"A picture is worth a thousand words!" हे जर चित्राबद्दल असेल, तर दृकश्राव्य माध्यम तर त्याहून प्रभावी म्हणायला हवं. अर्थात ही झाली अपेक्षा, प्रत्यक्षात तसं होतंच असं नाही हा प्रत्यय बर्याचदा येतो. मला ही आला. 'दा विंची कोड', 'शाळा' ही अलीकडली उदाहरणं. त्यात आता पुलंच्या सार्या व्यक्तिचित्रांची भर पडलीय. त्या निमित्ताने हा लेखनप्रपंच.
सारांश सांगायचा तर, सिनेमात एकंदरीत सगळ्याच गोष्टींची वाट लावली आहे. बालगंधर्व मध्ये नारायणरावांच्या चरित्राचा स्लाईडशो होता असं म्हटलं तर गोळाबेरीज म्हणजे प्रत्येक व्यक्तीचित्र हे एका स्लाईडवरचं बुलेट पॉईंट आहे. चित्रपटाच्या पहिल्या अर्ध्या तासातच बरेच जण हजेरी लावून जातात. त्यामुळे व्यक्तिरेखा फुलणं हा प्रकार होत नाही. चितळे मास्तर, हरितात्या, भय्या नागपूरकर, अंतू बर्वा, नाथा कामत एक ना दोन!! प्रत्येकजण आपापल्या व्यक्तिरेखेची चार वाक्यं म्हणतात आणि निघून जातात. उदाहरणार्थ भय्या नागपूरकर आणि कुठल्याशा परांजपे साहेबाला एकेरी संबोधून 'डोन्ट वरी' म्हणणारा बापू अनुक्रमे चाळीस व तीस सेकंदात आणि पाच व चार वाक्यांत आटोपले. यांना न घेताही मग काम चालू शकलं असतंच की. सगळंच दाखवायला हवं हा अट्टहास का? हा प्रश्न पुन्हा एकदा पडला. त्यातल्या त्यात नंदा, गटणे, चितळेमास्तर या लोकांना पुन्हा संधी देऊन त्यांना अगदीच उडवलं नाही हे दाखवतात. पण सगळ्यांच्याच बाबतीत असं म्हणता येत नाही.
पुलंची व्यक्तीचित्रे जशी अजरामर तशीच त्यांनी लिहिलेली वाक्यं माराठी मनावर कोरली गेली आहेत. आमच्या नंदनलाच विचारा, एका क्षणात सटासट दहा वाक्यं फेकेल. तर या अशा वाक्यांची तर चुकीच्या संवादफेकीने अक्षरशः वाट लावलीय. वानगीदाखल सांगायचं तर "रत्नांग्रीच्या समस्त म्हयशी तूर्तास गाभण काय रे झंप्या?" हे वाक्य प्रश्नार्थक न येता तारस्वरात विधानार्थी येतं, तसंच "इथं पण ऑटोमॅटिक होतं की कुंथायला लागतं?" या टंग इन चीक वाक्याची तर अगदी फेफे उडवलीय. पुलंनी लिहिलेली वाक्यं कुठं ना कुठं वापरायलाच हवीत या समजाने ती काही ठिकाणी घुसडल्यासारखी वाटतात. सिनेमातले पुलं स्वगत बोलताना चेहर्यावर सास बहू सिरियलमधल्या बायकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त हावभाव दाखवतात. या सगळ्या गोष्टींमुळे चित्रपटात नर्मविनोद आणि सटल्टी या दोन गोष्टी जाम हरवून गेल्या आहेत.
दिग्दर्शन कसं असावं याबद्दल जास्त काही बोलता येत नसलं तरी 'किमानपक्षी' कसं असावं याच्या काही माफक अपेक्षा असतात. आनंदवनातलं कथाकथन संपल्यावर बाबा आमटे पुलंना भेटायला येतात. प्रथम दिसतो तो त्यांचा कटिप्रदेश(!) आणि मग कॅमेरा वर जाऊन चेहर्यावरती स्थिरावण्याऐवजी तो पाठी जाऊन होऊन आमटे उर्ध्व-अधर दिशेने वाढतात. गदिमांची आई किंवा बायको, "अधून मधून दिसत जा" म्हणते आणि निर्विकार चेहर्याने फ्रेममधून निघून जाते. संवाद म्हणताना जर तिचा चेहरा दाखवला नाही, तर नंतर आणि तोही असा दाखवायची गरज काय? तसेच चित्रपटभर नको तिथे संगीत आणि भरीस भर म्हणून क्लोज-अप्सचा भडिमार आहे. नवीन कॅमेरा घेतला की आपण जसे दिसेल ते चेहरे टिपायला लागतो तसे इथे पडदाभर नुसतेच चेहरेच चेहरे दिसतात. पुलं वृद्ध होतात पण त्यांचा मित्र बबडू अगदी तरणाबांड आहे, नंदा प्रधानची आई ही सुद्धा पुलंच्याच वयाची दिसते. नंदा शेवटपर्यंत पहिल्या दृश्यात दिसला तसाच दिसतो, वार्धक्याचा कुठे इतकासा म्हणून लवलेश नाही. त्याची आई कुठल्याही अँगलमधून श्रीमंत-सुखवस्तू बाई वाटत नाही. एक ना दोन!!! इतर गोष्टींबद्दल सांगायचं तर आपला सिनेमा विंटरनॅशनल फिल्म फेष्टिवलमध्ये दाखवला जाणार असल्याची खात्री असल्याने सगळ्या पाट्या विंग्रजीत आहेत. पुलंच्या कथाकथन आणि इतर गोष्टी सांगताना त्यांचे दोन-चारच फोटो पुन्हा पुन्हा दाखवलेयत.सिनेमात अधून मधून रंगमंचावर मनोज जोशी पुलंच्या रूपात कथावाचन करताना दिसतात. मूळ पुलंचा फोटो आहे, आणि वर निखिल रत्नपारखी पुलं जगत असतोच. इतके तीन तीन पुलं का हाही एक प्रश्न आहे. आदरांजली म्हणून मूळ पुलं नी असण्याशी मला हरकत नाही. मग निखिल रत्नपारखी आणि मनोज जोशी दोघे कशाला हवेत? एकानेच काम काम भागलं नसतं का? असो. सिनेमात पुलंची आई अगदी सर्वसामान्याला अगम्य (म्हणे शुद्ध गोवन) असलं कोंकणी बोलते. तीच गोष्ट सुनिताबाई आणि पुलंच्या लग्नाची. तिथे पण तीन फोटो(तीन सेकंदां)त त्यांचे प्रेमप्रकरण आणि लग्न आटोपून नंतर लक्षात न राहिलसं पाच मिनिटांचं गाणं खर्ची घातलंय. (बहुधा 'आहे मनोहर तरी' मध्ये वाचल्याप्रमाणे दोघांची भेट कॉलेजात शिकवताना न होता संघाच्या हापिसात झाली होती, आणि बर्याच ठिकाणी वाचल्याप्रमाणे लग्न घरातल्याच साडीवर नोंदणी पद्धतीने झाले होते. ते इथे शालू नेसून विधीवत होते.)
बाकी, काय बरं आहे हे सांगायचं तर शेवटाकडे चितळे मास्तर सॉल्लीड जमून आले आहेत, रावसाहेब मस्त रंगलेयत आणि 'इंद्रायणी काठी' हे गाणं छान जमून आलंय, आणि त्यातल्या त्यात सुनिताबाईच काय त्या आपला आब आणि भूमिकेचा बाज सांभाळून आहेत. थोडक्यात सिनेमाला माझ्याकडून दहापैकी अर्धा गुण. पुलं प्रेमींनी आणि एकूणच रसिकांनी पिक्चर न पाहता त्यांचं कोणतंही पुस्तक कुठल्याही पानाशी उघडावं आणि वाचावं.
No comments:
Post a Comment