आता नक्की आठवत नाही.. पण नागपंचमीच्या आधीची कुठली तरी एक तिथी असायची.. सगळ्यांना पंचमीच्या उंच च उंच झोक्याचे वेध लागलेले असायचे.. पण त्याआधीच या तिथीपासून रात्रीचे खेळ चालू व्हायचे!! संध्याकाळपासूनच गल्लीतल्या बायका एकमेकींना आठवण द्यायला लागायच्या.. "आज रात्री जेवण झाल्यावर चौकात जमायचे हं!!!" मी तर पुष्कळ लहान होते .. त्यामुळे इकडे तिकडे निरोप पोचवण्याचं काम मध्ये मध्ये लुडबुड करणार्या वानरसेनेकडे आपसूकच यायचं. रात्री ९:३०-१०:०० चा सुमार झाला की एक-एक करून बायका जमू लागत.. गल्लीत हुंब्यांचे घर अगदी चौकात.. घराला ओटाही होता.. त्यामुळे ते सगळ्यांचं जमण्याचं ठिकाण.. हुंबे आजी तशा खडूस, पण यादिवसांत त्या का कोण जाणे प्रेमळ वागायच्या.. मग जाधवांच्या दोन सुना, चव्हाणांच्या घरातल्या लेकीसुना, पाटीलकाकू, झालंच तर शेजारच्या गल्लीतल्या बायका, आम्ही शाळकरी ८-१० मुली, असे सगळे जमले की जो उतमात सुरू होई तो अगदी १२ वाजले तरी संपत नसे... लोळणफुगडी... बसफुगडी... कोंबडा... पिंगा.... झिम्मा...आणि बरंच काही!!! परवा शनिवारी मराठी बाणा पाहात होते.. मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू झाला नि बरंच काही आठवत गेलं..
एकदा असेच नाचून नाचून थकलो होतो.. पण कुणालाच थांबावंसं वाटत नव्ह्तं. हुंबेआजी एकदम ओट्यावरून खाली उतरल्या. सगळ्याच दिलवाले मधे अमरिशपुरी नाचकामात आल्यावर थांबतात तशा थांबल्या. आजी येताना सुप घेऊनआल्या होत्या. आता या सुपाने कुणाला चोप देणार असं प्रश्नचिन्ह सगळ्यांच्याच चेहर्यावर!!! त्या आल्या तशा रिंगणात मध्यभागी उभ्या राहिल्या नि म्हणाल्या, "म्हणा गं पोरींनो, नाच गं घुमा”. आणि काय त्या नाचल्या, यंव रेयंव!!! एका हाताने सुप धरायचं.. निमिषार्धात तो हात सोडायचा.. सूप अधांतरी राहू द्यायचं नि ते खाली यायच्या आधी दुसर्या हाताने पकडायचं.. आणि हे करत करत स्वतःभोवती गोल गोल फिरायचं!!! दुसर्या दिवशी येताना घरोघरची सुपं बाहेर आली होती हे काय आता वेगळं सांगायला हवं???
लोळणफुगडी, बसफुगडी, साधी फुगडी नि कोंबड्याच्या स्पर्धा तर अगदी रोजच!!! आम्ही खेळणार म्हणून रस्ता अगदी चांगला झाडून, पाणी मारून तयार असायचाच. आधी जोड्या ठरत. मग एकमेकींसमोर बसून दोन्ही पायांचे तळवे एकमेकांना स्पर्श करतील अशी लांबलचक मांडी घालून बसायचं... दोन्ही हातानी दोन्ही अंगठे पकडायचे... डाव्या बाजूने असं कलंडायचं की पूर्ण पाठ जमिनीला लागली पाहिजे... नि मग धरलेले अंगठे न सोडता, कुठल्याही आधाराशिवाय उजव्या बाजूने पूर्वस्थितीत यायचं. हे खेळताना "काठवट खणा.. सातारखाना" असले काहीतरी गाणं सुरू असायचं. हे असे हात सुटेपर्यंत चालायचं.. शेवटपर्यंत जी कुणी तग धरेल ती अर्थातच जिंकायची.. (कार्यक्रम संपवून घरी आल्या आल्या मी बेडवर हे करायचा प्रयत्न केला.. कलंडले खरी, पण उठायलाच येईना. :( मग काल हॉलमधलं सगळं फर्निचर एका बाजूला सारलं, थोडी लोळायला ऐसपैस जागा केली.. नि पुन्हा प्रयत्न केला.. हुश्श!!! जमलं एकदाचं!!! एवढी काही खूपच जड नि जाड झाले नाहीय अशी मनाची समजूतपण लगेच घालून घेतली!!!!)
बसफुगडी हे लठ्ठ लोकांचं काम नोहे. ती खेळायची म्हणजे आधी चवड्यावर बसायचं...नि एकदा उजवा पाय पुढे आणिडावा पाठीमागे, आणि दुसर्यांदा डावा पुढे नि उजवा मागे, असे वर्तुळात फिरवत राहायचे.. हात आपसूक जसे पाय हलतील तसे हलतात.. हे प्रकरण मात्र लोळणफुगडीपेक्षा अवघड!!! जास्त वेळ तग नाही धरता येत.. नेहमीची फुगडी घालताना फू बाई फू म्हणतात तसे ही फुगडी घालताना "चुईफुई" अशा सगळ्याजणी म्हणायच्या.. आम्ही मुलीमुळातच वात्रट.. आम्हाला हे चुईफुई गाणं नाही आवडायचं.. आम्ही मुद्दाम मोठ्यांदा "कुईफुई.. कुईफुई" म्हणत बसायचो.. (ही फुगडी काल एकदा घालून पाहिली.. पण कुठचे काय? दोनच मिनिटात पाय दुखायला लागले.. नि हात लढाई येत नसलेल्या शिपायासारखे अंमळ जास्तच आवेशात हलत होते.. छ्या: प्रॅक्टीस नाय राहिली!!!)
फुगडीच्या स्पर्धा म्हणजे अगदी कहर!!! गाणी म्हणून, कसंही र ला र, ट ला ट लावून एकमेकींची पिंग्यातून प्रेमळउणीदुणी काढून नि कमरेचे काटे ढिले करून झाले की फुगड्यांना सुरूवात व्हायची.. सगळ्यात आधी घामेजल्या ओल्या हातांना खडू/भस्म्/माती काहीतरी लावलं जायचं, नाहीतर मग ऐनवेळी हात सुटले तर तोल जाऊन पडण्याचीच शक्यता जास्त... नि वेगात असताना हात सुटले, तर कुठे जाऊन पडेल याचा नेम नाही. फुगड्यांची गाणी आता आठवत नाहीत.. पण आधीच्या हळूहळू गिरक्या लवकरच वेग घ्यायच्या.. मग नुसत्या गिरक्यांचा पण कंटाळा यायचा.. एका जोडीतली कुणीतरी अर्धवट खाली बसून जमिनीला एक पाय नि दुसरा अधांतरी ठेवून जातं घालायला लागली, की त्या संसर्गाची लागण लगेच व्हायची. . अशावेळी मग कुणाचं जातं जास्त वेळ टिकतं याची शर्यत लागायची. जातं घालता घालता फुगडी तशीच संपवणं यात काहीच नाही.. पण जात्यातून पुन्हा फुगडीसाठी उभं राहाणं हे खरं कौशल्याचे काम!!! अजूनही कधी फुगडी घालायचं म्हटलं की मी दोन्ही आणि एका पायावर सारख्याच उत्साहाने तयार असते!!!
खेळून खेळून काकू लोक दमले तरी आमचा उत्साह उतू जात असायचा.. बसलेल्या आयांच्या मागे "चला, उठा"चं टुमणं लावलं की "जा गं, कोंबडा कोंबडा खेळा" म्हणून त्या सुटवणूक करून घ्यायच्या!!! मग काय, आम्ही कानांत वारं शिरलेल्या वासरांसारखे धूम!! एक सुरवातीची नि दुसरी भोज्जाची रेष आखायची.. सुरूवातीच्या रेषेवर पायांवर पायठेऊन बसायचं.. दोन्ही हात गुडघ्यावर एकांवर एक.. नि शर्यत सुरू... मध्येच कुणी अडखळायचं.. ढोपरं फुटायची, खरचटायचं तरीही बिल्कुल रडारड न करता पुन्हा कोंबड्याची पोज घेऊन शर्यत सुरूच र्हायची.. अगदीच चिल्लीपिली असतील ती सगळं झाल्यावर भ्वॉ म्हणून भोकाड पसरायची!!!
शाळकरी वयातल्या या गोष्टींची मजाच और होती!!! पंधरा दिवस हां हां म्हणता कसे निघून जायचे तेच कळायचे नाही.. दिवसभर शेतात, घरात काम करून थकलेल्या, नोकरी वरून आलेल्या बायकांना, दिवसभराचं हुंदाडणं जणू कमीच पडलेल्या आम्हा सर्वांसाठी ती पर्वणीच असायची.. कधी घराबाहेर न पडणार्या पाटील काकू याच दिवसांत नवर्याशिवाय बाहेर पडत. मूल नाही म्हणून खंतावलेल्या, कधी कुणाशी न बोलणार्या चव्हाण काकू याच दिवसांत हसताखेळताना दिसत.. नि नेहमी करवादणार्या हुंबेआजी नाचून थकलेल्या लेकीसुना आणि पोरीबाळींना मोठ्या प्रेमाने लिंबूसरबताचे ग्लासेस भरभरून देत असत.
आताशा नागपंचमीच्या वेळेस गांवी असणं खूप वर्षांत जमलं नाही. हुंबेआजी गेल्या... बरीच कुटुंबे काही कामाकारणाने गांव बदलून निघून गेली.. आणि हे आमचे छान रंगीबेरंगी दिवस चॅनेलच्या सुळसुळाटात हरवून गेले.
1 comment:
लहानपणी च्या आठवनी चे वर्नन फारच सुरेख केलं आहे . वाचकाला वाटते की आपण प्रत्यक्ष त्यात कुठले तरी पात्र आहोत काय? असो मी पुरुष असल्याने माघार घेतो. अप्रतीम वर्नन आहे .
Post a Comment