Friday, November 19, 2010

कणेकरी!!!

एके रात्री निद्रादेवी आमच्यावर अंमळ रूसली.. नि एका बेसावध क्षणी मी पुस्तकांचे कपाट उघडले.. नाहीतरी शनिवारची जंगी खरेदी खुणावत होतीच.. मोठं पुस्तक आख्खी रात्र खाईल म्हणून छोट्सं नि हलकंफुलकं पुस्तक निवडलं-- कणेकरांचं गोतावळा.. पुढे दोन-अडीच तासांत  ते संपलं नि मी बाजूला ठेवलेलं झाडाझडती पुन्हा उचललं हे काय आता वेगळं सांगायला हवं?

कणेकर कोणे एके काळी सामनाच्या रविवारच्या पुरवणीतून शब्दचित्रं रेखाटायचे त्याचं हे संकलन. गोतावळा म्हणजे शिवाजी पार्काच्या कट्ट्यावर जमणारे इरसाल लोक.. नि अर्थातच त्यांचं शब्द चित्रण. प्रस्तावनेतच कणेकर म्हणतात की ,"यावेळच्या लेखात हवी तशी हजामत नाही झाली" असे अभिप्राय त्यांना मिळाले.. आपण हजामत केल्यासारखी लोकांची खेचतो हे त्यांना स्वत:लाच आवडले नाही.. मग त्यांनी त्या लोकांना यावर खास छेडताच असे काही नाही, उलट आमची लोकप्रियताच वाढली  असे सर्वांनी त्याना सांगितले, असे कणेकर म्हणतात!!!! त्यांच्या या गोतावळ्यात अविनाश खर्शीकर, नंदू जूकर, संजय मोने, बाळ ठाकरे, ओ. पी. सारखी सुमारे बावीसशे व्यक्तीचित्रे आहेत..

पुस्तक वाचायला जसं हवं होतं तसं  हलकेफुलके आहे.. नि काही अपवाद वगळता , उदा. त्यांचा मावसभाऊ सुभाष, कर्णिक वकील, ते लेखातून हजामत करतात हे वाक्य अगदी पटले.. चारपानी लेखाची पहिली ३ पाने त्या व्यक्तीचित्राची वाट लावण्यात खर्ची पडतात.. नि राहिलेल्या जागेत कधी आणखी एखादा राहिलेला अनुभव आणि  "मेल्या माणसाबद्दल वाईट बोलू नये" च्या चालीवर त्या माणसाबद्दल शेवटी कुठेतरी चांगलं लिहिलं आहे...

सांगायचंच झाले तर अविनाश खर्शीकर बद्दल, "काहीही फुकट मिळेल ते घेऊन ठेवणारा माणूस.. मग ते मित्राच्या गाडीतले प्लास्टीकचे फनेल का असेना", "अवीच्या घरात अन्न शिजत नाही","अविनाशची दोन्-तीन वर्षांनी एकदा होणारी पार्टी म्हणजे एका वड्याच्या बदल्यात आपल्याला त्याला किमान चाळीस चिकनची जेवणं खायला घालणं", "त्याला नाटकाला सेटस लागत नाहीत, लाइटिंग लागत नाही, प्रेक्षकही लागत नसावेत" इ. इ. ओ पी नय्यरच्या तिरसटपणाबद्दलही तेच.. एकूण काय, थोडक्यात 'हजामतच!!'

या हजामतीत एक प्रकरण त्यांनी स्वतःवरही खर्ची घातलंय. स्वतःलाही थोडेफार चिमटे काढले आहेत, पण इतरांच्या चिमट्यांच्या तुलनेत हे काहीच नाहीत. त्यांच्याच गोतावळ्यातल्यातले एक संपादक कणेकरांनी चित्रपट समीक्षकांवर(यांत कणेकरही होते) कणेकरी शैलीतल्या लेखावर काट मारताना, "आपणच आपल्याला मारलेली थोबाडीत आपल्याला लागत नाही" असे म्हणतात ते इथे अगदी पटले..

थोडक्यात काय?
अगदीच न वाचले तरी काही हुकल्याची खंत नाही.. वाचलं तरी वेळ अगदीच वाया गेला असेही नाही छापाचे पुस्तक!!!

टीपः सदर परिचय छोटा डॉन यांना समर्पित!!!!

आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ जोशी. मनात खोल दडून राहिलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक.. आता आठवत देखील नाही त्यांच्याबद्दल प्रथम केव्हा ऐकले. कन्या शाळेत शिकत असताना दर शारदोत्सवात आठवडाभर व्याख्यानं असायची, कधी तांब्यांची मनू, कधी आनंदीबाई, कधी चाँदबीबी तर कधी राणी चन्नम्मा.. तेव्हाच तिची कथा मनात खोल दडून राहिली.. तासाभराच्या व्याख्यानात नुसती तोंडओळख झाली.. पण तेवढ्याने मन भरत नव्हते. आणखी काहीतरी हवे होते. त्याकाळी स्त्री शिक्षणालाच इतका विरोध होता, मग ही कशी शिकली? ते पण सासरघरी? नवरा साधा पोष्टात कारकून, मग त्याचा ’अभिमान’ नाही का झाला? ती परदेशात शिकायला गेली, एकटीने एवढा प्रवास करण्याइतका आत्मविश्वास, सामर्थ्य तिच्यात आले कुठून? काय अडचणी आल्या असतील, कशी मात केली असेल त्यावर? अवघ्या एकविसाव्या वर्षी वारली... कितीतरी प्रश्न.. सगळेच तेव्हा अनुत्तरीत!!!! कधीकाळी म्हणे दूरदर्शनवर मालिका लागायची. पण तेव्हा घरी टिव्ही नव्हता. आणि तीही पाहायची राहून गेली.. मग आनंदी-गोपाळ पुस्तक आहे असे कळाले, पण तेही कुठे मिळेना.. असा पाठशिवणीचा खेळ चालूच होता..

नंतर कधीतरी कॉलेजच्या विश्वस्तमंडळाने एका शिबिराला पाठवले होते. त्यात सगळ्याच कॉलेजातली विविध शाखांमधली विविध विषय शिकवणारी मंडळी होती. ट्रेनमध्ये चाललेली माझी चौफेर टकळी थांबवण्यासाठी एका उपप्राचार्यांनी विचारले, “काय गं, नुसतीच बडबडतेस की काही वाचतेस सुद्धा??” आणि मग मी काय काय वाचलंय यापेक्षा काय काय वाचायचंय याचीच लांबड लावली. त्यात पुन्हा एकदा आनंदी गोपाळ होतंच. परत आलो, आणि एक दोन दिवसांतच त्यांचा फोन आला, “आनंदी गोपाळ तर नाही मिळाले, पण एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्या दोघांचा पत्रव्यवहार आहे, हवा असेल तर घेऊन जा.” त्यांचे कॉलेज कँपसमध्येच. पण आर्टस, कॉमर्स आणि सायन्स या तिन्हींची वेगवेगळी काँबिनेशनची एकूण पाच कॉलेजं अधिक बीएड, एम एड चा खिचडी असलेली एक मोठीच्या बिल्डींग आहे. त्यात चार प्रवेशद्वारे, आणि आत गेले की जाम भुलभुलैय्या!!! विचारत विचारत त्यांच्या केबिनपाशी जाऊन पोचले आणि चार चार वेळा धन्यवाद देत ते पुस्तक घेऊन आले.

अधाशासारखं आल्या आल्या लगेच वाचूनही काढलं.. आधी गोपाळराव कसे असतील, त्यांचे जीवनमान आनंदी अमेरिकेला जाण्याआधी आणि नंतर कसे असेल, अशी उत्सुकता होती.. बायकोला शिकवले, अगदी परदेशात पाठवले याचा समाजाने त्यांना त्रास दिला असेल, हेटाळणी केली असेल.. त्यात हे पडले पुरूष. स्त्री एक वेळ पुरूषाचा उत्कर्ष सहन करू शकेल, पण याच्या उलटे न होण्याचाच तो काळ. एक ना अनेक प्रश्न. वाचू लागले, मात्र आता प्रत्येक पानागणिक त्यांचा राग येऊ लागला होता.. आनंदीबाईंची पत्रे तिकडून प्रेमाची , काळजीने ओथंबलेली आणि इकडून यांची रागे भरणारी.

