असेच एकदा आम्हास शहरात जायचे होते.. रेशमी साड्या.. झालंच तर आणखी काही इथल्या खास गोष्टी घरी नेल्या असत्या.. गटाल्या इतर बायकांना रस्त्यांवर खरेदी करायची होती.. मुंबईत फॅशन स्ट्रीट, लिंकिंग रोड वरती फिरून झाल्यावर मला तिथल्या फॅशन स्ट्रीट वा तत्सम प्रकाराचं अप्रूप नव्हतं.. पण सगळ्यांसोबत रिकामपणाचे उद्योग म्हणून सगळेच निघालो.. बहुधा तो शनिवार होता..आणि तिथे आय आय टी मध्ये एक खुले थिएटर आहे.. दर शनिवारी तिथे माफक दरात चित्रपट दाखवले जातात.. पुरूष मंडळीना आमच्या खरेदीत काही रस नव्हता.. त्यांना संध्या़काळी आराम करून रात्री चित्रपट पाहायचा होता.. शिबिरातून अतिथीगृहात न जाता थेट शक्य तितक्या लवकर मुख्य प्रवेश द्वारापाशी आलो... नेहेमीप्रमाणे रिक्षा ठरवण्याचे काम स्थानिक सहकार्यांने पार पाडले.. ४०रू.. पोंडी बाजार पर्यंत.. तिथे फॅशन स्ट्रीट.. अणि पुढे T नगरमध्ये नल्ली, चेन्नई सिल्क अशी इतर दुकाने आहेत... मला पोंडी बाजारातली आवडलेली एकमेव गोष्टः
नल्ली'ज मस्त प्रशस्त आहे.. साड्यांची पुष्कळ व्हरायटी आहे.. तिथे आणखी एक स्टोअर आहे.. "सरवाना'ज"..ते चेन्नईतले सगळ्यात मोठे स्टोअर आहे... नल्ली'ज पेक्षा स्वस्त आहे.. अर्थात वस्तूंचा दर्जाही त्याच लायकीचा असतो. पण तरीही गर्दी इतकी असते की पाय ठेवायला जागा मिळत नाही.. नल्ली'ज मध्ये मनसोक्त खरेदी केल्यावर समोरच आणखी एक कपड्यांचेच दुकान होते.."पोथी'ज"!!! वेळही भरपूर होता हाताशी.. चला म्हटले.. विन्डो शॉपिंग करू... माझ्या एक सहकारी.. त्याना माझं जीन्स कुर्ता प्रकरण भलतंच आवडलं होतं... त्या म्हणाल्या चार मजली दुकान आहे.. भरपूर कपडे असतील तिथे.. मला जीन्स कुर्ता निवडायला मदत कर... दुकान छानच होतं.. पण माहीत आहे..??? त्या दुकानात चार स्वागतिका ठेवल्या होत्या... भरतनाट्यमला घालतात तसा पारंपारिक पोषाख न दागिने घालून त्या दिवसभर उभ्या असतात.. नंतरही त्या दुकानात दोनदा जाण्याचा योग आला.. तेव्हाही त्या तशाच.. चेहेर्यावर हसू आणून उभ्या होत्या.. मला त्यांच्याबद्द्ल खरंच खूप वाईट वाटलं..
परत येताना.. रिक्षा शोधू लागलो.. पहिला म्हणाला.. ८०रू... कैच्या कै??? त्याला सांगितले.. ए बाबा.. येताना ४०रू. मध्ये आलो.. थोडे तरी कमी कर.. तो ऐकेचना.. सरळ निघून गेला...दुष्ट मेला!!! त्यानंतर भेटलेले रिक्षावाले... चढत्या क्रमाने.. १५०/-, २००/- शेवटी २५०/- पर्यंत पोचले हो ते रास्कल आण्णा लोक!!! पैसे देण्याबद्द्ल ना नव्हती... पण ते सरळ्सऱळ अडवणूक करत होते हे सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ होतं.. तेवढ्यात समोर बस स्थानक दिसलं.. नि त्यात ५ब क्रमांकाची बसही... थेट आय आय टी त जाणारी... मग आणखी काय हवं होतं?? "तुम्हा रिक्षावाल्यांच्या नानाची टांग" असं मनात नाही.. मोठ्यांदा म्हणून (नाहीतरी कुणाच्या बापाला मराठी कळत होतं तिथे?? ) बसमध्ये शिरलो.
बाकी बाईमाणसं संध्याकाळच्या चित्रपटासाठी उत्सुक नव्हती.. मी माझं तिकीट आधीच इतरांना काढायला सांगितले होतं.. मला त्या आय आय टी मध्ये सगळ्यांत जास्त काही आवडलं असेल तर ओपन एअर थिएटर... खूप मोठं आहे... खुलं असूनही आवाज अगदी स्पष्ट.... रात्रीची मस्त थंड हवा... नि चित्रपट होता.. "द वॅन्टेज पॉइन्ट"!!!! वाह!!!! उन्हाळ्याच्या सुटयांमुळे गर्दी जास्त नव्हती... पुढे खुर्च्या होत्या पण आम्ही पाठीमागे पायर्यांवर बसून चित्रपट मस्त अनुभवला.....
तसे रोज संध्याकाळी फिरायला तर जात असूच.. एकदा सागरकिनारी (मेरिना बीच नव्हे.. या किनार्याचं नाव नाही आठवत्)गेलो होतो.. आपल्या चाट्च्या गाड्यांसारख्या मासे तळून देणार्या गाड्या भरपूर होत्या.. नि बाँबे भेळ नि चौपाटी आईस्क्रीमच्या पण!!!! समोर मुरूगन नावाचे हॉटेल आहे... तिथल्या इड्ल्या मात्र.. मस्त.. लाजवाबच होत्या.. वसतीगृहातील अर्धकच्च्या इडल्या खाऊन आयुष्यात पुन्हा कधीही इडली न खाण्याची प्रतिज्ञा या इडल्या खाऊन मोडली...
मस्त कोवळं लुसलुशीत केळीचं पान.. त्यावर गरमागरम इडली... नि वेगवेगळ्या प्रकारच्या चटण्या... नि काटा-चमच्यांना पूर्ण फाटा... अहाहा.... स्वर्गसुख म्हणजे आणखी दुसरं काय असतं?? (उत्तर आहे माझ्याकडे: मस्त वाफाळता भात.. त्यावर वरण... वरून तुपाची धार... लिंबाची फोड.. नि मेतकूट... याला भूतलावर कुठेही पर्याय नाही)....!!!
(क्रमशः)
No comments:
Post a Comment