नुसतं ठरवून काय होतं..??? सामानाच्या जुळवाजुळवीला लागले... यापूर्वी या क्षेत्रात ढवळाढवळ केली नव्हती... त्यामुळे End product कसे होईल याबद्दल जरा साशंकच होते.. सगळ्यात आधी आणले रंग.. ते काय fevicol चं पाकीट मिळतं, तेच आणले होते.. मग काचेचा बाउल.. एक बर्यापैकी आकाराचा.. खूप लहान नाही खूप मोठा नाही.. पहिलाच प्रयत्न होता. म्हणून उगाच जास्त महागही नाही.. झालं.. जो काही कच्चा माल बाहेरून हवा होता.. ते साहित्य मिळालं होतं.. पण डिझाईन काही किल्या नक्की होईना.. खूप बाळबोध ही नको होतं.. नि जास्त क्लिष्ट हि नको होतं.. (आखूडशिगीं.. बहुदुधी.. बहुगुणी..सगळंच हवं होतं..) शेवटी यातली आपल्याला अक्कल नाही हे माहित असलेलीच गोष्ट आणखी एकदा मान्य केली नि गुगलोबाला शरण गेले.. बरिचशी चित्रे डाउनलोड केली.. त्यातलं एक नक्कीपण केलं..

आता???? सगळीकडे आधीच बोंबाबोंब केल्याने लोकांनी विचारायला पण सुरुवात केली होती.. कुठवर आलंय काम म्हणून.. होता होता एका सायंकाळी मनाचा हिय्या करून बसले..
पायरी १. बाउल नीट लख्ख पुसून घेतला.. :)
पायरी २. fevicol च्या रंगाचं पाकीट उघडलं.. :D
पायरी ३. त्यात छोट्या ट्युबामधून बरेचसे रंग होते.. नि एक काळ्या रंगाची ट्यूब हि होती.. त्या काळ्या रंगाने रूपरेखा आखून घ्यायची..
यात अडचण अशी होती.. कि हा काळा रंग पटकन सुकतो.. त्यामुळे दुरुस्त्या करण्याची भानगड नाही.. [ म्हणजे वाट लागली].. रूपरेखा आखून बाउल रात्रभर सुकायला ठवून दिला.. चुकून चांगला व्हायचा.. नि माझा हात लागून आईच्या भाषेत "धडाचा विध्वंस" व्हायचा..
पायरी ४. दिवस (खरं तर रात्र ) दुसरा.. आता त्या रूपरेखेत रंग भरायचे होते.. पाणी किंवा तत्सम काही मिसळायचं नाही त्यात.. ती ट्यूब फक्त तिरकी धरायची.. नि रंग भरत जायचे.. इथे दुसराच लोच्या होता.. एकतर रंग पातळ होता.. बाउल चा आकार असा.. की तो सारखा ओघळत होता. त्यामुळे एका ठिकाणी साचलेला गर्द रंग तर दुसर्या ठिकाणी अति पातळ रंग.. नि त्यात भर म्हणजे.. रंग सारखा बुडबुडे धरत होता.. ते फोडणे हे आणखी काम होऊन बसले होते.. त्यात रंगाच्या पाकिटात रंग विविध रंगसंगतीचे नव्हते.. त्यामुळे रंगांची जास्त निवड करायलाही वाव नव्ह्ता.. त्यामुळे जे हातात होतं.. त्यातच जो काही घालायचा.. तो गोंधळ घालायचा होता..
त्या दिवशीच्या अखेरची स्थिती अशी होती..

मग तुकड्या तुकड्यांनी हळूहळू एका बाजूचा रंग सुकेल तसा फिरवून फिरवून.... कुठे चुकून हात लागू नये याची काळजी घेऊन.. साधारण दोन रात्रीत रंगकाम पूर्ण झालं..

पायरी ५. मस्तपैकी निरनिराळ्या कोनातून बाउलचे फोटो काढले.. सगळ्याना दाखवले.. ज्यांनी मनातला भाव लक्षात घेउन तारीफ केली ते बिचारे सुटले.. ज्याना हे नाही कळाले.. त्याना पकडून पकडून त्यांना कित्ती छान.. कित्ती सुरेख असे जबरदस्तीने म्हणायला लावले.. :D


पण ती माझी दुष्ट मैत्रीण.. जिच्यासोबत मला ही आयडीया सुचली होती.. तिने मात्र कौतुक दूरच.. पणतळाचं वर्तुळ नीट आलं नाही म्हणून नाक मुरडलं.... (मेलं कौतुकच नाही ते कशाचं) :(
तसंही बनवायला गेले मारूती नि झाला गणपती त्यातला प्रकार झालाय.. पुरावा दिला आहेच त्याचा.. पण अस्मादिक सध्यातरी स्वतःवर बेहद्द खूष आहेत.. अशीच कधीतरी सणक येईल नि या बाऊलचं रूपांतर कुंडी.. झुंबर किंवा आणि कशात होईल!!! त्या दिवसाची आता मी वाट पाहातेय!!!!! :D
No comments:
Post a Comment