एकदा त्यांनी नवर्‍याला त्यांचा फोटो पाठवला, तर त्यांचे लक्ष बायकोऐवजी त्यांचे त्यांच्या उडणार्‍या पदराकडेच.
“तुमची तस्बीर बघितली, तुमच्या आणि आमच्या पितरांना स्वर्गामध्ये आनंदाच्या उकळया फुटल्या असतील ना? कुणाकडे बघून हसताय? पदर सरळ्सरळ ढळलेला दिसतोय” आणि अशीच नाउमेद करणारी वाक्ये. काय वाटले त्यांना तेव्हा? एकतर परका देश, वेगळे राहणीमान, त्यातच आपल्या नऊवारी नेसण्याच्या पद्धतीमुळे पोटर्‍या उघड्या पडायच्या, थंड हवा बोचत असे, आणि त्यात असे हे आपल्यात माणसाकडून मनावर ओरखडे!!!!

आणखी एक पत्र आठवतेय, गोपाळराव विलायतेत असतानाचे पत्र. ते अमेरिकेत होते, पण आनंदीबाई ज्या शहरात होत्या, त्या गावात नव्हते. तेव्हाचे त्यांचे ते पत्र तर अतिविषारी होते. “अमेरिकेत राहून आता तुमचे श्रीमंती चोचले चालू झाले. हे मानवत नाही, ते मानवत नाही, अमक्याने डोके दुखते, तमक्याने कळा येतात.. या चोचल्यांत माझ्यासारखा गरीब मनुष्य कुठे बसणार देव जाणे. आता माझीही तुम्हाला अडचण वाटायला लागली असेल!!!”
आणि हे कमी की काय म्हणून तुम्हाला भेटायला आल्यावर मी कसे वागावे याला उत्तर देताना त्याच पत्रात ते पुढे लिहितात, “मी स्टेशनवर उतरल्यावर इतर अमेरिकन स्त्रियांप्रमाणे तुम्ही मला आलिंगन देऊन ओष्टचुंबन देत आहात आणि इतर अमेरिकन स्त्रीपुरूष टाळ्या वाजवत आहेत, हे दृश्य माझ्यासमोर उभे राहिले. हा हिंदु संस्कृतीचा घात घालणारे चित्र आहे. मला असे थिल्लर वागणे जमणार नाही. निरनिराळे लोक आपल्याबद्दल निरनिराळे बोलतात.. तुम्हांला हे उत्तम जमेल!! कसे वागायचे हे आपण ठरवलेले असेलच!!!” अशा पत्राने नवर्‍याबद्दल प्रेम उत्पन्न होण्याऐवजी धास्तीच यायची त्याच्या विक्षिप्तपणाची. कदाचित त्यामुळेच एकदा आनंदीबाईंनी, त्या चोळीऐवजी शर्ट वापरत तेव्हा साडी शर्टाला पिन-अप करण्यासाठी पिन पाठवण्याविषयी लांबलचक स्पष्टीकरण लिहिले होते. विखार आणि डंखांनी भरलेली ती गोपाळरावांची आधीची लांबलचक आणि नंतरची त्रोटक होत गेलेली ती पत्रे. सतत त्यात कुत्सित विचार भरलेले.. त्यांची घायाळ करणारी संभाषणे वाचून तर माझ्या मनाची तडफड झाली होती.. थोडेसे चरफडतच मी ते पुस्तक संपवले.

मिपावर हळूहळू लिहायला लागले, ओळखी झाल्या. आणिक एक दिवस असाच एक वाचनवेडा मित्र भेटला. त्यालाही आनंदी गोपाळ कसे हवेय वगैरे पुन्हा एकदा रामायण सांगून झाले. माझ्या नाही, परंतु त्याच्या शोधाला यश आले, आणि एक दिवस पुस्तक माझ्या पदरात नाही, पण हातात तरी पडलेच. दुसर्‍या दिवशी काही कारणांनी कॉलेज बुडवायचे होतेच, त्यामुळे सकाळी वेळेत उठण्याची चिंता नव्हती. पहाट होता होता पुस्तक वाचून संपलंही होतं.

आतापर्यंत फक्त पुण्याच्या राजा केळकर वस्तुसंग्रहालयात तिने मैत्रिणींसोबत मिळून शिवलेली गोधडी फक्त पाहिली होती, आता तिचा सगळा जीवनपट समोर उलगडला होता. सावळ्या वर्णाची, तोंडावर देवीचे व्रण असलेली यमू, नऊ वर्षांची झाली तरी बिनालग्नाची आणि मग नंतर आलेच स्थळ म्हणून पंचविशीच्या बिजवराच्या गळ्यात बांधलेली. तो बिजवर तरी कसा? चिडखोर, हेकट आणि वि़क्षिप्त. त्याला पत्नी हवी होती लिहिता वाचता येणारी, मग घराणं अगदी रांडेचं असले तरी चालेल असे चारचौघांत बोलून दाखवण्याचा भयंकर फटकळ म्हणा किंवा तोंडाळपणा असलेला!!! त्यांना खरेतर वयाने इतक्या लहान मुलीशी करण्याऐवजी एखाद्या विधवेशी लग्न करायचे होते, पण त्यांचे लग्न झाले ते लहानग्या यमूशी. असा माणूसच सासुरवाडीच्या लोकांना धर्मांतर करेन म्हणून धमक्या देऊन बायकोस शिकवायची हिंमत करू जाणे. आणि त्यावेळेस बायकोला पायात मोजड्या घालून समुद्रकिनारी फिरायला नेण्याचा देखील!!!! पण तरीही या दोन गोष्टी माझ्या मनातल्या पूर्वग्रहाला बदलू शकल्या नाहीत. कदाचित यामागे त्यांनी लहानग्या आनंदीकडून ओरबाडून घेतलेले शरीरसुख किंवा बायको गरोदर असताना अथवा अगदी नुकतेच जन्माला आलेले मूल मेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून नुसता बुकांचा धोशा लावणे हेही कारण असू शकेल.

मी इंजिनिअरिंगला असताना माझ्या आसपासच्या बायका आईला म्हणायच्या, "कशाला शिकवतेस तिला??? आपण शिकवायचे आणि परक्यांचं घर भरायचं". आई अर्थातच लक्ष द्यायची नाही. आनंदीचा काळ तर खूपच जुना. अगदी १८६५चा. ती कशी शिकली असेल, असे वाटायचे. पुस्तक वाचताना कळले, तिला नशीबाने कुठल्याच प्रकारचा सासुरवास झाला नाही. पण आनंदीचे शिक्षण जरी नवर्‍याने तिच्यावर लादले असले, तरी सुखासुखी झाले नाही हे निश्चित. आई, बाबा , आजी सगळ्यांनी करता येईल इतका विरोध केला. लग्न बायकोला पुढे शिकवेन याच अटीवर झाले असले तरी, हे क्षणिक असेल आणि नंतर ते वेड जाईल अशीच सगळ्यांची अटकळ होती. ते बधत नव्हते याची शिक्षा मात्र आनंदीला जळक्या लाकडाचे चटके घेऊन भोगावी लागली. नवर्‍याचा आडमुठेपणा आणि घरच्यांचा सनातनीपणा यात तिचं बालपण मात्र भरडलं गेलं.

नवरा असा तर्‍हेवाईक, पण कुठे कुठे गोपाळरावांचे चांगले रूपही दिसत होते. एकदा ते आनंदीबाईंना म्हणतात, “आता अमुक कशाला आणि तमुक कशाला हा प्रश्न विचारायचा नाही. मी सांगेन ते वाचायचं.. जन्मभर सारखा अभ्यास करायचा. माझ्यापेक्षाही जास्त शहाणं व्हायचे.. मला येत नाहीत-कोणत्याही पुरूषाला येत नाहीत, असे विषयही शिकायचे”. त्यांनी आनंदीबाईंना वेगवेगळे विषय शिकवले, ज्ञान मिळवण्यासाठी उद्युक्त केलं, पण दुर्दैवाने स्वत:हून पंधरासोळा वर्षांनी लहान पत्नीचे मन समजून घ्यायला मात्र ते कमी पडले हेदेखिल जाणवत राहिले. त्यांनी परदेशात डॉक्टरी शिकायला जावे असे म्हणणार्‍या त्यांच्यात नंतर मात्र कली शिरला..

पुस्तकाला सुरूवात करण्याआधी बरेचसे प्रश्न होते. माझ्या त्या प्रश्नांची उत्तरे मला आनंदी-गोपाळमधून मिळत गेली. ख्रिश्चन लोक किती झाले तरी भारतीयांना समान वागणूक देणं शक्यच नाही. आता जरी कुणी परदेशात शिकायला निघाले तरी आधी सगळी चौकशी करतो, कुणी तिथे ओळखीचे भेटेल का हे पाहातो.. आनंदीसाठी सारेच नवीन. बोटीचा इतका मोठा प्रवास... आणि पत्रातून सूर जुळलेल्या मावशी. आणि नजरेसमोर एक मोठे स्वप्न-डॊक्टर बनण्याचे!!!! राहणीमानाच्या, खाणपानाच्या सवयींनी झालेला त्रास.. आणि पुन्हा चालू झालेला गोपाळरावांचा पत्रातला दुष्टपणा. एक मात्र खरं, की आनंदीबाईंमध्ये जन्मत: काही असे वेगळे करण्याची, शिकण्याची इच्छा दिसत नाही, तिला रूजवले, खतपाणी घातलं ते गोपाळरावांनी. मात्र त्यांच्या मनाचे सूर कधी जुळलेच नाहीत. आनंदीबाई हुशार असाव्यातच. नाहीतर इतके सगळे विषय घरच्याघरी तयार करणं, नंतर इंग्रजी व्यवस्थित शिकणं, परक्या भाषेतून भाषणं देणं हे आजच्या घडीला देखील सगळ्यांना जमतंच असे नाही. त्यांच्यामध्ये, विचारांमध्ये प्रगल्भता आली, जिथे गोपाळराव कधीच पोचू शकले नाहीत.

पुस्तक एकदा वाचून मन नाहीच भरलं. अजूनही कधी मनात आले की काढून वाचत बसते. कितीही नैसर्गिक, कौटुंबिक , मानसिक अडचणींतून आनंदीबाई गेल्या, स्थित्यंतरे अनुभवली, परंतु त्या स्वत:ला त्यातून समृद्ध करत राहिल्या. त्यामुळे जरी शोकांत शेवट असेल तरी मला आनंदीबाईंची प्रतिकूल परिस्थितीतही लढा देण्याची वृत्ती दुर्दम्य आशावाद देऊन जाते. आधी त्या माझ्यालेखी एक व्यक्तिरेखा, आदर्श होत्या, आता माझ्या त्यांच्याविषयी काय वाटतं ते शब्दांत नाही सांगता यायचं.. पुस्तक मिळवण्यासाठी बरीच धडपड केली होती आणि ती धडपड खरोखर यथार्थ ठरली!!!

पुरो आणि मुक्ता!!

परवा अपघातानेच ’पिंजर’ हाती लागली. अमृता प्रितम म्हटले की मला “वारिस शाह नूं” आणि “पिंजर” हेच आठवते. पंजाबी वळणाची हिंदी ही त्यांची शैली. सहसा माहित नसलेलेही बरेच हिंदी शब्द पानांच्या वाटेवर भेटत राहतात आणि हळूहळू ओळखीचे होऊन जातात. पिंजरच्या अर्पणपत्रिकेतच त्या म्हणतात, “स्त्री, वह हिंदू हो या मुसलमान, जो उसकी ठिकाने तक पहुंच पाई.” यावरून खरेतर आत काय असावे याची कल्पना यावी. भारत-पाकिस्तानाची फाळणी हा तसा बराचसा संवेदनशील विषय. आणि ज्यांनी ते प्रत्यक्षात अनुभवले, त्यांच्यासाठी तर जन्मभराची भळभळती जखम. लेखिकेने हे सगळे जवळून पाहिल्यानेच की काय पण वारिस शाह नूं आणि पिंजरमध्ये फक्त “फाळणी” यापलिकडे जाऊन त्याचा जनसामान्यांवर झालेला परिणाम अधिक उत्कटतेने दिसून येतो.

    पिंजर. ही कुंकवाची पिंजर नाही. तो आहे अस्थिपंजर. स्त्रीमनाचा आणि शरीराचाही. तो पिंजर आहे पुरोचा आणि मुक्ताचा. दोघीही स्त्रियाच, पण वेगवेगळ्या काळातल्या, वेगवेगळ्या भूभागातल्या!! दोघींचे जिव्हाळ्याचे विषयही वेगळे, तरीही दोघींमध्ये एक समान धागा आहे. पुरो, ही गुजरातच्या पण आता पाकिस्तानात असलेल्या भागात राहणाया धनकोची मोठी मुलगी. पुरोची सगाई झालीय, रत्तोवालच्या रामचंदशी आणि पुरोच्या पाठच्या भावाचे लग्न पण तेव्हाच रामचंदच्या बहिणीबरोबर ठरवून टाकलंय. गावातलाच शेखांचा रशिद तिला सतत मागावर असल्याचे जाणवतं, तिचं स्त्रीत्व तिला अनामिक धोक्याची जाणीव करून देतं. आणि एक दिवस लग्न आठवड्यावर आले असताना रशिद तिला पळवून घेऊन जातो. गावातल्या या शेखांसोबत पुरोच्या घराचे पिढीजात वैर आहे. तिच्या ताऊंनी रशीदच्या आत्याला पळवून आणले होते, तीन दिवस घरात डांबून ठेवले आणि नंतर सोडून दिले. तिला ना कुणी घरात घेतले, ना तिचे लग्न झाले. रशीदच्या काका-भावांनी त्याला याचा बदला म्हणून पुरोला पळवायला भाग पाडलेय, आणि काही केलंत तर बरे होणार नाही असे तिच्या बाबांना धमकावलंय देखील. पण रशीद पुरोच्या ताऊंसारखे वागत नाही, तिला सोडून देत नाही. तो तिच्याशी निकाह करतो आणि तिला त्रास होऊ नये म्हणून तिला दुसर्‍याच गांवी घेऊन येतो.

    इथेही पुरोचे मन रमत नाही. ती त्यांच्या भाऊबंदांत रमत नाही, बोलत नाही. निसर्ग आपले काम चोख बजावतो. पण तिला तो गर्भ म्हणजे शरीरात असलेल्या नकोशा किड्यासारखा वाटत असतो. मूल झाल्यावर तिला त्याच्याबद्दल थोडेफार प्रेम वाटते, पण तेही तितकेच. ती स्वत: मात्र तूप न लावलेलय रोट्या, फक्त देह जगवायला अतिशय साधे अन्न तेही दिवसातून एकदाच खात राहते आणि अस्थिपंजर बनून जाते. इतक्या दिवसांच्या सहवासानेही तिला रशिदबद्दल प्रेम वाटत नसते, पण तो एकदा आजारी पडल्यावर तिला त्याची काळजी वाटते आणि तिला पळवून आणल्याबद्दलचा तिरस्कार, ताटातूट सगळी गळून पडते.

    एवढे सगळे होऊनही तिचे मन माहेराकडे, ज्याची लग्नापूर्वी रात्रंदिन स्वप्ने पाहिली, त्याच्याकडे धावत असते. अचानक तिला एक संधी मिळते, रत्तोवालला जाण्याची. ती जाते, गावांत फिरता येत नाही, म्हणून शेतांतून फिरते, उगाच काहीबाही करणे काढून हे शेत कुणाचे ते शेत कुणाचे असे विचारत राहते. तिने एकवार त्याला ओझरते पाहिलेले असते, आणखी भेट व्हावी असे वाटतं पण प्रत्यक्षात तो भेटल्यावर ती काहीच बोलत नाही. त्यालाही कळत नाही, ही मुस्लीम स्त्री कोण ते, पण ती ओढ कुठेतरी असावी. तो दुसर्‍या दिवशी विचारतो, “तू पुरो आहेस का?” ती अर्थातच उत्तर टाळून निघून जाते. अशातच फाळणी होते, हिंदूना तो भूभाग सोडून जावे लागते. सगळे मुस्लिम त्यांचे वैरी बनतात. घरे लुटतात, मुलींना पळवून नेतात, अव्वाच्या सव्वा भावाने त्याना धान्यधुन्य विकतात. सरकारी छावण्यांतला बंदोबस्तही अशा लोकांना रोखायला कमी पडतो. आणि अशावेळी रामचंद तिला पुन्हा भेटतो ते हेच सांगायला की, त्याची बहिण व पुरोची वहिनी मुस्लिमांनी पळवून नेलीय आणि बाकीचे कुटुंब जीव वाचवून भारतात जात आहे. ही जीवावर उदार होते, नवराही साथ देतो आणि ती रत्तोवालमध्ये जाऊन वहिनीला पळवून आणते. पत्ता देऊनही रामचंद, भाऊ कुणीच संपर्क साधत नाही. इथे दोघीही आता समदु:खी. एकीला १५ दिवस पळवून नेली म्हणून घरात घेतले नाही, तर तेच लोक आता दुसरीला कसे घेतील? वहिनीने तर आशाच सोडलीय. पण पुरो वहिनीला आपल्यासारखी पिंजर होऊ देत नाही. महिन्यावर महिने उलटतात, पण तिच्यातला दुर्दम्य आशावाद तिला धीर देत राहतो. एके दिवशी खरेच निरोप येतो की अमक्या अमक्या दिवशी इथे जे लोक राहिले आहेत, त्यांना भारतात नेण्यात येणार आहे. आपल्याही घरचे कुणी येईल म्हणून तिघेही तिकडे जातात. भाऊ-बहिण जवळ जवळ दहा वर्षांनी एकमेकांना भेटतात. आणि तेव्हाच उद्घोषणा होते, “भारतात ज्यांना जायचेय त्यांनी या बाजूला यावे”.

आता हे एकदम अवघड वळण. अजूनही भावाचा हात तिच्या हातात आहे. तो स्पर्श तिला सोबत नेऊ पाहतोय, तिच्या स्वत:च्या माणसांत. तिच्याही मनात स्वार्थ डोकावतो, पण तो क्षणभरच! ती निकराने फक्त वहिनीला परत पाठवते. कारण एकच, तिच्यावाचून तिच्या रशीदचं, पोटच्या मुलाचं आणि एका सांभाळलेल्या मुलाचं पिंजरच शिल्लक राहिले असते...

पुरोची कथा इथेच संपते. एका मुलीच्या आयुष्यात आलेली स्थित्यंतरे दिसतात, दिसतात म्हणण्यापेक्षा लेखणीमधून, निवडलेल्या शब्दांतून ती जाणवत राहतात. लग्नाआधी मैत्रिणींसोबत असतानाचे प्रसंग वाचताना आपल्यालाही प्रसन्न वाटते, तेच रशीद तिला दिसला रे दिसला की अशुभाची काळी छाया पान व्यापून राहिल्यासारखे वाटते. रशीद तिला सक्कडअलीला नेऊन ठेवतो. तिने परिस्थितीसमोर हार मानलीय, तिला कशाचा उत्साह नाही, हे “मटमैला दिन था” सारख्या छोट्या छोट्या वाक्यरचनांमधून तिचे नैराश्य अधिक गडद होत जाते. तिचा स्वत:चा स्वत:शी संघर्ष दिसतो, नंतर परिस्थितीशी जुळवून घेतल्यावरची बदलेली पुरो ही अधिक ठाम अन अधिक खंबीर वाटते.
  
पिंजरची दुसरी नायिका मुक्ता. ही स्वतंत्र भारतातली मुलगी. अत्यंत सुंदर पण दुर्दैवाने गरीब घरात जन्माला आलेली. घरातल्या वस्तू अगदी मोजक्या. इतक्या मोजक्या की लग्नासारख्या समारंभात देखील काय येणार, किती येणार आणि काय काय जाणार हेही अगदी ठरून गेलेलं!!! ती कॊलेजात शिकते, पण याला घरच्यांचा म्हणावा तसा पाठिंबा दिसत नाही. तसाच तो तिने “मिस दिल्ली” स्पर्धेत भाग घ्यायलाही मिळत नाही. याची रूखरूखही तिच्या मनात कुठेतरी आहेच. तिला एका श्रीमंत बिजवराचे स्थळ सांगून येते. तो बराच श्रीमंत.  अगदी त्याच्या पदरी त्या काळात पगारी वकिल ठेवले होते. आणि त्यातल्या कुठल्यातरी एका वकिलाच्या मुन्शीची ही लेक. त्यात पाठीवर बहिणी आहेतच. घरच्यांना स्थळात काही वावगे दिसत नाही, पण हीच काही बोलत नाही.
 “त्याची बायको आत्ताच वारलीय, ओटीत लहान मूल टाकून गेलीय, मग लग्न नक्की कुणाची गरज म्हणून? बाळाची, की नवर्‍याची??? जर बाळाची गरज म्हणून मी, तर मग माझे त्याच्या आयुष्यातले अस्तित्व काय??” तिच्या मनात नुसते विचारांचे काहूर. अर्थातच उघड बोलण्याची सोय नाहीच.

तीनेक महिन्यांनी पुन्हा तेच स्थळ, यावेळी एक निरोपही आहे सोबत. “मुलाला हवे तर आजीकडे अमृतसरला ठेवतो” यावेळी हिला खिजगिणतीत न धरता लग्न ठरवले जाते. लग्न तरी काय, अत्यंत आवश्यक विधी चार भिंतींआड जास्त गाजावाजा न करता पार पाडले जातात इतकंच. ती सासरी येते, कळतं, ते मूल-राहूल-नुकतेच गेलंय. पाहुण्यांत दबकी चर्चा.  हिच्या कानावर पडेलशी..., “अपशकुनी दिसते मुलगी, इकडे स्थळ सांगून गेलं, तिकडे मूल गेलं!!”
नवरा अद्याप प्रथम पत्नीला विसरू शकलेला नाही. सगळ्यांनी अगदी त्याच्या आईने सांगूनही त्याने पहिल्या पत्नीचा, मुलाचा व त्याचा फोटो नवपरिणीत जोडप्याच्या शयनकक्षात तसाच ठेवलाय. घरातले बाकीचे फोटो काढू दिलेत, हे त्यातल्या त्यात नशीब. त्याचा भूतकाळ तिला पावलोपावली भेटत राहतो. कपड्यांच्या अलमारीत.. पहिलीच्या कपड्यांच्या ट्रंकांत... गडीमाणसांच्या बोलण्यात.... अगदी त्या दोघ्यांच्या शय्येवर सतत तिला ते न पाहिलेल्या मुलाचं प्रेत दिसत राहातं. मनातल्या मनात ती पिंजर बनत जाते. नवर्‍याला खुश ठेवते, पण त्याच्यापर्यंतही तिचे अंतर्मन पोचत नाही. ती गरोदर राहते, पण नवर्‍याला त्याने त्याच्या आईला कळवू नये अशी अट घालते. तोही ती म्हणेल तेव्हा आईला सांगू असे म्हणून गप्प राहतो. तिचा गर्भपात होतो, आणि याचे मन चरकते, “असे काही होणार हे मुक्ताला आधीच कसे कळले?” ती सांगते, “मला माहित होते, तो जाणार होता. तो राहुल होता” नवर्‍याचे डोळे उघडतात. आपला भूतकाळ वर्तमानाला जगू देत नाहीए. यावेळी तो तिला खोदून खोदून विचारतो आणि इतके दिवस साचलेले तिचे दु:ख बाहेर पडते, “मला तो नको होता. म्हणजे आपल्यामध्ये नको होता. पण मी त्याच्या मृत्यूची आशा कधीच केली नव्हती. तो इथेच असतो, रोज असतो. इथे, आपल्या पलंगावर, आपल्या दोघांच्या मध्ये” आणि असेच बरेच काही. मुलाच्या मत्यूची टोचणी तिचे मन खात असते. जणू काही ते तिच्याच इच्छेचे फलित असावे. नवर्‍यालाही कळते, हे सगळे काय आणि का घडतं आहे. तो बेडरूममधला तिघांचा फोटो काढून टाकतो.
सगळे बोलून टाकल्याने तिच्या मनावरचे ओझेही हलके होते, ती तो फोटो तिथेच परत लावते. “आपका अतीत अब मेरा भी अतीत है” म्हणत!!


