एका वर्षी शाळेत एकदमच रमाबाई रानडे नि लक्ष्मीबाई टिळ्कांच्या शिक्षणावर दोन धडे होते.. त्यात त्यांच्या शिक्षणापेक्षा त्यांना शिकवणार्यांचे नि मदत करणार्यांचे काय 'हाल' झाले होते याचं खुसखुशीत वर्णन दोघींनीही केलं होतं.. रमाबाईंचे शिकणे म्हणजे जुलुमाचा रामराम.. तर लक्ष्मीबाईंचे शिकण्याची सुरूवातच मुळी, "शब्द म्हणजे काय?", या प्रश्नाला "शब्द म्हणजे शब्द" या उत्तराने, नि आणलेल्या पुस्तकांची होळी करण्यानेच झाली.. तसे आम्ही स्वतःची पुस्तकं सोडून अवांतरात जास्त रमणारी माणसं.. त्यातूनच एकदा बहिणीचे अकरा-बारावीचे पुस्तक वाचत होते.. त्यातही लक्ष्मीबाईंचा लेख होता.. हा मात्र आधी सारखा विनोदी नाही, तर त्यांना होणारा सासुरवास नि नवर्याचे धर्मांतर याबद्दल होता. स्मृतीचित्रे वाचायचं तेव्हाच मनात नक्की झालं होतं.. पण योग मात्र आता जुळून आला..
पुस्तक तसे लिहिलंय खूप वर्षांपूर्वी.. हा मुख्यतः १८६० ते १९२० चा कालखंड आहे.. पहिली आवृत्ती १५ डिसें १९३४ ची आहे.. तरी मराठी पुष्कळशी सोपी (पक्षी: बाळबोध) आहे.. तसे आत्मचरित्रच आहे पण जाता जाता त्या त्यांना समजतील तशा सामाजिक घडामोडींचेही वर्णन करायला विसरत नाहीत.सगळे प्रसंग वर्णन तटस्थपणे समोर येतात... तेही काहीशा त्यावेळच्या टिपीकल बायकी पद्धतीने.. म्हणजे... प्रसंगांचे फक्त वर्णन.. त्यावर स्वतःची टिप्पणी तशी कमीच.. नाहीतरी त्या काळी स्त्रियांना स्वतःची मते असावीत असे फार थोड्या जणांनाच वाटायचं ना!!! 'बाईने कसे घर, घरातील माणसं यांना सांभाळून राहावं', हे त्या म्हणत नाहीत.. पण पानोपानी तसे ते जाणवतं मात्र!! पण कशावर शेरा मारत नाहीत याचा अर्थ मनातून काही वाटत नाही असा नसतो हे वाचताना पुढे लक्षात येत राहातं.
लहानपणीचा बाबांचा विक्षिप्त स्वभाव.. लग्न झाल्यावर पळून जाणारा नवरा.. नि मग असावे तितके तर्हेवाईक नि कर्मठ सासरे.. यांच्याबद्दल त्या लिहितात, पण यांतले कुणी चुकीचे वागलं असं कुठेच येत नाही.. अगदी टिळकांनी धर्मांतर केलं, तेव्हासुद्धा... त्या रडतात.. आजारी पडतात.. तरीही नाहीच.. उलट स्वतःच्या सततच्या आजारपणाचा उल्लेख त्या लोळणफुगडी म्हणून करून जणू काही तो एक खेळच की काय असे म्हणून उडवून लावतात..
टिळकांचे राहाणं तसे बेभरवशाचं.. कधीही या.. न सांगता कुठेही जा.. पैशाची विवंचना तर कायमची पुजलेली.. अशा वेळी पै-पाहुण्यांच्यात येजा करायची, नवरा एखाद्या कार्याला जात नाही.. पण म्हणून बायकोला जाणं थोडंच चुकतं! अशा वेळी आपण लंकेची पार्वती नि ते कफल्लक शंकर म्हणून त्यांना रडू येतं पण लगेच शंकर-पार्वतीच्या कथा आठवून हसूपण येतं.. जे आहे, जसे आहे, ते त्या अगदी प्रांजळपणे कबूल करतात.. नि परिस्थितीने त्यांची थट्टा करण्याऐवजी त्याच परिस्थितीवर विनोद करतात.. वरचे लोळणफुगडीचे उदाहरण तर आहेच.. आणि भरीस भर म्हणून त्यांना हसू फार येत असे.. त्यामुळे अगदी कडाक्याच्या भांडणं पण त्यामुळं मजेदार होतात.. हेच पाहा ना आता:
"टिळकाबरोबर सोंगटय़ा खेळताना त्यांची सरशी होऊ लागली की मला हसू लोटायचे व मी हसू लागले की, टिळक चिडायचे. एकदा टिळकांच्या रागाचा पारा चढल्या. सोंगटय़ा, पट, फांसे थर थर कापू लागली. काहींनी खालील गटाराचा आश्रय केला. घातलेले बिछाने सैरावैरा धावू लागले. सगळ्या सामानाने बंड पुकारले. जागच्या जागी काही राहिले असेल तर ते फक्त बायको व दिवा! प्रकरण इतके हातघाईवर आले की शेवटी दिव्यानेही राम म्हटले. आगपेटी केव्हाच पासोडीचा आसरा करून बिछान्याच्या ढिगाऱ्यात तोंड लपवून बसली होती. तरी मला वाटत होती गंमत. मी आणखी जोरजोराने हसू लागले. आता त्या युद्धकांडातील शेवटला भाग! जिन्याला नव्हते दार! टिळकांनी मला अंधारात लोटले. मी जिन्यातून ‘घालीन लोटांगण वंदीन चरण’ करीत खाली तबकडीत येऊन पडले. टिळकांचा राग मावळला व माझे हास्य पळाले. टिळक घाबऱ्या घाबऱ्या आगपेटी शोधू लागले. ती सापडेना. शेवटी अंधारातच चाचपडतते खाली आले व मला उठवून वर घेऊन गेले- विद्यानंदाचे वेळी मला तो सातवा महिना होता."
हे वाचून कुणाला वाटेल की इथे रणकंदन माजले होते??
विद्यानंद.. त्यांचा पहिला मुलगा.. फार काळ तो नाही जगला.. खरंतर त्यांना मुलांची खूप आवड.. त्यांना मुले झाली, नाही असे नाही.. पण त्यातला दत्तू हा मुलगा सोडला तर विशेष कुणाला जास्त आयुष्य लाभले नाही.. पोटच्या मुलांचे मृत्यू तर त्यांनी सहन केलेच, पण टिळकांच्या ख्रिस्ती होण्यामुळे त्यांच्या पारंपरिक, पापभिरू मनावर झालेला आघात मात्र चांगलाच होता. इतका की, जीव देण्याचा विचारही त्यांनी केला होता.. पण शेवटी ख्रिस्ती झाला तर झाला.. पण नवर्याची ख्याली खुशाली तर कळाली, म्हणून स्वतःचीच समजूत घालून घेतात..
टिळकांनी धर्म बदलला तरी लक्ष्मीबाईंनी बदलला नव्हता.. पण त्या काळात धर्म बदलणे ही लहान गोष्ट तर खचितच नव्हती.. अशावेळी त्यांचे शुद्धीकरण करून परत धर्मात घेण्याचे प्रयत्न झाले नसतील तर नवलच!!! पण टिळक आपल्या निर्णयावर अटळ होते. परिणाम व्हायचा तोच झाला.. समाजाने त्यांना एका अर्थाने वाळीत टाकले. भाड्याने राहण्यासाठी घर , एवढेच काय पण धुण्याभांड्याला बाई पण मिळेना.. हद्द म्हणजे एका घरमालकाने त्यांना घरातलं शौचालयही वापरू नाही दिले.. यावर त्या "तेही जणू कर्मठ झाले होते" असा मार्मिक शेरा मारतात.. नि नवीन बिर्हाड शोधायला सज्ज होतात.. हेच खरं कर्तृत्व!!!
दरवेळी टिळकांनी संसार उधळून टाकायचा, लक्ष्मीबाईंनी काडी काडी करून जमवलेल्या चीजवस्तू त्यांनी लोकांमध्ये वाटून टाकायच्या व लक्ष्मीबाईंनी पुन्हा नव्या जोमाने संसार उभा करायचा.. हे अगदी टिळकांच्या मृत्यूपर्यंत चाललं.. पण तरीही त्या सगळे तितक्याच जोमाने नि मनापासून करत राहिल्या.. एक मात्र आहे, जरी त्यांनी स्वतःचे थेट मत देणं टाळलंय, पण योग्य तिथे ते वागण्यातून ते दाखवूनही दिलंय. "क्रियेवीण वाचाळता...." व्यर्थच याचा योग्य वस्तुपाठ!!! नाहीतर केवळ टिळकांनी ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला म्हणून त्यामागोमाग त्याही ख्रिस्ती झाल्या, असे घडले नाही तर नातेवाईकांकडे आश्रित म्हणून जगण्यापेक्षा ख्रिस्ती झालेल्या नवर्याची अवहेलना ऐकण्यापेक्षा त्यांनी आपले वेगळे बिर्हाड थाटणे पसंत केले. आणि पुढे ख्रिस्ती धर्मातील तत्त्वे पटल्यानंतरच अगदी डोळसपणे त्यांनी त्या धर्माचा स्वीकार केला. स्वयंनिर्णयाचा यापेक्षा दुसरा कोणता पुरावा असू शकेल? टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांचे काम पुढे नेणाऱ्या लक्ष्मीबाईंचे ‘टिळकांच्या अस्थी पेटीत जाताच माझे अस्तित्व जाणवू लागले’ हे उद्गारही त्याच दृष्टीने अर्थपूर्ण होत.
वास्तविकतः त्यांनी रूढार्थाने कसलेही शिक्षण घेतले नव्हते.. नवर्याने शिकवले म्हणून त्या मराठी लिहायला वाचायला शिकल्या.. नि जसजशी गरज पडत गेली तशतशा नवीन गोष्टीही शिकत गेल्या.. मग त्यात अगदी उतारवयात मेट्रनची नोकरी करताना शिकलेले इंग्रजी असो वा कराचीला जाऊन तिथली जीवनपद्धती अंगीकारणं असो. आयुष्यातले प्रसंग त्या लिहित तर होत्याच आणि त्या कविताही करत होत्या.. बर्याचजणांना या कविता टिळच करत असे वाट्त असे!!!!(हे वाचताना मला सुनीताबाई आणि पुलंचा अवघड वळणात गाडी अडकण्याचा प्रसंग आठवला.. Sealed असो.) आत्मचरित्रातल्या प्रसंगांचे वर्णन वाचताना "मी नाही हो अशी" असा सूरही कुठे जाणवत नाही.. बहुतेक सारे दु:खाचे प्रसंगांचे वर्णन त्या विनोदाने करतात.. मात्र तो कुठे बोचत नाही वा अंगावरही येत नाही.. त्यामुळेच पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहिलेले "प्रसन्न आणि गोड विनोद कसा असतो ते या पुस्तकावरून समजेल" हे वाक्यही तितकेच सार्थ ठरते.. पुस्तकात इंग्रजी शब्दांचा वापर अनेक ठिकाणी अगदी लीलया झाला आहे.. (माझी आजीही या काळात इतके इंग्रजी शब्द वापरत नाही!!) नि कुठे कुठे त्या शब्दांना छान मराठी रूपडंही बहाल केलंय.. उदा. व्ही.पी चे अनेकवचन.. व्हीप्या!!! Smile
कदाचित त्यांचे हे सगळे लेखनसामर्थ्य पाहूनच आचार्य अत्र्यांनी त्यांना साहित्यलक्ष्मी पदवी बहाल केली असेल..
या वरती आणखी चर्चा इथे...
No comments:
Post a Comment