Wednesday, June 23, 2010

भ्रमाचा भोपळा!!!!


पुस्तक : बाकी शून्य 

लेखक:  वालावलकर कमलेश 

किंमत:  180.00 

प्रकाशक:  राजहंस प्रकाशन प्रा.लि.



मला न आवडलेलं पुस्तक म्हणजे : बाकी शून्य.
पुस्तकाचा विषय तसा सर्वश्रुत आहेच. एक तरूण, त्याचे लहानपण, पौगंडावस्था, कॉलेजजीवन नि नंतर उमेदवारीचे-नोकरीचे दिवस.. नि यात मालमसाला म्हणून कंटाळा, कंटाळ्याचा कंटाळा, दारू, भकाभका सिगरेट्स, मुली/बायका आणि त्यासंबंधीचे मुलांचे संभाषण, अर्वाच्य भाषा.. सतत येणारे 'झ'कार... आणि हे सगळं कमी की काय म्हणून निरर्थक तत्वज्ञान..
एखादे पुस्तक का आवडत नाही याची बरीच कारणे असू शकतात.. विषय न आवडणं, विषय आवडूनही त्याची मांडणी , सादरीकरण न आवडणं, भाषा न आवडणं!!!आता हे पुस्तक न आवडण्याचे कारण काय म्हणून सांगू??? काहीतरी तरी असायलाच पाहिजे.. तर पहिले आणि मोठे कारण म्हणजे: डोक्याला त्रास देणारे नि पानोपानी छळणारं तत्वज्ञान. पुस्तकभर 'भ', 'ल' ,'चु' आणि 'झ' काराशिवाय काही नाही.. तसे पाहायचं तर आत्मचरित्रपर पुस्तक आहे.. काही ठिकाणी विदारक, अत्यंत हेलाऊन टाकणारं आयुष्यात घडतही असेल, पण प्रत्येक वेळेस ते अशाच शब्दांत मांडायला पाहिजे असेच नाही.. या लेखकाला आपण का जगतोय, नोकरी का करायची वगैरे वगैरे आत्मपरिक्षणात्मक प्रश्न पडतात..ते तो सगळीकडे विचारत राहतो... पण ते विचार मांडून तो काय साधतो? काही नाही. नुसते प्रश्न उपस्थित करतो. बर्‍याचदा त्याला परिस्थितीपासून पळ काढायचाय (उदा. मृणालशी पहिल्यांदा संबंध येतात तो प्रसंग किंवा त्याला नवी नोकरी ऑफर केली जाते तो प्रसंग). बरे, ते विचार एका मार्गाने जातात का? ते ही नाही.. सगळ्या बाजूंनी घडलेल्या घटनेची कंटाळवाणी मीमांसा करत लेखक मध्येच कुठेतरी आपल्याला सोडून देतो. ठीक आहे, एखाद्याच्या मनात एकाच घटनेबाबत किती नि कसे कसे विचार येतात हेच जर दाखवायचेय, तर त्याला कधीतरी काहीतरी मानसिक बैठक तर असायला हवी. ते ही नाहीय. त्याच्या विचारातून त्याला स्वत:ला स्वतःपुरताही काहीही कधीही निष्कर्ष निघत नाही. तो स्वतःकडे काही कमीपणा घेत नाही.. काहीतरी चुकतेय पण तो चुकत नाही असे त्याला एकाच वेळी आणि नेहमीच वाटते. त्यामुळे ते सारे विचार भंपक , दांभिक, एकांगी, वरवरचे , बिनबुडाचे(आणखी कुणाकडे असले काही शब्द असतील तर उसने द्या रे..) वाटतात.
उदा. पुन्हा एकदा वरचाच प्रसंग. मृणालचा. असे घडून गेल्यानंतर एकतर अपराधी वाटेल किंवा जे झाले ते झाले, निभावून नेऊ असे वाटेल. पण यांचे त्यावरचे विचार(लग्न म्हणजे काय? लग्नसंस्था म्हणजे काय? मृणाल तिच्यावर संयम राखू शकली नाही... मग योनीशुचिता ती कसली... आणि परत असेच वाहात जाणारे शब्द) वाचून कुणाला जन्मात लग्न करण्याची इच्छा होईलसे वाटत नाही.. आणि निकिता की आणखी कोणाबरोबरच्या तरी संबंधानंतरचा निष्कर्ष म्हणजे सगळ्यावर कडी आहे.. "प्रत्येकाने लग्न करावे.. होता होईल तितके जोडीदारासोबत प्रामाणिक राहावे. शक्य नसेल तेव्हा प्रत्येकाने वेगळा जोडीदार शोधावा नि व्यभिचार करावा.. एकूणच काय बहु*वित्व ही समाजाची गरज आहे" हे वाचल्यानंतर मी कपाळावर हात मारून घेतला...
वरचा प्रकार म्हणजे मनात येणारे विचार. आता त्याचे इतरांसोबतचे संभाषण पाहू. त्याचे सगळेच मित्र दिसणार्‍या बायकांच्या अवयवांबद्दल बोलतात. काही नुसतेच संबंध ठेवण्याबाबत बोलतात, काहींची संबंध ठेवण्यापर्यंत मजल जाते, आणि ते त्या बायका शेअर करायलाही तयार असतात. बाकी राहिलेले संभाषण म्हणजे, उगीच अश्लाघ्य भाषेत समोरच्याला प्रश्न विचारले की तो पुढे काही बोलत नाही अशा छापाचे आहे.. असे बोलले की ऐकणाराच कानकोंडा होतो.. काही उत्तर देत नाही. मग हा असाच सारखा बोलत राहातो. उदा. त्याला मनःशांतीसाठी कुणीतरी गाईला नमस्कार करायला सांगतो.. मग हा विचारतो," ती गाय नैसर्गिक विधी करत असेल तरी करायचा का?" उत्तर हो येते. मग म्हणतो, "गायच कशाला हवी? आपल्या संस्थानाचा हत्ती फळाफळा मुतत आणि फदाफदा हगत गांवभर उंडारत असतो, त्यालाच नमस्कार करतो.." समोरचा यावर काय बोलणार, कप्पाळ? तो निश्चितच गप्प बसतो. असे झाले की मग लेखकाला कंटाळा येतो.. मग कंटाळ्याचाही कंटाळा येतो.. मग तो भसाभस सिगरेटी फुंकतो नि दारू ढोसतो.. ही जर कंटाळ्याची, दारू सिगरेटची तत्त्वज्ञानाची, भ/झ/ल/चु काराची वाक्ये पुस्तकातून काढली, तर पाचशेवीसातली दहा पानेही शिल्लक राहणार नाहीत..
स्वतःच्या देखणेपणाचं कौतुक तर सगळीकडे ओसांडून वाहतं. माणून पहिले आणि आत्यंतिक प्रेम स्वतःवरच करतो हे जरी मान्य असले तरी, किती म्हणून कौतुक ते करायचे? आणि म्हणून पुस्तकात उल्लेख केलेल्या प्रत्येक मुली/अथवा बाईला याच्याकडून शरीरसंबंधाची इच्छा असते.(यात तो पाचवीत असतानाची एक सातवीतली शेजारीण येते, त्याची चुलत की मावस अशी बहीण येते नि बाकी भेटलेल्या निराळ्याच.) एक दोघी असतील एक वेळ पटलं असतं.. पण प्रत्येकजण???? कठीण आहे. आणि हो, त्या ते बिन्धास्तपणे बोलूनही दाखवतात.. बर्‍याचजणी त्याच्याकडून ती इच्छा पूर्ण करूनही घेतात. अपवाद फक्त एकच, निशा. कारण तिच्यावर हा एकतर्फी लाईन मारत असतो आणि तिच्या खिजगणतीतही नसतो.
भाषेच्या पलीकडे जाऊन थोडासा विचार केला. एका तरूणाच्या जीवनात काय काय घडू शकतील असे प्रसंग(काही अतिशयोक्तीपूर्ण सोडले तर) आहेत. पण कोसला पार्ट-टू म्हणण्याइतके यात काही आहे असे मात्र वाटत नाही. आणि कितीही प्रयत्न केला, तरी वरती लिहिले आहे त्या पलीकडे काही सापडत नाही.. लेखकाचा मुख्य प्रॉब्लेम काय आहे हेच कळत नाही.. कंटाळा?? बायका???? ध्येय सापडत नाही??? जग मिथ्या आहे??? जाऊ दे.. त्याचे त्यालाच माहित नाही तर मी का डोके खपऊ???
लेखकच्याच भाषेत सांगायचे झाले तर पुस्तक वाचून डोक्याची झेडझेड झाली..
(खरंतर पुस्तक वाचून माझा शब्दकोष बराच समृद्ध झाला.. या पुस्तकाबद्दल त्याच भाषेत लिहावे असेही एकवेळ वाटले होते.. पण आपण एक आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतली, त्यात इथल्या वाचकांचा दोष काय , म्हणून तो विचार बाजूला ठेवला.. Smile )

8 comments:

Suvarna said...

Pustakache navach Baki Shunya ahe. Self explainatory.

हेरंब said...

अरेरे एवढं भयंकर आहे हे पुस्तक? बर्‍याच जणांकडून ऐकलं होतं हे पुस्तकं कसं आणि किती चांगलं आहे त्याबद्दल. म्हणून पुढच्या भारत दौर्‍यात विशलिस्ट मध्ये टाकलं होतं. आता काढून टाकतो. असंच एक पुस्तकं रत्नाकर मतकरी यांचंही आहे. हाच विषय थोडीफार हीच भाषा. पुस्तकाचं नाव 'अ‍ॅडम' (Self explainatory.)

Unknown said...

माझी या पुस्तकाची "worst books of century" मध्ये समावेश करण्याची तयारी आहे.

Swati..... The self-moving one said...

@ हेरंब, मला नवीन पुस्तक मिळाले नाही.. जे मिळाले, त्याची पाने जुनाट-पिवळी पडली होती.. नंतर काही पाने वाचल्यावर पिवळं पुस्तक म्हणजे असलेच असते का हा प्रश्न पडला मला!!! चांगले ३००+ पानांचे पुस्तक आहे.. त्यामुळे इतका वेळ वाया घालवायला असेल, तरच वाचा.

@नितीन,
मनातले बोललात!!!!

प्रभाकर कुळकर्णी said...

स्वाती,
तुझ्या प्रोफ़ाईल मधे एक चुक आहे वाटते .

तुझ्या नावा बद्दल तु ईन्ग्रजी मधे काही तरी लिहिले आहे त्या आधी तुला ईन्ग्रजी मधे " संस्कृत " म्हनायचे आहे का ? का मीच चुकत आहे आणि तु जे स्पेलिंग लिहिले आहे तेच बरोबरच आहे?

प्रभाकर कुळकर्णी said...

मी पहिल्यांदाच ही साईट विजिट करतोय . एक मुलगी असे पुस्तक वाचत त्यावर एव्हढी मोठी बिन्धास्त पणे पोस्ट लिहिते ह्याचे आश्चर्य वाटते. दुसरी एक बाई टीप्पणी पन करत आहे. जर अश्या शिव्या पुस्तकात आहेत तर तर ते कसले पुस्तक . तेही मुलगी ते वाचते आणि त्यावर एव्हढं सवीस्तर लिहिते. मला कळायच्या पलीकडचे आहे. मी कळवुन घ्यायचा प्रयत्न पन करनार नाही. बाकी बरेच जे प्रकार मला माहीत नाहीत ते माहीत पडत आहेत ह्या ईन्टरनेट मुळे. सगळंच धन्य आहे रे बाबा !!! आता हे कोसला काय आहे रे बाबा?

आळश्यांचा राजा said...

तुमचं वाचन भरपूर दिसतंय. या पुस्तकावर एवढा विचार करण्याच्या लायकीचं तुम्हाला वाटलं हेच आश्चर्य आहे. लेखक मला माहिती होता, खूप बुद्धीमान आहे. म्हणून वाचलं. मी त्यातली शंभरेक पानं तर स्किप करतच वाचलं कसंबसं. अगदी बोर झालो, दुसरं काहीच नसताना वाचायचो. महिना लागला मला संपवायला.

S A M said...

malaa he pustak prachanD aawaDala.