Monday, February 15, 2010

गाणी.. आईच्या आठ्वणीतली .. २

भा. रा. तांबेंशी ओळख तशी खूपच लवकर झाली.. घरी एक पाठ्यपुस्तक होते... सगळी चित्रे हिरव्या रंगात छापलेली होती.. (अंमळ हिरवा माज त्याकाळी भारतात होता की काय!!!) नि त्यात कविता होती:

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

जन पळभर म्हणतील.. अथवा नववधू... ही प्रकर्णं आयुष्यात त्यानंतर जवळजवळ ७-८ वर्षांनी आली... आणी हे गाणे ऐकवल्यानंतर आईने झाशीच्या राणीची गोष्ट सांगितल्याने ते अधिकच आवडले... गाताना अगदी जोशात येऊन मी हे गाणे म्हणत असे.. तसे गाण्याच्या तालासुरांच्या बाबतीत मी अतिशय स्वतंत्र विचारांची आहे.. त्यामुळे गाणे आहे त्या तालासुरात तर जाऊच दे, पण प्रत्येक वेळेस वेगळ्याच चालीत येते.. आता याला कुणी मला चालीत गाणं म्हणता येत नाही असं म्हणत असतील म्हणोत बापडे... ज्याची त्याची जाण, समज इ.इ. म्हणून तो विषय मी सोडूनच देते कसा??? :)

लहानपणी आमच्या बंधुराजांना खाऊ घालणे हा एक मोठा सोहळा असायचा.. हा खाण्याच्या बाबतीत अतिशय आळशी.. मग त्याला बाबापुता करून खायला घालायला लागायचं... तेव्हा आई त्याच्यासाठी एक गाणं म्हणायची,
दिपका मांडिले तुला सोनियाचे ताट
घडविला जडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्याची सोपी करू पायवाट
कुतू काऊ चिऊ माऊ या रे सारे या रे
सांडलेली गोड शिते उचलून घ्या रे
गा रे राघू गा रे मैना बाळाच्या या ओळी
मुखी घालू तुमच्याही दुधातली पोळी
गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये कुलदेवी!!!

तर आमच्या या गुणी कुलदिपकाला या गाण्याची इतकी सवय लागली, की हे गाणं म्हटल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरेनासा झाला.. नि आईने त्याला सवय तर लावली, पण नंतर तिला काम असल्याने त्याला भरवायचे काम माझ्याकडे आले.. मी या गाण्याला कंटाळून एक-दोनदा दुसरं गाणं गायचा प्रयत्न केला... तर लगेच याने भोकाड पसरलन्!!!! मग त्याचे जेवण होईपर्यंत या गाण्याची आवर्तने करावीच लागायची!!! :(

आणखी एक गाणं होते.... त्यात मला एक नवीन शब्द मिळाला होता, 'चटोर'. मला आजवर फक्त खाण्याचे चिरोटेच माहित!!! त्यातल्या शब्दांची अदलाबदल केल्यावर अर्थाचा कसला अनर्थ होतो.. मला तो शब्द जाम आवडला होता.. मी उगाच कुरापत काढून सापडेल त्याला चटोर म्हणत सुटले होते..

गाई पाणयावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही हा मिळाल्या
उभय पितरांचया चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला
तुला लंकेच्या पार्वती समान
पाहनीया होवोनी साभिमान
काय तयातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"
पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूतसंगे सुमहार का भिकारी??
कशी तुही मग मज मुळी भिकारी?
नारीमायेचे रोप हे प्रसिद्ध
सोस लेणयांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे
तदा बापाचे हदय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते
देव देतो सदगुणी बालकांना
काय म्हणूनी आम्हांस करंट्यांना?

हे गाणं मला निखिल, विवेक मोडक आणि संग्रामने पाठवलेल्या बालभारतीच्या पुस्तकात मिळाले.. पण त्यात मला माहित असलेल्या
"मुली असती शाळेतल्या चटोर,
एकमेकींना बोलती कठोर"
या ओळी नाहीत!!! कशा विसरतील म्हणा??? लहान भावाला आंघोळ घालायला शेजारच्या एक आजी यायच्या.. आणि आंघोळ घालताना भाऊ रडायचा.. मला वाटायचं की या आजी त्याला मुद्दाम रडवतात.. मग त्यांना चटोर म्हटल्याबद्दल चांगलाच प्रसाद मिळाला होता!!! :|
चला.. आजच्या आठवणी इथेच थांबवते!!!

आई.. आणि आठवणीतील गाणी!!!

गाण्यांचं आणी आमचं अतूट नातं!!! कोणे एके काळी, जेव्हा लोडशेडिंग नव्हतं.. सटीसहामाशी केव्हा तरी नाहीतर गेला बाजार आठवड्यातून एखाद्या दिवशी लाईट्स नसत तेव्हा, किंवा लहानपणी शेत विकलं नव्हतं तेव्हा, कधी शेंगदाण्याच्या पेरणीसाठी बियाण्यांच्या शेंगा फोडत असताना, तर कधी भुईमुगाच्या वेलाच्या शेंगा तोडताना, कधी दिवाळीत करंज्या करताना.. घरातले सगळेजण एकत्र असायचे.. नि ठरल्यासारखी गाण्यांच्या भेंड्यांना सुरूवात व्हायची.. तशी ती अजूनही होतेच.. :)
यात प्रत्येकाची गायची गाणी ठरलेली. बाबा म्हणजे फक्त मुकेश नि राज कपूर.. आम्हा भावंडाची प्रत्येकाची नवी-जुनी आवड ती निराळीच.. आंणी आई म्हणजे फक्त मराठी गाणी!!!! तिच्या तोंडून मी बरीचशी गाणी ऐकली.. अगदी नकळत्या वयापासून.. त्यातली कित्येक गाणी मी कुठे पाहिलीही नाहीत.. पण लहानपणापासून ऐकत आलेय.. नि बहुतेक सगळी जशीच्या तशी लक्षात आहेत..

सुरूवात कुठून करावी हा प्रश्न तर आहेच.. आज अशीच काही गाणी आठवली आहेत.. काहींचे मधले मधले शब्द विसरले गेलेयत..

आईचं खूप आवडतं गाणं होतं..कविताही म्हणू शकतो तिला... दिव्याची कहाणी...!!! जणू काही दिवा आपल्या आयुष्याची स्थित्यंतर सांगतोय... तशा लहानपणातल्या सगळ्याच गोष्टी ठळकपणे आठवत नसल्या तरी काही गोष्टी मात्र मेमरीत अगदी फिट्ट बसल्या आहेत.. या गाण्याची आठवण झाली.. की मी आईच्या मांडीवर बसलेय, नि ती अंगणात बसून मला हे गाणं ऐकवतेय हेच दृष्य आठवतं..



आधी होते मी दिवटी ,
शेतकर्‍यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतून मिणमिणती!!
समई केले मला कुणी,
देवापुढती नेऊनी
तिथून आले बाहेर,
ओकीत काळासा धूर!!!
काचेचा मग महाल तो,
कुणी बांधूनी मज देतो,
कंदील त्याला जन म्हणती,
मीच तयातील परि ज्योती!!!
बत्तीचे ते रूप नवे,
पुढे मिळाले मज बरवे,
झगमगाट तो कसा पडे,
वरात मज वाचून अडे!!!
आता झाले मी बिजली,
घरे मंदिरे लखलखती
देवा ठाऊक काय पुढे
नवा बदल माझ्यात घडे!!
एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांना
कसलेही मज रूप मिळो
देह जळो अन जग उजळो!!!



मी तशी जाम रडूबाई होते.. म्हणजे काहीतरी आगाऊपणा करणे,त्याबद्दल आईचा किमानपक्षी ओरडा नि कमालपक्षी मार खाणे.. चालूच असायचं!!! आजही जास्त फरक पडलाय असं नाही.. फक्त आता मार पडत नाही :D घरी जसं सगळ्यांना गाण्यांचं वेड, तसंच पुस्तकांचंही.. आम्हा भावंडाना परीक्षेच्या दिवसांत अभ्यासाच्या पुस्तकांत घालून अवांतर पुस्तके वाचताना रागवणारी आई आता माझी भाचरंही तोच उद्योग करताना पाहून दोघी बहिणींची जाम खेचते...(इतिहासाची पुनरावृत्ती इथेही झालीच!!!)
असंच पहिलीत असेन-नसेन.. कुठलंसं पुस्तक माझ्या हातात.. त्यामुळे आता ही काही गोंधळ घालणार नाही म्हणून आईही निवांत.. तोच आधी मुसमुस.. आणी नंतर हुंदके सुरू झाले तेव्हा ती घाबरली.. बरं, का रडतेय हे ही मी सांगायला तयार नव्हते.. ती बिचारी जाम गोंधळात!! शेवटी कसे कोण जाणे पण तिने हातातले पुस्तक काढून घेतले तेव्हा तिला कळाले, की मी हिरकणीची गोष्ट वाचून रडत होते!!!! :| (त्यानंतर कित्येक दिवस घरी पुस्तक असूनही तिने मला शामची आई पुस्तक वाचू दिले नव्हते. :( ) अशीच आणखी एकदा बालपणीच्या रडण्याची आठवण आहे, ती श्रावणबाळाचे कथा ऐकली तेव्हाची!!! यावर आईने एक गाणे ऐकवले होते....

शर आला तो धावूनी आला काळ,
विव्हळला श्रावण बाळ..
हा ! आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा
मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले!!!


यापुढच्या ओळी आता आठवत नाहीत.. :)

लहानांनाच काय, मोठ्यांनाही गोष्टी वाचयला आवडतात..आई सांगते मी चालायला, बोलायला नि वाचायलाही अंमळ जास्तच लवकर शिकले होते.. मी तेव्हा एक वाचली होती, की काहीतरी होते, नि वार्‍याच्या अंगाला खाज सुटते.. मग तो वारा वेळूच्या बनात जातो, आणी अंगाची खाज शमवतो. त्या गोष्टीच्या शेवटी असा धूसर दिसणारा वारा, वेळूचं बन असलेलं चित्र होतं.. नि भरीस भर म्हणजे त्या धूसर आकाराला चेहरा ही होता.. मग मी आईकडे तसा दिसणारा वारा दाखव असा हट्ट धरला होता..!!!! :party: आधी रूसणं.. फुगणं.. मग आईचा थोडाफार रॅंडमायझेशन अल्गोरिदम प्रयोग.... सगळं सगळं झालं.. तेव्हा आईच्या मदतीला एक कविता धावून आली...

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं
फिरुन फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय
आले भरुन डोळे पुन्हा गळा ही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला



आमच्या घराला अंगण होतं.. पण परसदार नव्हतं.. घरी फुलांचं झाडही नव्हतं.. मग बिचारा वारा येणार कसा??? मग माझी आई वारा कसा काय मला दाखवू शकणार होती??? माझं तेव्हढ्यापुरतं समाधान झालं.. पण त्यानंतर जेव्हा आम्ही आजोळी गेलो, तेव्हा कुणालाही न भेटता स्वारी सरळ परसात!!! तिथे जास्वंदीचं आणी विलायती चिंचांचं झाड होतं... तिथं जाऊन मी बराच वेळ वारा कधी तिथे पिंगा घालायला येतो याची वाट बघत बसले होते.. :(


आज इथेच थांबतेय.. अजूनही काही गाणी डोक्यात आहेत.. त्यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी!!! तुमच्याकडूनही येऊ देत अशी आठवणीतली गाणी!!!!!!

Thursday, February 11, 2010

माझा रिकामपणाचा उद्योग.... १ ग्लास पेंटिग!!!

एकदा हॉटेलात जेवायला गेल्यावर सहज वरती नजर गेली...टेबलाच्या वर काचेवरती पेंटिग केलेले छान झुंबर होते.. अगदी वेगळं नि झक्कास दिसत होतं.. सोबतची मैत्रिण म्हणाली.. काचेचे तुकडे एकमेकांना जोडून जोड दिलेला भाग सोनेरी वा काळ्या रंगाने रंगवतात.... खूप नाजूक नि बर्‍यापैकी महाग प्रकरण असतं ते... नंतर विसरूनही गेले मी ते... त्यानंतर एकदा दिव्यांच्या दुकानात गेले असताना पुन्हा तसंच एक झुंबर दिसलं... आता मात्र जवळून पाहता आलं.. यावेळी ते जरा जास्तच क्लिक झालं.. घरी गेल्या गेल्या जालावर शोध घेतला.. नि अशी चित्रे शोधली... तर तिथे गंमतच होती... एकच बाऊल.. त्यावर रंगकाम केलं होतं.. त्याला वरती कड्या लावून टांगलं.. की झाला कुंडीवजा शोपीस... वरून कडी लावली... तर झालं झुंबर.. नि जर हे दोन्ही पर्याय नाही आवडले.. तर खालून एक उभा दांडा लावायचा... की झाला नाईट्लँप!!!! आपल्याला आयडिया जाम आवडली... पण खरेदी करण्यापेक्षा स्वतः बनवलं तर???? (लफडं जर नीट पार पडलं तर) स्वनिर्मितीचा आनंद वेगळाच.... म्हटलं प्रयत्न तर करून पाहू.. गाजराची पुंगी.. वाजली तर वाजली.. नाही वाजली.. तर काय करायचं ते तेव्हाचं तेव्हा पाहू...

नुसतं ठरवून काय होतं..??? सामानाच्या जुळवाजुळवीला लागले... यापूर्वी या क्षेत्रात ढवळाढवळ केली नव्हती... त्यामुळे End product कसे होईल याबद्दल जरा साशंकच होते.. सगळ्यात आधी आणले रंग.. ते काय fevicol चं पाकीट मिळतं, तेच आणले होते.. मग काचेचा बाउल.. एक बर्‍यापैकी आकाराचा.. खूप लहान नाही खूप मोठा नाही.. पहिलाच प्रयत्न होता. म्हणून उगाच जास्त महागही नाही.. झालं.. जो काही कच्चा माल बाहेरून हवा होता.. ते साहित्य मिळालं होतं.. पण डिझाईन काही किल्या नक्की होईना.. खूप बाळबोध ही नको होतं.. नि जास्त क्लिष्ट हि नको होतं.. (आखूडशिगीं.. बहुदुधी.. बहुगुणी..सगळंच हवं होतं..) शेवटी यातली आपल्याला अक्कल नाही हे माहित असलेलीच गोष्ट आणखी एकदा मान्य केली नि गुगलोबाला शरण गेले.. बरिचशी चित्रे डाउनलोड केली.. त्यातलं एक नक्कीपण केलं..



आता???? सगळीकडे आधीच बोंबाबोंब केल्याने लोकांनी विचारायला पण सुरुवात केली होती.. कुठवर आलंय काम म्हणून.. होता होता एका सायंकाळी मनाचा हिय्या करून बसले..

पायरी १. बाउल नीट लख्ख पुसून घेतला.. :)

पायरी २. fevicol च्या रंगाचं पाकीट उघडलं.. :D

पायरी ३. त्यात छोट्या ट्युबामधून बरेचसे रंग होते.. नि एक काळ्या रंगाची ट्यूब हि होती.. त्या काळ्या रंगाने रूपरेखा आखून घ्यायची..
यात अडचण अशी होती.. कि हा काळा रंग पटकन सुकतो.. त्यामुळे दुरुस्त्या करण्याची भानगड नाही.. [ म्हणजे वाट लागली].. रूपरेखा आखून बाउल रात्रभर सुकायला ठवून दिला.. चुकून चांगला व्हायचा.. नि माझा हात लागून आईच्या भाषेत "धडाचा विध्वंस" व्हायचा..

पायरी ४. दिवस (खरं तर रात्र ) दुसरा.. आता त्या रूपरेखेत रंग भरायचे होते.. पाणी किंवा तत्सम काही मिसळायचं नाही त्यात.. ती ट्यूब फक्त तिरकी धरायची.. नि रंग भरत जायचे.. इथे दुसराच लोच्या होता.. एकतर रंग पातळ होता.. बाउल चा आकार असा.. की तो सारखा ओघळत होता. त्यामुळे एका ठिकाणी साचलेला गर्द रंग तर दुसर्या ठिकाणी अति पातळ रंग.. नि त्यात भर म्हणजे.. रंग सारखा बुडबुडे धरत होता.. ते फोडणे हे आणखी काम होऊन बसले होते.. त्यात रंगाच्या पाकिटात रंग विविध रंगसंगतीचे नव्हते.. त्यामुळे रंगांची जास्त निवड करायलाही वाव नव्ह्ता.. त्यामुळे जे हातात होतं.. त्यातच जो काही घालायचा.. तो गोंधळ घालायचा होता..

त्या दिवशीच्या अखेरची स्थिती अशी होती..



मग तुकड्या तुकड्यांनी हळूहळू एका बाजूचा रंग सुकेल तसा फिरवून फिरवून.... कुठे चुकून हात लागू नये याची काळजी घेऊन.. साधारण दोन रात्रीत रंगकाम पूर्ण झालं..



पायरी ५. मस्तपैकी निरनिराळ्या कोनातून बाउलचे फोटो काढले.. सगळ्याना दाखवले.. ज्यांनी मनातला भाव लक्षात घेउन तारीफ केली ते बिचारे सुटले.. ज्याना हे नाही कळाले.. त्याना पकडून पकडून त्यांना कित्ती छान.. कित्ती सुरेख असे जबरदस्तीने म्हणायला लावले.. :D








पण ती माझी दुष्ट मैत्रीण.. जिच्यासोबत मला ही आयडीया सुचली होती.. तिने मात्र कौतुक दूरच.. पणतळाचं वर्तुळ नीट आलं नाही म्हणून नाक मुरडलं.... (मेलं कौतुकच नाही ते कशाचं) :(
तसंही बनवायला गेले मारूती नि झाला गणपती त्यातला प्रकार झालाय.. पुरावा दिला आहेच त्याचा.. पण अस्मादिक सध्यातरी स्वतःवर बेहद्द खूष आहेत.. अशीच कधीतरी सणक येईल नि या बाऊलचं रूपांतर कुंडी.. झुंबर किंवा आणि कशात होईल!!! त्या दिवसाची आता मी वाट पाहातेय!!!!! :D

माझे रिकामपणाचे उद्योग....२ बुकमार्क्स...!!!!

तसं पाहता गेलं तर माझं नी एखाद्या कलेचं एकदम वाकडं... म्हणजे एखादं काम करायला लागणारी नजाकत कशाशी खातात हेच माहीत नाही.. त्यामुळं आईच्या भाषेत माझ्याकडे एखादं नाजूक काम... म्हणजे फक्त 'धडा'चा विध्वंस!!!! नी याबाबतीत घरी तसंही कुणाचं दुमत नाही...

लहानपणी जेव्हा दूरचित्रवाणीवर फक्त दूरदर्शनचं राज्य होतं.... तेव्हा मोजकेच कार्यक्रम असायचे.. नि लोक कार्यक्रमाच्या वेळा सांभाळून आपली कामं करायचे... पुन:प्रक्षेपण पण तितकंसं व्हायचं नाही.. नि झालं तरी त्याच्या आगाऊ सूचना तर नसतच नसत.... नि नेमके हे दिल्ली दूरदर्शनवाले लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत काहीतरी टाकाऊतून टिकाऊ बनवायला शिकवणारे कार्यक्रम लावायचे.. नि मला याची भयंकर चीड यायची.. एकतर माझ्या वयाच्या लोकांवर ताईगिरी केल्याने माझ्या मित्रमैत्रिणी माझ्यासोबत खेळायला तयार नसायच्या.. नि म्हणून आईकडून बहिणींच्यावर खेळण्यासाठी दट्टया आणायचा तर त्यांना हे असले काहीतरी प्रकार टीव्ही वर बघायचे असायचे...
एकदा असंच मला बळेबळे टीव्ही समोर बसायला लावलं होतं.... नि आईच्या दुर्दैवानं त्यादिवशी जुन्या साड्यांचे पायपुसणे कसे करायचे ते दाखवले.. झालं...!!!!! मग मला पण ते बनवायचं होतं.... नि नेमक्या मला आवडलेल्या साड्या आईच्या चांगल्या रोजच्या वापरातल्या होत्या... तिनं व्हेटो वापरला... मी भोकाड पसरलं... नि त्याची परिणीती आईनं मला चांगलंच बदडण्यात झाली... कुठे शिकलीये कोण जाणे.. पण तिचा रँडमायझेशन अल्गोरिदम अगदी पक्का आहे... मी अजूनही तिचा एकही फटका हातावर झेलू शकले नाहीये... मग रूसवा.. फुगवा... असं सगळं होऊन बिचारीनं या सुटीत तुला निदान एक वस्तू बनवू देईन असं सांगितलं... त्यात पण बर्‍याच अटी होत्या... पहिली म्हणजे कात्री वापरायची नाही.. त्याचं कारण असं होतं की एकदा घरातले सगळे झोपले असताना मला नि माझ्या भावाला व्यापार व्यापार खेळायची हुक्की आली होती.. नि मी ट्रंकेत एक कसलंतरी खरेदीखत पाहिलं होतं... त्याच्यावरची नोटांची चित्रे कापून त्यादिवशी आम्ही पैसे म्हणून वापरली होती.... भाऊ लहान म्हणून वाचला.. पण पुन्हा एकदा आईनं रँडमायझेशन अल्गोरिदमचा प्रयोग केला होता... :( बाकीच्या अटी पण अशा बर्‍याचशा अनुभवातूनच बनल्या होत्या...
मग एक दिवस टीव्ही वर बुकमार्क्स कसे बनवायचे ते दाखवले... नि सतत माझी भुणभुण ऐकून कंटाळलेल्या आईनं हार पत्करली.... थोडे कागद.... एक स्केचपेनचं पाकीट... अगदी अंगावर रंगवलं तरी हरकत नाही असा चांगला मळखाऊ पोषाख...... एक कात्री... एवढं सगळं देऊन नि जे काही पराक्रम गाजवायचे ते दिलेल्या सामानावरच... असा दम देऊन एका काल्पनिक रिंगणात बसवून ती गेली...

अगदी सहज सोप्पं होतं ते!!!! कागदाला घडी घालायची... वरती एक छोटेखाने नी खाली तुलनेने थोडा मोठा आकार कापून घ्यायचा... घडी उलगडून त्यावर थोडं रंगकाम..... असा बाकीच्यांच्या दृष्टीनं चांगला निरूपद्रवी प्रकार होता तो...



नंतरही बहिणींनी भरतकाम.. रंगकाम... काहीही केलं मी मध्ये घुसायचं नि त्या दोघींनी गनिमी काव्याने ते प्रयत्न हाणून पाडायचे हे ठरलेलंच असायचं... बिचार्‍याना करण्यापेक्षा निस्तरणंच भारी पडायचं ना... नंतर एका वसतीगृहात रहात होते तेव्हाची गोष्ट!!! हे होतं नोकरी करणार्‍या मुलींचे वसतीगृह.. पण काही विद्यार्थिनीपण तिथे रहायच्या... मी इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवत असल्याने माझ्या ग्रुपमध्ये पण त्यांचाच भरणा जास्त होता... असेच एकदा त्यांच्या परीक्षा चालू होत्या... आम्ही निशाचर... रात्री १-२ वाजता कधीतरी शेजारच्या खोलीत डोकावले तर ती मुलगी पांढर्‍या कागदावर रंगीत खडू.. स्केचपेनने काहीतरी करत होती....
मी म्हटलं.. 'अगं आज पेपर झालाय.. कशाला उगाच जागतेस... मस्त झोप ना!!'
त्यावर तिचं उत्तर होतं..'चेंज एन वर्क इज रेस्ट... मला हे आवडतं.. त्यामुळं मला हे आरामासारखंच आहे. आईच्या वाढदिवसाला मी हे माझ्या हातांने बनवलेलं भेटकार्ड देणार आहे!!!'

अस्सं??? मी लगेच ती नि तिचं ड्रॉईंग याच्या मध्ये..... @)

'मी करू तुला काही मदत चित्र काढायला नि रंगवायला????'

दोन-तीन वर्षांच्या सहवासात तीनंही माझ्यातले सुप्त गुण चांगलेच ओळखलेले.....
'त्यापेक्षा मॅम तुम्ही स्वतःचं छानसं भेटकार्ड बनवा ना!!!!'

दोन कागद, ग्लीटर पेन्स, रंग.. असं काही साहित्य देऊन मला समोरच्या रिकाम्या बेडवर पाठवून तिने सुटका करून घेतली.... मी पण वॉशिंग्टनच्या उत्साहात थोडीफार अक्कल पाजळायचा प्रयत्न केला.. एका कागदावर वेड्यावाकड्या चित्रांनी गिरगटून झाल्यावर कळलं... हे भेटकार्ड जरा जास्तच होतंय.... आपण त्यापेक्षा लहान आकारातलं काहीतरी करायला हवं.... नि मला आठवली... आयुष्यात एकदाच काहीतरी बनवलेली कलात्मक वस्तू... बुकमार्क्स!!!!!! :D

पण कसं बनवणार?? एकदा चित्रकलेच्या बाईंनी हट्टानं इंटरमिजिएट की कसलीशी परीक्षा असते.. ती द्यायला लावली होती.. नि मी माझ्या अपेक्षेप्रमाणं त्यात झक्कपैकी नापास झाले होते.... त्यामुळं तिथंपण बोंब....

मी परत एकदा तिच्या चित्रात डोकं खूपसून....
"हे डिझाईन तुला कसं सुचलं???"

तीनं मी खराब केलेले कागद पाह्यले... माझी एकंदर चित्रकलेतली गती तिला कळली असावी....तीनं एक मेहंदीचं पुस्तक काढून दिलं... मग ते बघून बघून एक काहीतरी बनवलं... नि फ्रेंडशिप डे ला मीच तिला बांधलेली सॅटिनची फीत मागून घेऊन त्याला बांधली...



खूप पण काही चांगलं झालंय असं तरी वाटत नव्हतं... म्हणून जरा वेळ देऊन एक छानसं चित्र काढलं...



पण हे बनवता बनवता माझीच वाट लागली.. नि तसंही चित्रकला काही माझा प्रांतही नाही.. नि तसंही हे इतकं तकलादू वाटत होतं की माझ्या नाजूक हातात यांची अर्ध्या तासात वाट लागली असती... त्यामुळं आता याच्यावर प्रयोग चालू केले...

पहिल्यांदा आणले हँडमेड पेपर्स!!!!


त्यात स्केचपेनांनी तितकीशी रेखीवता नि सफाई येत नव्हती.... म्हणून वेगवेगळ्या रंगांचे फाईनलाईनर्स..... नि वेगवेगळ्या रंगांचे रेशमी धागे..... (धाग्यांचा फोटो काढायचा कंटा़ळा आलाय..)


नि मग.... धडाड धूम....!!!!!




















भेटकार्डे----





यावर फक्त एक पारदर्शक कागद लावला नि त्यावर छानसा संदेश लिहिलं की झाssssssssssssssssssलं.... यातपण अनुभवातून बरेचसे बदल झाले... हँडमेड कागद पण वेगवेगळ्या जाडीचे नि वेगवेगळ्या पोतांचे असतात.. पातळ कागदाला पांढरा ड्रॉईंगचा कागद मजबुती देण्यासाठी वापरत होते.. आता मुद्दाम जाडसर कागदच आणते... जाड रेशमी धागे ओबड्धोबड वाटतात.. तेच जरा पातळ असतील तर नाजुक दिसतात.... गेल्या दीड वर्षांत बरेचसे बुकमार्क्स बनवले.. त्यातल्या बहुतेकांचे फक्त फोटोजच माझ्याकडे आहेत.... :) नि ते माझ्या मित्रमैत्रीणींच्या पुस्तकात मस्त विराजमान आहेत.... अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा अस्मादिक स्वतःवर खूप खूष आहेतच..... नि इतरांनी कौतुक केल्यावर मग तर काय..!!!!! :D गंमत म्हणून चालू केलेला छंद मात्रा आता जास्तच भावलाय... पहिला अतिशय फालतू बुकमार्क मोठ्या प्रेमाने काहीही टोमणे न मारता घेणार्‍या भावाने आता स्वतःला दा विन्ची समजतेस काय म्हणून विचारायला सुरूवात केलीय.... :)


आणखी काही बुकमार्क्स...