Friday, November 19, 2010

आनंदी गोपाळ

आनंदी गोपाळ जोशी. मनात खोल दडून राहिलेल्या व्यक्तिमत्वांपैकी एक.. आता आठवत देखील नाही त्यांच्याबद्दल प्रथम केव्हा ऐकले. कन्या शाळेत शिकत असताना दर शारदोत्सवात आठवडाभर व्याख्यानं असायची, कधी तांब्यांची मनू, कधी आनंदीबाई, कधी चाँदबीबी तर कधी राणी चन्नम्मा.. तेव्हाच तिची कथा मनात खोल दडून राहिली.. तासाभराच्या व्याख्यानात नुसती तोंडओळख झाली.. पण तेवढ्याने मन भरत नव्हते. आणखी काहीतरी हवे होते. त्याकाळी स्त्री शिक्षणालाच इतका विरोध होता, मग ही कशी शिकली? ते पण सासरघरी? नवरा साधा पोष्टात कारकून, मग त्याचा ’अभिमान’ नाही का झाला? ती परदेशात शिकायला गेली, एकटीने एवढा प्रवास करण्याइतका आत्मविश्वास, सामर्थ्य तिच्यात आले कुठून? काय अडचणी आल्या असतील, कशी मात केली असेल त्यावर? अवघ्या एकविसाव्या वर्षी वारली... कितीतरी प्रश्न.. सगळेच तेव्हा अनुत्तरीत!!!! कधीकाळी म्हणे दूरदर्शनवर मालिका लागायची. पण तेव्हा घरी टिव्ही नव्हता. आणि तीही पाहायची राहून गेली.. मग आनंदी-गोपाळ पुस्तक आहे असे कळाले, पण तेही कुठे मिळेना.. असा पाठशिवणीचा खेळ चालूच होता..

नंतर कधीतरी कॉलेजच्या विश्वस्तमंडळाने एका शिबिराला पाठवले होते. त्यात सगळ्याच कॉलेजातली विविध शाखांमधली विविध विषय शिकवणारी मंडळी होती. ट्रेनमध्ये चाललेली माझी चौफेर टकळी थांबवण्यासाठी एका उपप्राचार्यांनी विचारले, “काय गं, नुसतीच बडबडतेस की काही वाचतेस सुद्धा??” आणि मग मी काय काय वाचलंय यापेक्षा काय काय वाचायचंय याचीच लांबड लावली. त्यात पुन्हा एकदा आनंदी गोपाळ होतंच. परत आलो, आणि एक दोन दिवसांतच त्यांचा फोन आला, “आनंदी गोपाळ तर नाही मिळाले, पण एम. ए. च्या अभ्यासक्रमात त्या दोघांचा पत्रव्यवहार आहे, हवा असेल तर घेऊन जा.” त्यांचे कॉलेज कँपसमध्येच. पण आर्टस, कॉमर्स आणि सायन्स या तिन्हींची वेगवेगळी काँबिनेशनची एकूण पाच कॉलेजं अधिक बीएड, एम एड चा खिचडी असलेली एक मोठीच्या बिल्डींग आहे. त्यात चार प्रवेशद्वारे, आणि आत गेले की जाम भुलभुलैय्या!!! विचारत विचारत त्यांच्या केबिनपाशी जाऊन पोचले आणि चार चार वेळा धन्यवाद देत ते पुस्तक घेऊन आले.

अधाशासारखं आल्या आल्या लगेच वाचूनही काढलं.. आधी गोपाळराव कसे असतील, त्यांचे जीवनमान आनंदी अमेरिकेला जाण्याआधी आणि नंतर कसे असेल, अशी उत्सुकता होती.. बायकोला शिकवले, अगदी परदेशात पाठवले याचा समाजाने त्यांना त्रास दिला असेल, हेटाळणी केली असेल.. त्यात हे पडले पुरूष. स्त्री एक वेळ पुरूषाचा उत्कर्ष सहन करू शकेल, पण याच्या उलटे न होण्याचाच तो काळ. एक ना अनेक प्रश्न. वाचू लागले, मात्र आता प्रत्येक पानागणिक त्यांचा राग येऊ लागला होता.. आनंदीबाईंची पत्रे तिकडून प्रेमाची , काळजीने ओथंबलेली आणि इकडून यांची रागे भरणारी.

एकदा त्यांनी नवर्‍याला त्यांचा फोटो पाठवला, तर त्यांचे लक्ष बायकोऐवजी त्यांचे त्यांच्या उडणार्‍या पदराकडेच.
“तुमची तस्बीर बघितली, तुमच्या आणि आमच्या पितरांना स्वर्गामध्ये आनंदाच्या उकळया फुटल्या असतील ना? कुणाकडे बघून हसताय? पदर सरळ्सरळ ढळलेला दिसतोय” आणि अशीच नाउमेद करणारी वाक्ये. काय वाटले त्यांना तेव्हा? एकतर परका देश, वेगळे राहणीमान, त्यातच आपल्या नऊवारी नेसण्याच्या पद्धतीमुळे पोटर्‍या उघड्या पडायच्या, थंड हवा बोचत असे, आणि त्यात असे हे आपल्यात माणसाकडून मनावर ओरखडे!!!!

आणखी एक पत्र आठवतेय, गोपाळराव विलायतेत असतानाचे पत्र. ते अमेरिकेत होते, पण आनंदीबाई ज्या शहरात होत्या, त्या गावात नव्हते. तेव्हाचे त्यांचे ते पत्र तर अतिविषारी होते. “अमेरिकेत राहून आता तुमचे श्रीमंती चोचले चालू झाले. हे मानवत नाही, ते मानवत नाही, अमक्याने डोके दुखते, तमक्याने कळा येतात.. या चोचल्यांत माझ्यासारखा गरीब मनुष्य कुठे बसणार देव जाणे. आता माझीही तुम्हाला अडचण वाटायला लागली असेल!!!”
आणि हे कमी की काय म्हणून तुम्हाला भेटायला आल्यावर मी कसे वागावे याला उत्तर देताना त्याच पत्रात ते पुढे लिहितात, “मी स्टेशनवर उतरल्यावर इतर अमेरिकन स्त्रियांप्रमाणे तुम्ही मला आलिंगन देऊन ओष्टचुंबन देत आहात आणि इतर अमेरिकन स्त्रीपुरूष टाळ्या वाजवत आहेत, हे दृश्य माझ्यासमोर उभे राहिले. हा हिंदु संस्कृतीचा घात घालणारे चित्र आहे. मला असे थिल्लर वागणे जमणार नाही. निरनिराळे लोक आपल्याबद्दल निरनिराळे बोलतात.. तुम्हांला हे उत्तम जमेल!! कसे वागायचे हे आपण ठरवलेले असेलच!!!” अशा पत्राने नवर्‍याबद्दल प्रेम उत्पन्न होण्याऐवजी धास्तीच यायची त्याच्या विक्षिप्तपणाची. कदाचित त्यामुळेच एकदा आनंदीबाईंनी, त्या चोळीऐवजी शर्ट वापरत तेव्हा साडी शर्टाला पिन-अप करण्यासाठी पिन पाठवण्याविषयी लांबलचक स्पष्टीकरण लिहिले होते. विखार आणि डंखांनी भरलेली ती गोपाळरावांची आधीची लांबलचक आणि नंतरची त्रोटक होत गेलेली ती पत्रे. सतत त्यात कुत्सित विचार भरलेले.. त्यांची घायाळ करणारी संभाषणे वाचून तर माझ्या मनाची तडफड झाली होती.. थोडेसे चरफडतच मी ते पुस्तक संपवले.

मिपावर हळूहळू लिहायला लागले, ओळखी झाल्या. आणिक एक दिवस असाच एक वाचनवेडा मित्र भेटला. त्यालाही आनंदी गोपाळ कसे हवेय वगैरे पुन्हा एकदा रामायण सांगून झाले. माझ्या नाही, परंतु त्याच्या शोधाला यश आले, आणि एक दिवस पुस्तक माझ्या पदरात नाही, पण हातात तरी पडलेच. दुसर्‍या दिवशी काही कारणांनी कॉलेज बुडवायचे होतेच, त्यामुळे सकाळी वेळेत उठण्याची चिंता नव्हती. पहाट होता होता पुस्तक वाचून संपलंही होतं.

आतापर्यंत फक्त पुण्याच्या राजा केळकर वस्तुसंग्रहालयात तिने मैत्रिणींसोबत मिळून शिवलेली गोधडी फक्त पाहिली होती, आता तिचा सगळा जीवनपट समोर उलगडला होता. सावळ्या वर्णाची, तोंडावर देवीचे व्रण असलेली यमू, नऊ वर्षांची झाली तरी बिनालग्नाची आणि मग नंतर आलेच स्थळ म्हणून पंचविशीच्या बिजवराच्या गळ्यात बांधलेली. तो बिजवर तरी कसा? चिडखोर, हेकट आणि वि़क्षिप्त. त्याला पत्नी हवी होती लिहिता वाचता येणारी, मग घराणं अगदी रांडेचं असले तरी चालेल असे चारचौघांत बोलून दाखवण्याचा भयंकर फटकळ म्हणा किंवा तोंडाळपणा असलेला!!! त्यांना खरेतर वयाने इतक्या लहान मुलीशी करण्याऐवजी एखाद्या विधवेशी लग्न करायचे होते, पण त्यांचे लग्न झाले ते लहानग्या यमूशी. असा माणूसच सासुरवाडीच्या लोकांना धर्मांतर करेन म्हणून धमक्या देऊन बायकोस शिकवायची हिंमत करू जाणे. आणि त्यावेळेस बायकोला पायात मोजड्या घालून समुद्रकिनारी फिरायला नेण्याचा देखील!!!! पण तरीही या दोन गोष्टी माझ्या मनातल्या पूर्वग्रहाला बदलू शकल्या नाहीत. कदाचित यामागे त्यांनी लहानग्या आनंदीकडून ओरबाडून घेतलेले शरीरसुख किंवा बायको गरोदर असताना अथवा अगदी नुकतेच जन्माला आलेले मूल मेले असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून नुसता बुकांचा धोशा लावणे हेही कारण असू शकेल.

मी इंजिनिअरिंगला असताना माझ्या आसपासच्या बायका आईला म्हणायच्या, "कशाला शिकवतेस तिला??? आपण शिकवायचे आणि परक्यांचं घर भरायचं". आई अर्थातच लक्ष द्यायची नाही. आनंदीचा काळ तर खूपच जुना. अगदी १८६५चा. ती कशी शिकली असेल, असे वाटायचे. पुस्तक वाचताना कळले, तिला नशीबाने कुठल्याच प्रकारचा सासुरवास झाला नाही. पण आनंदीचे शिक्षण जरी नवर्‍याने तिच्यावर लादले असले, तरी सुखासुखी झाले नाही हे निश्चित. आई, बाबा , आजी सगळ्यांनी करता येईल इतका विरोध केला. लग्न बायकोला पुढे शिकवेन याच अटीवर झाले असले तरी, हे क्षणिक असेल आणि नंतर ते वेड जाईल अशीच सगळ्यांची अटकळ होती. ते बधत नव्हते याची शिक्षा मात्र आनंदीला जळक्या लाकडाचे चटके घेऊन भोगावी लागली. नवर्‍याचा आडमुठेपणा आणि घरच्यांचा सनातनीपणा यात तिचं बालपण मात्र भरडलं गेलं.

नवरा असा तर्‍हेवाईक, पण कुठे कुठे गोपाळरावांचे चांगले रूपही दिसत होते. एकदा ते आनंदीबाईंना म्हणतात, “आता अमुक कशाला आणि तमुक कशाला हा प्रश्न विचारायचा नाही. मी सांगेन ते वाचायचं.. जन्मभर सारखा अभ्यास करायचा. माझ्यापेक्षाही जास्त शहाणं व्हायचे.. मला येत नाहीत-कोणत्याही पुरूषाला येत नाहीत, असे विषयही शिकायचे”. त्यांनी आनंदीबाईंना वेगवेगळे विषय शिकवले, ज्ञान मिळवण्यासाठी उद्युक्त केलं, पण दुर्दैवाने स्वत:हून पंधरासोळा वर्षांनी लहान पत्नीचे मन समजून घ्यायला मात्र ते कमी पडले हेदेखिल जाणवत राहिले. त्यांनी परदेशात डॉक्टरी शिकायला जावे असे म्हणणार्‍या त्यांच्यात नंतर मात्र कली शिरला..

पुस्तकाला सुरूवात करण्याआधी बरेचसे प्रश्न होते. माझ्या त्या प्रश्नांची उत्तरे मला आनंदी-गोपाळमधून मिळत गेली. ख्रिश्चन लोक किती झाले तरी भारतीयांना समान वागणूक देणं शक्यच नाही. आता जरी कुणी परदेशात शिकायला निघाले तरी आधी सगळी चौकशी करतो, कुणी तिथे ओळखीचे भेटेल का हे पाहातो.. आनंदीसाठी सारेच नवीन. बोटीचा इतका मोठा प्रवास... आणि पत्रातून सूर जुळलेल्या मावशी. आणि नजरेसमोर एक मोठे स्वप्न-डॊक्टर बनण्याचे!!!! राहणीमानाच्या, खाणपानाच्या सवयींनी झालेला त्रास.. आणि पुन्हा चालू झालेला गोपाळरावांचा पत्रातला दुष्टपणा. एक मात्र खरं, की आनंदीबाईंमध्ये जन्मत: काही असे वेगळे करण्याची, शिकण्याची इच्छा दिसत नाही, तिला रूजवले, खतपाणी घातलं ते गोपाळरावांनी. मात्र त्यांच्या मनाचे सूर कधी जुळलेच नाहीत. आनंदीबाई हुशार असाव्यातच. नाहीतर इतके सगळे विषय घरच्याघरी तयार करणं, नंतर इंग्रजी व्यवस्थित शिकणं, परक्या भाषेतून भाषणं देणं हे आजच्या घडीला देखील सगळ्यांना जमतंच असे नाही. त्यांच्यामध्ये, विचारांमध्ये प्रगल्भता आली, जिथे गोपाळराव कधीच पोचू शकले नाहीत.

पुस्तक एकदा वाचून मन नाहीच भरलं. अजूनही कधी मनात आले की काढून वाचत बसते. कितीही नैसर्गिक, कौटुंबिक , मानसिक अडचणींतून आनंदीबाई गेल्या, स्थित्यंतरे अनुभवली, परंतु त्या स्वत:ला त्यातून समृद्ध करत राहिल्या. त्यामुळे जरी शोकांत शेवट असेल तरी मला आनंदीबाईंची प्रतिकूल परिस्थितीतही लढा देण्याची वृत्ती दुर्दम्य आशावाद देऊन जाते. आधी त्या माझ्यालेखी एक व्यक्तिरेखा, आदर्श होत्या, आता माझ्या त्यांच्याविषयी काय वाटतं ते शब्दांत नाही सांगता यायचं.. पुस्तक मिळवण्यासाठी बरीच धडपड केली होती आणि ती धडपड खरोखर यथार्थ ठरली!!!

2 comments:

S A M said...

khoop chhan lihele aahe. shaaLet asataanaa TV war hee maalikaa pahilyaacha dhusar aathawatay. Gopalraaw naawaachaa to wikshipt manushya farasaa aawaDalaa navataa evaDhach kaay te aaThawatay.

vaijayanti said...

ekhadycha janma mulatach sharirik va manasik hal apeshta sosnyasathich asto!! jase sadashivrav rav peshave anandibai joshi..puastak phar sundar aahe. pan tyanchya vedana ya pustakacha janma tyanchya yatnetun?