Monday, December 27, 2010

साम्राज्य बुरख्यामागचे - The Veiled Kingdom

    सर्वात आधी नॉट विदाऊट माय डॉटर, त्यानंतर द ब्रेडविनर, आणि गेल्यावर्षीच वाचलेलं स्प्लेंडिड थाऊजंड सन्स. वाचताना आणि त्यानंतरही आपण भारतात जन्माला आलो हे किती हे भाग्य असंच वाटत राहातं. त्यातूनही आजकालच्या बातम्या वाचल्या-पाहिल्या की बरं झालं, आपण दिल्लीबिल्लीत राहात नाही, आणि महाराष्ट्रात राहून रात्री उशीरापर्यंत बिन्धास्तपणे फिरू शकतो असं वाटतं. अर्थात हे चांगलं चित्रही आजकाल बिघडायला लागलंय. 

        हे सगळं पुन्हा एकदा आठवायचं कारण म्हणजे कारमेन बिन लादेनचं ’द व्हेल्ड किंगडम’. अदितीनं हिरव्या देशात जाताना बॅग जड होतेय म्हणून बाहेर काढलं आणि स्प्लेंडीड थाऊजंड सन्स वाचताना आता पुन्हा सौदी अरेबिया, अफगाण, इराण देशातली स्त्रियांवरच्या अत्याचारांची पुस्तकं वाचून मनाचा उद्वेग करून घेण्यापेक्षा ती वाचणंच बंद करायची हा निश्चय माझा मीच मोडला. कारण हे पुस्तक कुठल्या आम स्त्रीचं नाही. ती तर प्रत्यक्ष ओसामा बिन लादेनची वहिनी. आणि हे पुस्तक तिने ९/११ नंतर ती ज्या मानसिक त्रासांमधून गेली त्यानंतर लिहिलेलं.

     खूप मानसिक तयारी करून पुस्तक वाचायला घेतलं खरं, पण वाचताना मन खूप घट्ट करावं नाही लागलं. नॉत विदाऊट माय डॉटर वाचताना, किंवा अगदी अलीकडचं थाऊजंड सन्स वाचताना देखील मी जाम रडले होते. पहिल्या भागात मरियमला हक्काचा बाबा मिळत नाही म्हणून जितकी रडले त्याहून जास्त तिचा नवरा आणि नंतर भरीस भर पोटचा मुलगाही छळतो म्हणून डोळ्यांत पाणी आलं होतं. कारमेनचे अनुभव वाचताना तितकंसं वाईटही वाटलं नाही. कदाचित ती स्वत:ला तितकं त्रयस्थ ठेऊ शकलीय म्हणूनही असेल, किंवा खरंच तिला बेट्टीइतका त्रास झाला नाही म्हणूनही असेल. पण ती स्वत: ती अगदी बिचारी होती, सतत दडपणाखाली तिचा कोंडमारा झाला असं दळण दळत नाही. तिला त्रास झालाच नाही असं नाहीच. तिला घरच्या स्त्रियांशी काय बोलावं असा प्रश्न पडतो, प्रयत्न करूनही त्यांच्याशी गट्टी जमू शकत नाही, कोणत्याही खरेदीसाठी तिला प्रत्यक्ष जाता येत नाही तर तीनचारदा कामगारांच्याच नमुने घेऊन फेर्‍या होतात, अगदी तिला हवं ते तिच्या मुलीसाठीचं दूध तिथं मिळत नाही, बाहेर गेल्यावर सतत अंग झाकून राहावं लागतं असे असं सगळं तिच्याबाबतीतही झालंच. पण त्यातल्या त्यात बरी गोष्ट हीच की तिच्या मनासारखं काम झालं नाही तेव्हा तिचा नवरा स्वत:च तिला काम करवून घेण्याची परवानगी देतो, तिला हव्या त्या किरकोळ खरेदीसाठीही जिनिव्हाला जाऊ देतो, किमान त्याच्याकडून तरी तिला मानसिक त्रास होत नाही आणि वेगळं घर असल्याने इतरांचाही तितकासा प्रश्न येत नाही. कदाचित या सगळ्या कारणांमुळेच पुस्तकाचा रोख ’मी किती त्रास भोगला’ यावरून ओसामाचं घर, तिथली विचारसरणी, वातावरण यांवर राहतो.

