Sunday, October 21, 2012

A heritage walk

खूप दिवसांपासून ठरत होतं, पण योग यायचा होता. तो या शनिवारी आला. काळ्या घोड्याचंही एक निमित्त होतंच. फोनाफोनी करत, मोडकांना ट्रेनची सफर(ही हिंदी/मराठी बरं का, इंग्रजीमधली नव्हे) घडवत फोर्टात पोचलो. एलआयसीच्या दर वळणानजिक दिसणार्‍या शाखेबरोबरोबर रामदासांची ब्रांच ही तर नव्हे अशा शंका मनी बाळगत एकदाचे त्यांच्या हापिसात पोचलो. इकडच्या तिकडच्या गप्पा चालू असतानाच रामदासांनी टेबलाखालून एक मोठं बाड बाहेर काढलं, '१९४५ ते बहुधा १९५६ पर्यंतचे टाईम मासिकाचे अंक' होते ते. खजिनाच तो, दुसरा शब्दच नाही!!
हापिसातून उतरून खाली आलो, आणि अलीबाबाच्या पोतडीतून एक एक गोष्ट बाहेर येऊ लागली. रस्त्याच्या दुतर्फा ताशीव दगडांच्या, मजबूत आणि प्रशस्त इमारती. प्रत्येक इमारतीची स्वतःची एक कहाणी. ती कुणी बांधली, त्या मूळ मालक कंपनीचं पुढं काय झालं, तिची किती, कशी आणि कोणत्या कारणाने हस्तांतरे झाली, हा सगळा इतिहास सांगायला रामदासच हवेत.

देशेदेशीच्या  वास्तुशिल्पकलेचे नमुने इथल्या इमारतींमध्ये साकारले आहेत. या पहा रोमन शैलीतले खांब मिरवणार्‍या इमारती:





इतरांच्या हातचं पाणी न चालणार्‍या भटांसाठी राजस्थानी ब्राह्मणांनी चालवलेलं चहाचं दुकान. पाटीचं स्वरूपच दुकान किती जुनं असेल हे सांगायला पुरेसं आहे.




ही आहे पारशी लोकांची विहीर. काळाच्या ओघात तिची देखभाल होत नाहीय, पाणी दूषित होतं आहे आणि आजूबाजूलाही अस्वच्छतेचं साम्राज्य पसरलंय. साहजिकच त्यामुळं ती सध्या बंद अवस्थेत आहे.
विहीरीचा दुरून काढलेला फोटो:


विहिरीवरची भित्तीशिल्पे:




विहिरीवरचा फारसी/इराणी मजकूरः



ग्रीक शैलीतली (बहुधा मार्शल & मार्शलची) इमारतः





मोडकांनी उल्लेखलेलं इटालियन मार्बलः


थोडंसं दुरून पाहिलं की दुरवस्था लक्षात येते:


या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर भित्तीशिल्पं आहेत. मी फक्त पहिल्या मजल्यावरच्या शिल्पाचा फोटो घेतला आहे.


लढवय्या पुरूष, त्याची लेकुरवाळी स्त्री आणि ड्रॅगनशी झुंजतानाचा त्याचा अविर्भाव अगदी प्रेमात पडावं असाच!!

प्रसिद्ध स्ट्रँड बुक स्टॉलः


सगळ्या विलायती शैलींमधून आपलं वेगळेपण दाखवणार्‍या इमारतीवरची ही लक्ष्मीची मूर्ती:


काळाच्या ओघासोबत न बदललेली आणि अजूनही लाकडावर चालणार्‍या भट्टीची बेकरी:


माझ्या सोबतच्या चारही लोकांची तोंडं चार दिशांना आहेत!!

बेकरीवरच्या पाट्याही तितक्याच जुन्या आहेत.





इथली खारी, मावा केक  आणि बन मस्का इतका रूचकर होता की फोटो काढण्याचं लक्षातच आलं नाही. खास यांचा आस्वाद घेण्यासाठी इथं कितीही वेळा जाण्याची माझी तयारी आहे. :-)

हे रेमण्डसचं दुकान, पण इतर दुकानांहून जास्त महत्त्व मिळालेलं. शपथविधीपूर्वीचे मंत्र्यासंत्र्यांचे कपडे इथेच शिवले जातात म्हणे. (आर आर आबांनी मात्र ही परंपरा मोडली. शपथेपूर्वी की नंतर हे माहित नाही)


ही देखणी इमारत इथे मुंबईतच आहे असं कुणी सांगितलं असतं तर माझा त्यावर विश्वास बसला नसता.




तिच्या शेजारची ही दुसरी इमारतः


या दोन इमारतींसमोरच हे शांत, धीरगंभीरसं चर्च.


याची बहुधा पुर्नबांधणी झाली असावी. ही त्याच चर्चची मागील बाजू.


पारशांची विहीर बुजवली असली तरी एशियाटिक सोसायटी समोरील ही १८७३ साली बांधलेली विहीर वापरात आहे. तिच्यावरची कोनशिला:


तिथेच असलेला हंडा:


यानंतर एशियाटिकसमोर काळाघोडा संगीत महोत्सवातला कार्यक्रम चालू होता. अद्याप चालू व्हायचा होता, पण ऐकू येणार्‍या तबल्यावरच्या खड्या बोलांनी जागीच थांबवलं. तालबद्ध लयीत सहजगत्या एकेक बोल लीलया निघत होते. माईक टेस्टिंगसाठी असा काही तुकडा वाजवला की यंव रे यंव!! पण मुख्य कार्यक्रम चालू व्हायला बराच अवकाश असल्याने काढता पाय घेतला.

मोडकांनी यांना नांव दिलंय, टिपकागद!




निघताना मोडकांनी या फोटोंवरती कधी लिहितेयस असं विचारलं, आणि मी आळस केल्याचं सार्थक झालं!! :-)

4 comments:

Mahendra Kulkarni said...

माझे फेवरेट स्पॉट्स आहेत सगळे. पण तुम्ही फोर्टला जाऊन बेलार्ड पिअर भागात फिरायला जाल तर अजून मजा येईल. रामदास आहेतच सोबत तेंव्हा सगळं दाखवतीलच..छान फोटो आहेत सगळेच. प्रत्येक इमारतीची एक हिस्टरी आहे. एक कॉफी टेबल बुक वाचलं होतं या वरचं.. :)

सोनाली केळकर said...
This comment has been removed by the author.
सोनाली केळकर said...

खूप छान फोटो आहेत. सध्या युरोपात वास्तव्य आहे, अगदी अशाच इमारती इकडे दिसतात. या वास्‍तु जतन केल्या पाहिजेत.

rochin said...

Hi,

I am envious!!!!!!!!!fototil 4 thi vyakti kon aahe???

-Rochin.