दोन वेगवेगळ्या कथा, पण दोघींची आतल्या आत धुसमट हे समान सूत्र. ना पुरो रशीदला कधी तिला काय वाटते ते सांगते, ना मुक्ता. तरीही त्यांना काय वाटते, ते पक्के आहे, त्यांच्यापुरते ठाम आहे. दोघीही वेगवेगळ्या लादलेल्या प्रतिकूल परिस्थितींचा शेवटी स्वीकार करतात आणि लक्षात राहतात.

संगरी वीराग्रणी जे धैर्यमेरू संकटी....

          २६/११ चे रणकंदन आणि तेव्हाचा थरार भारतीयांच्या मनातून कधीच पुसला जाणं शक्य नाही. बरेच जण मृत्यूमुखी पडले, कैक जायबंदी झाले. त्यात पोलिस आणि सामान्य नागरिक दोन्हीही आलेच. या हल्ल्यात आपले बरेच नुकसान तर झाले, वर पोलिसदलाने अनेक पोलिस इन्स्पेक्टर्स, शिपाई, कॉन्स्टेबल्स यांसह अशोक कामटे, हेमंत करकरे आणि साळसकर यांच्यासारखे मोहरे गमावले. तेव्हाच्या बातम्यांत झळकणारं “करकरे, कामटे आणि साळसकर यांना परिस्थितीचे गांभीर्य ल़क्षात आले नाही” हे वाक्य कामटेंच्या पत्नी- विनीता कामटे-यांच्या मनाला लागलं आणि त्यांनी सत्य शोधून या पुस्तकाच्या रूपाने सर्वांसमोर मांडले.

           अशोक कामटे हे खरेतर मुंबई पूर्वविभागाचे-चेंबूरचे अतिरिक्त पोलिस आयुक्त. पण त्यांना वेळोवेळी शहराच्या इतर भागातही कारवाईसाठी जावं लागत असे. तसेच त्यांना २६ नोव्हेंबरलाही जावे लागले आणि काही तासांतच दूरचित्रवाणीवर त्यांच्या मृत्यूची बातमी झळकली. आपली यंत्रणा अशा प्रकारच्या हल्ल्यासाठी तयार नव्हती, आपल्या पोलिसांकडची शस्त्रास्त्रे आधुनिक  पद्धतीची नाहीत हे सगळे जरी खरे असले तरी ’असे काय झाले की ते तिन्ही अधिकारी एकाच गाडीत बसून कामा हॉस्पिटलकडे गेले’ हा प्रश्न अनुत्तरित होता. विनीताबाईंना नेमके हेच शोधून काढायचे होते. त्याची पहिली पायरी म्हणून त्यांनी पोलिसांकडे असलेल्या वायरलेस मोटोरोला आणि एरिक्सन या दोन कंपन्यांच्या फोन्सवर कामटे आणि कंट्रोलरूम यांमध्ये  झालेले संभाषण मिळवले. पुस्तकात अगदी क्रमवार पद्धतीने त्यांनी या संभाषणाचे तपशील दिले आहेत. त्यातून कंट्रोलरूम कडून व्यवस्थित प्रतिसाद न मिळाल्याचे, आलेल्या संदेशांवर- विशेषत: करकरेंच्या पोलिस फोर्स मागवण्याच्या संदेशांवर कारवाई न झाल्याने या तिघांचा मृत्यू ओढवला यापेक्षा वेगळं काही  निष्पन्न होत नाही.  म्हणून त्यांना लोकांनी १०० या नंबरावर फोन करून काय माहिती दिली, याचे तपशील हवे होते. की जेणेकरून या तिघा अधिकार्‍यांचा मृत्यू त्यांनी स्वत:वर निष्काळजीपणे ओढवून घेतलेला नसून तो यंत्रणेतील त्रुटीमुळे आहे हे अधोरेखित होईल. एका वरिष्ठ अधिकार्‍याची पत्नी म्हणून त्या हे सगळे सहज करू शकतील अशी त्यांची अटकळ मात्र धुळीला मिळाली. एका सर्वसामान्य नागरिकासारखाच त्यांना महिती अधिकाराचा उपयोग करून घेऊन ही माहिती मिळवावी लागली. त्यांनी जानेवारीत मागवलेली माहिती झगडून झगडून नोव्हेंबरात पदरी पाडून घेतली. त्यांची त्यापायी केलेली धडपड एकंदर मूळातूनच वाचण्यासारखी आहे. विनीताबाईंना हे तपशील या प्रकरणाची चौकशी करणार्‍या ’राम प्रधान’ आयोगासमोर मांडायचे होते, पण तुटपुंजे अधिकार असलेल्या या समितीस कोणालाही साक्ष देण्यास बोलावण्याचे अधिकार नव्हते, व हा सगळा शोध सरकार दफ्तरी नोंदला गेला नाही.

          पुस्तकाचा मुख्य मुद्दा मांडल्यानंतर पुस्तकाचा नंतरचा भाग म्हणजे अशोक कामटे यांची थोडक्यात जीवनकहाणी आहे. *त्यात त्यांचे ठिकठिकाणचे पोस्टिंग्ज, त्यांची कार्यपद्धती, निर्णयक्षमता, त्यांचे भंडारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यातले काम असा आहे. कामटेंच्या सोबत काम केलेले त्यांचे सहकारी, पत्रकार व काही मित्र, त्यांच्या राजकोट व कोडाईकॅनॉलच्या शाळेतले मित्र आणि शिक्षकांनीही त्यांच्याबद्दलच्या आठवणी जागवल्या आहेत. पुस्तकाच्या उत्तरार्धात कामटेंचं एकंदर कुटुंब येते. यांचे घराणेच मुळात पोलिस आणि लष्करसेवेत असलेलं आहे. अशोक कामटे यांचे पणजोबा मारूती कामटे हे १८९५ ते १९२३ याकाळात पोलिसांत होते आणि त्यांना त्यावेळच्या मुंबई इलाख्याच्या गव्हर्नरनी तलवार देऊन सन्मानित केलं होते. आजोबा एन. एम. कामटे हे मुंबईचे पहिले आय.जी. होते, त्यांनी त्यांच्या नोकरीतल्या व ब्रिटिशांसोबतच्या आठवणी “फ्रॉम देम टू अस” या पुस्तकात मांडल्या आहेत. पणजोबा-आजोबा नंतर बाबा मात्र पोलिसांत न जाता लष्करात गेले, आणि त्यांनी तिथे कर्नलपद भूषवले. कामटेंची आईही अशाच मोठ्या घराण्यातून आलेली व १९५६ सालची स्क्वॅशची नॅशनल चँपियन होती. कामटेंना मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीने आणि घरच्या-कामगिरीवरच्या फोटो आल्बमसोबत पुस्तक संपतं. पहिला भाग वाचताना हे असे का व कसे घडले असेल असा प्रश्न पडतो. विनिताबाईंना माहिती देतानाची संबंधितांनी केलेली टाळाटाळ मन उद्विग्न करते. या दु:खद घटनेतून सावरणार्‍या, सत्याचा छडा लावणार्‍या विनिताबाईंची तळमळ खरेच कौतुकास्पद आहे. पुस्तकाचा मूळ हेतू पहिल्या एकतृतियांश भागातच संपत असला तरी, नंतरचे पुस्तकही कंटाळवाणं होत नाही. एक पोलिस अधिकारी म्हणून, पिता, पती, भाऊ, एक उत्कृष्ट खेळाडू, अशी विविध रूपांतून त्यांची प्रेरणादायी गाथा उलगडत जाते.

     एकदा घरी येताना पायरेटेड पुस्तकांच्या स्टॉलवर हे पुस्तक दिसले. मोह आवरला नाही, आणि अवघ्या साठ रूपयांत ते पुस्तक मिळाले. पायरेटेड कॉपी असली, तरी एकदोन फिकुटलेली किंवा अतिठळक झालेली पाने सोडता वाचायला काहीच वाईट नव्हती. एकंदर पुस्तकाची मांडणी अगदीच उत्कृष्ट सदरात मोडत नसली तरी चांगली आहे. तशा फ्रुफरिडिंगच्या चुकाही आहेत. दोनतीन ठिकाणी पूर्ण परिच्छेदांची पुनरावृत्ती झाली आहे.  पण एकंदरीत पुस्तक वाचनीय व एका घडलेल्या महत्वपूर्ण घटनेची  ती कशी घडत गेली याची मीमांसा म्हणून छानच आहे. कदाचित आता नंतर असे काही घडले, तर किमान आपली यंत्रणा या चुकांपासून काही शिकेल अशी आशा बाळगूयात

         * हा भाग वाचताना पती म्हणून कामटे विनीताबाईंना  खूप महान वाटत असतील आणि म्हणून त्यांनी अतिशयोक्ती केली असावी असे वाटण्याचा संभव आहे. कामटे २००२च्या सुमारास सांगली जिल्ह्यात होते. मूळ सांगली शहरात गुंडगिरी, दिवसाढवळ्या खून पडणे, मारामारी असले प्रकार सर्रास घडायचे. फासेपारधी सतत चोर्‍या करत असत. त्यांच्या काळात कामटेंनी याप्रकाराला खूप आळा घातला. त्यांच्यानंतर सांगलीला आलेले आयुक्त कृष्णप्रकाश यांनी तिथे इतका दरारा निर्माण केला की त्यांच्या नावाने लोक अक्षरश: घाबरत. बेकायदा प्रवासी वाहतूक, बेकायदा वाळू उपसा,  गुंडगिरी आणि असे बरेच उद्योग पूर्ण बंद झाले होते. एकदा गणेशोत्सवात झालेल्या मारामारीच्या पार्श्वभूमीवर ते स्वत: तासगांवच्या रथोत्सवाच्या बंदोबस्तात सामील झाले होते. तेव्हा फक्त मानकर्‍यांसाठी असलेल्या रथात लोकांनी त्यांना आमंत्रित केले. आणि तद्दन गल्लाभरू चित्रपटात साजेसा प्रसंग तिथे घडला. लोक त्यांना कॅमेर्‍यात साठवत होते, अभिवादन करत होते, अचानक सगळीकडून उत्साहाची लाट आसमंतात सळसळत पसरली होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी रस्त्यावर उतरला की लोकांना त्यांचा किती आधार वाटतो आणि असा अधिकारी कसा लोकप्रिय होतो, हे स्वत:च्या डोळ्यांनी अनुभवल्यामुळे मला अशीच कार्यपद्धती असलेल्या कामटेंना या पुस्तकात मुद्दाम ग्लोरिफाय केले आहे असे मुळीच वाटले नाही.

आनंदी आनंदी आणि आनंदी!!!

           आनंदी. बर्‍याच दिवसांपासून माझ्या मनावर गारूड करून आहे. किंबहुना, तीच नाही, तर त्या काळात ज्या स्त्रिया शिकल्या, चाकोरीबाहेर जाऊन वेगळे काही करू शकल्या, त्या सर्वांबद्दलच माझ्या मनात एक मोठे कुतुहल आहे. आजच्या काळात शिकणे वा परदेशात जाणं काहीच अवघड नाही. परंतु घराबाहेर पडण्याची बंदी असलेल्या काळात या स्त्रिया त्यांच्या काळातील लोकांपेक्षा चार पिढ्या पुढेच होत्या. मला प्रश्न आहेत ते: यांना शिकावे असे मुळातून का वाटलं? त्यासाठी विरोध पत्करायची आणि सहन करण्याची आंतरिक शक्ती यांना कशी मिळाली? त्या एकट्या होत्या की सुदैवाने काही मदतही मिळाली? त्रास झाला हे खरे, पण तो नक्की कसा आणि कुणाकुणाकडून? त्यावेळेस समाजात काय स्थित्यंतरे घडत होती? असा प्रयत्न करणार्‍या याच पहिल्या स्त्रिया होत्या, की अजून काही अपेशी जीव होते?.....  प्रश्नावली तर काही थांबतच नाही..  मी शोधून शोधून आनंदी-गोपाळ मिळवलं आणि वाचलं. एकदा वाचले, आणि वाटले की आपल्याला आनंदी कळाली. पण नंतर काहीतरी निसटून जातंय, काहीतरी राहून जातं आहे असे वाटत होते. ती फक्त जीवनकहाणी होती. एक गोष्ट सांगितल्यासारखी. पण त्यात आनंदीचे स्वत:चे असे काहीच दिसत नव्हतं. तिचं अंतरंग, विचार, ज्ञान यांची प्रगल्भता दिसत नव्हती. ती फिलाल्डेफियाला जाऊन नक्की काय शिकली? तिला क्षय होऊन ती अवघ्या बावीसाव्या वर्षी वारली. स्वत: एक डॉक्टर असताना, एका मेडिकल कॉलेजात शिकत असताना तिच्या रोगाचे निदान कुणालाच कसे झाले नाही? आनंदी मला भेटूनही पुन्हा परकी झाली होती.

             अशातच गेल्या आठवड्यात माझी सततचीआनंदी-आनंदीची भुणभुण ऐकून माझ्या मैत्रिणीने वाचनालयात ’डॉ. आनंदीबाई जोशी: काळ आणि कर्तृत्व’ हे पुस्तक दिसल्या दिसल्या उचलले. आणि प्रस्तावनेतच  कळाले की मला हवे असलेले पुस्तक ते हेच होते!! आणि भारल्यासारखी एकामागून एक प्रकरणं कशी संपली हे कळालेच नाही. लेखिका अंजली किर्तने यांनी आनंदीवर जवळजवळ सहा –सात वर्षे संशोधन केले. मला पडलेले, किंबहुना त्याहून जास्त प्रश्न त्यांना पडले होते, आणि एक प्रश्न सोडता सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी मिळवली असे म्हणायला हरकत नाही. आनंदीबाई निवर्तल्यानंतरच्या एकाच वर्षात त्यांच्या जीवनावर दोन चरित्रे लिहिली गेली. एक होते काशीबाई कानिटकरांचे आणि दुसरे कॅरोलीन डॉल यांनी लिहिलेले. काशीबाई आनंदीच्या समकालीन, त्यांना नवर्‍याने लिहावाचायला शिकवले. हरिभाऊ आपटे त्यांचे स्नेही. त्या आनंदीला कधी भेटल्या नाहीत, मात्र गोपाळरावांना त्या भेटल्या. किंबहुना त्यांना बरीचशी माहिती गोपाळरावांकडूनच मिळाली. कॅरोलीन ही आनंदीहून बरीच मोठी होती. ती आनंदीला अमेरिकेत भेटली. प्रथम दर्शनी तिला आनंदीमध्ये काही विशेष जाणवले नाही पण नंतर तिच्या बुद्धीमत्तेची चमक पाहून तीही थक्क झाली होती. आनंदी जात्याच सोशीक असल्याने आणि मुलीच्या जातीने काय काय करू नये याची शिकवण लहानपणापासून असल्याने ती नवरा हा विषय सोडून कॅरोलीनकडे पुष्कळ बोललेली दिसते. त्यामुळे काहीप्रमाणात का होईना, पण आनंदीच्या मनातली स्पंदने तिच्याप्रमाणात पोचली होती, असे म्हणायला हरकत नाही. पण हेही आहे की, तिला काही गोष्टी गवसल्या नाहीत आणि काशीबाईंनी लिहिलेले चरित्र गोपाळरावांच्या सांगण्यावरून लिहिलेले म्हणूनही आणि त्यानी चरित्राच्या दुसर्‍या आवृत्तीत काटछाट करताना त्यात काही महत्वाच्या संदर्भही उडवून लावल्याने परिपूर्ण नव्हते. त्यामुळे आणखी खोलवर जाऊन सत्यासत्यतेची पाळंमुळं शोधण्याचे काम कुणीतरी करायला हवेच होते, आणि ते या कीर्तनेबाईंनी केलंय.

          पुस्तकाची सुरूवातच मुळात १९व्या शतकातला हिंदुस्तान आणि शिक्षण याच्या तपशीलाने होते. आपले तेव्हाचे ज्ञान हे जातीव्यवस्थेवर आधारलेल्या शिक्षणपद्धतीवर मिळायचे. तेव्हा एतद्देशीयांनी आणि काही ख्रिस्ती मिशनर्‍यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे ते लोकाभिमुख कसे झाले याचा इतिहास वाचण्यासारखा आहे. पुरूष शिक्षण, त्यानंतर स्त्रिशिक्षण आणि त्याकाळातले वैद्यकिय शिक्षण हे देखील बरेचसे झगडून मिळवावे लागले. तो झगडा नुसताच रूढीपरंपरांशी नव्हता तर इथल्या राजवटीशीही होता. स्त्रिशिक्षणात काय अडचणी आल्या असाव्यात हे मी नव्याने सांगायला नको. पण जेव्हा आपल्या फायद्यासाठी  हा होईना, पण जेव्हा वैद्यकिय महाविद्यालये इथे निघाली, तेव्हा इंग्रज, अमेरिकन मिशनरी आणि नेटिव्ह हा भेदाभेद केला गेलाच. उदा. त्यांना शस्त्रक्रिया व शवविच्छेदनाचा थेट अनुभव न देता शेळीवरती प्रयोग करणे, अथवा एम. बी. बी. एस. ची पदवी न देता लिटरेचर इन मेडिसीन ही हलक्या प्रतीची डीग्री देणं. हे झाले बाहेरचे. स्त्रियांसाठी तर घराबाहेर पडणंच अवघड होतं. त्यांच्यासाठी होती अंधारी माजघरे, बालविवाह, नहाण आलं की गर्भाधान आणि नंतर चालू होणारी बाळंतपणाची मालिका. काही मुले जगत, काही मरत. त्या बाळ-बाळंतिणीला घरगुती औषधोपचार सोडले तर काहीच मिळायचे नाही. पुरूष डॉक्टरकडे जाण्यातल्या संकोचाने स्त्री डॉक्टरांची गरज निर्माण झाली. तेव्हा मिशनरी स्त्रिया आपली भाषा शिकून माजघरापर्यंत पोचल्या. पण त्यांनाही त्यांच्यातल्या उणीवा जाणवल्या असाव्यात. कारण त्या काळी भारतातच नव्हे तर इतरत्रही स्त्रियांसाठी वैद्यकीय शिक्षण मिळणे खूप हलाखीचे होते. जे आपल्याकडे सर्वसामान्य शिक्षणासाठी झाले ते त्यांच्याकडे या शिक्षणासाठी त्यांनीही भोगले. नाही म्हणायला फिलाल्डेफियाला एकच असे ’वीमेन्स मेडिकल कॉलेज’ होते, की जिथे मुलींना प्रवेशासाठी झगडावे लागले नाही अथवा विश्वस्त मंडळ आणि विद्यार्थ्यांच्या कृपेची वाट पाहात थांबावे लागले नाही. तशी आनंदी ही हिंदुस्तानातली डॉक्टर होऊ इच्छिणारी पहिली मुलगी नाही. तिच्याही आधी कृपाबाई ख्रिस्ती या बाईंचीही तीच इच्छा होती. पण शरीरप्रकृतीने साथ न दिल्याने त्या हे शिक्षण पूर्ण करू शकल्या नाहीत. या कृपाबाईंचाही आनंदीआधीची आनंदी म्हणून एका प्रकरणात परिचय आला आहे. इथेपर्यंत पुस्तकाची पहिली तीन प्रकरणे संपतात आणि आनंदीपर्व चालू होतं.

         पुस्तक मुळातूनच वाचावं इतकं छान आहे. कॅनव्हास पुष्कळ मोठा आहे, आणि तो अगदी नेमकेपणाने हाताळला देखील आहे. हे पुस्तक वेगळे यासाठी, की त्यात आनंदीच्या आधीपासून हिंदुस्तानातल्या महत्वाच्या स्थित्यंतरांचा मागोवा घेतला आहे. आणि त्या अनुषंगाने फक्त आनंदीच नव्हे तर इतर स्त्रिया कशा घडत गेल्या, त्यांना काय काय संकटे आली याचे इत्यंभूत वर्णन आहे. त्यातही मग नंतर हिंदुस्तानी आणि परदेशी असा भेदाभेद नाही. आनंदीच्या कॉलेजचे वर्णन करताना त्यांनी एक पूर्ण प्रकरण इंग्लंडातल्या, फ्रान्समधल्या स्त्रियांनी-मुलींनी असे मुद्दामच म्हणत नाही, कारण आनंदीच्या वर्गात वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रिया होत्या-दिलेला संघर्ष, सहकार्‍यांनी, समाजाने केलेली अवहेलना आणि तरी त्यातून जिद्दीने शिकलेल्या या स्त्रिया सगळ्यांबद्दल माहिती मिळते. भारतातल्या त्या काळातल्या शिकलेल्या स्त्रिया म्हणून फक्त आनंदीबाई आणि पंडिता रमाबाई यांचीच नांवे आपल्या डोळ्यांसमोर येतात. पण ही फक्त काही उदाहरणे आहेत. पुण्यातल्या रावबहादूर भिडे यांची मुलगी आवडाबाई, कृपाबाई, काशीबाई अशी अनेक सर्वसामान्यांना न माहित असलेली व्यक्तिचित्रेही या अनुषंगाने समोर येतात. या स्त्रिया फक्त शिकल्या नाहीत, तर त्या रोजनिशी लिहीत, त्यांची मते समाजासमोर मांडात नसल्या तरी लेखनातून ती मते कुठेतरी उतरत होतीच. या आनंदीच्या समकालीन असल्याने त्यातूनही आनंदीविषयी अधिकाअधिक समजायला मदत होते.

      आनंदीच्या छोट्याशा आयुष्यात तिचा खूप लोकांशी संपर्क आला. या सगळ्यांबद्दल जमेल तितकी माहिती संकलित करून लेखिकेने योग्य तिथे दिली आहे. या व्यक्तींमध्ये महत्वाची व्यक्ती म्हणजे गोपाळराव. हा अतिशय विक्षिप्त मनुष्य, हवे तेव्हा एकदम उलटी उडी मारून टोकाची भूमिका घेऊ शकत असे. आनंदी परदेशात जाईतो गोपाळराव म्हणजे सद्गुणांचा पुतळा म्हणायला हरकत नाही. आनंदी-गोपाळमधून दिसते ते त्यांचे हिमनगाचे पाण्यावरचे टोक. बहुतेकांनी आनंदीबाईंबद्दल लिहिताना काशीबाईंकृत चरित्र प्रमाण मानलेले दिसते. त्याला य.ज. जोशीबुवाही अपवाद नसावेत. त्यामुळे आनंदी-गोपाळ मध्ये आनंदीच्या घरची स्थिती अतिशय हलाखीची, कर्जबाजारी, बाबा-आजी शिक्षणाच्या विरूद्ध आणि कहर म्हणजे घरच्या स्त्रिया गोपाळरावांना कल्याणच्या पोष्टात पाहायला गेल्या आणि पसंत करून आल्या वगैरे गोष्टी दिसतात. सत्य परिस्थिती अगदीच वेगळी आहे हे आता पुन्हा सांगायला नकोच. हो, एक सांगायचे राहिले. लेखिकेने कुठलेही विधान संदर्भाशिवाय केलेले नाही.त्यामुळे आता काय खरे आणि काय खोटे हा प्रश्नच उद्भवत नाही. आधी म्हटल्याप्रमाणे पुस्तकाचा बाज संशोधकी आहे पण ते रटाळ होत नाही. आनंदीचे मूळ जोशी घराण्याबद्दलचा दोनशे वर्षांचा जुना इतिहास, आनंदीच्या भावाने ठेवलेल्या नोंदी, इतर तत्कालीन ग्रंथ अशा सगळ्यांची सांगड घालत त्या आपल्यासमोर शक्य तितकी खरी आनंदी उभी करतात. आणि इतर लोकांच्या व्यक्तिरेखाही स्वत:चे मत मध्ये न आणता रंगवतात. त्यामुळे पहिल्यांदा गोपाळरावांचा खलपणा जाणवत नाही. पण जसजशी प्रकरणे पुढे जातात, गोपाळरावांच्या वागण्याचा आनंदीला मानसिक त्रास व्हायला लागतो, तेव्हा एक खास प्रकरण लिहून गोपाळरावांचा दुष्टपणा अगदी साग्रसंगीत सांगतात. कलकत्याच्या सभेत आनंदी स्वत:हून, हातात एक चिटोरेही न घेता भाषण देण्यास उभी राहिली, तेव्हाच त्यांना तिच्या भरारीची कल्पना आली होती. (हे भाषणही पुस्तकात पूर्ण उपलब्ध आहे). जी गोष्ट त्यांची, तीच आनंदीच्या डीनबाईंची. या डीन रिचेल बॉडले, यांनी मोठ्या मनाने आनंदीला त्यांच्या घरी राहायला बोलावले. आनंदीच्या घरमालकिणीबद्दल जेवढं वाईट सांगितले जाते-उदा. अपुरं जेवण देणं, तशा त्या कधीच वागल्या नाहीत.

    या सगळ्या प्रवासातील आनंदीच्या सुखदु:खांची साथीदार होती आंट थिओ कार्पेंटर. एक नवरा सोडला तर खटकणारी, आनंदाची, हळवेपणाची प्रत्येक गोष्ट तिने या दूर देशीच्या मावशीला सांगितली. या पुस्तकात ही आंट तिच्या कुटुंबासह अधिक विस्ताराने येतेच आणि तिच्या कॉलेजमधल्या सहचारिणीही आपापल्या कहाण्या घेऊन येतात. प्रत्येकीचे काही ध्येय होते, काही स्वप्ने होती. इतकेच नाही, तर प्रत्येक प्राध्यापक काय शिकवित होते, त्यांचे आनंदीशी असलेले नाते यांचीही माहिती आनंदीच्या पत्रातून आणि आताच्या मेडिकल कॉलेज ऑफ पेनिसिल्वेनियाच्या दस्ताऐवज विभागातून मिळालेल्या माहितीतून उलगडत जाते. आणि खरोखर आनंदीचा काळ आणि तिचे कर्तृत्व वाचकांसमोर येतं.
लेखिका आनंदीमुळे प्रभावित झालीय पण म्हणून तिच्या चुकांकडे कानाडोळा करत नाही. कलकत्याच्या सभेत तिने उपस्थित जनसमुदायाला दिलेले, “मी माझ्या वेशभूषेत व खाण्यात बदल करणार नाही” हे वचन तिने जीवावर उदार होऊन पाळले. निदान तिने तिथल्या कपड्यांच्या सवयी अंगिकारल्या असत्या, तर थंडी शरीरात राहून राहून ती सतत आजारी पडती ना. तिला भेटणारे सगळेजण “हिंदुस्थानात बालविवाह होतात ना?” असे विचारत असत. तेव्हा तिने आपल्या भाषणात “बालविवाहच कसे चांगले असतात” असे ठासून सांगितले होते. तिच्या सामाजिक भूमिकेत हिंदुस्थानाची प्रतिमा येनकेनप्रकारेण उंचावण्याचाच यत्न जास्त दिसतो. आनंदीचा प्रबंध तिच्या वर्गातल्या इतर प्रबंधांपेक्षा सर्वात मोठा होता, आणि विषय होता: “Obestetrics Among The Aryan Hindoos”. नांव हिंदूंचे, पण ती लिहिते फक्त ब्राह्मण कुटुंबातल्या प्रसूतीशास्त्राविषयी. त्यातही, स्वत:चे असे काही मत न मांडता संस्कृत ग्रंथांचे भाषांतर, मनुस्मृतीतील वचनेच जास्त येतात. एकतर स्वत: डॉक्टर बनावे ही इच्छाच तिला तिच्या मुलाच्या अपमृत्यूमुळे निर्माण झाली होती. असे असताना विज्ञानाभिमुख झालेल्या तिच्या मनाने, पारंपारिक आर्य वैद्यकशास्त्राकडे कोणत्या दृष्टीने पाहिले , पाश्चात्य ज्ञानशाखेच्या अभ्यासानंतर तिला कोणती वेगळी दृष्टी प्राप्त झाली, हे यातून काही लेखिकेला जाणवत नाही. आणि पत्रांतून जाणवणारी चिंतनशील, अत्यंत चिकित्सक, संवेदमाक्षम, सखोल वृत्तीची आनंदी इथे हरवल्यासारखी वाटते. एक प्रश्न फक्त इथे अनुत्तरित राहतो: स्वत: डॉक्टर असूनही, अवतीभोवती इतके निष्णात शिक्षक आणि डॉक्टर  असूनही तिला क्षयाची बाधा झालेली कुठेच कुणी लिहून ठेवले नाही. खुद्द आनंदीला आपण जगू-वाचू याची आशा वाटत नव्हती. गोपाळरावांकडून मानसिक त्रास तर सतत होताच. पण ती औषधे घेत आहे किंवा नाही याचा उल्लेख कुठल्याच पत्रात नाही.

           आनंदी परत येण्यापूर्वीच तिला कोल्हापूर संस्थानात नोकरी मिळाली होती, पण त्यापूर्वीच तिचा आजार बळावल्याने सगळे मार्ग खुंटले. तिच्या मत्यूनंतर रावसाहेब भिडे आणि वैद्य मेहेंदळे यांच्याबद्दलही बरेच वाईट बोलले जात असे, पण ते कसे चुकीचे आहे याचेही ससंदर्भ विवेचन येते. आनंदीची गोष्ट जशी आनंदीच्या आधीच्या आनंदीपासून सुरू होते, तशीच ती आनंदीनंतरच्या आनंदीच्या गोष्टीने संपते. आनंदीच्या मृत्यूनंतर कोल्हापूर संस्थानच्या माहिला डॉक्टरच्या छोट्याशा ओळखीने हे पुस्तक संपते.

     पुस्तकात प्रत्येक गोष्ट अगदी विस्तृतपणे येते. हा परिचय त्यामानाने अगदी त्रोटक म्हणावा लागेल. आनंदी-गोपाळ वाचून आनंदीची फक्त गोष्ट समजते पण तिची खरी ओळख या पुस्तकातून होते. परिशिष्टातला पत्रव्यवहार, आनंदीची भाषणे, आणि तिच्यासाठी इतरांनी केलेली भाषणे, तिचा हिशेबाचा अचूकपणा, या सर्वातून तिची लोकप्रियता व तिचे  सर्वांगीण गुण दिसून येतात. पुस्तक संपता संपता लेखिकेने आंट थिओच्या पणतीकडून मिळालेला आंट- आनंदी पत्रव्यवहारावर पुस्तक लिहायचे ठरवले आहे असे लिहिलेय, आणि आता मी ते पुस्तक शोधायला आतापासूनच सुरूवात करतेय.