Thursday, November 22, 2012

रिकामपणाचे उद्योग..


कॉलेजमध्ये कुणीतरी एक लेटरपॅड विसरून गेलं होतं. गुलबट-बदामी पानं आणि खालच्या कोपर्‍यात दोन-तीन चित्रे थोड्या थोड्या अंतराने आली होती. त्यातलं एक चित्र जाम आवडलं होतं म्हणून त्याचं एक पान मी फाडून घरी आणलं. तीन-चार वर्षे तशीच गेली. मध्येच मी माझा पहिला वहिला बाऊल रंगवला, त्यानंतरही ग्लास पेंटिंग केलं आणि मग या बाईला पेंट करावं अशी मनानं उचल खाल्ली. माझ्या घरातल्या स्वयंपाक घरात उघडणारा हॉलचा दरवाजा भिंतीच्या मधोमध आहे. तेव्हा दोन्ही बाजूला काहीतरी पेंट करून लावल्यास छान दिसेलसं वाटलं. साधारण प्रमाण पाहता ए३ हा आकार चांगला दिसेलसं माझं मीच ठरवलं. बरेच सव्यापसव्य करून ते दीड इंच बाय तीन इंचाचं चित्र आधी ए४ आणि नंतर ए३ मध्ये एका कागदावर छापून आणलं. पण तेही नंतर लहान वाटलं म्हणून कसंबसं ए२ आकारातलं रेखाचित्र जमवलं. तरीही कितपत जमेल असा आत्मविश्वास नसल्यानं आधी एका ट्रान्सपरन्सीवर रंगीत तालिम घेतली आणि किमान 'हे जमू शकेल' असं म्हणून स्वत:चीच पाठ थोपटून घेतली.

पहिली पायरी: जीटी मारणे (पक्षी: ग्लास ट्रेसींग). इंजिनिअरिंगला असताना कधी न करावा लागलेला प्रकार आता मी सहज करते!
हे चित्र पूर्णपणे ट्रेस करायला साधारण दोनेक तास लागले.

1

पृष्ठभाग बाऊलसारखा गोलाकार नसल्याने रंग ओघळणं ही अडचण नव्हती. फक्त रंगांच्या बुडबुड्यांनी तोंडाला फेस आणला. हे पहिलं पूर्ण चित्र.

2

नीट जमत आलेलं काम बिघडवण्याची माझी परंपरा यावेळीही खंडित झाली नाही. काही ठिकाणचा रंग तुलनेने पातळ वाटत होता म्हणून मी रात्री झोपायला जाताना आणखी एक रंगाचा थर दिला. सकाळी उठून पाहते, तर खालचा रंग फाटून सगळं चित्र अगदी चित्रविचित्र झालं होतं. आधी चुकचुक, मग नेहमीप्रमाणेच "कशी मला दुर्बुद्धी झाली?", "आता काय करू" वगैरे नेहमीची पालुपदे आळवून झाल्यावर पुन्हा एकदा नेहमीप्रमाणेच झाला पराक्रम निस्तरायला स्वारी सज्ज झाली. एका बोथट चाकूने तो फाटलेला रंगाचा भाग वरच्यावर कापला, काही ठिकाणचं बाजूचं काळ्या रंगाचं रेखाटनही 'तेरा मेरा साथ रहे' म्हणत सोबत निघून आलं. लगोलग 'जालिम जमाना' बनत त्यांचा साथ मी तिथंच कापून टाकला. मग, आधी रेखाटनाची दुरूस्ती केली. फाटलेला नारिंगी रंग संपला होता म्हणून तिथे आता चॉकलेटी रंग देऊन टाकला. आणि "लहान मुलं असतील नसतील तेवढे सगळे रंग वापरतात तसं माझं चित्र वाटत नाहीय. ना?" असं म्हणून नकारार्थी उत्तराला जराही वाव न ठेवता निखिलकडून "चित्र चांगलंच झालंय" अशी पावती घेतली.

इतके दिवस मला काही फ्रेम करून घेण्याची गरज पडली नव्हती. त्यामुळं आता फ्रेम करणारं माणूस/बाईमाणूस शोधणं आलं. मध्येच एकदा खरडाखरडीत पराग मांडेच्या खव मध्ये मी ट्रान्सपरन्सीचा फोटू डकवून आले होते. तो पाहून लीमाऊजेट्ने "ही हेदर ना गं?" असा प्रश्न विचारून पुढे याच्या पार्श्वभूमीवर इजिप्तमध्ये पपायरस्/पॅपीरस नावाचा गवतापासून बनवलेला हातकागद वापरतात असं सांगितलं. आतापर्यंत ही चित्रातली बाई कोण याचाही गंध नव्हता, पण अज्ञान उघड होऊ नये म्हणून तिला "हो..हो" केलं. अधिक शोभा नको म्हणून आता त्या मेल्या 'पपायरस' सदृश्य काही मिळवायचा प्रयत्न चालू केला. जुन्या काडाच्या चटया सहसा मिळण्यासारख्या नव्हत्या आणि अधिक त्रास घेणं माझ्या आळशीपणाला मानवणारं नव्हतं. म्हणून मग मूळ योजनेबरहुकूम मी हातकागद शोधायला लागले. हेदर जणू माझ्यावर प्रसन्न झाली आणि मला चटईसारखा दिसणारा हातकागद मिळाला. हुश्श. आता सुटले म्हणेतोवर जो मला फ्रेम करणारा भेटला तो फक्त सकाळी ११ ते १२:३० व संध्याकाळी ६:३० ते ७:३० असं हौशीखातर काम करणारा महाभाग. त्याने पुढे त्याच्या व्यवसाय धर्माला जागून मी निवडलेली फ्रेम न लावता दुसरीच कुठलीशी फ्रेम लावली. सुदैवाने तीही जरा बरी होती.

हेदरः
3

आता मला दुसर्‍या बाजूची फ्रेम करायची होती. आता हेदरबाईंमुळे दुसर्‍या बाजूलाही कुणीतरी इजिप्शियन सोबत आणावी असं वाटत होतं. होता होता तुतनखामेनचा बळी द्यायचं ठरवलं. दरवाजाच्या दोन्ही बाजूंचं सारखेपण जपायचं असल्यामुळं जर लवकर चित्र दिलं नाही तर तशीच फ्रेम पुन्हा मिळणार नाही असं त्या फ्रेमवाल्यानं सांगितलं. हे त्याचं पुढचं काम मिळवण्याचं गिमिक असू शकेल असं वाटूनही मी धोका पत्करायला तयार नव्हते. आणि नुसत्या काचेच्या आकाराने तो मापं घ्यायला आढेवेढे घ्यायला तयार नव्हता. अशा वेळेस जे होतं तेच झालं. तयार होता होता पुन्हा एकदा ९८% तयार झालेलं चित्र बिघडलं. त्यानंतर आठवडाभर आम्ही गावी चाललो होतो. आता " जे व्हायचे ते होऊ दे" असं म्हणून फ्रेम-सारखेपणा-आणि जे जे काही असेल ते गेलं खड्ड्यात म्हणून सरळ त्या बिघडलेल्या तुतनखामेनकडे तुच्छ कटाक्ष टाकून आम्ही घराबाहेर पडलो. तसंही या चित्रापायी "हा बाई का बुवा जे काही आहे ते जरा इथून हलव" असले शब्द ऐकून मला या चित्राचाच कंटाळा आला होता.
परत आल्यावर नव्याने तयारीला लागले. आधी चाकूने रंग-रेखाटने कापून आणि त्यातल्या दाद न देणार्‍याला भागाला मस्तपैकी भांडी घासण्याच्या उपकरणांनी घासून काच पुन्हा पहिल्यासारखी केली. सुदैवाने किंवा जे काही असेल त्याप्रमाणे तश्शीच बाजूची फ्रेम मिळाली आणि एकदाचे तुतनखामेनोबा घरी आले.

4

या दोघांची स्थापना करून वर्ष उलटून गेलं आहे. दिवाळीनिमित्त काही वेगळ्या प्रकारातले कंदिल पाहून आणि माझी रंगांची आवड पाहून एका मित्राने मला असले पाच कंदिल आणून दिले. त्यातला एक अजून रंगवला नाहीय, दुसर्‍यावरचं चुकलेलं रंगकाम मी अजून दुरूस्त करतेय. हे बाकीचे तीनः

5

6

7

याने खूपच जास्त वेळ घेतला

8

ग्लास पेंटिग करताना मला गवसलेली विचारमोत्ये:
१. सराव म्हणून बाऊल सारखा आकार न घेता सपाट पृष्ठभाग घेतल्यास बरे.
२. चित्रात एखादा आकार खूपच मोठा असल्यास एकीकडचा रंग देऊन दुसरीकडे जाईपर्यंत आधीच रंग वाळतो आणि नंतर मग डाग दिसू लागतात. उदा. तुतनखामेनचा चेहर्‍याचा आणि मानेचा भाग. ते टाळण्यासाठी काही करता येत नाही; हात जरा भराभर चालवावा.
३. चित्र बिघडल्यास जास्त घाबरू नये, सरळ निघेल तितका रंग बोथट चाकूने काढून भांडे/काच घासून घ्यावे. काच चांगल्या प्रतीची असल्यास काही फरक पडत नाही. नसेल, तर काचेचा घासलेला भाग खरबरीत तर न घासलेला गुळगुळीत असं खूपच चिवित्र दिसतं. अशा फालतू संकटांनी डगमगून न जाता आधीचं डिझाईन रद्दबातल करून त्याठिकाणी *चित्रविचित्र दिसणारे मॉडर्न आर्ट काढावे. पाहणार्‍यास आपण चतुरस्त्र आहोत आणि सगळ्या कलाप्रकारात आपणांस रूची आहे असे वाटते. त्यानंतर उगीच खुलासे करून 'झाकली मूठ' उघडण्याचा प्रयत्न करून नये.
*-> इथे ठरवून या प्रकारचे डिझाईन काढले आहे. सध्याचा दुरूस्त करत असलेला कंदिल पूर्ण झाला की नक्की एन्ड प्रॉडक्ट कसे होते ते इथेच सांगेन.
४. हे तसे बरेच वेळखाऊ काम असल्याने विरंगुळा म्हणून "सीआयडी" ही मालिका टीव्हीवर लावावी. टीव्हीकडे न पाहताही आख्खा इपिसोड झक्कास कळतो. आणि छान मनोरंजन होते.
उदा. "दया, ये आदमी यहाँ क्यूं खडा है?"
"हाँ सर, ये आदमी बसस्टॉपपे क्यूं खडा है?"
"अभिजीत, देखो उसके हाथ में ब्राऊन कलरका लिफाफा है."
"हां सर, कितना बडा लिफाफा है, ऑर उसमें कुछ रखा भी है"
" ये यहाँ पिछले दस मिनिटसे खडा है"
"देखो दया , एक नीले रंगकी बस आ रही है"
"हां सर, ये नीली बस तो इसी आदमी की तरफ आ रही है"
"देखो, ये तो बसमें चढ गया" :)
५.  लेख नाहीतर गेलाबाजार किमान फेसबुकावरतरी म्हणून फोटो डकवून लोकांकडून 'चान चान' म्हणून घ्यावे


footer

No comments: