Wednesday, February 15, 2012

माझी मद्रास ची सफर- भाग अंतिम

तसं बरंचसं लिहून झालंय चेन्नई/मद्रास बद्दल... देवांनी तर सविस्तर लिहिलं आहेच.. नि बरीचशी जनता ही तिकडे राहून आल्यामुळेही अनुभव जवळ्जवळ सारखेच असतील... पण माझ्यामते... आणखी एक-दोन गोष्टींच्या उल्लेखाविना ही सफर नक्कीच अपूर्ण राहिल...

पहिली गोष्ट म्हणजे.. दाक्षिणात्यांचं वागणं!!!
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं.. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.. माझ्या पाहण्यातले बरीचशी गुजराती,उत्तर प्रदेशातील कुटुंबे आहेत की ज्यातल्या अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्याना चांगली मराठी नि हिंदी बोलता येते.. जर मराठी बोलता येत नसेल.. तर त्यांना कळते तरी नक्कीच.. माझ्या उत्तरभारतीय मैत्रिणीची मुलगी मराठी पाळणाघरात जाते.. तिच्याशी हिंदी बोलले तरी ती उत्तर मात्र शुद्ध मराठीत देते.. काका-मामा-मावश्या-आत्या-आई-बाबा याना मराठी येतंच... दोन्ही आजी-आजोबाच काय.. पणजोबाही मोडकं तोड़कं का होईना.. तिच्याशी मराठीत बोलतात.. मग हे दाक्षिणात्यच असे का वागतात..?? ज्या ठिकाणी १०-२० वर्षं राहतात.. तिथली भाषा कळत नाही असे का म्हणतात..??
त्यावरचं उत्तर खरंच चपखल आहे.. ते दिलं एका तमिळनाडूमध्ये लहानाचे मोठे झालेल्या एका गुज्जुभाईने.. तर त्यांच्या मते.. "तमिळ माणूस हा स्वतःच्या कोशात राहणारा प्राणी आहे.. त्याच्या मनात काय चालू असेल... कुणीच सांगू नाही शकत.. घरातल्या घरात भावा-भावा मध्ये कोश असतात.. पण जेव्हा प्रसंग दुसर्‍या कुटुंबासोबत येतो.. तेव्हा तो कोश थोडाफार स्वतःच्या कुटंबापुरता विस्तृत होतो.. त्याप्रमाणे जेव्हा आपला प्रदेश सोडून ते बाहेर जातात.. तेव्हा तो कोश आपल्या भाषेपुरताच ठेवतात.. असं म्हणतात की एका ठिकाणी एका मद्राशाला नोकरी द्या.. तो लगेच आपल्या मागे इतरांची रांग लावेल.. तेही या कोश जीवनपद्धतीमुळेच... दुसरी भाषा समजते असं म्हटलं तर त्या कोशात बाहेरचे लोकही येतील असं त्याना वाटतं नि त्यांना ते कोणत्याही परिस्थितीत नको असतं... आता थोडं परिवर्तन येतं आहे.. पण जुनी खोडं बदलणं खरंच अवघड आहे...."
आश्चर्य म्हणजे सगळ्याना हे उत्तर पटलंही.. नि बर्‍याच जणांनी असंही म्हटलं की हे खरं आहे.. पण असं नेमकं शब्दबद्द करणं त्यांना स्वतःलाही जमले नसतं... खरंय!!! आपल्या इथेही दोन पिढितला हा फरक मी खुपदा अनुभवलाय..

असो.. त्या लोकांबद्द्ल खूप झालं.. तुम्हाला माहित आहे.. आपले लोक तिकडे गेले की कसे वागतात???
मी आधीच सांगितलं ना पहिल्या भागात की मला तिथे एक नातेवाईकांकडे जायचं होतं..तर त्यांचा मुलगा बी. एस्सी. च्या प्रथम वर्षात होता.. त्याची माझी ऑर्कुट्वर ओळख झाली.. निरोप्यावर गप्पाही बर्‍यापैकी झाल्या होत्या.. नि त्यामुळेच त्या लोकांना मी तिकडे येणार अशी खबर मिळाली होती.. मी पोचल्यावर त्याला फोन केला.. म्हटलं एवढं मोठं चेन्नई... त्यात मला तमिळ येत नाही.. रिक्षावाल्यंबद्दल पण काही चांगलं ऐकलं नाहिये.. नि २० मिनिटांचंच तर अंतर आहे मोटरसायकल वरून... पण तो बेटा काही यायला तयार नव्हता.. अस्सा राग आला.. कालपर्यंत तर नीट होता.. त्याच्या गावात आले तर याला भाव चढला.. थोड्या घुश्श्यातच कसं यायचं ते विचारलं नि तत्क्षणी आईला फोन करून सांगितलं.. की फक्त तू म्हणतेयस म्हणून जातेय.. पुन्हा जा म्हणून सांगू नकोस..हो म्हणाली बिच्चारी..
बाहेर आल्या-आल्या गेस्टरूमच्या रखवालदाराने सांगितलं की विजेरी वरच्या बसेस दर १५ मिनिटाला येतात.. तिने तुम्हाला मुख्यप्रवेशद्वारापर्यंत जाता येईल..म्हटलं बरं झालं.. नाहीतरी सकाळी ११:३० च्या दरम्यान मी आले होते.. नि त्यावेळी आय आय टी चे आवार म्हणजे एक जंगलच वाटलं होतं.. रस्त्यावर एखदं माणूस कुठेतरी.. नाहीतर.. किर्र झाडी.. मुंबई आय आय टी सारखे सायकलवरून जाणारे विद्यार्थी नाहीत.. एखादी इमारत कुठेतरी.. जाम टरकले होते.. अशा परिस्थितित दुपारी ३-४ वाजता काही वाहन मिळणे कठीण होते.. नशीब या बसेस तरी होत्या..
तर मला जायचं होतं गिंडी स्थानकापासून तिरूमलायै स्थानकापर्यंत.. (हो तेच ते.. तिरूमलायै.. खत्रूड पाटीवालं)!!! आय आय टी च्या मुख्य प्रवेश्द्वारापासून गिंडी पर्यंत रिक्षावाल्याने सांगितल की ४० रू भाडं होईल.. मीटर प्रकरण कुणाच्या गावीही नव्ह्तं.. मी मुंबईकर.. थोडं बारगेन करण्याचा प्रयत्न केला.. कुठलं काय... त्याने भाडं कमी करणं सोडा.. सरळ निघून गेला..!!! त्यानंतर ५०-- ६० अशी चढती भाजणी चालू झाली तेव्हा निमूटपणे ६० रू ठरवले.. नि मंडळी कसचं काय... इथं मुंबईत तेवढ्या अंतराला अवघ्या नऊ रूपड्या मोजतो हो आपण.. (नंतर प्रत्येकवेळी आम्ही तेवढं अंतर चालूनच गेलो!!!) मनात म्हटलं.. अक्कलखाती पडले..!!! रेल्वे दुसर्‍या मजल्यावर येते.. इंडिकेटर मुंबईसारख्या मागास्लेल्या भागात हो.. तिथे सगळे बहुधा विजयकांथ किंवा रजनीकांथ ची दिव्य पॉवर घेऊन येत असावेत.. ट्रेन आली..

Tuesday, February 14, 2012

गोळाबेरीज? छे:, बाकी शून्य!!




 "A picture is worth a thousand words!" हे जर चित्राबद्दल असेल, तर दृकश्राव्य माध्यम तर त्याहून प्रभावी म्हणायला हवं. अर्थात ही झाली अपेक्षा, प्रत्यक्षात तसं होतंच असं नाही हा प्रत्यय बर्‍याचदा येतो. मला ही आला. 'दा विंची कोड', 'शाळा' ही अलीकडली उदाहरणं. त्यात आता पुलंच्या सार्‍या व्यक्तिचित्रांची भर पडलीय. त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच.
सारांश सांगायचा तर, सिनेमात एकंदरीत सगळ्याच गोष्टींची वाट लावली आहे. बालगंधर्व मध्ये नारायणरावांच्या चरित्राचा स्लाईडशो होता असं म्हटलं तर गोळाबेरीज म्हणजे प्रत्येक व्यक्तीचित्र हे एका स्लाईडवरचं बुलेट पॉईंट आहे. चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासातच बरेच जण हजेरी लावून जातात. त्यामुळे व्यक्तिरेखा फुलणं हा प्रकार होत नाही. चितळे मास्तर, हरितात्या, भय्या नागपूरकर, अंतू बर्वा, नाथा कामत एक ना दोन!! प्रत्येकजण आपापल्या व्यक्तिरेखेची चार वाक्यं म्हणतात आणि निघून जातात. उदाहरणार्थ भय्या नागपूरकर आणि कुठल्याशा परांजपे साहेबाला एकेरी संबोधून 'डोन्ट वरी' म्हणणारा बापू अनुक्रमे चाळीस व तीस सेकंदात आणि पाच व चार वाक्यांत आटोपले. यांना न घेताही मग काम चालू शकलं असतंच की. सगळंच दाखवायला हवं हा अट्टहास का? हा प्रश्न पुन्हा एकदा पडला. त्यातल्या त्यात नंदा, गटणे, चितळेमास्तर या लोकांना पुन्हा संधी देऊन त्यांना अगदीच उडवलं नाही हे दाखवतात. पण सगळ्यांच्याच बाबतीत असं म्हणता येत नाही.
पुलंची व्यक्तीचित्रे जशी अजरामर तशीच त्यांनी लिहिलेली वाक्यं माराठी मनावर कोरली गेली आहेत. आमच्या नंदनलाच विचारा, एका क्षणात सटासट दहा वाक्यं फेकेल. तर या अशा वाक्यांची तर चुकीच्या संवादफेकीने अक्षरशः वाट लावलीय. वानगीदाखल सांगायचं तर "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे झंप्या?" हे वाक्य प्रश्नार्थक न येता तारस्वरात विधानार्थी येतं, तसंच "इथं पण ऑटोमॅटिक होतं की कुंथायला लागतं?" या टंग इन चीक वाक्याची तर अगदी फेफे उडवलीय. पुलंनी लिहिलेली वाक्यं कुठं ना कुठं वापरायलाच हवीत या समजाने ती काही ठिकाणी घुसडल्यासारखी वाटतात. सिनेमातले पुलं स्वगत बोलताना चेहर्‍यावर सास बहू सिरियलमधल्या बायकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त हावभाव दाखवतात. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटात नर्मविनोद आणि सटल्टी या दोन गोष्टी जाम हरवून गेल्या आहेत.
दिग्दर्शन कसं असावं याबद्दल जास्त काही बोलता येत नसलं तरी 'किमानपक्षी' कसं असावं याच्या काही माफक अपेक्षा असतात. आनंदवनातलं कथाकथन संपल्यावर बाबा आमटे पुलंना भेटायला येतात. प्रथम दिसतो तो त्यांचा कटिप्रदेश(!) आणि मग कॅमेरा वर जाऊन चेहर्‍यावरती स्थिरावण्याऐवजी तो पाठी जाऊन होऊन आमटे उर्ध्व-अधर दिशेने वाढतात. गदिमांची आई किंवा बायको, "अधून मधून दिसत जा" म्हणते आणि निर्विकार चेहर्‍याने फ्रेममधून निघून जाते. संवाद म्हणताना जर तिचा चेहरा दाखवला नाही, तर नंतर आणि तोही असा दाखवायची गरज काय? तसेच चित्रपटभर नको तिथे संगीत आणि भरीस भर म्हणून क्लोज-अप्सचा भडिमार आहे. नवीन कॅमेरा घेतला की आपण जसे दिसेल ते चेहरे टिपायला लागतो तसे इथे पडदाभर नुसतेच चेहरेच चेहरे दिसतात. पुलं वृद्ध होतात पण त्यांचा मित्र बबडू अगदी तरणाबांड आहे, नंदा प्रधानची आई ही सुद्धा पुलंच्याच वयाची दिसते. नंदा शेवटपर्यंत पहिल्या दृश्यात दिसला तसाच दिसतो, वार्धक्याचा कुठे इतकासा म्हणून लवलेश नाही. त्याची आई कुठल्याही अँगलमधून श्रीमंत-सुखवस्तू बाई वाटत नाही. एक ना दोन!!! इतर गोष्टींबद्दल सांगायचं तर आपला सिनेमा विंटरनॅशनल फिल्म फेष्टिवलमध्ये दाखवला जाणार असल्याची खात्री असल्याने सगळ्या पाट्या विंग्रजीत आहेत. पुलंच्या कथाकथन आणि इतर गोष्टी सांगताना त्यांचे दोन-चारच फोटो पुन्हा पुन्हा दाखवलेयत.सिनेमात अधून मधून रंगमंचावर मनोज जोशी पुलंच्या रूपात कथावाचन करताना दिसतात. मूळ पुलंचा फोटो आहे, आणि वर निखिल रत्नपारखी पुलं जगत असतोच. इतके तीन तीन पुलं का हाही एक प्रश्न आहे. आदरांजली म्हणून मूळ पुलं नी असण्याशी मला हरकत नाही. मग निखिल रत्नपारखी आणि मनोज जोशी दोघे कशाला हवेत? एकानेच काम काम भागलं नसतं का? असो. सिनेमात पुलंची आई अगदी सर्वसामान्याला अगम्य (म्हणे शुद्ध गोवन) असलं कोंकणी बोलते. तीच गोष्ट सुनिताबाई आणि पुलंच्या लग्नाची. तिथे पण तीन फोटो(तीन सेकंदां)त त्यांचे प्रेमप्रकरण आणि लग्न आटोपून नंतर लक्षात न राहिलसं पाच मिनिटांचं गाणं खर्ची घातलंय. (बहुधा 'आहे मनोहर तरी' मध्ये वाचल्याप्रमाणे दोघांची भेट कॉलेजात शिकवताना न होता संघाच्या हापिसात झाली होती, आणि बर्‍याच ठिकाणी वाचल्याप्रमाणे लग्न घरातल्याच साडीवर नोंदणी पद्धतीने झाले होते. ते इथे शालू नेसून विधीवत होते.)
बाकी, काय बरं आहे हे सांगायचं तर शेवटाकडे चितळे मास्तर सॉल्लीड जमून आले आहेत, रावसाहेब मस्त रंगलेयत आणि 'इंद्रायणी काठी' हे गाणं छान जमून आलंय, आणि त्यातल्या त्यात सुनिताबाईच काय त्या आपला आब आणि भूमिकेचा बाज सांभाळून आहेत. थोडक्यात सिनेमाला माझ्याकडून दहापैकी अर्धा गुण. पुलं प्रेमींनी आणि एकूणच रसिकांनी पिक्चर न पाहता त्यांचं कोणतंही पुस्तक कुठल्याही पानाशी उघडावं आणि वाचावं.