या महिन्याच्या सुरवातीस उन्हाळयाचा शेवट आणि पावसाळ्याची सुरूवात असा मुहूर्त साधून चार दिवस जीवाचा गोवा करून आलो. आमचं राहण्याचं ठिकाण दूर आत आणि मुख्य पर्यटन स्थळांपासून दूर असल्याने चांगलंच शांत आणि प्रशस्त होतं. त्यामुळे जातायेता अगदी खरंखुर्रं गोंय भरपूर पाहायला मिळालं. मुंबई-औरंगाबाद-तासगांवातले खड्ड्यातले रस्ते पाह्यल्यानंतर गोव्यातले रस्ते अगदी हिरॉईनच्या गालांसारखे* मऊ मुलायम वाटत होते. आणि त्यातच चार दिवसांतल्या प्रवासात एकही टोलनाका दिसला नाही त्यामुळे अगदी चुकल्यासारखं झालं.
तिथे प्रवास करताना माड-पोफळीच्या बागा आणि समुद्रकिनार्यांपेक्षाही जर काही नजरेत भरली असतील, ती होती तिथली घरे. वेगवेगळ्या वास्तुकलांचे नमुने तर खरेच, पण त्यांना दिलेले रंग या सगळ्यांवर सॉल्लीड मात करत होते.नेहमीच्या त्याच त्याच रंगांच्या इमारती बघून मेलेल्या नजरेला ही रंगाबेरंगी घरे पाहून जणू नवसंजीवनीच मिळाली. माझं हे अशा घरांच्या फोटो काढण्याचे वेड पाहून पैसा ताईला 'हे वेगळेपण इतके दिवस मला कसं जाणवलं नाही' असं वाटू लागलं!
विशेष सूचना: धावत्या कारमधून आणि दही खाल्लं तर पाच मिनिटांत त्याचं हमखास ताक होईल अशा अतिवळणावळणांच्या रस्त्यावरून जाताना हे फोटो काढले असल्याने फोटोंच्या कोलितीबद्दल अवाक्षर काढू नये, अपमान करण्यात येईल.
तर मंडळी सादर आहेत, रंगरंगील्या गोव्याचे फोटो:
सुरवात करतेय एकदम गुलाबी गुलाबी रंगाच्या घराने. अगदीच नाही म्हटलं तर पनवेलमध्ये शिरताना या रंगाची एक इमारत दिसते.
हा रंग आजवर एखाद्या फिक्या रंगाला पूरक म्हणूनच पाह्यलेला आठवतोय.
आणि हा पण. इथे जरासा वेगळा दिसतोय हा, पण हादेखिल रक्तवर्णीच आहे.
या रंगाच्या सगळ्या छटा इथे पाह्यला मिळाल्या.
हा रंगसुद्धा फिका वाटत असला तरी प्रत्यक्षात तो जांभळाच्या आतला (पक्षी:पर्पल) रंग आहे.
निळ्या रंगासोबतच इथल्या लोकांना पिवळ्या रंगाच्या सगळ्या छटा आवडतात असं वाटतं.
हे जरा नेत्रसुखद तरी आहे.
हे मंदिरासारखे दिसत असले तरी, फोंड्याजवळच्या गावातले घरच आहे.
ही फोंड्यातल्या कोर्टाची इमारत आणि तटबंदी:
हे असेच आणखी एक घर..
आणि हा सर्वांवर कळस आहे. तिथे एक घराला गडद turquoise blue रंग देणे चालूय, अजून पूर्ण व्हायचंय ते)
फोटो बरेच काढले. त्यातले काही खूपच धावत होते. आणि सगळेच काढणंही झालं नाही. एक फोटो घेता घेता शेजारचं घर वाकुल्या दाखवून पळायचं तर कधी नक्की कोणत्या बाजूच्या घराचा फोटो घेऊ असं होऊन कधी एक तर कधी दोन्ही फोटो हातचे गेले. एक तर घर 'शी'च्या रंगासारखं होतं, एक दत्ताचं देऊळ अगदी अविश्वसनीय बेबी पिंक रंगात होतं. खरंतर हे इथे दिलेले रंग काहीच नव्हेत असं वाटायला लावणारे अतरंगी रंगही टिपता नाही आलेयत. आणि असं बरंच काही...
अधिक फोटो इथे.
फोटो घेता घेता कॅमेर्याची बॅटरी संपली, पण तरीही अशी वेगवेगळी घरे खुणावत होती. राहिलेले फोटो देण्याचं पैसातैने कबूल केलेय.. तेव्हा अजून खजिन्याच्या प्रतिक्षेत आहे.
*श्रेयअव्हेरः बहुतेक भाईकाका. चू भू दे घे.
स्थळः साष्टी तालुक्यातल्या वर्का बीचपासून मडगांव-शांतादुर्गा-मंगेशी-फोंडा या गावातले रस्त्यांच्या आजूबाजूस.
No comments:
Post a Comment