Wednesday, June 2, 2010

डी रिअर विंडो!!!!


सुटीत बरंच काही लिहायचं ठरवलं होतंच॥ आज सकाळी मोडकांना यादी वाचून दाखवली तर ते म्हणाले, "तुला लिहिण्यासाठी नि मला वाचण्यासाठी शुभेच्छा"!!! :)
तर,यादीतील पहिलं स्थान आहे ते रिअर विंडो ला!!
रिअर विंडो... हिचकॉकचा मी पाहिलेला पहिला चित्रपट!!!

नायक जेफ्री(जेम्स स्ट्युअर्ट) -प्रोफेशनल फोटोग्राफर-एकदा फोटोग्राफी करताना त्याचा अपघात होतो आणि त्याच्यावर घरी बसण्याची सक्ती होते. आधीच उन्हाळा नि त्यातच घरी बसून कंटाळलेला तो.. खिडकीत बसून आजूबाजूच्या कुटुंबांचे निरिक्षण करू लागतो.. त्याचे शेजारी असतात, एक बॅले डान्सर..: जी घरी सुद्धा अप्लवस्त्रांत बॅलेच करत असते, एक संगीतकार..: थोडासा वैतागलेला, एक एकाकी प्रौढा....:मिस लोनलीहार्ट, एक सेल्समन..: मि.टोरवाल्ड नि त्याची सतत आजारी पत्नी, एक नवीनच लग्न झालेले जोडपे, एक उन्हाळा सहन होत नाही म्हणून बाहेर फायर एस्केपमध्ये झोपणारे जोडपे.. यांच्याकडे एक कुत्राही आहे, आणि एक कमी ऐकू येणारी.. शिल्पकार..!!! यांच्यासोबत त्याच्या आयुष्यात आणखी दोन व्यक्ती असतात.. एक त्याची नर्स नि दुसरी त्याची मैत्रिण.. लिसा(ग्रेस केली)!!

सुरूवातीला चित्रपट थोडासा रटाळवाणा संथ जातो.. पण हळूहळू आपणही त्या वातावरणाचा भाग बनतो नि कोण कुठे राहते हे नीट लक्षात राहते. निरिक्षण करता करता जेफ्रीच्या लक्षात येते की मि टोरवाल्ड भर पावसात.. रात्रीबेरात्री येजा करत असतो. त्याचे त्याच्या आजारी पत्नीसोबत खटकेही उडत असतात.. आधी त्याच्या या टाईमपासला नाक मुरडणारी लिसा ही हळूहळू त्यात रस घ्यायला लागते. यातच सौ. टोरवाल्ड गायब होतात. तिला बाहेर जाताना जेफ्रीने पाहिलेले नसते. नि काही काळानंतर टोरवाल्डच्या घरून एक मोठा बॉक्स बाहेर पाठवला जातो. त्याने त्याच्या बायकोचा खून करून तिला त्यात घालून तिची विल्हेवाट लावली असा त्याचा समज होतो

आता तो आपल्या कामात त्याच्या पोलिस मित्रालाही सामील करून घेतो. नर्सही नकळत यात गुंतते. दरम्यान तो लिसाला टोरवाल्ड घरी नसताना त्याच्या नावे एक पत्र टाकायला सांगतो.. हेतू हा की, त्याची यावर काय प्रतिक्रिया होते हे त्याला पाहायचे असतं.. पण याने टोरवाल्डला आपल्यावर सतत कुणीतरी नजर ठेऊन आहे हे कळतं. भरीस भर म्हणून जेफ्री टोरवाल्डला एके ठिकाणी भेटायला बोलावतो.. आणि लिसा नर्सला समोरच्या बागेत एका कुत्र्याने थोडेसे उकरलेले असते(हा कुत्रा तोवर अचानक मान मुरगाळल्याने मेलेला असतो) तिथे काय आहे ते पाहायला सांगतो. लिसा शहाणपणा करून टोरवाल्डच्या घरात घुसते नि तेव्हाच अचानक परत आलेला टोरवाल्ड तिला रंगेहाथ पकडतो. जेफ्रीने बोलावलेले पोलीस तिला वाचवायला तिथे पोचतात नि याचवेळी त्याच्या लक्षात येतं की लिसा समोरच्या अपार्टमेंटमध्ये कुणालातरी इशारा करत आहे. या सर्वाच्या मुळाशी कोण आहे हे त्याच्या लक्षात येते.

नर्स लिसाला जामीनावर सोडवून आणायला पोलिस स्टेशनमध्ये जाते नि जेफ्री घरी एकटाच राहतो. तो पोलिस डिटेक्टिव्ह मित्राला घडला प्रकार सांगतो. नि कुठेतरी पाणी मुरतंय हे त्यालाही पटतं. नि याच वेळी टोरवाल्ड जेफ्रीच्या घरी येतो. खुर्चीला खिळून असणारा जेफ्री स्वसंरक्षणार्थ कॅमेर्याचे फ्लॅशलाईट्स वापरून टोरवाल्डचे डोळे दिपवण्याचा प्रयत्न करतो... पण त्याचाही काही उपयोग होत नाही. तो जेफ्रीला त्याच रिअर विंडो मधून खाली ढकलून देतो नि सुदैवाने पण नेहमी उशीरा येणारे पोलीस त्याला अर्धवट झेलतात.

सिनेमा संपतो त्तेव्हा हिवाळा चालू झालेला असतो... संगीतकार नि मिस लोनलीहार्टची मैत्री झालेली असते... बॅले डान्सरला तिचा मित्र भेटायला येतो... कुत्रेवाल्याकडे नवीन कुत्रा आलेला असतो.. शिल्पकार आजी मस्त उन्हात आरामखुर्चीत आराम करत असतात.. टोरवाल्डचं घर नवीन लोकांसाठी सज्ज होत असते... नवपरिणीत जोडप्याचे लग्न चांगलेच मुरलेले असते.. नि जेफ्री दोन्ही पाय जायबंदी होऊन पडलेला असतो.. शेजारी अर्थातच लिसा असते.. ती त्याला दाखवायला म्हणून "बियॉन्ड हाय हिमालयाज" पण खरेतर एक फॅशन मॅगेझिन वाचत असते..!!! :)

जरी हा रहस्यपट असला.. तरी यात गूढ किंवा कनठाळ्या बसवणारे संगीत नाही... चित्रविचित्र किंवा गूढ बोलणारी पात्रे नाहीत.. टोरवाल्डनेच त्याच्या बायकोचा खून केला हे आधीच लक्षात येतं पण त्यामुळे चित्रपटाची रंगत बिल्कुल कमी होत नाही.. पूर्ण चित्रपट घडतो ते ही एकाच अपार्ट्मेंट मध्ये.. तरी काही चुकलंय असंही वाटत नाही!!! ग्रेस केली.. नॉर्मा शिअरर ही नांवे नाथा कामत मध्ये फक्त वाचली होती.. पण प्रत्यक्षात ती दिसते कशी, हे इथेच प्रथम पाहिले..!!!

हे रिअर विंडो मधून दिसणार्‍या दृष्याचे म्युरल:


जाता जाता, चित्रपट तर आवडलाच.. पण आणखीही एक गोष्ट मला आवडली.. ती म्हणजे ग्रेस केलीची सूटकेस.. तिच्या त्या एवढुशा सूटकेसमध्ये तिचा नाईट गाऊन चपलेसह मावतो!!! आहे की नाही गंमत???

No comments: