका घडलेल्या महत्वपूर्ण घटनेची  ती कशी घडत गेली याची मीमांसा म्हणून छानच आहे. कदाचित आता नंतर असे काही घडले, तर किमान आपली यंत्रणा या चुकांपासून काही शिकेल अशी आशा बाळगूयात

         * हा भाग वाचताना पती म्हणून कामटे विनीताबाईंना  खूप महान वाटत असतील आणि म्हणून त्यांनी अतिशयोक्ती केली असावी असे वाटण्याचा संभव आहे. कामटे २००२च्या सुमारास सांगली जिल्ह्यात होते. मूळ सांगली शहरात गुंडगिरी, दिवसाढवळ्या खून पडणे, मारामारी असले प्रकार सर्रास घडायचे. फासेपारधी सतत चोर्‍या करत असत. त्यांच्या काळात कामटेंनी याप्रकाराला खूप आळा घातला. त्यांच्यानंतर सांगलीला आलेले आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तिथे इतका दरारा निर्माण केला की त्यांच्या नावाने लोक अक्षरश: घाबरत. बेकायदा प्रवासी वाहतूक, बेकायदा वाळू उपसा,  गुंडगिरी आणि असे बरेच उद्योग पूर्ण बंद झाले होते. एकदा गणेशोत्सवात झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: तासगांवच्या रथोत्सवाच्या बंदोबस्तात सामील झाले होते. तेव्हा फक्त मानकर्‍यांसाठी असलेल्या रथात लोकांनी त्यांना आमंत्रित केले. आणि तद्दन गल्लाभरू चित्रपटात साजेसा प्रसंग तिथे घडला. लोक त्यांना कॅमेर्‍यात साठवत होते, अभिवादन करत होते, अचानक सगळीकडून उत्साहाची लाट आसमंतात सळसळत पसरली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी रस्त्यावर उतरला की लोकांना त्यांचा किती आधार वाटतो आणि असा अधिकारी कसा लोकप्रिय होतो, हे स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवल्यामुळे मला अशीच कार्यपद्धती असलेल्या कामटेंना या पुस्तकात मुद्दाम ग्लोरिफाय केले आहे असे मुळीच वाटले नाही.

No comments: