या चटोर शब्दावरून आणखी आठवलं... शाळेत असताना नाचकामात.. म्हणजे तेच ते हो.. स्नेहसंमेलनात, हिंदी गाणी एवढी बोकाळली नव्हती तेव्हाचं म्हणतेय मी.. तेव्हा कृष्ण-राधेची गाणी चांगलीच पॉप्युलर होती.. मला लहानपणी 'आज गोकुळात रंग खेळतो हरी' हे गाणं पुन्हा एकदा त्यातल्या चटोर शब्दांमुळं आवडायचं.. पण जेव्हा हे गाणं टीव्ही वर पहिल्यांदा पाहिलं, तेव्हा कृष्ण म्हणून धुमाळांना बघून बिचार्या कृष्णाची कीव आली.. नंतर म्हणून त्या चटोर गाण्याच्या नि चटोर धुमाळांच्याही वाटेस गेले नाही!!!! असो!!!
गणपाची मुलगी 'दिपका मांडिले तुला' ऐकून झोपते.. त्यावरून आठवलं, आमच्या घरातली आख्खी पिलावळ आईचं एक गाणं ऐकत झोपायची. अगदी भावापासून ते सध्या तीन वर्षाचा असलेल्या भाच्यापर्यंत. सगळ्या भाचरांत सर्वात जास्त लाड झाले ते मोठ्या भाचीचे.. घरातलं पहिलं बाळ!! साहजिकच डोक्यावर मिर्या वाटायचं.. अजूनही वाटतंच आहे..!!! भावाच्या 'दिपक' प्रकरणात तोंड दुखल्याने त्याला झोपवण्याची जबाबदारी मी कधीच घेतली नाही. पण या भाचीसमोर माझ्या निश्चयाने नांगी टाकली.. आधीच ती मला सोडून राहायची नाही.. नि झोप आल्यावर माझ्या मांडीवर डोकं ठेवून स्वतःच उंउं करत मान हलवायची.. मग कळायचं.. महाराणींना झोप आली ते!!! बाकी, हे गाणं मला माझ्या स्वतंत्र चालीत म्हणता येत नाही असं इतरांचं मत आहे.
आकाश अंगणी रांगत आला
शीण तान्हुल्या भारीच झाला
पाळण्यामध्ये बाळ झोपला
सृष्टी माऊली लागे गायला... जो बाळा जो जो रे जो!!!
निशामातेच्या अंकी निजाया
केव्हाच गेला दिवस राया
जागून जागून तापली काया
नीज रे बाळ नीज भास्करा.. जो बाळा जो जो रे जो!!!
आनंदकंदा जगतधारा
नीज सुखाने नीज वासरा
पहाट होता जाई माघारा
नीज रे बाळा नीज चंद्रमा.. जो बाळा जो जो रे जो!!!
सृष्टीमाऊली आपल्या दोन मुलांना आलटून पालटून झोपवते, ही कल्पनाच कस्सली येडू आहे.
एकदा इथे मुंबईतच एका बारशाला जायचा योग आला.. नांव ठेवले.. पाळ्णा म्हणायची वेळ आली. पण 'पहिल्या दिवशी राजदरबारी' तर सोडाच हो पण अंमळ उत्साहाने पुढे आलेल्या मंडळाची गाडी 'हलके हलके जोजवा' च्या दोन ओळींवरच अडकली... मी म्हटलं, नाहीतरी तुम्हांला काहीतरी 'जो बाळा जो जो रे जो' च हवंय ना??? मी म्हणते गाणं!!! मग कुणीतरी, 'म्हण बै. तू पण वाट मिर्या' म्हणायचीच खोटी होती!!
मला वाटलं, की हे गाणं कुणाला माहितही नसेल. पण कुठलं काय?? तिथल्या बर्याच काकवांनी पण म्हणायला सुरुवात केली.. नंतर कळलं, त्यांना शाळेत पाचवी-सहावीच्या पुस्तकात ही कविता होती म्हणून.. नि नंतर सगळा प्रोग्रॅम राहिला बाजूला.. नि समस्त काकूमंडळ शाळेतल्या आठवणीत असं रमलं की यंव रे यंव!!!
आणखी एक कविता होती.. बहुतेक माझ्याच पहिलीच्या पुस्तकात असावी.. आता जसे मी आणी माझा भाचा जिंगल टून्समधली उंदराच्या टोपीची गोष्ट, 'हे काय आहे? असेल रूमाल!!!! ओहो.. आहा येईल धमाल" असं तालासुरात म्हणतो, तसे तेव्हा मी आणी आई ही कविता म्हणत असू.
चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?
कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?
नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी
कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?
नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही
कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?
नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?
आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?
गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला
चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?
काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला
चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?
पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा
जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला
राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना!!!!!
या गाण्यात कधी मी चिमणी असे, तर कधी आई चिमणीची भूमिका करे. पण मग मला कावळेदादा, कपिलामावशी, पोपट्दादा व्हावं लागे. नि ते मला मुळीच नाही आवडायचं. मग आई मी काही ऐकेना म्हणजे 'आता तुला चिमणी होऊ देणार नाही' अशी धमकी द्यायची!!!
अजूनही पुष्कळशी गाणी आहेत.. मनाच्या कुपीत दडलेली... अशीच कधीतरी इच्छा होईल.. मी परत येईन एकदा आठवणींचा आणि गाण्यांचा खजिना घेऊन !!!
No comments:
Post a Comment