Monday, February 15, 2010

आई.. आणि आठवणीतील गाणी!!!

गाण्यांचं आणी आमचं अतूट नातं!!! कोणे एके काळी, जेव्हा लोडशेडिंग नव्हतं.. सटीसहामाशी केव्हा तरी नाहीतर गेला बाजार आठवड्यातून एखाद्या दिवशी लाईट्स नसत तेव्हा, किंवा लहानपणी शेत विकलं नव्हतं तेव्हा, कधी शेंगदाण्याच्या पेरणीसाठी बियाण्यांच्या शेंगा फोडत असताना, तर कधी भुईमुगाच्या वेलाच्या शेंगा तोडताना, कधी दिवाळीत करंज्या करताना.. घरातले सगळेजण एकत्र असायचे.. नि ठरल्यासारखी गाण्यांच्या भेंड्यांना सुरूवात व्हायची.. तशी ती अजूनही होतेच.. :)
यात प्रत्येकाची गायची गाणी ठरलेली. बाबा म्हणजे फक्त मुकेश नि राज कपूर.. आम्हा भावंडाची प्रत्येकाची नवी-जुनी आवड ती निराळीच.. आंणी आई म्हणजे फक्त मराठी गाणी!!!! तिच्या तोंडून मी बरीचशी गाणी ऐकली.. अगदी नकळत्या वयापासून.. त्यातली कित्येक गाणी मी कुठे पाहिलीही नाहीत.. पण लहानपणापासून ऐकत आलेय.. नि बहुतेक सगळी जशीच्या तशी लक्षात आहेत..

सुरूवात कुठून करावी हा प्रश्न तर आहेच.. आज अशीच काही गाणी आठवली आहेत.. काहींचे मधले मधले शब्द विसरले गेलेयत..

आईचं खूप आवडतं गाणं होतं..कविताही म्हणू शकतो तिला... दिव्याची कहाणी...!!! जणू काही दिवा आपल्या आयुष्याची स्थित्यंतर सांगतोय... तशा लहानपणातल्या सगळ्याच गोष्टी ठळकपणे आठवत नसल्या तरी काही गोष्टी मात्र मेमरीत अगदी फिट्ट बसल्या आहेत.. या गाण्याची आठवण झाली.. की मी आईच्या मांडीवर बसलेय, नि ती अंगणात बसून मला हे गाणं ऐकवतेय हेच दृष्य आठवतं..



आधी होते मी दिवटी ,
शेतकर्‍यांची आवडती
झाले इवली मग पणती
घरांघरांतून मिणमिणती!!
समई केले मला कुणी,
देवापुढती नेऊनी
तिथून आले बाहेर,
ओकीत काळासा धूर!!!
काचेचा मग महाल तो,
कुणी बांधूनी मज देतो,
कंदील त्याला जन म्हणती,
मीच तयातील परि ज्योती!!!
बत्तीचे ते रूप नवे,
पुढे मिळाले मज बरवे,
झगमगाट तो कसा पडे,
वरात मज वाचून अडे!!!
आता झाले मी बिजली,
घरे मंदिरे लखलखती
देवा ठाऊक काय पुढे
नवा बदल माझ्यात घडे!!
एकच ठावे काम मला
प्रकाश द्यावा सकलांना
कसलेही मज रूप मिळो
देह जळो अन जग उजळो!!!



मी तशी जाम रडूबाई होते.. म्हणजे काहीतरी आगाऊपणा करणे,त्याबद्दल आईचा किमानपक्षी ओरडा नि कमालपक्षी मार खाणे.. चालूच असायचं!!! आजही जास्त फरक पडलाय असं नाही.. फक्त आता मार पडत नाही :D घरी जसं सगळ्यांना गाण्यांचं वेड, तसंच पुस्तकांचंही.. आम्हा भावंडाना परीक्षेच्या दिवसांत अभ्यासाच्या पुस्तकांत घालून अवांतर पुस्तके वाचताना रागवणारी आई आता माझी भाचरंही तोच उद्योग करताना पाहून दोघी बहिणींची जाम खेचते...(इतिहासाची पुनरावृत्ती इथेही झालीच!!!)
असंच पहिलीत असेन-नसेन.. कुठलंसं पुस्तक माझ्या हातात.. त्यामुळे आता ही काही गोंधळ घालणार नाही म्हणून आईही निवांत.. तोच आधी मुसमुस.. आणी नंतर हुंदके सुरू झाले तेव्हा ती घाबरली.. बरं, का रडतेय हे ही मी सांगायला तयार नव्हते.. ती बिचारी जाम गोंधळात!! शेवटी कसे कोण जाणे पण तिने हातातले पुस्तक काढून घेतले तेव्हा तिला कळाले, की मी हिरकणीची गोष्ट वाचून रडत होते!!!! :| (त्यानंतर कित्येक दिवस घरी पुस्तक असूनही तिने मला शामची आई पुस्तक वाचू दिले नव्हते. :( ) अशीच आणखी एकदा बालपणीच्या रडण्याची आठवण आहे, ती श्रावणबाळाचे कथा ऐकली तेव्हाची!!! यावर आईने एक गाणे ऐकवले होते....

शर आला तो धावूनी आला काळ,
विव्हळला श्रावण बाळ..
हा ! आई गे ! दीर्घ फोडूनी हाक
तो पडला जाऊन झोक
ये राजाच्या श्रवणी करुणा वाणी
हृदयाचे झाले पाणी
त्या ब्राह्मण पुत्रा बघुनी
शोकाकुल झाला नृमणी
आसवे आणुनी नयनी
तो वदला हा हंत तुझ्या नाशाला
मी पापी कारण बाळा
मग कळवळूनी
नृपास बोले बाळ
कशी तुम्ही साधीली वेळ
मम म्हातारे माय-बाप तान्हेले
तरुखाली असती बसले!!!


यापुढच्या ओळी आता आठवत नाहीत.. :)

लहानांनाच काय, मोठ्यांनाही गोष्टी वाचयला आवडतात..आई सांगते मी चालायला, बोलायला नि वाचायलाही अंमळ जास्तच लवकर शिकले होते.. मी तेव्हा एक वाचली होती, की काहीतरी होते, नि वार्‍याच्या अंगाला खाज सुटते.. मग तो वारा वेळूच्या बनात जातो, आणी अंगाची खाज शमवतो. त्या गोष्टीच्या शेवटी असा धूसर दिसणारा वारा, वेळूचं बन असलेलं चित्र होतं.. नि भरीस भर म्हणजे त्या धूसर आकाराला चेहरा ही होता.. मग मी आईकडे तसा दिसणारा वारा दाखव असा हट्ट धरला होता..!!!! :party: आधी रूसणं.. फुगणं.. मग आईचा थोडाफार रॅंडमायझेशन अल्गोरिदम प्रयोग.... सगळं सगळं झालं.. तेव्हा आईच्या मदतीला एक कविता धावून आली...

घाल घाल पिंगा वार्‍या माझ्या परसात
माहेरी जा सुवासाची कर बरसात
सुखी आहे पोर सांग आईच्या कानात
आई भाऊसाठी परी मन खंतावतं
विसरली का गं भादव्यात वर्स झालं
माहेरीच्या सुखाला गं मन आसवलं
फिरुन फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा गं शेव ओलाचिंब होतो
काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार
हुंगहुंगुनिया करी कशी गं बेजार
परसात पारिजातकाचा सडा पडे
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे
कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी माय
आले भरुन डोळे पुन्हा गळा ही दाटला
माऊलीच्या भेटीसाठी जीव व्याकुळला



आमच्या घराला अंगण होतं.. पण परसदार नव्हतं.. घरी फुलांचं झाडही नव्हतं.. मग बिचारा वारा येणार कसा??? मग माझी आई वारा कसा काय मला दाखवू शकणार होती??? माझं तेव्हढ्यापुरतं समाधान झालं.. पण त्यानंतर जेव्हा आम्ही आजोळी गेलो, तेव्हा कुणालाही न भेटता स्वारी सरळ परसात!!! तिथे जास्वंदीचं आणी विलायती चिंचांचं झाड होतं... तिथं जाऊन मी बराच वेळ वारा कधी तिथे पिंगा घालायला येतो याची वाट बघत बसले होते.. :(


आज इथेच थांबतेय.. अजूनही काही गाणी डोक्यात आहेत.. त्यांच्याबद्दल पुन्हा कधीतरी!!! तुमच्याकडूनही येऊ देत अशी आठवणीतली गाणी!!!!!!

No comments: