Thursday, June 3, 2010

स्मृतीचित्रे

एका वर्षी शाळेत एकदमच रमाबाई रानडे नि लक्ष्मीबाई टिळ्कांच्या शिक्षणावर दोन धडे होते.. त्यात त्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांना शिकवणार्‍यांचे नि मदत करणार्‍यांचे काय हाल झाले होते याचं खुसखुशीत वर्णन दोघींनीही केलं होतं.. तसे आम्ही स्वतःची पुस्तकं सोडून अवांतरात जास्त रमणारी माणसं.. त्यातूनच एकदा बहिणीचे अकरा-बारावीचे पुस्तक वाचत होते.. त्यातही लक्ष्मीबाईंचा लेख होता.. हा मात्र आधी सारखा विनोदी नाही, तर त्यांना होणारा सासुरवास नि नवर्‍याचे धर्मांतर याबद्दल होता. स्मृतीचित्रे वाचायचं तेव्हाच मनात नक्की झालं होतं.. पण योग मात्र आता जुळून आला..

   पुस्तक तसे लिहिलंय खूप वर्षांपूर्वी.. पहिली आवृत्ती १५ डिसें १९३४ ची आहे.. तरी मराठी पुष्कळशी सोपी (पक्षी: बाळबोध) आहे.. तसे आत्मचरित्रच आहे पण जाता जाता त्या त्यांना समजतील तशा सामाजिक घडामोडींचेही वर्णन करायला विसरत नाहीत.. हा मुख्यतः १८६० ते १९२० चा कालखंड आहे.. मधून मधून त्या इंग्रजी शब्दही वापरतात.. याची मात्र मला गंमत वाटली.. बाकी, इतर आत्मचरित्रांत असलेला दोष इथे मला तरी आढळला नाही.. जे आहे.. जसे आहे.. ते त्या अगदी प्रांजळपणे कबूल करतात.. नि परिस्थितीने त्यांची थट्टा करण्याऐवजी त्याच परिस्थितीवर विनोद करतात..


                पुस्तक पहिल्यांदा प्रकाशित झाले ते चार भागांत.. आता मात्र चारही भाग एकत्रच उपलब्ध आहेत. पुस्तकाची सुरूवातच मुळी होते त्यांच्या बाबांच्या एका आठवणीपासून. त्यांच्या बाबांचे सोवळे ओवळे इतके कडक, की ते सोनेनाणें देखील धुवुन घ्यायचे म्हणे.. घरच्यांचे काय हाल होत असतील तेव्हा, ते देवालाच माहित!!! त्यानंतर त्यांचे टिळकांशी लग्न-त्याच्या हकिकती होतात न होतात तोच टिळकांचे घरून पळून जाण्याच्या सुरस कथा येतात. इथेच ते राजनांदगांवी असताना टिळकांच्या मनात लक्ष्मीबाईंच्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. याच सुमारास टिळकांचा कल ख्रिस्त्ती धर्माकडे होऊ लागला होता.. त्यावेळच्या त्यांच्या डायरीतले काही उतारे टिळकांची मनःस्थिती सांगतात.. लक्ष्मीबाईंच्या कविता लेखनासही सुरूवात आणि टिळकांचे धर्मांतर यासोबत हा पहिला भाग संपतो...


     टिळकांनी धर्म बदलला तरी लक्ष्मीबाईंनी अद्याप बदलला नव्हता.. पण त्या काळात धर्म बदलणे ही लहान गोष्ट तर खचितच नव्हती.. अशावेळी त्यांचे शुद्धीकरण करून परत धर्मात घेण्याचे प्रयत्न झाले नसतील तर नवलच!!! पण टिळक आपल्या निर्णयावर अटळ होते. परिणाम व्हायचा तोच झाला.. समाजाने त्यांना एका अर्थाने वाळीत टाकले. भाड्याने राहण्यासाठी घर , एवढेच काय पण धुण्याभांड्याला बाई पण मिळेना.. हद्द म्हणजे एका घरमालकाने त्यांना घरातलं शौचालयही वापरू नाही दिले.. तेही जणू कर्मठ झाले होते..  =)) टिळकांचे धर्मांतराचे कारण त्या हिंदूधर्मातला जातीभेद असे देतात. यावेळपर्यंत प्लेगाने थैमान घातले होते. आणि हळूहळू लक्ष्मीबाईंच्या मनात पण जातिभेदातला फोलपणा लक्षात येऊ लागला होता.. नि त्यांचे मनही ख्रिस्तीधर्माकडे वळू लागले होते.. हा दुसरा भाग संपता संपता त्याही धर्म बदलून ख्रिस्ती होतात.. या भागात आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडते म्हणजे त्या अनाथ- गरीब मुलांना सांभाळायला सुरूवात करतात.. खरंतर त्यांना मुलांची खूप आवड.. पण त्यांना मुले झाली नाहीत असे नाही.. पण त्यातला दत्तू हा मुलगा सोडला तर विशेष कुणाला जास्त आयुष्य लाभले नाही..

    

       होता होता लक्ष्मीबाईंचा गोतावळा वाढला..  दरम्यान त्यांचे इतर ख्रिस्ती लोकांसोबत येणेजाणेही वाढले होते.. दत्तूचे लग्न.. त्याचा संसार मांडणे वगैरेसारख्या गोष्टीही त्या अशातच नमूद करून जातात.. आपले बालकवी त्यांच्याकडेच लहानाचे मोठे झाले. बरेचसे शब्द लक्ष्मीबाईंना सुचत पण लिहिताना अडचण येई. तेव्हा ठोंबरेच त्यांच्या मदतीला हजर होत.(शाळेतल्या धड्यात त्यांना पुस्तक लिहिताना मनुष्य हा शब्द अडला होता याची आठवण नि खास लक्ष्मीबाईंच्या मराठी शैलीतला :)  बालकवींनी लिहिलेला पुस्तकाचा अभिप्राय होता..) या बालकवींच्या आठवणींवरती त्यांनी एक आख्खे प्रकरण लिहिले आहे.. त्याच बरोबर त्यांचे अनेक मानसपुत्र नि मानसकन्या यांचा उल्लेखही जागोजागी आहेच आहे.  अशातच  टिळकांनी ख्रिस्तायन लिहिण्यासाठी सातार्‍याला बूड हलवले..  टिळक एके  ठिकाणी मान्य करतात की बुद्धीने मी ख्रिस्ती झालो होतो पण मनाने ख्रिस्ती व्हायला आणखी दहा वर्षे जावी लागली. त्यांची ही कथा.. तर इतरांचे काय??  ते अजूनही स्पृश्य-अस्पृश्यतेच्या कल्पनांना कवटाळून तर होतेच.. नि वर मिशनर्‍यांनी त्यांना पंगुही करून ठेवले होते..  या सगळ्या आठवणी त्या टिळकांनी त्या-त्या वेळी लिहिलेल्या कवितांसह उद्धृत करतात.. हा तिसरा भाग टिळकांच्या मृत्यूच्या प्रकरणाने संपतो

        पुस्तकाचा शेवटचा म्हणजे चौथा भाग म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतरचे बाईंचे मुंबईमधले वास्तव्य आणि एका मिशनरी वसतीगृहात मेट्रनची नोकरी. येथे आल्यावर त्या जुजबी इंग्रजीही लिहायला वाचायला शिकल्या.. तिथे त्या एकदा मुलींना पिकनिकला म्हणून जुहू बीचवर घेऊन गेल्या नि अचानक समुद्राला भरती आली.. लहानथोर सर्व मुलींना वाचवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली..  एक मुलगी समुद्रात बुडाली नि कधी नव्हे ते आयुष्यात उतारवयात कोर्टाची पायरीही चढावी लागली. या प्रकरणात त्यांना बराच मनस्ताप सोसावा लागला..  भरीस भर म्हणून त्यांच्या घरातले मृत्यूसत्र तर चांगलेच चालले.. सुरूवात ठोंबरे(पक्षी: बालकवी) नी केली.. त्यानंतर स्वतः टिळक.. इतर नातेवाईक.. ज्यांना प्राणपणाने जपल्या त्या अकरा मुली.. पंडिता रमाबाई.. अशी एकंदर बीव-बावीस माणसे वीस-बावीस महिन्यांत गेली.. माणूस कितीही धीराचा असला.. तरी अशा वेळेस मनाची अवस्था काय होत असेल याची कल्पनासुद्धा न केलेली बरी..  बाईंची प्रकृतीही खालावली. तेव्हा त्यांना सर्वांनी हवापालटास जायला सुचवले नि  त्या सहपरिवार एका डॉक्टरीणबाईंकडे कराचीला गेल्या.. त्यांचे बस्तान लावून मुलगा परत मुंबईला आला.. नि त्या पुन्हा घरची कर्ती बनल्या..  कराचीतली गोषा पद्धती.. भाजीखरेदी.. भाड्याची घरे शोधणे.. कचरा फेकणारे शेजारी या  गोष्टी सांगता सांगता पुस्तक  इथेच संपते..

     वास्तविकतः त्यांनी रूढार्थाने कसलेही शिक्षण घेतले नव्हते.. नवर्‍याने शिकवले म्हणून त्या मराठी लिहायला वाचायला शिकल्या.. नि जसजशी गरज पडत गेली तशतशा नवीन गोष्टीही शिकत गेल्या.. आयुष्यातले प्रसंग त्या लिहित तर होत्याच आणि त्या कविताही करू लागल्या..बर्‍याचजणांना या कविता टिळच करत असे वाट्त असे!!!!(हे वाचताना मला सुनीताबाई आणि पुलंचा अवघड वळणात गाडी अडकण्याचा प्रसंग आठवला.. ;) असो.) आत्मचरित्रातल्या  प्रसंगांचे वर्णन तटस्थपणे त्या करतातच.. "मी नाही हो अशी" असा सूरही वाचताना कुठे जाणवत नाही..  बहुतेक सारे दु:खाचे प्रसंगांचे वर्णन त्या विनोदाने करतात.. मात्र तो कुठे बोचत नाही वा अंगावरही येत नाही.. त्यामुळेच  पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेले "प्रसन्न आणि गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल" हे वाक्यही तितकेच सार्थ ठरते.. पुस्तकात इंग्रजी शब्दांचा वापर अनेक ठिकाणी झाला आहेच.. नि कुठे कुठे त्या शब्दांना छान मराठी रूपडंही बहाल केलंय.. उदा. व्ही.पी चे अनेकवचन.. व्हीप्या!!! :) कदाचित त्यांचे हे सगळे लेखनसामर्थ्य पाहूनच आचार्य अत्र्यांनी त्यांना साहित्यलक्ष्मी पदवी बहाल केली असेल..

1 comment:

राज जैन said...

उत्तम लेख, पुस्तक एकदा वाचायलाच हवे असे वाटत आहे.
एकदम साधीसोपी भाषा वापरल्यामुळे हदयास भिडतो हा लेख !

लिहीत रहा...