तसं पाहता गेलं तर माझं नी एखाद्या कलेचं एकदम वाकडं... म्हणजे एखादं काम करायला लागणारी नजाकत कशाशी खातात हेच माहीत नाही.. त्यामुळं आईच्या भाषेत माझ्याकडे एखादं नाजूक काम... म्हणजे फक्त 'धडा'चा विध्वंस!!!! नी याबाबतीत घरी तसंही कुणाचं दुमत नाही...
लहानपणी जेव्हा दूरचित्रवाणीवर फक्त दूरदर्शनचं राज्य होतं.... तेव्हा मोजकेच कार्यक्रम असायचे.. नि लोक कार्यक्रमाच्या वेळा सांभाळून आपली कामं करायचे... पुन:प्रक्षेपण पण तितकंसं व्हायचं नाही.. नि झालं तरी त्याच्या आगाऊ सूचना तर नसतच नसत.... नि नेमके हे दिल्ली दूरदर्शनवाले लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांत काहीतरी टाकाऊतून टिकाऊ बनवायला शिकवणारे कार्यक्रम लावायचे.. नि मला याची भयंकर चीड यायची.. एकतर माझ्या वयाच्या लोकांवर ताईगिरी केल्याने माझ्या मित्रमैत्रिणी माझ्यासोबत खेळायला तयार नसायच्या.. नि म्हणून आईकडून बहिणींच्यावर खेळण्यासाठी दट्टया आणायचा तर त्यांना हे असले काहीतरी प्रकार टीव्ही वर बघायचे असायचे...
एकदा असंच मला बळेबळे टीव्ही समोर बसायला लावलं होतं.... नि आईच्या दुर्दैवानं त्यादिवशी जुन्या साड्यांचे पायपुसणे कसे करायचे ते दाखवले.. झालं...!!!!! मग मला पण ते बनवायचं होतं.... नि नेमक्या मला आवडलेल्या साड्या आईच्या चांगल्या रोजच्या वापरातल्या होत्या... तिनं व्हेटो वापरला... मी भोकाड पसरलं... नि त्याची परिणीती आईनं मला चांगलंच बदडण्यात झाली... कुठे शिकलीये कोण जाणे.. पण तिचा रँडमायझेशन अल्गोरिदम अगदी पक्का आहे... मी अजूनही तिचा एकही फटका हातावर झेलू शकले नाहीये... मग रूसवा.. फुगवा... असं सगळं होऊन बिचारीनं या सुटीत तुला निदान एक वस्तू बनवू देईन असं सांगितलं... त्यात पण बर्याच अटी होत्या... पहिली म्हणजे कात्री वापरायची नाही.. त्याचं कारण असं होतं की एकदा घरातले सगळे झोपले असताना मला नि माझ्या भावाला व्यापार व्यापार खेळायची हुक्की आली होती.. नि मी ट्रंकेत एक कसलंतरी खरेदीखत पाहिलं होतं... त्याच्यावरची नोटांची चित्रे कापून त्यादिवशी आम्ही पैसे म्हणून वापरली होती.... भाऊ लहान म्हणून वाचला.. पण पुन्हा एकदा आईनं रँडमायझेशन अल्गोरिदमचा प्रयोग केला होता... :( बाकीच्या अटी पण अशा बर्याचशा अनुभवातूनच बनल्या होत्या...
मग एक दिवस टीव्ही वर बुकमार्क्स कसे बनवायचे ते दाखवले... नि सतत माझी भुणभुण ऐकून कंटाळलेल्या आईनं हार पत्करली.... थोडे कागद.... एक स्केचपेनचं पाकीट... अगदी अंगावर रंगवलं तरी हरकत नाही असा चांगला मळखाऊ पोषाख...... एक कात्री... एवढं सगळं देऊन नि जे काही पराक्रम गाजवायचे ते दिलेल्या सामानावरच... असा दम देऊन एका काल्पनिक रिंगणात बसवून ती गेली...
अगदी सहज सोप्पं होतं ते!!!! कागदाला घडी घालायची... वरती एक छोटेखाने नी खाली तुलनेने थोडा मोठा आकार कापून घ्यायचा... घडी उलगडून त्यावर थोडं रंगकाम..... असा बाकीच्यांच्या दृष्टीनं चांगला निरूपद्रवी प्रकार होता तो...
नंतरही बहिणींनी भरतकाम.. रंगकाम... काहीही केलं मी मध्ये घुसायचं नि त्या दोघींनी गनिमी काव्याने ते प्रयत्न हाणून पाडायचे हे ठरलेलंच असायचं... बिचार्याना करण्यापेक्षा निस्तरणंच भारी पडायचं ना... नंतर एका वसतीगृहात रहात होते तेव्हाची गोष्ट!!! हे होतं नोकरी करणार्या मुलींचे वसतीगृह.. पण काही विद्यार्थिनीपण तिथे रहायच्या... मी इंजिनिअरिंग कॉलेजात शिकवत असल्याने माझ्या ग्रुपमध्ये पण त्यांचाच भरणा जास्त होता... असेच एकदा त्यांच्या परीक्षा चालू होत्या... आम्ही निशाचर... रात्री १-२ वाजता कधीतरी शेजारच्या खोलीत डोकावले तर ती मुलगी पांढर्या कागदावर रंगीत खडू.. स्केचपेनने काहीतरी करत होती....
मी म्हटलं.. 'अगं आज पेपर झालाय.. कशाला उगाच जागतेस... मस्त झोप ना!!'
त्यावर तिचं उत्तर होतं..'चेंज एन वर्क इज रेस्ट... मला हे आवडतं.. त्यामुळं मला हे आरामासारखंच आहे. आईच्या वाढदिवसाला मी हे माझ्या हातांने बनवलेलं भेटकार्ड देणार आहे!!!'
अस्सं??? मी लगेच ती नि तिचं ड्रॉईंग याच्या मध्ये..... @)
'मी करू तुला काही मदत चित्र काढायला नि रंगवायला????'
दोन-तीन वर्षांच्या सहवासात तीनंही माझ्यातले सुप्त गुण चांगलेच ओळखलेले.....
'त्यापेक्षा मॅम तुम्ही स्वतःचं छानसं भेटकार्ड बनवा ना!!!!'
दोन कागद, ग्लीटर पेन्स, रंग.. असं काही साहित्य देऊन मला समोरच्या रिकाम्या बेडवर पाठवून तिने सुटका करून घेतली.... मी पण वॉशिंग्टनच्या उत्साहात थोडीफार अक्कल पाजळायचा प्रयत्न केला.. एका कागदावर वेड्यावाकड्या चित्रांनी गिरगटून झाल्यावर कळलं... हे भेटकार्ड जरा जास्तच होतंय.... आपण त्यापेक्षा लहान आकारातलं काहीतरी करायला हवं.... नि मला आठवली... आयुष्यात एकदाच काहीतरी बनवलेली कलात्मक वस्तू... बुकमार्क्स!!!!!! :D
पण कसं बनवणार?? एकदा चित्रकलेच्या बाईंनी हट्टानं इंटरमिजिएट की कसलीशी परीक्षा असते.. ती द्यायला लावली होती.. नि मी माझ्या अपेक्षेप्रमाणं त्यात झक्कपैकी नापास झाले होते.... त्यामुळं तिथंपण बोंब....
मी परत एकदा तिच्या चित्रात डोकं खूपसून....
"हे डिझाईन तुला कसं सुचलं???"
तीनं मी खराब केलेले कागद पाह्यले... माझी एकंदर चित्रकलेतली गती तिला कळली असावी....तीनं एक मेहंदीचं पुस्तक काढून दिलं... मग ते बघून बघून एक काहीतरी बनवलं... नि फ्रेंडशिप डे ला मीच तिला बांधलेली सॅटिनची फीत मागून घेऊन त्याला बांधली...
खूप पण काही चांगलं झालंय असं तरी वाटत नव्हतं... म्हणून जरा वेळ देऊन एक छानसं चित्र काढलं...
पण हे बनवता बनवता माझीच वाट लागली.. नि तसंही चित्रकला काही माझा प्रांतही नाही.. नि तसंही हे इतकं तकलादू वाटत होतं की माझ्या नाजूक हातात यांची अर्ध्या तासात वाट लागली असती... त्यामुळं आता याच्यावर प्रयोग चालू केले...
पहिल्यांदा आणले हँडमेड पेपर्स!!!!
त्यात स्केचपेनांनी तितकीशी रेखीवता नि सफाई येत नव्हती.... म्हणून वेगवेगळ्या रंगांचे फाईनलाईनर्स..... नि वेगवेगळ्या रंगांचे रेशमी धागे..... (धाग्यांचा फोटो काढायचा कंटा़ळा आलाय..)
नि मग.... धडाड धूम....!!!!!
भेटकार्डे----
यावर फक्त एक पारदर्शक कागद लावला नि त्यावर छानसा संदेश लिहिलं की झाssssssssssssssssssलं.... यातपण अनुभवातून बरेचसे बदल झाले... हँडमेड कागद पण वेगवेगळ्या जाडीचे नि वेगवेगळ्या पोतांचे असतात.. पातळ कागदाला पांढरा ड्रॉईंगचा कागद मजबुती देण्यासाठी वापरत होते.. आता मुद्दाम जाडसर कागदच आणते... जाड रेशमी धागे ओबड्धोबड वाटतात.. तेच जरा पातळ असतील तर नाजुक दिसतात.... गेल्या दीड वर्षांत बरेचसे बुकमार्क्स बनवले.. त्यातल्या बहुतेकांचे फक्त फोटोजच माझ्याकडे आहेत.... :) नि ते माझ्या मित्रमैत्रीणींच्या पुस्तकात मस्त विराजमान आहेत.... अपेक्षेप्रमाणे पुन्हा एकदा अस्मादिक स्वतःवर खूप खूष आहेतच..... नि इतरांनी कौतुक केल्यावर मग तर काय..!!!!! :D गंमत म्हणून चालू केलेला छंद मात्रा आता जास्तच भावलाय... पहिला अतिशय फालतू बुकमार्क मोठ्या प्रेमाने काहीही टोमणे न मारता घेणार्या भावाने आता स्वतःला दा विन्ची समजतेस काय म्हणून विचारायला सुरूवात केलीय.... :)
आणखी काही बुकमार्क्स...
1 comment:
उत्कृष्ट वा !!
Post a Comment