       ओसामाच्या वडिलांबद्दल तिला जाम आदर आहे. इतका की, तिच्या सध्याच्या घरातही त्यांचा फोटो टांगलेला आहे म्हणे. त्यांचं कर्तृत्व, त्यांचा मोठा कुटुंबकबिला, स्वत: ओसामा यांच्याबद्दल मग सगळं तब्बेतीनं येत राहातं. त्यांचे कौटुंबिक सोहळे, तिथेही काहींचं(उदा. येस्लाम:कारमेनचा नवरा) नव्या विचारांना आपलंसं करणं, त्या विरूद्ध ओसामाचं आणि म्हणून त्याला मानणार्‍या त्याच्या भावाबहिणींचं अतिसनातन राहाणं (मूल बेंबीच्या देठापासून रडत असेल तरी त्याला धर्माविरूद्ध म्हणून बाटलीनं दूध न पाजणं) हे सगळंच येत राहातं. ती तिथं लग्नापासून ते तिसर्‍या खेपेस गरोदर असेपर्यंत राहिली. हा साधारण दहा-एक वर्षाचा कालावधी तरी असावा. त्यामुळे कुटुंबातल्या व्यक्ती, प्रत्येकाच्या खाचाखोचा यांच्याबद्दलची माहिती ती अगदी व्यवस्थितरित्या देते. श्रीमंत असूनही नवर्‍याकडून मिळालेल्या पैशातली शिल्लक दडवून ठेवणं आणि ती खोट्यानाट्या किंवा किरकोळ आजारापणासाठी परदेशात गेलं की त्याचे कपडे दागिने घेणं हे वाचून तर जगाच्या पाठीवरच्या सगळ्या स्त्रिया सारख्याच हे पुन्हा एकदा पटलं. ओसामाची बहिण त्याची मर्जी राहावी म्हणून त्याला हवं तसं वागण्याचा प्रयत्न करते तर त्याच्या एका भावाची पत्नी कुटुंबातल्या लोकांच्या नकला करते. मोठ्या कुटुंबातून स्त्रियांची आणि मुलींची घुसमट होणं यात नवीन काही नाही. ते इथंही आहेच. आणि स्त्रियांचं अस्तित्व इतकं दुर्लक्षित की एकदा का मुलगा झाला की तिला स्वत:चं नांव टाकून देऊन त्याजागी ’उम-मुलाचं नांव’ मरेपर्यंत घ्यायचं. कारमेनच्या सासूचं नांव ’उम-येस्लाम’ होतं!!!!!

            काही गोष्टींची मात्र राहून राहून गंमत वाटत राहाते. हे घर अतिसनातनी असलं तरी सगळे भाईबंद अमेरिकेत मात्र अगदी पाश्चांत्यासारखे राहतात. म्हणजे यांच्या सगळ्या रूढीपरंपरा फक्त आपल्या देशात. यांच्या घरच्या बायका घरातून उठून सुपरमार्केटात गेल्यासारख्या उठसूठ युरोपात साध्या साध्या खरेदीला जातात. मला आतापर्यंत तिथल्या स्त्रियांचा ड्रेस हा पंजाबीसारखा किंवा गेलाबाजार आय ड्रीम ऑफ जिनीमधल्या जिनीसारखा असेल असं वाटलं होतं. पण या तर लग्नात पाश्चात्यांसारखा वेडिंग गाऊन घालतात. खुद्द कारमेन व तिच्या मुली तिथल्या त्यांच्या वास्तव्यात गुडघ्यापर्यंतचे फ्रॉक्स आणि मिडीस्कर्टस घालतात. कडक धर्मबंधनं असतानाही हे बरं चालतं तिथे!! हे सगळं वाचून त्यांच्या आचारांवर बंधनं असतील असं वाटत नाही. विचारांवर मात्र बंधनं नक्कीच आहेत!!!

         एक मात्र खरं, की ही कारमेन बाई मोठी धोरणी होती. तिला तिच्या नवर्‍याच्या बदलत्या विचारांची चाहूल वेळेत लागली आणि कर्मधर्मसंयोगाने ती तिसर्‍या बाळंपणासाठी माहेरी गेली. त्यानंतर येस्लामच्या कोणत्याही विनंती-धमकीला भीक न घालता ती तिथेच राहिली. नाहीतर परत जाणं आणि मुलींना अशा जाचक वातावरणापासून दूर ठेवणं तिला जमतं ना!!! ती उजेडात आली ती ९/११ नंतर लोकांनी टेलिफोन डिरेक्टरीत बिन लादेन कुटुंबाचा शोध घेतला तेव्हा. तिच्यावर आणि मुलींवर ओसामाला सामिल असल्याचा आरोप झाला. अमेरिकेन जनतेनं त्यांनाही अतिरेकी ठरवलं आणि कारमेननं या बुरख्याआडच्या साम्राज्याची कथा जगासमोर आणली.

      अर्थात बर्‍याचशा अनुवादांचे जे होतं तेच या पुस्तकाचंही झालंय. अविनाश दर्प यांनी हा अनुवाद केलाय. काही ठिकाणी अडखळायला होतं. वाचताना पुस्तक मूळ इंग्रजीत वाचलं असतं तर जरा बरं वाटलं असतं असं वाटल्यावाचून राहावत नाही. थोडक्यात, स्वत: विकत घेऊन संग्रही ठेवण्यापेक्षा लायब्ररी किंवा उसनवार मिळालं तर वाचावं हे उत्तम!!!

1 comment:

Jyoti Kamat said...

आता हेच पुस्तक आणलाय लायब्ररीतून!