
आईचं एक तंत्र होतं. शेणाचा छोटासा गोळा दोन्ही हातात घेऊन ती त्याला आकार देई, अशी आधी नुसती धडे बनवून बाजूला ठेवे, मग त्यांना योग्य जागी ठेवे, आणि मग डोकी आणि नंतर त्यांना हात चिकटवे. मी आईला बर्याचदा गूळ लावून मला एक-दोन तरी गौळणी बनवायला दे असे म्हणत असे. तिने एकदा खरेच दिलं खरं, पण माझ्या गौळणी फारच नम्र झाल्या होत्या. उभ्या राहिल्या खर्या, पण कमरेत भलत्याच वाकल्या होत्या.
वसुबारसेला चालू झालेला हा सोहळा संपतो तो बलिप्रतिपदेला. बळीराजाची सर्वांना माहित असलेली तीच ती छोटीशी गोष्ट. बळी राजाचे पुण्य खूप झाले, इतकेकी त्याला देवांचा राजा करतील की काय अशी इंद्राला पुन्हा एकदा भीती पडली. त्यानं श्रीविष्णूला साकडं घातलं आणि पुण्यवान बळीला स्थान मिळालं ते पाताळात. त्या बळीचे पूजन जरी बलीप्रतिपदेला होत असलं तरी, त्याचं स्मरण करण्याची ही आगळीवेगळी प्रथा विलक्षणच. लहानपणी खूप कुतुहल असे, आईला प्रश्न विचारूम मी भंडावत असे. आता हे काम भाचरं करतातच.
हे नक्की असतं काय? तर, बळी राजाच्या राज्यातले एक छोटंसं नगर. जिथे सगळेजण गुण्यागोविंदाने राहतात. तिथे समृद्धी आहे, संस्कृती आहे, कामसू वृत्ती आहे. थोडक्यातच सांगायचं तर या पुण्यशील राजाच्या राज्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे. ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रजानन त्याची सेवा करतात. हे इतकं सगळं दाखवताना तिथे अवतरतात, गौळणी!! मुख्य असतो तो बळीराजा. नगरीत दिसणारा एकमेव पुरूष. बाकीचे कुठे गेलेयत तडमडायला या प्रश्नाचे उत्तर मला अजून मिळाले नाहीय. तर हा निवांत पहुडलेला असतो. त्याच्या हातापायाशी, डोक्याशी गौळणी त्याची सेवा करत असतात. हा बळी पडला राजा. त्यामुळे त्या बळीला सजवण्याचीही अहमहिका लागलेली असते. त्याचा हार, मुकुट, भलादांडगा करदोडा, वाळे हे तर नेहमीचेच. त्यासोबत छोटेमोठे हार आणि इतर दागिन्यांचे तर काही विचारायलाच नको. आणि त्यात बारकावे इतके, की त्याच्या मानेखाली एक छोटीशी उशीही दिली जाते. हा आमचा साधासुधा बळीराजा:
गौळणी घालताना पहिला मान बळीराजाचा. तो एकदा तयार झाला की, कल्पनेच्या भरार्या चालू होतात. जणू या गृहिणी आपल्याच रूप या कामाकाजात गुंतलेल्या गौळणींमध्ये पाहतात. कुणी भल्यापहाटे जात्यावर जावेला नाहीतर नणंदेला सोबत देत धान्य दळते, कुणी स्वयंपाक रांधते, कुणी तुळशीवृंदावनासमोर घरच्यांसाठी-तिच्या धन्यासाठी आरोग्य, समृद्धी मागते, कुणी गायींना पाणवठ्यावर नेते, कुणी बाजारहाट करते, एक ना दोन. पण त्या गौळणींना मात्र आभूषणांचं लेणं नाही. त्यांचं लेणं म्हणजे, बोटाशी पोर आणि डोईवर घमेलं नाहीतर हातातलं काम. घमेल्यावाल्या गौळणीच्या म्हणजे बाजारात जाणार्या. माझी मामी मग त्या प्रत्येक गौळणीच्या डोईवरच्या घमेल्यात काही ना काही ठेवतेच. मग एकजण कांदा-मिरच्या घेऊन येते, दुसरी नुसतीच भुईमुगाच्या शेंगा तर तिसरी दुसरंच काही. कधी कधी भाकरीच्या करणारीच्या तव्यावर, टोपलीत, हातात इवलुशा भाकरीही ठेवते. तिच्या कडच्या गौळणी सगळेजण आवर्जून पाहायला येतात. तसं प्रत्येक घरापुढचे नगर वेगळं. पण यात वेशीत आपल्या सखीला भेटणारी आणि लेकुरवाळी अशा गौळणी आणि दरदिवशी मोठा होत जाणारा डोंगर या गोष्टी मात्र सगळीकडे अगदी मस्ट!!! सगळ्यांच्या गौळणी पाहाव्यात आणि नुसतं घरधनीणीचं कौतुक करत रहावं.
कामात गर्क गौळणी:
रोज रोज मात्र तेच ते केलं जात नाही. वैविध्य हवंच, नाही का? मला या डोंगराचे महत्व किंवा त्याचे अस्तित्व का असावे हे अजून कळालं नाही. वसुबारसेला डोंगराचा एकच थर असतो. हा असा:
त्यामुळे काही गौळणी नगरात तर काही या डोंगरावर असतात. काहींची बाळंही त्यांच्यासोबत असतात. दुसर्या दिवशी आणखी एक थर पडतो, तिसर्या-चौथ्या दिवशी मग डोंगर खर्या अर्थाने डोंगर म्हणण्यासारखा उंच होतो.
हा फोटो तिसर्या दिवशीचा असावा. बारकाईने पाहिले तर तीन थर स्पष्ट दिसताहेत. आत्याचे काम अजून चालू असतानाच मी हा फोटो काढलाय. इथे वेशीतल्या गौळणीच्या कडेवर बाळ आहे.
या नगरात अगदी खर्याखुर्या नगरासारखी जिवंतपणाची सळसळ असते. काहीजणी डोंगर चढत असतात, काहीजणी मुक्कामाला पोचलेल्या असतात, एक भाकरी तव्यावर, दुसरी हातात, काही भाकरी तयार होऊन टोपल्यात विसावलेल्या असतात, काही गायी पाणवठ्यावर पोचलेल्या असतात, एखादे चुकार वासरू आपला पाय मागे ओढत असते, वर्णन करू तितके कमीच!! प्रथा कुणी चालू असावी माहित नाही, पण हे असे जिवंत चित्रण एखाद्या कलाकाराच्या कलाकृतीइतकंच मला भावतं!!
बळीपाडव्याच्या दिवशी मात्र चित्र एकदम पालटतं. बळीराजा उठून उभा राहतो, सगळ्या गौळणींची पूजा होते आणि त्यांची घरच्या पांढर्याशुभ्र शेवयांनी सजलेली छोट्या छोट्या पानांची पंगत बसते. ज्वारीची कणसासहित पाच धाटे आणि एक ऊस यांचा झोपडीसदृश आकार त्याच्या डोईवर विसावतो. इतर दिवशी या नगरात नसणारी दिपमाळ यादिवशी मात्र या चित्रात किमान एकतरी हवीच. बहुधा ही पंगत गावातल्या चौकात किंवा ग्राममंदिरात बसत असावी. आता मला नांव आठवत नाही, पण या सगळ्या गौळणींना पांढरे पण टोकाशी गुलाबी होत जाणारे गवताचे तुरे खोचले जातात. ते नाही मिळाले तर मग झेंडू आणि मखमलीची फुले असतातच.
वरती चित्रात ही आडवी काठी दिसते ती वेस आहे. वेशीतच नेहमी गाठभेट होते याचा प्रतिकात्मक अर्थ घरी पाहुणा येणार हे माहित असेल तर त्याला सामोरे जाऊन तिथेच गळाभेट घेऊन घरी मानाने आणणं असावं. वेशीच्या वरच्या बाजूला दोन-तीन फुले ल्यालेली आकृती दिसतेय, ही आहे दीपमाळ. मोठ्या मंदिरांत ही सहसा असतेच. तिच्यावर आता समारंभाला पण पूर्वीच्या काळी अंधारून आलं की दिवे, पणत्या ठेवल्या जात.<br>
आदल्या दिवशीच्या गौळणी दुसर्या दिवशी उत्तरपूजा करून मोडल्या जातात आणि त्यात नवीन शेण मिसळून पुन्हा नव्या गौळणी बनतात. पाडव्यानंतर मात्र या सगळ्या गौळणी चांगल्या वाळवून शेण्यांच्या *हुडव्यात ठेवतात आणि मग कधीतरी बंबात जातात.
आता घरी म्हशी नाहीत, आणि आईलाही मधल्या काळात झालेल्या छोट्या अपघतानंतर जास्त वेळ चवड्यावर बसवत नाही. गेल्या वर्षी आत्याने घातलेल्या गौळणींचा फोटो काढला आणि तिला म्हटले, “मी यावर इंटरनेटवर लिहीन.” जाम खूष झाली ती. आता घरी गेले की तिला हा लेख आणि त्यावरच्या प्रतिक्रिया दाखवेन, म्हणजेच ती आणखी्च खूष होऊन जाईल!! *हुडवा: उन्हाळयात शेण्या चांगल्या वाळवून त्या व्यवस्थित गोलाकार रचून त्यावर पुन्हा शेणाचा जाडसा थर देतात. पावसाळ्यात भिजूनही याचे फारसे नुकसान होत नाही. गरज पडेल तशी एका बाजूने या हुडव्याला छोटे भगदाड पाडून आतल्या शेण्या बाहेर काढल्या जातात.