Monday, February 15, 2010

गाणी.. आईच्या आठ्वणीतली .. २

भा. रा. तांबेंशी ओळख तशी खूपच लवकर झाली.. घरी एक पाठ्यपुस्तक होते... सगळी चित्रे हिरव्या रंगात छापलेली होती.. (अंमळ हिरवा माज त्याकाळी भारतात होता की काय!!!) नि त्यात कविता होती:

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रृ ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्‍यांची कोंडी फोडीत, पाडीत वीर इथे आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजली,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

जन पळभर म्हणतील.. अथवा नववधू... ही प्रकर्णं आयुष्यात त्यानंतर जवळजवळ ७-८ वर्षांनी आली... आणी हे गाणे ऐकवल्यानंतर आईने झाशीच्या राणीची गोष्ट सांगितल्याने ते अधिकच आवडले... गाताना अगदी जोशात येऊन मी हे गाणे म्हणत असे.. तसे गाण्याच्या तालासुरांच्या बाबतीत मी अतिशय स्वतंत्र विचारांची आहे.. त्यामुळे गाणे आहे त्या तालासुरात तर जाऊच दे, पण प्रत्येक वेळेस वेगळ्याच चालीत येते.. आता याला कुणी मला चालीत गाणं म्हणता येत नाही असं म्हणत असतील म्हणोत बापडे... ज्याची त्याची जाण, समज इ.इ. म्हणून तो विषय मी सोडूनच देते कसा??? :)

लहानपणी आमच्या बंधुराजांना खाऊ घालणे हा एक मोठा सोहळा असायचा.. हा खाण्याच्या बाबतीत अतिशय आळशी.. मग त्याला बाबापुता करून खायला घालायला लागायचं... तेव्हा आई त्याच्यासाठी एक गाणं म्हणायची,
दिपका मांडिले तुला सोनियाचे ताट
घडविला जडविला चंदनाचा पाट
घरदार प्रकाशाने भरी काठोकाठ
दारी आलेल्याची सोपी करू पायवाट
कुतू काऊ चिऊ माऊ या रे सारे या रे
सांडलेली गोड शिते उचलून घ्या रे
गा रे राघू गा रे मैना बाळाच्या या ओळी
मुखी घालू तुमच्याही दुधातली पोळी
गुणी माझा बाळ कसा मटामटा जेवी
आयुष्याने थोर करी माये कुलदेवी!!!

तर आमच्या या गुणी कुलदिपकाला या गाण्याची इतकी सवय लागली, की हे गाणं म्हटल्याशिवाय त्याच्या घशाखाली घास उतरेनासा झाला.. नि आईने त्याला सवय तर लावली, पण नंतर तिला काम असल्याने त्याला भरवायचे काम माझ्याकडे आले.. मी या गाण्याला कंटाळून एक-दोनदा दुसरं गाणं गायचा प्रयत्न केला... तर लगेच याने भोकाड पसरलन्!!!! मग त्याचे जेवण होईपर्यंत या गाण्याची आवर्तने करावीच लागायची!!! :(

आणखी एक गाणं होते.... त्यात मला एक नवीन शब्द मिळाला होता, 'चटोर'. मला आजवर फक्त खाण्याचे चिरोटेच माहित!!! त्यातल्या शब्दांची अदलाबदल केल्यावर अर्थाचा कसला अनर्थ होतो.. मला तो शब्द जाम आवडला होता.. मी उगाच कुरापत काढून सापडेल त्याला चटोर म्हणत सुटले होते..

गाई पाणयावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही हा मिळाल्या
उभय पितरांचया चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला
तुला लंकेच्या पार्वती समान
पाहनीया होवोनी साभिमान
काय तयातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"
पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूतसंगे सुमहार का भिकारी??
कशी तुही मग मज मुळी भिकारी?
नारीमायेचे रोप हे प्रसिद्ध
सोस लेणयांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचित पुरविता न ये त्यांचे
तदा बापाचे हदय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते
देव देतो सदगुणी बालकांना
काय म्हणूनी आम्हांस करंट्यांना?

हे गाणं मला निखिल, विवेक मोडक आणि संग्रामने पाठवलेल्या बालभारतीच्या पुस्तकात मिळाले.. पण त्यात मला माहित असलेल्या
"मुली असती शाळेतल्या चटोर,
एकमेकींना बोलती कठोर"
या ओळी नाहीत!!! कशा विसरतील म्हणा??? लहान भावाला आंघोळ घालायला शेजारच्या एक आजी यायच्या.. आणि आंघोळ घालताना भाऊ रडायचा.. मला वाटायचं की या आजी त्याला मुद्दाम रडवतात.. मग त्यांना चटोर म्हटल्याबद्दल चांगलाच प्रसाद मिळाला होता!!! :|
चला.. आजच्या आठवणी इथेच थांबवते!!!

No comments: